बांद्रा वेस्ट - ७

Submitted by मिलिंद महांगडे on 30 October, 2020 - 03:16

रॉड्रीक आणि मॉन्ट्या पुन्हा रात्री दहाच्या सुमारास बांद्रा वेस्टच्या रिक्षास्टँडपाशी आले.

” साला भेटला पाहीजे रे तो …! ” मॉन्ट्या काळजीत बालु लागला.

” भेटेल … भेटेल … डोंट वरी . ” रॉड्रीकची शोधक नजर भिरभिर फिरत होती.

” चल, तु ही लाईन घे , मी ही लाईन घेतो. ” मॉन्ट्या त्याला म्हणाला. आणि तो निघालाही.

अर्ध्या तासाने ते दोघे पुन्हा भेटले , पण दोघांचेही चेहरे पडलेले.

” आयला कुणालाच माहीत नाही रे त्या हिरव्या टोपीवाल्याबद्दल… ” मॉन्ट्या वैतागुन म्हणाला. ” साला कुठे गायब झाला काय माहीत ? ” तेवढ्यात ,

” आप लोग अस्लमको ढुंडरेले क्या ? ” एक आवाज त्यांच्या मागुन अगदी जवळुन आला . दोघांनीही काहीशा आश्चर्याने मागे वळुन पाहीलं. एक जाडजुड माणुस त्यांना विचारत होता. त्याचे तोंड पान खाल्यामुळे लाल झाले होते आणि अजुनही त्याच्या तोंडात पानाचा काही भाग होता. आणि तोच चावत चावत तो विचारत होता.

” कौन अस्लम…? ” रॉड्रीकने विचारलं.

“अरे वही, हरी टोपी पहननेवाला…! ” तो जाडा माणुस सहज बोलुन गेला.

“ तुमको किसने बताया कि हम हरी टोपी पहननेवाले को ढुंढ रहे है ? ”

“ मैने सुना अभी … ”

” तु पैचानता है क्या उसको ? ” मॉन्ट्याने आपली बंबईया हिंदी सुरु केली. समोरच्या त्या जाड्या माणसाच्या तोंडात पानाचा तोबरा असल्याने त्याने नुसतीच नंदीबैलासारखी होकारार्थी मान हलवली.

” सच्ची …? किधर है वो…? ” रॉड्रीक अधीरपणे म्हणाला.

काहीतरी बोलण्यासाठी त्याने तोंड उघडलं पण तोंडात बराच माल असल्याने काही बोबडे बोल तो बोलला…. परंतु आपले म्हणणे समोरच्याला समजले नाही याची लगेच त्याला जाणीव झाली असावी, त्याने तोंडातला खजिना बाजुलाच रिता केला. अन् म्हणाला,

” वो भाडा मारने गया है… अंधेरी… आएगा थोडी देरमे… वैसे आप कायकु ढुंडरेले है उसको…? ” तो जाड्या उगाचच विचारु लागला. मुंबईत लोक फार बिझी असतात, सतत धावत असतात, पण सत्य हे आहे की सगळ्यात जास्त रिकामटेकडे आणि दुसऱ्याच्या बाबतीत नाक खुपसणारेे इथे जेवढे आहे तेवढे जगात कुठे नसतील. रॉड्रीकने विचार केला.

” कुछ नही… ऐसेही… काम था… ” रॉड्रीक त्याला टाळण्यासाठी काहीतरी बोलला.

” वही तो पुछ रहा हुं…. क्या काम था ? ” तो जाड्या काही केल्या पाठ सोडेना पण तोच होता की ज्याला तो हिरवी टोपीवाला कोण ते माहीत होतं.

” इसका पैसेका पाकिट रैगया है उसकी रिक्षामे… ” मॉन्ट्याने एक कारण चिकटवुन दिलं. रॉड्रीकलाही ते पटलं , ” हां… हां …मै मेरा वॉलेट उसकी रिक्षॉमे भुल गया था कल. ” हे कारण त्या जाड्याला पटलं असावं बहुतेक, त्याने पुढे जास्त काही विचारलं नाही.

