बांद्रा वेस्ट- ११

Submitted by मिलिंद महांगडे on 7 November, 2020 - 11:22

बांद्रा वेस्ट- ११ Bandra West- 11

” चल रे ए , गाडीत बस… चल. ! ” सत्तु मागुन रॉड्रीक आणि मॉन्ट्याला ढकलत होता. ते दोघे मुकाट्याने सुमोमधे मागच्या बाजुला जाऊन बसले. करायला विरोध करु शकले असते पण, त्याचा फारसा काही उपयोग झाला नसता. त्या दोघांनी मिळुन जरी त्याचा सामना केला असता तरी सत्तु केव्हाही त्यांना भारीच पडला असता. आणि शिवाय त्याच्या कमरेला असलेलं पिस्तुल मघाशीच त्या दोघांनी पाहीलं होतं. बाकीच्या दहाबारा गुंडांसमोर ते काय करु शकणार होते. तेव्हा शांत रहाणेच शहाणपणाचे होते. काय शोधायला आले होते आणि कशाचं काय होऊन बसलं. आसमान से गिरे और खजुरमें अटके, असं काहीसं झालं. आता त्यांना कुठे घेऊन जाणार होते, त्यांच्यासोबत काय करणार होते हेही त्यांना माहीत नव्हतं. काहीही झालं तरी ती पापा खडांगळे ची गँग होती. त्यांचा काहीच भरवसा नव्हता. ह्या दोघांचा काही संबंध नसतानाही ते नाहक ह्या अस्लम, शौकत आणि वैनीसाहेबांच्या प्रकरणात अडकले गेले. अस्लम आणि शौकतला दुसऱ्या गाडीत मागे बसवण्यात आलं. वैनीसाहेब पुढच्या सीटवर बसल्या. त्यांच्या बाजुला तो मघाशी त्यांच्या कानात काहीतरी कुजबुजणारा माणुस ड्रायविंग सिटवर बसला. मधल्या सीटवर त्यांचे राहीलेले आणखी काही गुंड बसले. सत्तु मात्र रॉड्रीक आणि मॉन्ट्यासमोर मागेच बसला.

” वैनीसाहेब, आमचा काही संबंध नाही हो त्या दोघांशी… प्लीज आम्हाला सोडा. ” मॉन्ट्याने आणखी एकदा समजावण्याचा प्रयत्न केला. वैनीसाहेबांनी एकदा मागे वळुन पाहीलं. त्यांच्या नजरेत असं काही होतं की त्याने मॉन्ट्या आपोआप शांत बसला. ड्रायवरने गाडी सुरु केली.

” मॉन्ट्या, मला ती नोट दिसली मघाशी. ” रॉड्रीक अत्यंत हळु आवाजात त्याला म्हणाला.

” काय…? ” तो जोरात ओरडला. सत्तुने त्याच्याकडे रागाने पाहीलं. ” सॉरी …. सॉरी … ” म्हणत त्याने लगेच माफी मागुन टाकली. सत्तु बाहेर बघु लागल्यावर मॉन्ट्याने रॉड्रीकला हळु आवाजात विचारलं “तीच नोट होती का? , अरे मग उचलली का नाहीस? ”

” कसा उचलणार …? ” असं म्हणुन त्याने सत्तुकडे पाहुन खुण केली.

” शिट…! ” मॉन्ट्याही हळहळला. ती नोट समोरच पडली होती, पण ह्या गुंडांमुळे काहीच करता येत नव्हतं. त्यांना कळालं असतं तर काय झालं असतं ह्याची कल्पनाच न केलेली बरी. परंतु रॉड्रीक मनातुन खुपच चरफडत होता. हातातोंडाशी आलेला घास निसटला होता. आता काहीच फायदा नाही. त्यांच्या गाड्या वांद्रे वरळी सी लिंकच्या हायवेवरुन आतल्या रस्त्याकडे वळाल्या. रॉड्रीकने घड्याळात पाहीलं , रात्रीचा दिड वाजला होता. आतल्या रस्त्याला गाड्यांची वर्दळही फारशी नव्हती. रिक्लेमेशन ओलांडुन गाड्या समुद्राच्या दिशेने जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावरुन जाऊ लागल्या. माहीमच्या खाडीपाशी दोन्ही गाड्या येऊन थांबल्या. बाजुलाच खाडीच्या घाणेरड्या पाण्याचा दुर्गंध येत होता. गाड्यांचे हेडलाईटस् बंद झाले तसं पुढचं काहीच दिसेना. तिथे बराच अंधार होता. ‘ आपल्याला शहरापासुन दुर ह्या अंधारात कशासाठी आणलं असेल ?’ रॉड्रीक विचार करु लागला.

” चला रे उतरा … ए शाणे उतर निचे . क्या बारात में आया है क्या ? ” पुढच्या गाडीतले गुंड अस्लम आणि शौकतवर खेकसले. ते दोघे अपराध्यासारखे हात जोडुन बाहेर आले.

