बांद्रा वेस्ट- ९

Submitted by मिलिंद महांगडे on 3 November, 2020 - 09:31

बांद्रा वेस्ट- ९

‘ सालं काय चाललंय हे…? कालपर्यंत किती सरळ सुटसुटीत आयुष्य होतं ! मला तर माहीतही नव्हतं की माझ्याकडे एवढी संपत्ती आहे. ज्या माणसाला महीन्याभराचा पगारही नीट पुरत नव्हता, आणि आता चार-पाच महीने जॉब नसल्याने उधारीचं जीवन जगत होता, त्याच्याकडे अचानक छप्पर फाडुन पैसा येतो. तो समोर दिसतोय पण वापरता येत नाही, याचं दुःख तर दरीद्री असण्यापेक्षा कितीतरी पटींनी जास्त आहे. पैसा माणसाच्या आयुष्यात येतो आणि त्याच्या समाधानाची जागा घेतो. ती दहा रुपयांची नोट काय माझ्या हातुन गेली सगळे फासेच उलटे फिरले. माझ्या निष्काळजीपणा आणि आळशीपणाचीच ही शिक्षा असावी. ‘ रॉड्रीक स्वतःलाच शिव्या देत अस्लम रिक्षावाल्यामागे चालला होता. त्या नोटेच्या शोधात तो निघाला होता खरा… पण कशाच्या आधारावर ? एकतर जो रिक्षावाला, ज्याला त्याने पाहीलं नव्हतं, केवळ हिरवी टोपी घालणारा म्हणुन त्याने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि तो राहत असलेल्या झोपडट्टीत नोटेच्या आशेने गेला पण तिथेही ती नोट त्याच्या हाती लागली नाही, आता त्याचा कोण तो भाऊ शौकत त्याने पैसे नेले असतील म्हणुन आपण वेड्यासारखे त्याच्या शोधात बारमधे चाललोय , सगळंच अधांतरी….!

” अपुन किधर जारेले है…? ” मॉन्ट्या अस्लमला विचारु लागला.

” इधरही बांद्रा वेस्ट मे , करीष्मा बार. मेरा भाई ज्यादातर उदरही जाता है। नवाबी ठाठ है सालेके ”

” बिनपैसेका नवाब….! ” मॉन्ट्या गमतीने म्हणाला

” अपना अपना शौक होता है भाय…! ”

” तेरेको कौनसा शौक है…? ” मॉन्ट्या चालता चालता विचारत होता. रॉड्रीकला ही सगळी वायफळ चर्चा वाटत होती. त्यात मॉन्ट्याही गरजेपेक्षा जास्त त्यात रस घेत होता. त्यामुळे रॉड्रीक चांगलाच वैतागला., ” मॉन्ट्या काय फालतुपणा लावलाय… गप चल … जल्दी चलो यार… ” शेवटचं वाक्य अस्लमला उद्देशुन होतं. तो नवाब तिकडे सगळी दौलतजादा करायच्या आधी आपल्याला तिथं पोहोचलं पाहीजे, असं रॉड्रीकला वाटत असावं म्हणुन तो घाई करत होता. रॉड्रीक वैतागल्याने अस्लमच्या शौकबाबतची चर्चा तिथल्या तिथेच थांबली. थोड्या वेळात ते करीष्मा बारपाशी पोहोचले. बारला बाहेरुन लायटींग केलेलं…करिष्मा हे नाव इटालिकमधे लिहीलेलं आणि त्यातही वेगवेगळ्या रंगांचं लायटिग केलेलं. बारच्या भल्यामोठ्या दरवाज्याच्या बाहेर दोन डोअरकीपर उभे होते. येणाऱ्या जाणाऱ्यांना ते टिपेच्या आशेने सलाम करत होते. दरवाजा उघडल्यावर आतुन जोरजोरात गाण्याचा आवाज येत होता.

” चलो, अंदर चलते है । ” रॉड्रीक आत जायला अधिर झाला होता. एकदाचा तो शौकत सापडला आणि त्याच्याकडुन ती नोट घेतली म्हणजे झालं .

” रुको, फोन करता हुं पहेले ! ” म्हणत त्याने फोन काढला . फोन लावला पण पुन्हा काहीच प्रतिसाद मिळाला नाही.