” हम लोग जरा सिगरेट मारके आतें है … वो क्या नाम है उसका… हां … अस्लम आएगा तो जरा आवाज देना बॉस… ” असं म्हणुन ते दोघे कटले. नाहीतर त्या जाड्याने आणखी काहीतरी फालतु विचारपुस केली असती. बराच वेळ सिगरेटचे झुरके मारण्यात गेला. दोघांच्या दोन दोन सिगरेटी संपल्या तरी तो अस्लम काही यायची चिन्हे दिसेनात.

” त्याला परस्पर तिकडेच एखादं भाडं मिळालं तर तो इथे कशाला येईल. ” मॉन्ट्याने आणखी एक शंका उपस्थीत केली …

” ओ मॉन्ट्या, प्लीज… नॉट अगेन… ” रॉड्रीक वैतागला.

इतक्यात तो जाड्या ओरडला. , ” अरे ओ भायलोग… वो देखो वो आगया अस्लम… ” ए अस्लम … इदर आ… ” त्या जाड्यानेच त्याला हाक मारली.

” हा… बोलो फारुख भाय ” म्हणत अस्लम आला. त्या जाड्याचे नाव फारुख असल्याची नवीन माहीती कळाली.

” अरे, ये लोग कितनी देरसे तेरेको ढुंडरेले है… ” म्हणत जाड्या फारुखने त्या दोघांकडे बोट दाखवले. अस्लम एक २०-२२ वर्षांचा तरुण होता. किरकोळ शरीरयष्टी, सावळा वर्ण, त्यात डोळ्यात काजळ घातलेलं त्यामुळे जरासा विचीत्रच दिसत होता तो ! रॉड्रीकला त्या रात्रीचा तो रिक्षावाला हाच आहे की दुसरा हे कळेना, तरी त्याने त्या रिक्षावाल्याला विचारलं,

” बॉस, कल रात १.३० बजे तु मुझे कार्टर रोड छोडा था… याद है…? ” तो अस्लम रिक्षावाला रॉड्रीकला निरखुन पाहु लागला, आणि काहीतरी आठवल्यासारखं करुन म्हणाला , ” भाय कल रात कार्टर रोड तो गया था लेकिन तुम नही था शायद… कोई बेवडा था । फुल पियेला था । उसको तो ठिकसे चलने भी नही आ रहा था । ” त्याने अगदी आत्मविश्वासाने उच्चारलेल्या ह्या वाक्यावर मॉन्ट्याला एकदम हसुच फुटलं तो जोरजोरात हसत सुटला. रॉड्रीकने एकवार वैतागाने त्याच्याकडे पाहीलं .

” ठिक है … उसने तेरेको दस रुपय का नोट दिया था, वो किधर है…? ” रॉड्रीकने थेट विचारलं

” दस रुपय का नोट…? कोनसा नोट…? ”

” अरे बाबा, कल टेरीफ ६० रुपय हुआ… मैने तेरेको सौ रुपय का नोट दिया. , लेकिन तेरेपास छुट्टा नही था तो मैने एक दस का नोट तेरेको दिया, याद आया …? ” रॉड्रीक शांतपणे त्याला समजेल आणि आठवेल अशा भाषेत समजावुन सांगु लागला.

” हां…. हां… याद आया… लेकिन वो तुम थे क्या ….? ” त्या रिक्षावाल्याला अजुनही विश्वास बसेना.

” हां भाई…. मै ही था…. लेकीन वो नोट मुझे वापस चाहीये… मै तेरेको दुसरा उसके बदले दुसरा नोट देता हुं । ”

” क्युं …? ऐसी क्या खास बात है उस नोट मैं….? ” तो रिक्षावाला कुतुहलाने विचारु लागला…

” वो मेरेलिये लकी नोट था । ” रॉड्रीकने काहीतरी सांगायचं म्हणुन सांगितलं

” लकी नोट बोले तो…? ” त्याला काही समजेना.