” तुम्ही दोघं, इथंच बसुन रायचं… पळालात तर कुठं गोळी घालीन माहीतीए ना….! ” असं म्हणुन सत्तुने मॉन्ट्याच्या पार्श्वभागाकडे पिस्तुल नेली.

” ना… ना.. नाही . आम्ही कुठंच जाणार नाही पळुन … ” मॉन्ट्या कसाबसा बोलला. सत्तु मागच्या दरवाज्याने बाहेर आला. आणि खाडकन दरवाजा लावुन घेतला. रॉड्रीक आणि मॉन्ट्या समोर पाहु लागले. अस्लम आणि शौकतला खाडीच्या बाजुला उभं केलं. वैनीसाहेब त्यांच्या समोर येऊन उभ्या राहील्या. रात्रीच्या शांततेत त्यांच्या बोलण्याचा आवाज स्पष्टपणे रॉड्रीकच्या कानावर पडत होता.

” काय प्रॉब्लेम आहे ? मी काय भिकारी आहे तुमच्याकडे सारखे सारखे पैसे मागायला ? ” वैनीसाहेब कडाडल्या.

” वैनीसाब, आपको किसीने गलत बात बोली है…। हम क्यों आपका पैसा डुबाके भाग जाएंगे. ? बस थोडीसी मोहलत देदो । ” शौकत गयावया करु लागला.

” मला आता माझा पैसा नकोय… तुम्हारी जान चाहीए । ” वैनीसाहेब त्यांच्यावर पिस्तुल रोखुन म्हणाल्या.

” मेरेको मारके आपको क्या मिलेगा …? आप मुझे सिर्फ एक हफ्ता …. ” शौकत हे बोलत असतानाच … ‘ठांय… ‘ वैनीसाहेबांच्या पिस्तुल मधुन गोळी सुटली. त्याच्या ध्यानीमनीही नव्हतं की असं काही होईल. त्यांच्या पिस्तुलातुन जाळ निघत असलेला त्याला दिसला …. क्षणभरच…! ती गोळी शौकतच्या खांद्याला चाटुन गेली. त्या धक्क्याबरोबर तो उडुन तीनताड मागे फेकला गेला.

” आयचा घो… अरे शुट केला तिने….! ” मॉन्ट्याच्या तोंडातुन अस्फुटशी किंकाळी बाहेर पडली.

” ओह.. जीजस ..! ” रॉड्रीकही समोर डोळे विस्फारुन पहात राहीला. ते दोघे गाडीत बसुन हा सगळा प्रकार पहात होते. दोघांनाही दरदरुन घाम फुटला. अस्लमला प्रथम काय झालं ते समजलंच नाही. शौकत मागे उडुन पडल्यावर तो भानावर आला. ” शौकत….! ” मागे पडलेल्या त्याच्या भावाकडे पाहुन तो जोरात ओरडला. त्याला सावरण्यासाठी तो धावला, शौकत वेदनेनं कळवळु लागला. त्याच्या डाव्या खांद्यातुन रक्ताची धार लागली होती. संपुर्ण डावा हात रक्तबंबाळ झाला. त्याला दोन्ही हातांनी पकडुन अस्लम जोरजोरात रडु लागला.

” चल ए. , नौटंकी बंद कर भाड्या …. ” वैनीसाहेब ओरडल्या, ” सत्तु त्याला बाजुला घे… ” वैनीसाहेब खरोखरच निर्दयी बाई होती. तिला समोरच्या माणसाच्या दुःखाबद्दल जराही कणव नव्हती. तिने तसंच अस्लमला उभं केलं आणि त्याच्यावर पिस्तुल रोखली . तो तसाच रडतरडत हात जोडुन उभा राहीला.

” बोल…. तुझं काय करायचं …? “

” वै… वैनीसाब… भगवान के लिये मुझे छोड दो । मै अपना झोपडा बेचके आपका पैसा चुका दुंगा । मुझपर यकीन करो । ” असं म्हणुन तो ढसाढसा रडु लागला. त्याच्या समोरच त्याच्या भावाला गोळी मारल्याने त्याचं डोकं सुन्न झालं होतं. इकडे रॉड्रीक आणि मॉन्ट्याची चांगलीच तंतरली होती. समोरची बाई फुल सायको आहे आणि ती पिस्तुल चालवायला बिलकुल मागेपुढे पहात नव्हती.

” कितने दिन में लौटाएगा ….? ” वैनीसाहेब म्हणाल्या

” एक हफ्ते में…. मैं कसम खाता हुं…! ” अस्लम रडत रडत म्हणाला.

” ठिक है… त्या दोन चिकन्यांना घेऊन या रे… ” वैनीसाहेबांनी आदेश सोडला आणि लगेच दोन जण रॉड्रीक आणि मॉन्ट्याला त्यांच्यासमोर घेऊन आले.

” तुमचं काय …? ” वैनीसाहेब वैतागलेल्या सुरात म्हणाल्या.

