बांद्रा वेस्ट- १२

Submitted by मिलिंद महांगडे on 10 November, 2020 - 12:13

बांद्रा वेस्ट- १२

वैनीसाहेब बराच वेळ फोनवर बोलत होत्या.  एका हातात पिस्तुल आणि दुसऱ्या हातात फोन घेऊन बोलत बोलत फिरत होत्या.  तो फोन झाल्यावर त्यांनी आणखी दोन जणांना फोन केले.  रॉड्रीक आणि मॉन्ट्याला काही कळेना . ते तसेच उभे राहीले पुढच्या आदेशाची वाट पहात… त्यांचे फोन झाले.  पुन्हा त्या ह्या दोघांच्या समोर उभ्या राहील्या.  दोघांनाही पुन्हा एकदा बारकाईने न्याहाळलं. 

" सत्तु .... ह्या दोघांना बाजुला घे. आणि गाडीत बसव... चला रे बसा जाऊन त्या गाडीत. " वैनीसाहेबांनी हुकुम सोडला. दोघेही पुन्हा गाडीत जाऊन बसले. 

" आयला ,  हे काय चाललंय ?  काहीच कळत नाही... " 

" आत्ता तो फोन आला म्हणुन वाचलो आपण   " 

" नो.... आय थिंक सिच्युएशन विल बिकम वर्स्ट.... " 

" का ...?  कशावरुन   ?  " 

" तिला फोन आला होता ना मघाशी.  त्यात ' दोन ' असं काहीतरी ती म्हणाली.  मे बी आपल्या दोघांबद्दल असावं काहीतरी. " रॉड्रीक चिंताग्रस्त दिसत होता. आधीच ती नोट हाती लागता लागता निसटली होती. आणि आता हे वेगळ्याच प्रकरणात ते अडकलेले होते. त्यातुन सुटण्याचा एकच मार्ग होता,  तो म्हणजे स्वतः वैनीसाहेबांनी त्याची सुटका करणे आणि तुर्तास ते काही शक्य दिसत नव्हतं. 

 " नाय रे,  मला नाही तसं वाटत. पण एक गोष्ट बरी झाली,  ती ह्या लोकांना आपल्याकडच्या पैशांबाबत तु कळु दिलं नाहीस. " मॉन्ट्या हळु आवाजात त्याला म्हणाला.  

" साल्या कानाजवळुन गोळी गेली माझ्या.! फुल फाटली होती माझी.! "

" तेच तर... ब्रेव्ह मॅन...! पण,  आता काय करतील रे हे लोक...?  " 

" डोंट नो यार.... माझं तर डोकंच काम करत नाही " रॉड्रीक डोकं धरुन बसला. दोघेही थोडावेळ असेच गाडीत बसुन राहीले.  कुणालाही काहीच सुचत नव्हतं. थोड्या वेळाने मॉन्ट्या म्हणाला,  " आयला,  नोट पाहीलीस तु  पण बॅड लक खराब आपलं...! "

" हं... यु आर राइट,  आता ती कुठे असेल गॉड नोज.... आपण परत तिथेच आलो जिथुन सुरुवात केली होती. आता आपल्याकडे दुसरा कुठला क्लु पण नाही. मला वाटतं की ती नोट आपल्या हातुन गेली. " रॉड्रीक कसनुसं तोंड करुन म्हणाला. 

" बी पॉजीटीव्ह यार…! मागे आपण जास्त काही माहीती नसताना त्या नोटेपर्यंत पोहोचलो होतो. आताही तसंच होईल.  ती नोट नक्की सापडेल " मॉन्ट्या त्याला धीर देत म्हणाला.  

" आधी इथुन नीट सुटलो पाहीजे. हे लोक चांगले दिसत नाहीत.  आय डोंट ट्रस्ट देम. ते काय करतील ह्याचा भरवसा नाही .  " रॉड्रीक गाडीच्या खिडकीबाहेर त्या गुंडांच्या टोळीकडे पहात म्हणाला.  तिकडे वैनीसाहेब आणि त्यांचा विश्वासु ड्रायवर बाजुला जाऊन बोलत होते.  काहीतरी गंभीर चर्चा चालली होती. 

