पिया मै हूं पतंग तू डोर

Submitted by एविता on 4 November, 2020 - 11:24

मी आईला फोन करून सांगितलं की आताच कुशालनगरहून निघते आहे. तिला कळलं की एक दीड तासात मी घरी पोहोचेन. तासाभराने मी राजाज् सीटला वळसा घालून जनरल थिमय्या रोडला लागले तेंव्हा सकाळचे साडे दहा वाजले होते. पोरं रस्त्यावर पतंग उडवत होती. रोडच्या शेवटाला आमचे घर. आई गेट उघडण्याच्या तयारीत वरांड्यातच थांबली होती. मी गाडीतून उतरून तिच्याकडे धावत गेले.

"मामो", मी तिला मिठी मारली आणि तिच्या गालावर ओठ टेकवले तसं तिनं मला गच्च आवळून धरलं. तिचे डोळे तरारले आणि आपसूक अश्रू ओघळायला लागले. असं हे न चुकता प्रत्येक भेटीत व्हायचं. आवेग ओसरल्यानंतर पहिला प्रश्न तिचा एकच असायचा, " आ त्यू मांजे आं वोयाज? त्यू देवे अव्वार फाम.."

ह्या भेटीतही काही वेगळं नव्हतं.

" अगं मी खाल्लय मघाशी कुशालनगर मध्ये. तू खाल्लं नसशील नेहमीप्रमाणे. हो ना..?"

ती हसली. " आई झालीस की कळेलच तुला, लेकीची वाट पाहत असताना खाल्लं जातं का ते...!. बर चल आता. तुला शॉवर खाली बसायचं असेल ना..? पण कॉफी घे अगोदर. आता गरम करते एका मिनिटात ओवनमध्ये."

"खायला काय केलंयस?"

"अक्की रोटी आणि कडंबत्तू."

"सो स्वीट मामो!"

वर्षातून तीन चार वेळा मी कुर्गला आले की आईचा चेहरा आनंदाने उजळायचा. मी बेंगळूर सोडायचे सकाळी साडेपाच वाजता. आदल्या दिवशी ऋषिन् माझी अल्टो सर्व्हिसिंग करून आणायचा. पेट्रोल, स्पेअर टायर आणि हवा वगैरे सगळं बघून गाडी तयार ठेवायचा.

" आईला भेटायला चालली आहेस तर गाडी फास्ट चालवू नकोस. जायला साडेसहा तास लागतात. तू पाच तासात पोचलीस असं मला कळलं तर बघ...आणि प्रत्येक तासाला फोन कर." मी लग्न झाल्यावर पहिल्यांदा चालले होते तेंव्हा ऋषिन् च्या सूचना.

" ऋ, मी आईला घेऊन कितीतरी वेळा गेलीय कूर्गला. तुला घेऊन गेले होते ओळख करून द्यायला ते विसरलास ना..? ह्या वेळी चार तासात पोचायचं म्हणते मी." मी त्याला चिडवलं.

"नको. मग तू फ्लाईट घे."

"तू विमान घेऊन दे."

"ओ हाय नीता अंबानी.. हाऊ आर यू..?"

"तू मुकेश नाहीस."

"विमान घेणं काही अवघड नाही. आय कॅन बाय. फक्त दहा लाखाला फ्रॅक्शनल ओनरशिपने सेस्ना १७२ मिळते. आणि तुझ्यासाठी दहा लाख म्हणजे पीनट्स.. यू आर प्राइसलेस...! तू पायलट लायसेन्स मिळव आणि मग मी विमान घेतो."

"बराच डिप्लोमॅटिक आहेस हां तू ऋ...."

"अगं मी तुला बेंगळूर कूर्ग फ्लाईट घे म्हणत होतो."

"बोअर फ्लाईट आहे ती. त्यापेक्षा अल्टो बेस्ट. होम टू होम."

"पण मघाशी सांगितलं तसं प्रत्येक तासाभराने फोन कर. नाहीतर मी करीनच म्हणा."

"बरं बाबा.. करते फोन. किती काळजी करतोस रे...? एम आय अ बेबी नाऊ?'

" बेबी नाहीस, बार्बी आहेस," असं म्हणत त्यानं मला जवळ ओढलं.

मी दोन तीन वेळा असा प्रवास केल्यावर ऋषिन् चा विश्वास बसला पण तरीही प्रत्येक तासाला फोन करायचं फर्मान चुकवता येत नव्हतं. अती काळजी... मी सांगायचे अरे ड्रायव्हिंग करताना डिस्टर्ब होतं पण नाही. मला हवं तसं करू द्यायचाच नाही.

