काय फायदा? (गजल)

Submitted by मिल्या on 17 December, 2007 - 00:04

आज पौर्णिमा नभात काय फायदा?
चांदणे नसे मनात काय फायदा?

वेचला मरंद तू जरी फुलांतुनी
वाटलास ना कुणात! काय फायदा?

पोटचे विकूनही न पोटभर मिळे
जन्म देउनी जगात काय फायदा?

चंद्र, चांदण्या खुडून आणशीलही
भाकरी न जर पुढयात काय फायदा?

दात आपलेच आणि ओठ आपले
गप्प बैस! बोलण्यात काय फायदा?

धावशील शर्यतीत जिंकण्यास तू
अडथळा ठरेल जात! काय फायदा?

शोधलेस नीट तर तुला मिळेलही
नजर ती न जर तुझ्यात काय फायदा?

ज्यात त्यात पाहतात फायदा सदा
राहुनी अश्या जनात काय फायदा?

तळटीप : वैभव च्या सुचनेनुसार काही बदल केलेले आहेत... वैभवा खूप धन्यवाद

गुलमोहर: 

मिल्या मस्त गझल, सगळेच शेर छान आहेत.

हे तर खासच

दात आपलेच आणि ओठ आपले
गप्प बैस! बोलण्यात काय फायदा?

ज्यात त्यात पाहतात फायदा सदा
राहुनी अश्या जनात काय फायदा?

सुधीर

मिल्या, बहुत खूब.

"वेचलास मरंद तू जरी फुलांतुनी
वाटलास ना कुणात! काय फायदा?" इथे एडिटायला हवंय. (मकरंद)

"शोधलेस नीट तर तुला मिळेलही
नजर ती न जर तुझ्यात काय फायदा?" क्या बात है. सहीच लिहिलय. लई आवडलं.

ओह, मला माहित नव्हतं. सॉरी, मिल्या.

श्यामले थँक्स, शब्दसंग्रहात भर टाकलीस.

दात आपलेच आणि ओठ आपले
गप्प बैस! बोलण्यात काय फायदा?

क्या बात है!!

वा! मिल्या... मस्त गझल!! आवडली.

मिल्या सहिच रे!!!
एक प्रश्नः
आज पौर्णिमा नभात काय फायदा?
चांदणे नसे मनात काय फायदा?

यात ' चांदणे नसे मनात काय फायदा' चा अपेक्षित अर्थ कळला नाही...
म्हणजे पौर्णिमेचा चंद्र नभात असूनही मनात मात्र त्याचा प्रकाश नाही मग काय फायदा असं म्हणायचं असेल तर
मग ' आज पौर्णिमा नभात काय फायदा?' याचा अर्थ लागत नाही.

चु. भू. द्या. घ्या.

नजरेचा श्लेष आवडला..

पोटचे विकूनही न पोटभर मिळे
जन्म देउनी जगात काय फायदा
हा सर्वात जास्त आवडला....

सुधीर, मंजू, मयुर, देवा : खूप सारे धन्यवाद तुम्हाला
मंजू श्या. म्हणते ते बरोबर आहे.. खुद्द गुरुजींनी सुचवलेला शब्द आहे तो Happy
श्या. गझल कशी वाटली ते नाही सांगितलेस पण?

देवा : 'चांदणे नसे मनात ' चा तू सांगितलेला अर्थ बरोबर आहे... उला मिसरा फक्त सूचक आहे. त्यात पोर्णिमेचा काही फायदा नाही ही खंत व्यक्त होत आहे पण का फायदा नाही? ह्याचे स्पष्टीकरण सानि मिसर्यात आहे... ती खंत जास्ती अधोरेखीत होते सानि मिसर्यात..
पटतेय का बघ?..

अर्थात सुधारणेला वाव आहेच.. काही चांगले सुचले तर जरूर सांग...

आणि तुला अवघड रदीफ म्हणायचेय का? कारण काफिये तर नेहमीचेच आहेत... वेगळे असे काही नाही...

http://milindchhatre.blogspot.com

एकदम सही लिहिले आहे.