” फोन कायकु करता है. तेरेको मालुम है ना वो इदरही आता है …? चल डायरेक्ट अंदर . ” म्हणत मॉन्ट्या आत जाऊ लागला. त्याच्या मागे रॉड्रीक आणि अस्लमही आत गेले. दरवाज्यातून आत गेल्यावर एक वेगळ्याच दुनियेत आल्यासारखं त्यांना वाटलं . आतला नजारा काही औरच होता. तो ऑर्केस्ट्रा बार होता. डिस्को लाईटस चमचमत होते. तिघांच्याही नजरा अस्लमचा भाऊ शौकतला शोधण्याऐवजी समोर मादक अदांनी भल्याभल्यांना घायाळ करणाऱ्या त्या पृथ्वीलोकाच्या अप्सरांवर प्रथम पडल्या. एका जागी उभं राहुन त्या त्यांच्या दिलखेचक अदा दाखवित होत्या. त्यातल्या बऱ्याच बारबालांनी केस मोकळे सोडलेलेे, अन् नाचता नाचता मुद्दामुनच मानेला हिसडा देऊन खांद्याच्या एका बाजुचे केस दुसऱ्या बाजुला सारत होत्या. त्यांच्या ह्या प्रकारच्या हालचाली खरोखर मादक होत्या , दोन पायाच्या कोणत्याही सजीव प्राण्याला भुरळ पाडाव्या अशा !! मॉन्ट्याला तर आपण कोणत्या कामासाठी आलोय याचा विसर पडला आणि तो समोर नाचणाऱ्या एका सुंदर मुलीला न्याहाळु लागला… समोर टेबलांवर शौकीन लोक बसले होते, त्याच्या समोर दारुच्या ग्लासांसोबत नोटांच्या गड्ड्याही ठेवलेल्या दिसत होत्या. ग्लासातली दारु पितापिता समोरच्या आपल्याला आवडणाऱ्या मुलीला बोलावुन लोक त्यांना पैसे देत होते. काही जण तर पैसे असे उधळत होते की त्यांच्या लेखी पैशाला काहीच किंमत नाही ! त्या मुलीही त्यांच्या मादक अदांनी समोरच्याला आणखी वेड लावत होत्या. बार मधल्या ह्या आधुनिक मेनका समोर बसलेल्या विश्वामित्रांचे तपोभंग करण्याच्या कामात दंग होत्या आणि हे विश्वमित्रही आपले तप भंग करून घेण्यास उतावीळ झाले होते . एकुणच तनामनाला धुंद करणारं बारचं वातावरण होतं. बारमधील गाण्याचा आवाज बराच मोठा होता. रॉड्रीक अस्लमच्या कानात जवळजवळ ओरडतच म्हणाला. , ” किधर है तेरा भाई…? ”

” क्या …? ” त्याला काही ऐकू गेलं नाही.

” तेरा भाई…? ” रॉड्रीक आणखी जोरात ओरडुन म्हणाला. ” हां .. हां… उसकोही ढुंड रहा हुं । ” अस्लम इकडे तिकडे शोधक नजरेने पाहु लागला. जवळजवळ सर्व टेबलांवर त्याने नजर फिरवली पण तो काही दिसेना. रॉड्रीक कधी आजुबाजुला तर कधी अस्लमकडे पहात होता.

” साला, ये गया किदर…? ” अस्लम स्वतःशीच म्हणाला.

” मै बाहर जाके फिरसे फोन लगाता हुं । ” म्हणत तो बाहेर गेला. थोड्या वेळाने आत आला अन् म्हणाला, वो बार के पिछे बैठा है. चलो पिछे जाते है । ” तिघेही बारच्या मागे जाणाऱ्या दरवाज्यातुन गेले. मागे जाउन बघितलं तर एक तरुण एका बारबालेबरोबर बसला होता. वय २७ -२८ असेल, चेहरेपट्टीवरुन तो अस्लम रिक्षावाल्याचाच भाऊ वाटत होता. तिघे गेल्यानंतर तो तरुण आणि ती बारबाला जरा सावरुन बसले.

” साले किधर किदर ढुंडा तेरेको…? ” अस्लम त्या तरुणाला म्हणाला ..

” क्यों ? इतनी क्या आफत आई है…? ” तो जरा रागातच म्हणाला. त्याला राग येणं तर स्वाभाविकच होतं. तो मस्त त्याच्या आवडत्या बारबालेबरोबर बोलत बसला होता आणि हे तिघे तिथे मधेच तडमडले होते. “इधर आ जरा , बात करनी है । ” अस्लम म्हणाला.

” क्या है ? बोल ना इदरीच… ” तो वैतागुन म्हणाला.

” इदर आ बोला ना ! तेरे फायदे का काम है । ”

” रानी, सॉरी मै अभी आया .. मेरा भाई है …मिलके आता हुं. ” हे वाक्य त्या बारबालेला उद्देशून होतं . तो त्यांच्या दिशेने आला. ” बोल बे क्या हुआ…? ” शौकत अस्लमला म्हणाला.

” साले मेरा पैसा लेके आया ना तु. ? किदर है मेरा पैसा..? “

” तेरा पैसा…? उडाया… ” शौकत बेफिकरीने म्हणाला.

” उडाया …? अरे क्या बोल रहा है ये ? किसपे उडाया…? ” मॉन्ट्या वैतागुन म्हणाला .