सुरुवातीला बाथरूम मध्ये इलेक्ट्रिक गिझर होता. बिल फार यायचे म्हणून नंतर गॅस सिलिंडर वापरून गिझर चालायचा. लग्न ठरल्यावर ह्याने गॅस पाइप लाइनसाठी अर्ज करून बाथरूम मधल्या गिझरला पण पाइप जोडली. सिलिंडर भडकेल अशी भीती... मी हसून म्हणाले होते की अरे, मला कळतं ना बाबा.. मला स्वतःची काळजी घेता येते की...!

एके दिवशी माझी आंघोळ झाल्यावर तो बाथरूम मध्ये शिरला आणि लगेच बाहेर आला.

" एवी, तू बाथरूमच्या खिडकीच्या काचा बंद का केल्या? गॅस कोंडून राहतो, इट्स डेंजरस्."

त्या दिवशी नेमकं बाथरूम मधून बाहेर येताना चुकून काचा वरती करायच्या विसरले होते.

"ते मागचं आंब्याचं झाड दिसतेय? रोज एक मंग्या बसलेलं असतं नेमकं मी आंघोळ करताना.."

" ओ हो..!" तो उद्गारला. " आपण बाथरूमला अशोक वाटिका म्हणुया का?"

" का..?"

" श्री रामाची ओळख म्हणून अंगठी टाकणार असतील हनुमान तर? त्यांना एक संधी दे की.. कशाला काचा बंद करतेस..?"

:-D:-D:-D हा हा हा... फ.. फ.. हाsहाsहा... मला हसू आवरेना..!

"असं काय चलती का नाम गाडी मधल्या मधुबाला सारखी हसतेस..?"

मी साडी नेसायला बेडरुम मध्ये शिरले. "तो पडदा ओढ...." मी खिडकी कडे बोट दाखवत सांगितलं. त्यानं पडदा ओढला.

"सांग ना..? का हसतेस?"

"तुला दहा तोंड असती तर कसा दिसला असतास याची कल्पना करत होते.... :-D:-D:-D...." मी साडी नेसत म्हणाले.

"का? का..? मी रावण का..?"

"अशोक वाटिका बीलॉंगज् टू......!"

अजून मी निऱ्या खोचतीय तेवढ्यात मला जवळ ओढून डोळ्यात डोळा घालत म्हणाला, " खरं म्हणजे तुला दहा तोंडं असायला हवी होती...."

नंतर तासाभराने नेहमीच्या इलेक्ट्रिशियनला फोन करून त्याने एक्झॉस्ट फॅन मागवले आणि सगळया बाथरूम मध्ये बसवले.

" पाहिजे तेवढं बंद कर आता खिडकी..." तो म्हणाला.

दोन दिवसांनंतर बेडरूम मध्ये रात्री त्याचं माझ्या डाव्या पोटरीवर उमटलेल्या व्हेरिकोज व्हेन्स वर लक्ष गेलं.

" एवि, अगं काय हे..? तो डोळे विस्फारून म्हणाला, " व्हेरिकोज टरारून आलेत... चांगलं नाही ते..."

"अरे फर्गेट इट... नॉट सिरीयस. काही होत नाही. आज ऑफिस मधे जास्त चालले म्हणून झालं असेल तसं..."

" तुझं लक्ष नाही तुझ्या पायाकडे..."

"माझ्या पोटऱ्या कोण बघतं शांग बलं माज्या शोन्या.." मी लाडात बोलले.

"मीच. आणि उद्या डॉक्टर बघतील. उद्या डॉक्टरकडे जावून दाखवून येऊ बिफोर इट गेट्स कॉम्प्लीकेटेड. आणि ते हाय हील वापरू नकोस आता."

"नो वे... हाय हील, सूट, ब्लेझर घातल्यावर जो कॉन्फिडन्स येतो ना.. तो आवश्यक आहे ऑफिसात काम करताना.... रियल एक्झिक्युटिव्ह वाटतं..."

"असं काही नसतं. हॅविंग कॉन्फिडन्स इज ए स्टेट ऑफ माईंड..."

" मला प्रॉपर् गियर मध्ये असेल तरच
कॉन्फिडन्स येतो. फिट वाटतं. साडी घालून जिम मध्ये व्यायाम होईल का? लग्नाला जाताना ट्रॅक सूट आणि स्पोर्ट्स शूज चालेल? कॅजुअल वॉक घेताना कुर्ता पायजमा कोणी घालेल? जीन्स आणि टी शर्टच करेक्ट आहे. एवरी ओकेजन हॅज इट्स ओन गियर. आणि त्याच प्रमाणे ऑफिसचा माझा ड्रेस ठरलेला आहे."

