डिटेक्टिव्ह निगेटिव्ह (भाग ४१ - गीता आणि नीता)

Submitted by निमिष_सोनार on 30 October, 2020 - 07:51

भाग ४० ची लिंक: https://www.maayboli.com/node/77148

भाग ४१ - गीता आणि नीता

स्मृतिकाने दिलेल्या गीता आणि नीता या दोन्ही मेमरी डॉल्स म्हणजे स्मृती बाहुल्यांमध्ये सायलीने बराच वेळ तिथल्या कॉम्पुटर तज्ज्ञांच्या मदतीने प्रयोग केला. त्यांच्यात वेगवेगळ्या मानवी डेटाबेस संबंधित कमांड टाकल्या. तो प्रयोग यशस्वी झाल्याचे सुनिलला कळवले. त्या बाहुल्या केसांद्वारे माणसांच्या डोक्याला जोडून त्यांच्यातील ठराविक मेमरी किंवा संपूर्ण मेमरी विशिष्ट कमांड (आज्ञावली) देऊन काढून टाकू शकत होत्या.

पण स्मृतिकाने दिलेली आणखी ज्यादा शक्ती म्हणजे या बाहुल्यांमध्ये सायली स्वतःच्या मेंदूचे पूर्ण प्रतिरूप टाकू शकत होती आणि टेलिपॅथीने या सगळ्या बाहुल्या सायलीशी जोडलेल्या होत्या आणि ती सांगेल तशा आज्ञा पाळू शकत होत्या, तिच्याशी आणि एकमेकांशी मनातल्या मनात बोलू शकत होत्या आणि स्वयंचलित होत्या. त्या आकाशात उडू शकत होत्या. सायली मनातल्या मनात त्यांना मुंबईतील प्रयोगशाळेत बसून सूचना देऊ शकत होती. त्या बाहुल्या मिती ग्रहावरील विशिष्ट जेलीने बनलेल्या होत्या.

विविध जमिनीवरील आणि आकाशातील उडणाऱ्या प्राण्यांशी मारामारी करता करता फोनवर सुनिलने मग सायलीने सांगितल्यानुसार प्लॅन आखला. त्याने हितेनवाल्या दोन बाईकचा पाठलाग करणाऱ्या राऊटरन आणि वायफायर यांना कॉल करून सायलीच्या दोन मेमरी डॉल्सच्या प्रयोगाबद्दल थोडक्यात सांगितले आणि गीता बाहुली उडत उडत तिथे येईपर्यंत हितेनची बाईक दुसऱ्या बाईकपासून वेगळी होईल असे करायला सूचना दिली.

तसेच निद्राजीताला पण सायलीच्या प्रयोगाबद्दल थोडक्यात सांगून जलजीवांना हॉट एयर बलूनचा पाठलाग करून नीता बाहुली तिथे पोहोचेपर्यंत त्या तिघांना फक्त गोंधळात टाकायचे अशी सूचना दिली.

गीता नीता या दोन्ही मेमरी डॉल्स सायली बसलेल्या प्रयोगशाळेतील दरवाज्यांतून वेगाने उडाल्या. सुनिल दूरदृष्टीने वेळोवेळी हितेन आणि रजक कुठे पोचले हे सायलीला सांगत होता आणि ती या दोघी बाहुल्यांना मनातून सूचना देऊन सांगत होती! त्यानुसार बाहुल्या आपापल्या अवकाश मार्गाने आपले टार्गेट शोधत निघाल्या.

सायलीचा हा नवा सरप्राईज प्रयोग नसता तर मग सगळ्यांना परिस्थिती वेगळ्या पद्धतीने हाताळावी लागली असती. पण आता या दोन्ही मेमरी डॉल्स मदतीला धावून आल्या होत्या.

नीता डॉल लवकरच बलूनच्या मागावर जाऊ लागली. तोपर्यंत एक ढग बलूनच्या मागे धावू लागला आणि वाफेचे रूपांतर डायरेक्ट बर्फात होऊन त्याचा बर्फाचा जलजीवा तयार झाला आणि तो त्या बलूनमधल्या रजकच्या अपहरणकर्त्यांना आव्हान देऊ लागला.

तिकडे राऊटरन आणि वायफायर वेगाने अजून पाठलाग करतच होते. राऊटरनने एकट्या बाईकवाल्याच्या अगदी जवळ जात बाईकवाल्याला आव्हान दिले. हितेनला घेऊन जाणारा बाईकवाला बराच पुढे निघून गेला होता. त्याने मागच्याला राऊटरन आणि वायफायर यांचा समाचार घेण्यास सांगितले होते.

"ए, फुकटच्या पेट्रोलवर गाडी चालवणाऱ्या हलकट माणसा!", राऊटरनने त्याला डिवचले.