” अरे मतलब , चल जाने दे, मै तेरेको सौ रुपये देता हुं लेकीन वो नोट मुझे देदे बॉस… ” रॉड्रीक एकदम बोलुन गेला. एका दहा रुपयाच्या नोटेसाठी हा माणुस इतका का उताविळ झालाय ? , रिक्षावाल्याच्या मनात शंका येऊ लागली. काहीतरी कारण सांगायचं म्हणुन तो म्हणाला, ” लेकिन मेरेपास अभी नही है वो नोट… किदर रहेगा मालुम नही । ”

” किधर रहेगा मतलब….? देख भाय., वो नोट वैसेभी तेरे कुछ कामका नही । सादा दसका नोट है । इसके पिताजीकी आखरी निशानी है वो नोट इसीलिये चाहीये थी । और इसिलिये तो तेरेको सौ रुपये दे रहे है । दस का सौ मिल रहा है तो ले ना । ” मॉन्ट्याने त्याला त्याच्या भाषेत समजावण्याचा प्रयत्न केला .

” वो सब तो ठिक है, लेकिन कल रात का सारा पैसा मै घरमे रखके आया । ” रिक्षावाला टाळाटाळ करु लागला.

” चल ना फिर तेरे घर चलते है । किदर है तेरा घर….? ” रॉड्रीक अधीरपणे म्हणाला …

” अरे, लेकिन मेरा नंबर है लाईन मै, रिक्षाका भाडा जाय़ेगा ना मेरा…! ” अस्लम रिक्षावालाही काही कच्च्या गुरुचा चेला नव्हता. थोडीशी आडीबाजी केली तेव्हा समोरचा दहाचे शंभर रुपये द्यायला तयार झाला, तेव्हा आणखी काही कारणं सांगुन जास्त पैसे काढता येतील म्हणुन तोही अडुन बसला.

” कितना भाडा होता है तेरा ….? ” खरं तर रॉड्रीकला आता त्याचा राग येऊ लागला पण काय करणार…? अडला नारायण…..!

” देखो भाय, वैसे तो कुछ फिक्स नही । दुरका मिलेगा तो तीनसौ, चारसौ तो मिलही जाता है । ” मिळत असलेल्या पैशाची हाव त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. मॉन्ट्याच्या तर तोंडात एकदम शिवीच आली, “आईझ…. ” पण महत्प्रयासाने त्याने ती रोखली… ” अबे, क्या मुंबईके बाहरका भाडा मारता है क्या तु….? ” तो आणखीही काहीतरी बोलणार होता पण रॉड्रीकने त्याला अडवलं. मनात त्या रिक्षावाल्यावर वैतागला असुनही रॉड्रीकने मनावर संयम ठेवत त्याला विचारलं., ” ओके , टेल योर अमाउंट . कितना पैसा लेगा ….? ”

” देखो अब आप भी समजदार लोग है । मै मेरा भाडा छोडके आपके साथ आऊंगा तो… हजार रुपये दे देना । ” अस्लम मधल्या रिक्षावाल्याची जागा आता एका व्यापाऱ्याने घेतली, जो दहा रुपयांच्या नोटेसाठी हजार रुपये मागु लागला. हजार रुपयाचं नाव काढल्यावर तर मॉन्ट्याचं टाळकंच सटकलं. ” अरे क्या चुत्या समझा है क्या ….? दस रुपय के लिये हजार रुपया …? रॉडी, खड्ड्यात गेला हा…. चल… ” म्हणत त्याने रॉड्रीकला डोळ्यांनी खुणावलं. आपल्याला इतकीही त्या नोटेची गरज नाही असं भासवण्यासाठी मॉन्ट्या रॉड्रीकला घेऊन जाउ लागला . हाता तोंडाशी आलेला घास निसटणार म्हणुन रॉड्रीकच्या मनाची घालमेल होउ लागली . ९९ करोडमधुन हजार रुपये गेले तर काय बिघडणार आहे ? त्याच्या व्यवहारी मनाने विचार केला, परंतु आता बराच उशीर झाला होता, मॉन्ट्या त्याला खेचुन घेऊन जाऊ लागला. ” मॉन्ट्या, आर यु सिली ? हजार रुपयांनी काय फरक पडणार आहे…? ” रॉड्रीक चालता चालता हळु आवाजात त्याला बोलु लागला…

” गप चल , मागे बघु नको. तोच आवाज देईल…. ” मॉन्ट्या हळु आवाजात त्याला म्हणाला.