" लिव्ह इट. मला तुझे पाय बघू देत." असं म्हणत त्यानं दोन्ही पाय, पावलं, घोटे आणि मांड्या तपासल्या. मी पण माझे पाय बघू लागले. इतक्या निवांतपणे मी पण माझे पाय पहिल्यांदाच बघत होते. घोट्यावर अगोदर तीळ नव्हता तो अचानक दिसायला लागला. पोटरीवर एकदमच चार तीळ..?! कुठून आले कोण जाणे.!

दुसऱ्या दिवशी रेडीओलोजिस्ट कडे गेलो. त्यानं सगळी माहिती दिली आणि हाय हील टाळा असं सांगितल्यावर ऋषि न् माझ्याकडे बघून हसला. व्वा... काय आनंद झाला होता त्याला. मला त्याच्या हसण्याचा इतका राग आला ना... छद्मी हास्य वाटलं मला ते. " शक्य तो सपाट बूट वापरा," डॉक्टर म्हणाले," स्पोर्ट शूज उत्तम. घरात पण चप्पल वापरत असाल तर कुशन असलेले बूटच वापरा." त्यांनी स्टोकिंग्ज वापरण्याचा सल्ला दिला. मग स्टोकिंग्ज, ते चढवायला वेगळे हातमोजे, सॉक्स, पावडर वगैरे खरेदी झाली आणि स्टोकिंग्ज पायात कसे चढवायचे त्याचे प्रात्यक्षिक झाले. " प्रेग्नन्सी मध्ये व्हेरिकोज व्हेन्स आणखीन फुगतील त्यामुळे बेटर यू स्टार्ट युझिंग स्टोकिंग्ज," डॉक्टर म्हणाले.

"डॉक्टर," मी म्हणाले, " नाहीतरी मी स्टोकिंग्ज घालणारच असेन तर हाय हील घालायला काय हरकत आहे?" मी ही मागे हटणार नव्हते.

" ब्लड पंपिंग पूर्ण होणार नाही. आणि पोटऱ्या फुगल्या तर व्हेन्स चुकून फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग रक्तस्त्राव होतो. तो टाळायला पाहिजे."

"अँड दॅट इज अँन एक्झिक्युटिव्ह ऑर्डर ऑफ द डॉक्टर, " ऋषिन मुद्दामच एक्झिक्युटिव्ह या शब्दावर जोर देत म्हणाला.

घरी येईपर्यंत मी त्याच्याशी काहीच बोलले नाही. माझा फुरंगटलेला चेहरा बघून तो ही गप्प बसला होता. रात्री बेडरुम मध्ये पण माझ्या कपाळावर आठ्या होत्या.

"पल भर के लिए कोई हमें प्यार कर ले, झूठा ही सही....दो दिन के लिए कोई इकरार कर ले.." त्यानं गुणगुणायला सुरुवात केली. मी कूस बदलली आणि त्याच्याकडे पाठ केली.

देव आनंद आमच्या दोघांचा वीक पॉइंट. सीसीडीला आम्ही दुसऱ्यांदा भेटलो तेंव्हा मी त्याला त्याचे फेवरिट एक्टर्स विचारले होते.

" देवमाणूस." तो म्हणाला. (कानडीत देव मनुष्य)

" म्हणजे देव आनंद ना..?"

" अगं देव आनंद, मधुबाला, नूतन आणि साधना. म्हणजे प्रत्येकाच्या नावातली काही आद्याक्षरे घेऊन देव माणूस. म्हणजे डीइवी देव, एमए मधुबाला, एनयू नूतन, एस्, साधना..! आणि ग्रेगरी पेक आवडतो."

" ओ..हो.. टू किल अ मोकिंगबर्ड! हम दोनों की पसंद बिलकुल एक जैसी है...!" मी म्हणाले.

तो गाणं म्हणायला लागला आणि मग जेंव्हा, " काजल की रेखा बनी लक्ष्मण की रेखा, राम में क्यों तुने रावण को देखा.." या ओळीवर आला त्यावेळी मला हसू फुटले. परवा मी त्याला रावण म्हंटले होते ना.. मी उशी त्याच्या पाठीवर आदळली. "एक काहीतरी ठरव ऋ.., " मी मुद्दामच आवाजात जरब आणून म्हणाले, " तुला प्यार पलभर के लिये पाहिजे की दो दिन के लिये. आणि काय रे.. अजून पलभर चा वादा मी केलाच नाही तरी लगेचच दो दिन के लिए म्हणून मोकळा होतोस..? डोन्ट टेक मी फॉर ग्रांटेड.."