” आ…. आमची काहीच चुक नाही वैनीसाहेब. आम्ही फक्त ह्या रिक्षावाल्याकडुन आमचे राहीलेले पैसे घ्यायला आलो होतो. आमचा त्याच्याशी काहीच संबंध नाही. मी तर त्याला ओळखतही नाही. ” रॉड्रीकचे पाय खाली लटपटत होते. थोड्याच वेळापुर्वी त्याने समोरच्या बाईला पिस्तुल चालवताना पाहीलं होतं आणि आता तो स्वतः तिच्यासमोर आरोपीच्या पिंजऱ्यात उभा होता त्यामुळे त्याचं घाबरणं सहाजिकच होतं. मॉन्ट्याचीही अवस्था काही वेगळी नव्हती.

” काय रे … खरं आहे का हे …? ” वैनीसाहेब अस्लमकडे पाहुन रॉड्रीकच्या उत्तराची पडताळणी करु लागल्या.

” हां … उनका एक दस रुपयका नोट आया था कल रात मेरेपास … वही लेने आए थे ये दोनो… ” अस्लम असं म्हणाला आणि रॉड्रीकने मनातल्या मनात कपाळाला हात लावला. जे सांगायचं नव्हतं तेच हा रिक्षावाला बोलुन मोकळा झाला होता. भर सागरात होडीला भोक पडल्यावर होईल तशी अवस्था झाली. आता पाणी आत आल्यावाचुन रहाणार नव्हतं. रॉड्रीक फटाफट विचार करु लागला. तेवढ्यात समोरुन अपेक्षीत प्रश्न आलाच !

” दस रुपय का नोट…? अशी तुला काय भिक लागली होती की फक्त दहा रुपयासाठी तु हया लुख्ख्याकडे आला ? ” वैनीसाहेब आश्चर्य व्यक्त करत म्हणाल्या.

” उस नोट के बदले पाचसौ दे रहे थे तो इसीलीए मै इनको शौकत के पास ले आया क्योंकी…. ” तो अजुन बरंच काही बोलणार होता पण वैनीसाहेबांनी हात उंचावुन त्याला शांत केलं. आता त्या एकटक रॉड्रीककडे पाहु लागल्या. रॉड्रीक त्यांच्या नजरेला नजर देऊ शकला नाही त्याने नजर दुसरीकडे वळवली. अस्लमने तर सगळ्या होडीला भोके पाडुन ठेवली आता वाचण्याचा मार्ग दिसत नव्हता.

” ए हिरो… काय ते नीट खरं खरं सांगायचं… ” वैनीसाहेबांची अनुभवी नजर त्याच्यावर रोखली होती. आता काय करावे ? रॉड्रीकच्या डोक्यात वेगाने चक्रे फिरु लागली. काय खोटं सांगितलं तर समोरच्या बाईला ते पटेल ह्याचा तो विचार करु लागला. कारण खरं सांगितलं तर सगळंच मुसळ केरात जाईल… आपली सगळी संपत्ती हे लोक लुटतील ह्या विचाराने तो आतुन कासावीस झाला. त्या विचारातच असताना ‘ ठांय ….! ‘ असा मोठ्ठा आवाज झाला. त्या आवाजानेच तो दचकला. रॉड्रीकला त्याच्या उजव्या कानाजवळुन काहीतरी गरम, वेगवान गेल्याचं जाणंवलं. गोळी त्याच्या कानाच्या दोन इंच दुरुन गेली होती.

” ओह जिजस्… माय डॅड हॅड गिव्हन मी दॅट नोट ! .. ती नोट लकी होती माझ्यासाठी… पण ती नोट गेली माझ्या वडीलांची शेवटची निशाणी होती ती नोट. त्यांनी मरणापुर्वी दिलेली, त्यांची शेवटची आठवण होती ती माझ्यासाठी …! ह्या रिक्षावाल्याने ती घालवली. ” त्या पिस्तुलाच्या गोळीने आपले काम चोख बजावले. रॉड्रीक पढवलेल्या पोपटासारखा बोलु लागला. पण त्याच्याकडे असलेल्या नव्व्याण्णव करोड रुपयांची गोष्ट मात्र शिताफीने सांगायची टाळली. इतक्यात वैनीसाहेबांचा मोबाईल वाजला. मोबाईल घेऊन त्या जरा बाजुला गेल्या, आणि रॉड्रीकने सुटकेचा निश्वास टाकला.

क्रमशः

https://kathakadambari.com

माझी अर्धदशक नावाची कादंबरी वाचण्यासाठी खाली लिंक दिली आहे

https://www.mehtapublishinghouse.com/book-details/ARDHADASHAK/3048.aspx

Amazon link

https://www.amazon.in/Ardhadashak-Milind-Mahangade/dp/9353174163/ref=sr_...

Flipkart Link

https://www.flipkart.com/ardhadashak/p/itm7149b4896e81d?pid=978935317416...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान Happy