” त्याचं काय जातंय ? आपले पैसे जातील मॉन्ट्या . व्हाय डोंट यु अन्डस्टँड ? ” रॉड्रीकला तर एक पाउलही पुढे टाकवत नव्हतं. तो तसाच उभा राहीला अन् लगेच खाली वाकला . त्याच्या उजव्या शुजची लेस मुद्दाम सोडली . आणि ती पुन्हा बांधायचं नाटक करु लागला. हेतु हा की मधल्या वेळेत त्या रिक्षावाल्याचं मत बदललं तर तो लगेच आवाज देईल. पण नाही, रॉड्रीकची लेसही आता बांधुन झाली होती. आता तिथं घुटमळण्याचं काहीच कारण त्याच्याकडे नव्हतं. ‘ कॉल मी , बास्टर्ड….’ मनातल्या मनात त्या अस्लम रिक्षावाल्याला शिव्या घालतच तो उठला . थोडा पुढे गेला नसेल इतक्यात, ” ओ साब, रुको जरा … ओ साब… ” मागुन अस्लम रिक्षावाल्याचा आवाज आला. ते ऐकण्यासाठी रॉड्रीकचा सारा जीव कानात गोळा झाला होता. तो लगेचच थांबला. ” अब क्या है …? ” रॉड्रीक चेहऱ्यावरचा आनंद लपवत म्हणाला.

” साब जाने दो, आप बोलो कितना दोगे ?

” देख…. मै पाचसौ देता हुं । अबी झिगझिग नै चाहीए। ” रॉड्रीक मुद्दामच पाचशे म्हणाला. कमी रक्कम सांगितली तर परत लफडा नको.

” ठिक है चलो । पास में ही है मेरा घर. ” म्हणत त्याने होकार दिला, आणि रॉड्रीकचा जीव भांड्यात पडला. ” फारुख भाय मै आता हुं जरा घर जाके. मेरी रानी का खयाल रखना जरा । ” अस्लम रिक्षावाला मघाच्या त्या जाड्याला म्हणाला. पाचशे रुपये मिळणार ह्या खुषीतच तो निघाला. त्याच्या मागे रॉड्रीक आणि मॉन्ट्याही निघाले.

” बघ, माझी आयडीया कामी आली की नाय…? कसा आला पाचशेवर …? ” मॉन्ट्या बढाई मारत म्हणाला .

” साल्या, गॅसवर होतो मी … फाटली होती माझी … ” रॉड्रीक हळु आवाजात त्याला म्हणाला.

” पण मानलं यार तुला ! कसली ऍक्टींग केलीस तु ! ” मॉन्ट्या रॉड्रीकवर खुष होऊन म्हणाला.

” कसली डोंबलाची ऍक्टींग ! तेवढे त्याला द्यायचे हजार रुपयेही माझ्याकडे नव्हते… ” रॉड्रीकच्या ह्या उत्तरावर मॉन्ट्या तिरमिरी येऊन पडण्याच्या बेतात होता.

क्रमशः

https://kathakadambari.com

लडाखचे प्रवासवर्णन

Ladakh Bike Trip – दुचाकी लडाखायण 1

माझी अर्धदशक नावाची कादंबरी वाचण्यासाठी खाली लिंक दिली आहे

https://www.mehtapublishinghouse.com/book-details/ARDHADASHAK/3048.aspx

Amazon link

https://www.amazon.in/Ardhadashak-Milind-Mahangade/dp/9353174163/ref=sr_...

Flipkart Link

https://www.flipkart.com/ardhadashak/p/itm7149b4896e81d?pid=978935317416...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users