" तू एक पल के लिये माझ्या मिठीत ये.." तो म्हणाला, " मग तू स्वतःच पल भर के प्यार पे निसार सारा जीवन,असं म्हणशील."

मला दुसऱ्या दिवसापर्यंत धुमसत राहायचं होतं पण माझ्या मनासारखं झालं नाही. स्टोकींग्ज घालायला सुरुवात करावीच लागली.

ऑफिस मध्ये त्याच त्याच कामाचा इतका कंटाळा यायचा की अगदी वीट यायचा कधी कधी. ते लवकर तयार व्हायचं, दोन्ही वेळा ट्रॅफिक मधून गाडी हाकायची, सदाशिव नगर मधून एअर बस ऑफिसला जायचं अगदी नकोसं व्हायचं. रोज येऊन जाऊन पन्नास किलोमीटर अंतर कापायला स्ट्रेस आल्यासारखं वाटायचं. "त्या" चार दिवसांत एंग्झायटी यायची आणि माझे निर्णय चुकायचे. एकदा माझ्या टीम मधल्या कावेरीने विंगचे डिझाईन चुकवले आणि मी तरातरा तिच्या केबिन मध्ये जाऊन मोठ्या आवाजात तिची कान उघाडणी केली. खरं म्हणजे तिला बोलावून सांगायला पाहिजे होतं पण माझं चुकलं. दुसऱ्या दिवशी सकाळी मीटिंग रूम मध्ये मी सगळ्यांच्या समोर तिला सॉरी म्हणाले आणि नंतर माझ्या केबिनमध्ये बोलावून कॉफी मागवली. तिला सांगितलं की माझ्या ओटीपोटात चमका येत होत्या आणि मला भानच राहिलं नाही म्हणून मी ओरडले.

" नो इश्युज एवी, " कावेरी म्हणाली, "अगं मला पण पाळी चालू आहे. बर्ड ऑफ सेम फिदर फ्लोक टू गेदर..!"

आम्ही दोघी खळखळून हसलो.

नोकरी सोडावी आणि कन्सल्टन्सी चालू करावी असा विचार मनात यायला लागला. एके दिवशी मी ऋषि न् ला हा विचार बोलून दाखवला.

" वाव..! नाइस आयडिया..! " तो म्हणाला, " अगं पण हे तुझं कॅम्पस् सिलेक्शन ना...?"

"होय ना... अरे सम गर्ल्स वेअर सो जेलस् आफ्टर माय सिलेक्शन यू नो.. जेव्हा तीस लाखाचा आकडा त्यानी ऐकला.."

" पण एवढ्यात कंटाळलीस..? जेमतेम दोन वर्षात..!"

" खरंच बोअर होतंय रे.. आपण काहीतरी उद्योग करू. बिजनेस. इरा आणि इशाननी कसं त्यांचं सुरू केलं बघ.."

" अगं ते आर्किटेक्चर आहेत दोघं. सेम फिल्ड. म्हणून ते करू शकतात. तू एरोस्पेस, मी मेकॅनिकल. काय कॉमन आहे? फक्त एमबीए. शिवाय बिजनेस करायला एक विशिष्ट माईंड सेट लागतो तो आपल्याकडे कुठे आहे?"

" तू मला डीस्करेज करतोयस.."

" नो वें स्विटी.. अजिबात नाही." तो बोलला, " तू प्लॅन तयार कर काय करायचं ते. आपण सगळे प्रॉस् अँड कॉन्स विचारात घेऊ आणि सुरू करू. माझ्या पण डोक्यात आहे. पण एक सांगतो. आपण अगोदर थोडे पैसे साठवू. या महिन्यापासून तुझा सगळा पगार बँकेत टाकायचा. तू फक्त आता वर्षभर काम कर. नेक्स्ट इअर सोडून दे. घाई नको."

" पुढच्या वर्षी..? बाप रे... अजून एक वर्ष काढायचं..? धीस इज नॉट फेअर.."

" इट इज फेअर. पण आय प्रॉमिस यू, एकच वर्ष काढ. चाळीस लाख जमा होतील. मी पण घालतो पैसे. वुई विल डू इट. ओके..? मीनव्हाईल तू सुन त्सु नं लिहिलेलं आर्ट ऑफ वॉर वाचून काढ. मस्ट फॉर बडिंग आंत्रप्रिन्योर."

" तू मला हवं तसं करू देत नाहीस ऋ..."