” कौन है ये लोग …? ” शौकत त्या दोघांकडे बघत अस्लमला म्हणाला. ” ये मेरे साथ आए है । ये भाईसाबका एक दसका नोट कल मेरेपास गलतीसे आ गया था । वो उनके लिय़े लकी नोट है इसीलिये ये वो नोट लेने आए है । ” अस्लम म्हणाला. शौकतने एकवार त्या दोघांकडे पाहीलं ” ऐसी क्या खास बात है उस नोट में…? ” त्याने आश्चर्याने विचारलं

” बोला ना, लकी नोट है करके … ” अस्लम म्हणाला. ” तु पैसा निकाल जल्दी । ” त्यांच्याकडे काहीशा संशयाने बघत शौकतने खिशात हात घालुन काही रुपये काढले. ” ये लो. देखो… ” म्हणत ते सारे पैसे त्याने अस्लमच्या हाती सोपवले. रॉड्रीक ते पैसे पहायला अधिर झाला होता. ” दस का नोट था ना …? ” म्हणत अस्लम दहाच्या सोडुन बाकीच्या नोट बाजुला काढुन घेऊ लागला. दहाच्या एकुण नऊ नोटा होत्या , ह्याच नोटांमधे आपली नोट असणार… आणि ती सापडली की मग काय धमालच …! ” असा विचार करुन रॉड्रीक त्या नीट पहाणार इतक्यात त्यांच्यावर एक पोलादी हात पडला. समोर पाहीलं तर एक बलदंड शरीराचा, काळाकभिन्न, इतका काळा की त्याच्या काळेपणाची कसोटी केवळ डांबराबरोबर व्हावी. एखाद्या मायथॉलॉजीकल सिरीयलमधला क्रुर दानव वाटावा अशी त्याची चेहरेपट्टी अन् शरीरयष्टी होती. सहा-साडेसहा फुट उंच, डोक्यावरचे लांब केस मानेवर रुळत होते , आग ओकणारे डोळे, दात-ओठ खात तो रागाने त्यांच्याकडे बघत होता. त्याच्याकडे बघुन तर शौकत आणि अस्लमची बोबडीच वळली. हिंदी फिल्म मधे हाणामारीच्या आधी हिरोला जसे गुंड लोक सर्व बाजुंनी गोल घेराव टाकतात तसा दहा बारा गुंडानी त्यांना घेराव टाकला. त्यातल्या दोघा तिघांच्या हातात सुरे आणि पिस्तुलेही होती . ही कुठली जनता जमा झाली ? रॉड्रीक आणि मॉन्ट्याही आश्चर्याने त्यांच्याकडे पहात राहीले.

” सत्तु , त्या माकडाला माझ्याकडे घेऊन ये. ” तो जो दानव होता त्याच्या मागुन एका स्त्रीचा आवाज आला. तो कोण सत्तु की कोण होता त्याने हातातल्या त्या दहा रुपयांच्या नोटा बाजुला फेकल्या आणि मागुन शौकतची कॉलर पकडली. एखाद्या मांजरीच्या पिल्लाला मानगुटीला पकडावं तसं त्याने शौकतला पकडलं आणि वर उचललं.

” त्या माकडाच्या भावालापण पकड. ” पुन्हा मागुन तसाच आवाज आला. सत्तुने अस्लमच्याही मानगुटीवर हात टाकला. त्या दोघांनाही त्या दानवाने अगदी सहज उचललं . भाजी भरलेल्या पिशव्या उचलाव्या तशा…! ते दोघेही त्याच्या बलदंड हाताला अक्षरशः लटकत होते. आणि सुटण्यासाठी धडपडत होते.

” हॉट द फक… ! ” रॉड्रीकचे डोळे आश्चर्याने उघडेचे उघडेच राहीले. हे असं काही होईल याची कल्पनाच त्याला नव्हती. त्या महाकाय प्राण्याकडे बघताना ज्या नोटेसाठी तो इथवर आला होता त्याचाही विसर त्याला पडला. त्या घेरणाऱ्या गुंडापैकी एकाने मॉन्ट्याच्या मानेवर आण् दुसऱ्याने रॉड्रीकच्या मानेवर सुरा धरला.

” अरे कोण आहेत हे …? ” मॉन्ट्या घाबरुन रॉड्रीकच्या कानात म्हणाला.

” आय डोन्ट नो… बट आय हॅव स्ट्रॉंग फिलिंग की आपण आता मोठ्या संकटात सापडलोय. ”

क्रमशः

https://kathakadambari.com

लडाखचे प्रवासवर्णन

Ladakh Bike Trip – दुचाकी लडाखायण 1

माझी अर्धदशक नावाची कादंबरी वाचण्यासाठी खाली लिंक दिली आहे

https://www.mehtapublishinghouse.com/book-details/ARDHADASHAK/3048.aspx

Amazon link

https://www.amazon.in/Ardhadashak-Milind-Mahangade/dp/9353174163/ref=sr_...

Flipkart Link

https://www.flipkart.com/ardhadashak/p/itm7149b4896e81d?pid=978935317416...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users