देवीसाठी कणकेची लेणी ( दागिने )

Submitted by मनीमोहोर on 23 October, 2020 - 14:38
देवीचे दागिने

नवरात्रात अष्टमी च्या दिवशी संध्याकाळी मुखवट्याची महालक्ष्मी उभी करतात. देवीचं ते वैभवशाली, सालंकृत प्रसन्न रूप, उदाधुपाची आणि उदबत्यांची वलय, तेवणाऱ्या समया, विविध प्रकारची फुलं फळं , हार, उत्तम कपडे घालुन दर्शनासाठी आलेल्या स्त्रिया, वातावरणात भरून राहिलेला घागरी फुंकताना होणारा आवाज ... सगळंच मन मोहून टाकणारं.

खूप जणांना माहीत नसेल म्हणून सांगते , ह्या दिवशी सकाळी नवीन लग्न झालेल्या मुली मंगळागौरी सारखी लक्ष्मी मातेची षोडशोपचारे पूजा करतात. ही पूजा पाच वर्षे करतात आणि ही पूजा करण्याची प्रथा फक्त कोकणस्थ ब्राह्मणांत च आहे. ( जस्ट सांगतेय , कृपया जातीवाचक घेऊ नये. ) पूजेनंतर मस्त पुरणा वरणाच्या नवैद्याच मिष्टान्न भोजन ही असत प्रसाद म्हणून.

तर ह्या पूजेसाठी देवीला कणकेचे दागिने ( लेणी ) ही करतात. कणकेत चिमूटभर साखर आणि भरपूर हळद घालून ती दुधात घट्टसर भिजवायची आणि आपल्याला हवे तसे छोटे छोटे दागिने करायचे. देवीला बसायला आसन म्हणून पाटा , टेकायला म्हणून वरवंटा ( मी सिंहासन ही केलं आहे ) आणि दुधासाठी एक झाकण असलेलं बोळकं ( फोटोत डाव्या हाताला दिसतंय ) ज्याला हरा डेरा अस म्हणतात ते ही करण्याची प्रथा आहे.

कणकेच्या दिव्यांनी देवीची आरती केली जाते , ते ही फोटोत दिसत आहेत.

कोणाला कधी गरज पडली तर संदर्भासाठी उपयोगी पडेल म्हणून फोटो देत आहे.

आज पूजेसाठी मी केलेले देवीचे दागिने

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कित्ती नाजूक आहे सगळं. दिव्यांना ती महिरप कशी केली, फारच छान दिसताहेत त्यामुळे दिवे. तुमच्यामुळे नवीन माहिती मिळते.

ममो, किती सुंदर! मुखवट्याची महालक्ष्मी वगैरे अनुभवले आहे पण ही दागिने तयार करुन पूजा वगैरे माहित नव्हते. तुमच्यामुळे खूप छान प्रकारे नवी माहिती मिळते.

सुरेख!
मुखवट्याची महालक्ष्मी वगैरे अनुभवले आहे पण ही दागिने तयार करुन पूजा वगैरे माहित नव्हते.>> मलाही.

सुंदर सजवलेय.
मंगळसूत्राचे काळे मणी कशाने काढले? >>>>> कदाचित काळे मिरे असेल.

खुप सुंदर आणि सुबक आहेत दागिने.

कणकेच्या दिव्यांना घातलेली मुरड अगदी नाजूक आणि एकसारखी.