तो मोठ्यांदा हसला. " ओके. उद्याच राजीनामा देऊन टाक. तीन महिन्याचा नोटीस पिरियड आहे ना..? देऊन टाक. पण तीन महिन्यानंतर जो पहिला दिवस असेल त्या दिवशी काय करायचं याचं प्लॅनिंग करायला आतापासून सुरुवात कर. यू आर माय स्वीट वाइफ!" असं म्हणत माझ्या गालावर ओठ टेकवले.

दुसऱ्या दिवशी मी केबिन मध्ये गेले आणि ब्लेझर खुर्चीवर ठेवला तेवढ्यात टेबलावरचा एचआर हेड सूरजचा इंटर कॉम वाजला.

"प्लीज सी मी विदीन टेन मिनिट्स. थॅन्क्स."

मी गेले. " गुड मॉर्निंग सर."

" गुड मॉर्निंग एवीता," तो म्हणाला," बस. हे बघ, तुला तुलूजला जायचयं रविवारी. आज गुरुवार. उद्या सकाळी तिकीट मिळेल तुला. एअर फ्रान्स आहे डायरेक्ट. पॅरिसला उतरलीस की सेलीनला फोन कर. तुला दोन आठवडे राहायचं आहे तिथे. गुड लक."

"थॅन्क्स सर," मी म्हणाले आणि माझ्या केबिन मध्ये आले. आज राजीनामा द्यायचा विचार करत होते आणि झालं वेगळंच. मी लगेच ऋषिन् ला फोन केला.

" वाव..! सो नाइस टू हिअर दॅट," त्याला आनंद झाला होता, " शामको पार्टी कहां पर?"

" :-):-) आल्यावर ठरवते. बाय."

आता तिथून आल्यावर प्रमोशन ठरलेलं. पगारवाढ होणार. म्हणजे परत जबाबदारी आलीच. स्ट्रेस, एंग्झायटी, पासून सुटका नाही. इज धिस दी लाइफ?

जेवण झाल्यावर मी आणि आई बाल्कनीत बसलो होतो तेंव्हा आईला मी हे सगळं सांगत होते. छान वारा सुटला होता आणि आकाशात बरेच पतंग उडत होते.

" तो पतंग बघतेस ना आकाशात उडताना? कसा वाऱ्याशी स्पर्धा करतोय ना?" आई म्हणाली, " फर्र..फर्र..फर्र..फर्र...आवाज कसा करतोय बघ..! पतंगाची दोरी सांगतेय की अरे फार वरती वरती जाऊ नकोस नाही तर फाटून जाशील.. हरवून जाशील... पण पतंगाला धाग्याचा हा सल्ला काही आवडत नाही. अजून वरती जाऊ दे मला.. अजून जरा ढील दे.. दे ना.. अजून जरा वरती.. अजून.. अजून.. असं म्हणत म्हणत तो पतंग चाललाय वरती... त्याला कळतच नाही की धाग्याला काहीतरी सीमा आहे... धागा कुठेतरी संपणार आहे.. जमिनी वरून किती वर गेलाय तो पतंग आणि किती छोटा दिसतोय तो... जणू काही जमिनीशी असलेले नाते तोडून टाकणार आहे अशा तऱ्हेने फुरफुरतोय....! अजून ढील दे... अजून... अजून असं पतंग म्हणाला तेंव्हा, " मला जितकं शक्य होतं तेवढी ढील मी तुला दिली, आता जर मी तुला मोकळं सोडायचा विचार केला तर माझंच मूळ उखडून जाईल आणि मला ते ठीक वाटत नाही.. आपण आपल्या चौकटीत राहू.. त्याच्या बाहेर नको... आपण आपल्या मर्यादेत राहू... लिमिटलेस नको..." धागा म्हणाला . पण पतंगाला ते काही पटलं नाही. त्याला अनिर्बंध उडायचं होतं, स्वच्छंद विहार करायचा होता आकाशात. त्यानं विचार केला की सोडूनच देऊ या धाग्याला, यानंच तर मला जखडून ठेवलंय असं म्हणत पतंगाने एक हिसका देऊन स्वतःची सुटका करून घेऊया असा विचार केला, आणि हिसका देणार तेवढ्यात त्याच्यावर एक पाण्याचा थेंब पडला. पतंगाच अंग शहारलं. त्यानं मान वर करून बघितलं तर एक काळा ढग त्याच्या डोक्यावर तरंगत होता."

मी आई कडे बघितलं. तिनं पाण्याचा ग्लास उचलला आणि घोटभर पाणी प्याली.