मस्तच आहे.

मिल्या.. रदिफच रे..:)

सानी आणि उला मिसर्‍यात दोन्हीमध्ये काय फायदा आल्याने, दोन्ही मिसर्‍यांना स्वतंत्र अर्थ पाहिजे असं वाटत रहातं बाकी काही नाही..
पण पहिल्या शेरात हे स्वातंत्र्य घेता येत नाही.. त्यामुळे मला तरी दुसरं काही सुचत नाहिये..:)

मिल्याभाऊ, मस्तं गजल. चंद्र चांदण्या, अडथळा आवडले.

आज पौर्णिमा नभात काय फायदा?
चांदणे नसे मनात काय फायदा?
गा ल गा ल गा ल गा ल गा ल गा ल गा

एक प्रश्न आहे.... वेचलास मरंद तू जरी फुलांतुनी
ह्यात मात्रांनी जरा गुटली खाल्लीये का? 'वेचला' हवय का?
(नसेल तर सपश्येल मापी करा...)

पल्लवी, असमी, चिनु, दाद : धन्यवाद

दाद बरोबर पकडलेस.. तो typo होता गं. चूक दुरुस्त केली आहे... निदर्शनास आणून दिलेस ते बरे केलेस...

http://milindchhatre.blogspot.com

मिल्या,सही आहे रे गझल... सध्या अगदी गझलमय झाला आहेस वाटतं.. Happy
गुर्जींनी गझल कार्यशाळा घेऊन बर्‍याच जणांना गझल लिहायची प्रेरणा आणि आत्मविश्वास दिलाय हे पाहुन छान वाटतय.. Happy

Good one re Milya !!

परागकण

मिल्या एकदम जबरी झालीये रे......... !! मला तो "काय फायदा" हा रदीफ (रदिफच ना रे?) भयंकर आवडला.

मस्त जमली आहे गझल!
-अश्विनी

खुप् च च।ग ले लिह ले आहे , सरवेच विशय। चा सम। वे श होत् आहे
व।चुन मज। आलि . गणॅश

नमस्कार...हा माझा पण पहिला प्रयत्न.....

ओढाळ स्पर्शात सारे श्वास गंधीत होती
ओठात ओठ विरघळत मौनात गीत गाती

हात हाती येता वचने सारी सुखावली
ही तुझी हार पण त्यांची जीत होती

अंतरे दुराव्यातली मिठीत हरवुन गेली
मनी चांदण्याची लाघवी प्रीत होती

हळुवार मान तुझी खांद्यावरी विसावली
उरी लांटांची भरती उसळीत आली

न मी माझा राहिलो न तुझी तु राहिली
मनी मोरांची रास थिरकत गेली

सुखावर तरंगत रात सारी झिंगली
डोळ्याच्या पापणीची ही काय रित होती?

आर्तता काळजातली अशी वाढत गेली
स्पर्शाने तिचिया कळ कापित गेली

कळाची आवर्तने स्तब्ध कोठुनी झाली
घटिका ती विरहातली काय आक्रित होती?

मला गझलमधलं ते सानी, मिसरा,मात्रा कळत नाही.
पण ही गझल भावली हे नक्की. मस्त...:)

शोधलेस नीट तर तुला मिळेलही
नजर ती न जर तुझ्यात काय फायदा?

ज्यात त्यात पाहतात फायदा सदा
राहुनी अश्या जनात काय फायदा?

सह्हीच आहे Happy

आज पौर्णिमा नभात काय फायदा?
चांदणे नसे मनात काय फायदा?

वेचला मरंद तू जरी फुलांतुनी
वाटलास ना कुणात! काय फायदा?

हे शेर माझ्या स्टाईलचे...खूप आवडले..

चंद्र, चांदण्या खुडून आणशीलही
भाकरी न जर पुढयात काय फायदा?

हा पण मस्त.. दुस-या ओळीत धक्का

पोटचे विकूनही न पोटभर मिळे
जन्म देउनी जगात काय फायदा?

आह !!

Pages