" काहीतरी प्लॅन चाललाय ह्यांचा.  " रॉड्रीक म्हणाला.  

" आपल्याबद्दल असेल काय  ?  " मॉन्ट्या घाबरत म्हणाला.  

" पॉसीबल.  नायतर आपल्याला कशाला बसवलंय इथे.! " रॉड्रीक नकारार्थी मान हलवत म्हणाला.  तो हे बोलत असतानाच बाहेर गडबड ऐकु आली.  त्यांनी पाहीलं तर अस्लम आणि शौकतला पुन्हा दुसऱ्या गाडीत बसवत होते. 

"  अरे ह्यांना कुठे घेऊन चालले..?  " मॉन्ट्या आश्चर्याने म्हणाला. 

" डोन्ट नो . आपण बेकार लटकणार असं वाटतंय.  " 

" आयला,  आपला काही संबंध पण नाय यार... एंचोद ! घेना ना देना अन् कंदिल घेऊन येना .... " मॉन्ट्या चांगलाच वैतागला होता.  ज्यांनी त्यांचे पैसे खाल्ले त्यांना सोडुन ह्या दोघांना  फुकटच पकडलं होतं. आणि उगाचच थांबवुन ठेवलं होतं. आणि ह्याचच कारण दोघांनाही समजत नव्हतं. चोर सोडुन संन्याशाला फाशी देणे ह्या म्हणीचा ते पुरेपुर अनुभव घेत होते. त्यांनी समोर पाहीलं,  अस्लम आणि त्याच्या भावाला घेऊन पुढची गाडी निघुन गेली.  आता त्या अंधारात वैनीसाहेब,  सत्तु आणि आणखी तीन गुंड राहीले. वैनीसाहेब आणि त्यांच्या त्या विश्वासु ड्रायवरने आणखी थोडा वेळ चर्चा केली.  काहीतरी ठरवुन ते दोघेजण गाडीपाशी आले. गाडीचे पुढचे दार उघडुन दोघेही आत बसले.  बसल्या बसल्या वैनीसाहेबांनीच सुरुवात केली. 

" हे बघा... आम्ही असा विचार केलाय की तुम्हा दोघांना सोडुन द्यायचं. " हे वाक्य ऐकताच रॉड्रीक आणि मॉन्ट्याच्या चेहरा एकदम  उजळला.  एखाद्या कैद्याची जन्मठेपेची शिक्षा माफ झाल्यावर त्याला जसा होईल त्याप्रमाणे त्यांना आनंद झाला.  " पण.... " ह्या  ' पण ' वर वैनीसाहेब थांबल्या .  दाताखाली खडा सापडावा तसा हा ' पण ' दोघांना वाटला. " तुम्हाला आमचं एक काम करावं लागेल. ते काम केलंत की तुम्ही मोकळे. " वैनीसाहेबांनी प्रस्ताव समोर ठेवला.  पण तो प्रस्ताव नाकारण्याचं स्वातंत्र्य मात्र त्यांना नव्हतं. 

" कसलं काम आहे...?  " रॉड्रीकने जराशा संशयानंच विचारलं. कारण काम साधंसुदं नसणार याची त्याला खात्री होती. 

" काम अगदी सोप्पं आहे. फक्त एक वस्तु एका ठिकाणी पोहोचवायची आहे. " वैनीसाहेब सहज म्हणाल्या.  

" कसली वस्तु  ?  " मॉन्ट्याने विचारलं. 

वैनीसाहेबांनी एकदा दोघांकडेही पाहीलं,  अन् म्हणाल्या,  " कोकेन "

क्रमशः

https://kathakadambari.com

माझी अर्धदशक  नावाची कादंबरी वाचण्यासाठी खाली लिंक दिली आहे

https://www.mehtapublishinghouse.com/book-details/ARDHADASHAK/3048.aspx

Amazon link

https://www.amazon.in/Ardhadashak-Milind-Mahangade/dp/9353174163/ref=sr_...

Flipkart Link

https://www.flipkart.com/ardhadashak/p/itm7149b4896e81d?pid=978935317416...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users