"त्यानं मान वर करून बघितलं आणि त्याला जरा भीतीच वाटली." आईने परत सांगायला सुरुवात केली." तो काळा ढग त्याच्या डोक्यावर तरंगत होता, पण ढगाच्या डोळ्यात अश्रू दिसत होते आणि तो अगदीच उदास झालेला दिसत होता. त्याच्याच डोळ्यातल्या आसवांचां एक थेंब पतंगावर पडला होता. त्याला असा रडताना पाहून पतंगाला वाईट वाटलं. त्याला त्या ढगाबद्दल सहानुभूती वाटली. त्याने ढगाला विचारले," अरे ढगा, तू एवढा मोठा झालायस आणि रडतोस? आकाशात किती उंच पोचलायस तू.. आणि तुझ्यावर कोणाचं नियंत्रणही नाही, अंकुश नाही, बांधिलकी नाही. स्वतंत्र आहेस की तू अगदी आणि तरीही तू का रडतो आहेस? मी तुला काही मदत करू का?

"आपल्या दुःखात कोणी वाटेकरी होऊन सहानुभूती दाखवल्यावर गळा कसा दाटून येतो ना..? तसंच झालं त्या ढगाला. तो हुंदके देत म्हणाला," जसं दिसतं तसं नसतं. मी तुला स्वच्छंद दिसतोय पण माझ्यावर हवा स्वार आहे. हवा जिथे ढकलेल तिथे मला जावं लागतं. हवा दिसत नाही म्हणून लोकांना वाटतं की मी कसाही फिरतोय. स्वच्छंद. म्हणूनच म्हणतात आवारा बादल.

" खरं म्हणजे माझीच चूक. मोठी चूक. मी त्या मोठ्या सरोवराचा भाग होतो. हे ढग आकाशात फिरताना मला पण तसच फिरावं असं वाटायला लागलं, आणि स्वतःची तुलना विहिरीतल्या बेडकाशी करून बाहेर पडण्यासाठी मी धडपडू लागलो. ती संधी आलीच. गरमी आणि हवा एकत्र आल्यावर मी ऊर्जेने भारलेल्या त्या पाण्याच्या थेंबा वर स्वार झालो आणि निघालो वर वर. माझ्या मित्रांनी जाऊ नकोस, पडशील, भटकशील असं सांगितलं पण माझी महत्त्वाकांक्षा मला जास्त महत्वाची वाटली. पण तसं काही झालं नाही. माझी उन्नती झालीच नाही. तेंव्हा पासून असाच निरुद्देश्य, अनाथ, हवेचा गुलाम बनून फिरतोय. माझं अस्तित्व असूनही नसल्यासारखं आहे . कधी कुठल्या महामेघात विलीन होऊन माझं अस्तित्व हरवून बसेन, माहित नाही. कधी तरी तो प्रचंड काळाकभिन्न ढग बाजूने तरंगतो तेंव्हा कानठळ्या बसतील असा माझ्यावर कडाडतो, मला हटवतो आणि माझ्या आजूबाजूला दिसलास तर तुझी खैर नाही अशी धमकी देतो.

" आज मी ठरवलंय, मी ही खोटी बेगडी शान सोडून पृथ्वीवर कोसळणार. मला ठाऊक नाही की मी माझ्या सरोवरात मिसळून जाईन की नाही पण कुठलं तरी जलाशय भरलं, शेताला पाणी मिळालं तरीही मला धन्य वाटेल.

" तू भाग्यवान आहेस की तुला धागा सारखा साथी आहे, एवढ्या उंचावर तू आलायास तरी पण तो तुझ्याशी जोडला गेलाय, तुला एवढ्या लांबून सांभाळतो आहे. स्वतःचं मूळ विसरू देत नाही आहे. मी मूळ विसरलो आणि... पुढच्याच क्षणी ढग वितळला आणि पाणी पाणी होऊन कोसळला. त्याचा मृत्यू झाला. पतंगाला वाईट वाटलं पण त्याच वेळी स्वतःला जोडलेल्या धागेचा अभिमान ही वाटला.
धाग्याला मात्र त्या दोघांच्या संभाषणाची गंधवार्ता ही नव्हती, तो तर पतंगाला सावरण्यात व्यस्त होता."

आईने गोष्ट संपवली. तिने पाण्याचा ग्लास भरला आणि मला दिला.