"च्यायला, तुला हजार वेळा सांगितले की आमच्या मागे येऊ नको तरी येतोच आहेस. एकतर आमच्या टीम मधून त्या टीमला सामील झालास. पण माझ्याकडे वेळ नाही तुझ्याशी हुज्जत घालायला! लवकरच हे शहर आणि जग नष्ट होईल. मग बस बोंबलत स्वागत टीमसोबत!", तो चिडून म्हणाला आणि त्याने गोळीबार सुरू केला पण राऊटरनने गोळीबार शिताफीने चुकवला. त्याच्या बंदुकीच्या उरल्या सुरल्या गोळ्या मारून संपल्या.

"अरे पण विकत घेऊन पेट्रोल वापरला असता तर कळलं असतं पेट्रोलच्या किमती काय आहेत ते? फुकट्या नारोबा!"

आता तो पुढचा प्रचंड चिडला, "फुकट्या कोणाला म्हणतोस रे गधड्या! तुझ्या बापाला जाऊन मागत नाही मी पेट्रोल! थांब तुझा कायमचा बंदोबस्त करतो. आणि काय रे, साल्या, आतापर्यंत आमच्याच सोबत राहून फुकट पेट्रोल वर मजा मारली आणि आता आम्हालाच शाणपट्टी शिकवतो?", असे म्हणत त्याने गाडी थांबवली आणि रस्त्याच्या बाजूला लावली. आसपास 2/3 हेलिकॉप्टर्स घिरट्या घालत होती. त्यात न्यूज चॅनलचे पण हेलिकॉप्टर होते.

"तर अनघा अशा पद्धतीने त्याने त्या माणसाला आव्हान दिले आहे आणि आता लवकरच कळेल पुढे काय होते ते!"

"धन्यवाद किशोर! मी प्रेक्षकांना सांगू इच्छिते की आपण बघतच आहोत की कशा पद्धतीने स्वागत टीमने वाईट टीमला आव्हान दिले आणि कशा पद्धतीने आता ते फायटिंग करतील आणि अशा पद्धतीने आम्ही आमचा जीव धोक्यात घालून बातम्या तुमच्यापर्यंत पोचवत आहोत! तर अशा पद्धतीने आपण बघत आहात की..."

तिथला चॅनल हेड परत स्टुडिओमध्ये आला, "अग, अनघा!! कशा पद्धतीने आणि अशा पद्धतीने असे शब्दप्रयोग एकसारखे करू नकोस नाहीतर मी तुम्हाला अशा पद्धतीने नोकरीतून काढेल की तुम्हाला कळणारच नाही की कशा पद्धतीने काढले?"

जीभ चावून अनघा म्हणाली, "तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने मला कॅमेरा समोर नोकरी वरून काढण्याची धमकी दिली गेली आहे!!"

तो चॅनल हेड कपाळाला हात लाऊन जागेवर बसला आणि शेजारच्या पत्रकाराला म्हणाला, "अशा पद्धतीने मला मला आता कळून चुकले की कशाच पद्धतीने यांना मी सुधारू शकत नाही!"

सगळीकडे टिव्हीवर हेलिकप्टरमधून शूट केलेले लाईव्ह दिसत होते की खाली हायवेवर दोन प्रचंड बाहुबल असलेले दोन योद्धे एकमेकांवर मुष्टी प्रहार करत आहेत.

वायफायर पण तिथे येऊन थांबला.

राऊटरनने वायफायरला दोघांच्या मध्ये येऊ नको असे बजावले. राऊटरनने उलटी लाथ फिरवून त्या माणसाच्या चेहऱ्याला लागलेल्या हेल्मेटवर प्रहार केला तर त्या हेल्मेटचे दोन तुकडे झाले.

"च्यायला, या डिटेक्टिव्हने आमचीच माणसं आमच्या विरुद्ध उभी केली, सगळे डावपेच माहीत आहेत याला!"

लगेच वेळ न दवडता त्याने आणखी एक लाथ घुमवून त्याच्या मानेवर मारली. त्याला सावरायला वेळ न देता राऊटरन ने आणखी एक जोराचा मुष्टि प्रहार त्याच्या छातीवर केला आणि नंतर पुन्हा त्याच्या दोन्ही मांड्यांमध्ये खालून वर जोराचा प्रहार केला. तो कळवळला.

दुसरा बाईकवाला पुढे जाऊन थांबला आणि मागे वळून आपला साथीदार मार खातोय पाहून पुन्हा मागे वळला. तेवढ्यात दूरवर "गीता मेमरी डॉल" वेगाने उडत आली आणि अगदी हितेनच्या जवळ गाडीला समांतर उडत राहिली.