" मला ठाऊक आहे एवी, तुझ्या धमन्यात फ्रेंच रक्त वाहतय." ती पुढे बोलू लागली, " फ्रेंचांना स्वातंत्र्याची भारी हौस. अगदी ईश्वरनिंदा करण्याचं स्वातंत्र्य पण त्यांना अभिप्रेत आहे. नास्तिक लोकांची संख्या पण तिथे प्रचंड. लीबर्ते, एगालिते, फ्रातर्नीते ही मूल्ये त्यांनीच तर जगाला सांगितली. त्यातूनच उद्यमशीलता आणि रेनेसांस याला सुरुवात झाली. सिनेमॅटिक लिबर्टी आज आपण म्हणतो तो सिनेमाच ल्युमिये बंधूंनी शोधला. मायग्रेशनच्या बाबतीत किती उदारमतवादी आहेत ते स्वातंत्र्य द्यायला.
आणि तू स्वतः ह्यूगो, व्हॉल्टेअर, गी द मोपांसा, जों पॉल सार्त्र, सिमोन द बोवा ह्यांची पुस्तकं वाचली आहेस की. व्हॉल्टेअर म्हणाला होता, ' मी तुझ्या मताशी सहमत नाही, पण तुला तुझे मत मांडू देण्याचा अधिकाराचे रक्षण करायला मी नेहमी पुढे असेन.'

" तू जे म्हणत आहेस की मला हवं तसं करू देत नाही त्याची जी कारणं आहेत ना ती फार क्षुल्लक आहेत एवी. हे वाक्य फार घातक आहे. आज क्षुल्लक कारणासाठी वापरतेस, पुढे मोठया कारणासाठी वापरशील. ऋषिन् खरोखर आदर्श मुलगा आहे. अगं मला पण दर सोमवारी आणि गुरुवारी फोन करतोच. माझ्या तब्येतीची चौकशी करतो. काय हवं नको विचारतो. तुला आठवतं पहिल्यांदा इथे आला होता तेंव्हा स्वतःची चहाची कप बशी पण त्यानं विसळून ठेवली. माई आणि अप्पांनी खूप चांगले संस्कार केले आहेत त्याच्यावरती. अगं ऋषिन् चं जाऊ दे, मला इरा आणि इशान पण महिन्यातून दोनदा फोन करतात. माई आणि अप्पा करतातच. खरंच तू इतका छान मुलगा शोधलास ना, की कधी कधी मला वाटतं, Nothing comes from nothing, Nothing ever could, So somewhere in my youth or childhood, I must have done something good. Good Karma. मला मुलगा नाही पण ऋषिन् च्या रूपाने मुलगाच मिळालाय मला. ही इज अ जेम ऑफ अ बॉय.

तुझ्या फ्रेंच रक्तात अर्ध रक्त भारतीय आहे. दया, क्षमा, शांती, सबुरी, श्रद्धा, अनुकंपा, जाणीव, जागृती हे गुण त्यात असणारच. शंकाच नाही. स्वातंत्र्य आणि मर्यादा याची उत्तम जाणीव आहे तुला. " आईनं माझ्या डोक्यावरून हात फिरवला. " छान आहे माझी छकुली.. चल, कॉफी करते, बस तू, कॉफीच्या बिया आजच दळून आणल्या बघ," असं म्हणत ती उठली.

" आई, तू बस. मी करून आणते कॉफी." मी उठले.

कॉफीचे मग घेऊन आम्ही परत बाल्कनीत बसलो. एक पतंग भिरभिरत बाल्कनीत येऊन पडला. फाटलेला, छिन्नविच्छिन्न, तुटलेली दोरी. आईने तो अगदी काळजीपूर्वक उचलला आणि त्याला आत मध्ये घेऊन गेली.

तेवढ्यात ऋषीन् चा फोन वाजला. " काय करतेस? "

" पतंग उडवतीय.."

" वाव... चली चली रे पतंग मेरी चली रे, चली बादलों के पार असं म्हणत उडव. लवकर वरती जाईल." तो म्हणाला.

" नाही. मी वेगळं गाणं म्हणतीय."

" कुठलं गाणं..?"

" पिया मै हूं पतंग तू डोर, मै उडती चारो ओर..."

टीप:

आ त्यू मांजे आं वोयाज? त्यू देवे अव्वार फाम..as-tu mangé en voyageant ? vous devez avoir faim . Did you eat while travelling? You must be hungry.

तुलुज= Toulouse. Airbus HQ in France.

.......

Group content visibility: 
Use group defaults

सध्या इकडे येणं होणार नाही म्हणाली होतीस ... सुखद आश्चर्य वाटलं .
नाव दिसल्याबरोबर वाचायला घेतलं... नेहमीप्रमाणेच छान लिहिलंय.. ..>>>> + 1

एविता, तुझं नाव पाहिलं तेव्हाच खुप खुप आनंद झाला.
सुंदर लिहिलयस ग..... नेहेमीप्रमाणेच Happy
लिहित राहा आता नेहेमी

नक्की काय सांगायचंय? Uhoh
की फक्त आपलं गुडी गुडी life दाखवायचं आहे? अगदी आदर्श नवरा, सासू सासरे, आई, .....

सुंदर!
खोल अनुभवांचं वर साखरेचा लेप चढवून केलेलं मधाळ वर्णन. शिवाय वेगळी पार्श्वभूमी, वेगळी नावं, वेगळा मुलुख, भावनांचे वेगळे आविष्कार.
खेळकर वृत्तीने आयुष्याला भिडणे आणि कुठल्याही प्रसंगवर्णनात द्वेष मत्सर संतापाचा लवलेशही नसणं ..
जागोजागी निर्मळ प्रसन्नतेचे शिडकावे आणि अप्रदूषित वातावरण यामुळे वाचताना आल्हाददायक वाटते

डिअर मोक्षू धन्यवाद .

डिअर आसा, धन्यवाद.

डिअर वैशाली जोशी धन्यवाद.

डिअर मंजुताई दोन महिने मी माबो वर नव्हतेच. रोज चार पाच ओळी लिहीत होते. असो. तुमचे आभार.

Dear Eternalmaw. Thank you for appreciation.

डिअर स्मिता, खूप खूप आभार

डिअर मृणाली धन्यवाद, आभार

डिअर नंबर १ वाचक. वेलकम टु रीड!

डिअर आंबट गोड अगं नाही. बॅडी पण आहे. बॅडीच जास्त आहे. मी आठ वर्षाची होते तेंव्हाच बाबा गेले. मला मग आईने काय कष्ट घेतले आणि कसं वाढवलं त्याची कहाणी मी लिहिली तर गुडी गुडी पेक्षा बॅडीच जास्त होईल. आता आयुष्य रडत जगायचं की हसत ते आपण ठरवायचं. आपण शिक्षण घेतो ते केवळ पैसा मिळवणे हाच हेतू असेल तर आपली वैचारिक पातळी वाढणार नाही. मतभेद आणि मनभेद यातला भेद ओळखण्याइतकी आपली वैचारीक पातळी प्रगल्भ असेल तर आपल्या भोवती आपण गुडी गुडी वातावरण निर्माण करू शकतो.

सुदैवाने सासर चांगलं मिळालंय म्हणून आनंदाने दिवस जात आहेत आणि ते ही गेल्या पाच सहा वर्षांपासूनच. प्रेमात पडल्यानंतर! सो विश मी ऑल द बेस्ट! थँक्यू.

<<<जागोजागी निर्मळ प्रसन्नतेचे शिडकावे आणि अप्रदूषित वातावरण यामुळे वाचताना आल्हाददायक वाटते>>> धन्यवाद हिरा. छान प्रतिसाद.

नीलिमा, धनुडी आणि सामी, सो नाईस ऑफ यू . सॉरी कथा जरा लांबली. श श क च्या जमान्यात मी बरीच लांबड लावली. काय करू... लिहिता लिहिता वाहवत गेले. तुम्हा सर्वांना आवडली, बरे वाटले.

तुम्ही गोष्ट छान रंगवली आहे. आवडली मला.
राग येणार नसेल तर एक सुचवू का? 'ते दोघंही आर्किटेक्चर आहेत' च्या जागी प्लीज 'ते दोघंही आर्किटेक्ट आहेत' करा. आर्किटेक्चर हे कोर्सचं नाव आहे. जसं इंजिनिअरिंग शिकून इंजिनिअर होतात, तसं आर्किटेक्चरच्या शिक्षणानंतर आर्किटेक्ट होतात.
धन्यवाद

अनया, अगं राग कसला? I love you sweety! ती चूक माझ्या लक्षात आली नंतर पण फार उशीरा. त्यावेळी माझी कथा बरीच खालच्या क्रमांकावर होती. मी संपादन केल्यावर ती परत वरती आली असती आणि मग काही लेखकांचा उगाच असा समज झाला असता की अरे, ही आपलं लिखाण मुद्दामच वरती ढकलतेय! लबाड कुठली! म्हणून मी ते तसच राहू दिलं. पण तुला धन्यवाद, अगदी लक्ष देऊन वाचलस.

अगं, मी स्वतः आर्किटेक्ट आहे. बरीच लोकं आम्हाला 'तुम्ही आर्किटेक्चर आहात' असं म्हणतात. मी मनातल्या मनात त्यांना ' मी आर्किटेक्चर, तर तुम्ही इंजिनिअरिंग किंवा कॉमर्स आहात' असं म्हणते.
शुभेच्छा