साधारण 13/14 वर्षाच्या मुली एवढी वाटणारी, सायली सारखी दिसणारी पण हिरवे रोखून पाहणारे डोळे असलेली, भुरभुर केस उडत असलेली ती लाल रंगाची बाहुली होती. तिने हितेन यांच्या डोळ्यात रोखून पाहिले, त्यांना हिप्नॉटाईज केले, तेवढ्या वेळात उडता उडता तिने स्वतःच्या हातानी आपले केस हितेन यांच्या डोक्याच्या केसांना जोडले. सायलीला हे कनेक्शन समजले. तिने प्रयोशाळेतून कॉम्प्युटर इंजिनिअरच्या मदतीने विशिष्ट कमांड रन केली (आज्ञावली कार्यरत केली). हितेनच्या डोक्यातील सगळे अणू शास्त्र संदर्भातील ज्ञान बाहुलीत ट्रान्सफर झाले आणि हितेनच्या मेंदूतून डिलीट झाले. मग हितेन संमोहन प्रभावातून जागा झाला. या सगळ्या कमांड सायलीने लगेच पाठ करून टाकल्या.

हितेनला नेमके काय झाले ते कळलेच नाही. पण डोक्यात काहीतरी गडबड झाली आहे असे मात्र त्याला राहून राहून वाटत होते. हितेनच्या बाईकवाल्याने हे पाहून त्या बाहुलीवर गोळी झाडली तेव्हा त्या बाहुलीचे हवेतच आपोआप जेली स्वरूपात अनेक तुकडे तुकडे झाले आणि गोळी तिला लागलीच नाही आणि बाहुली पुन्हा आपोआप जोडली गेली. त्याने परत गोळ्या झाडल्या पण, बाहुली तोपर्यंत उडत दूर निघून गेली आणि गोळ्या चुकवण्यासाठी तुकडे होऊन पुन्हा जोडली गेली. आता ती सुरक्षितपणे मुंबईकडे प्रयोगशाळेच्या दिशेने निघाली.

ही बातमी सायलीने सुनिलला आणि सुनिलने राऊटरन आणि वायफायरला सांगितली. तोपर्यंत राऊटरनच्या ताब्यात असलेला माणूस मारला गेला होता.

त्या बाईकस्वाराने आता धमकी दिली, "जर आमचा कुणी पाठलाग केला तर मी हितेन यांना गोळी घालेन!"

सगळीकडे हेलिकॉप्टरमधून व्हीडिओ शूटिंग सुरू होती त्यामुळे हितेनला वाचवायचे होते. दुनियेच्या नजरेत हितेन, रजक हे चांगले व्यक्ती होते. नंतर राऊटरन आणि वायफायर सुनिलच्या सांगण्यावरून तिथून उलट दिशेने जायला निघाले कारण नाहीतरी आता हितेन व्हायरसिकच्या काहीच कामाचा राहिला नव्हता, पण हे व्हायरसिकला अजून अर्थातच माहीत नव्हते कारण त्या बाहुलीने नेमके काय केले हे कुणालाही कळले नव्हते. मग आपल्या साथीदाराला रस्त्यावर सोडून हितेनला घेऊन एकटा बाईकस्वार खंडाळ्याला निघाला.

इकडे मुंबईत बर्फाच्या जलजीवाने बलूनमध्ये मारामारी सुरू केली. त्या दोघांच्या बंदुकीतून गोळ्या आल्या की जलजीवाच्या बर्फाचे तुकडे होत होते आणि ते तुकडे जमिनीवर पडण्याच्या आधीच हवेतच एकमेकांकडे आकर्षले जाऊन एकत्र येऊन पाण्यात रुपांतरीत होत होते आणि पुन्हा वाफ होऊन वर येऊन बर्फ बनून हॉट एयर बलूनवर हल्ला करत होते. त्यामुळे बलून मधल्या दोन्ही माणसांच्या बंदुकीच्या गोळ्या संपल्या. तोपर्यंत नीता बाहुलीने रजक डॉक्टरांच्या डोक्यातील माहिती डिलीट करून ती स्वतःमध्ये ट्रान्सफर करून सायलीकडे मार्गस्थ झाली. काम झाल्यावर जलजीवांनी बलूनला मुद्दाम आपल्या मार्गी जाऊ दिले आणि ते निद्राजीताला मदत करायला गेले.

टीव्हीवर वार्ताहर सांगू लागले, "हे स्वागतवाले स्वतःला समजतात तरी काय? छोट्या दोन उडणाऱ्या बाहुल्यांना पण लढायला बोलावलं होतं! यांचं काही कळत नाही!"

व्हायरसिक पण आपल्या गुहेत बसून मास्क काढून खदाखदा हसत होता. त्याचे इतर साथीदार आणि ताकामीशी मांजर पण खुदकन हसत होतं.

^^^

Group content visibility: 
Public - accessible to all site users