टीव्हीतलं पाकिस्तान आणि स्मॉल वंडर

Submitted by वावे on 18 October, 2020 - 15:25

माझ्या लहानपणी आमच्याकडे अर्थातच ब्लॅक ॲंड व्हाईट टीव्ही होता आणि छपरावर काड्यांचा ॲंटेना. ’दंगल’ चित्रपटात सुरुवातीला टीव्हीवरची मॅच नीट दिसावी म्हणून आमिर खान ऑफिसमधल्या एकाला वर ॲंटेना पकडून उभं रहायला लावतो. लहानपणी आपल्यापैकी अनेकांनी हे केलेलं असल्यामुळे ते दृश्य आपल्याला चांगलंच ओळखीचं वाटतं. आमच्याकडे यात फरक एवढाच होता, की ॲंटेना पकडूनही टीव्हीवरचा कार्यक्रम नीट दिसायचा नाहीच. Wink मुंबईच्या दूरदर्शन केंद्रातून आमच्याकडे येणार्‍या लहरींना गावाभोवतालच्या डोंगरांचा अडथळा व्हायचा. ॲंटेना कितीही ॲडजस्ट करा, टीव्हीवरचं चित्र पूर्ण स्पष्ट कधीच दिसायचं नाही. त्यात आणखी एक डोकेदुखी होती, ती म्हणजे टीव्हीत घुसणारं पाकिस्तान! आमच्या दृष्टीने मुंबई जशी उत्तरेला, तशी कराचीही जवळजवळ उत्तरेलाच. त्यामुळे व्हायचं काय, की ॲंटेना जशा मुंबई दूरदर्शन केंद्राकडून येणार्‍या लहरी पकडायचा, तशा कराचीकडून येणार्‍या लहरीही पकडायचा आणि मग या दोन्ही लहरींचं भांडण सुरू व्हायचं. याचा परिणाम म्हणजे टीव्हीच्या पडद्यावर कधी खालून वर तर कधी वरून खाली जाणारे आडवे पट्टे यायला लागायचे. लगेच घरातलं कुणीतरी म्हणायचं, "पाकिस्तान घुसलं". आधी हलके, सावकाश जाणारे हे पट्टे अधिकाधिक स्पष्ट व्हायचे आणि भराभर जायला लागायचे आणि आमच्या रंगोलीचा किंवा एखाद्या चांगल्या सिनेमाचा विचका व्हायचा. हे इतक्या वेळा व्हायचं, की त्याचीही सवयच झाली होती. पाकिस्तान नावाचा एक देश आहे, हे ज्ञान होण्यापूर्वी माझी अशी समजूत होती, की पाकिस्तान म्हणजे आडव्या रेषा! Biggrin कधीकधी तर हा प्रकार एवढा वाढायचा की चक्क पीटीव्ही (पाकिस्तान टीव्ही)चं चित्र दिसायला लागायचं.

मुळात पूर्ण गावात मिळून दोनतीन टीव्ही, त्यात ते नीट दिसायचे नाहीत. त्यामुळे मनोरंजनासाठी आम्ही काही टीव्हीवर अवलंबून नव्हतो. पण अर्थातच अशी करमणूक मिळाली तर आम्हाला हवी असायचीच. ती अधूनमधून मिळायची ती ’पिक्चर’ मधून! थिएटरला जाऊन सिनेमा बघण्याचा प्रश्नच नव्हता, कारण जवळच्या कुठल्याच गावात थिएटर नव्हतं. पण गावात कुणाकडे लग्नाच्या निमित्ताने किंवा इतर कुठल्या कारणाने सत्यनारायणाची पूजा असली, की रात्री हमखास ’पिक्चर’ असायचा. म्हणजे जवळच्या मोठ्या गावातल्या दुकानातून कलर टीव्ही, व्हीसीआर आणि दोन किंवा कधीकधी तीनसुद्धा सिनेमांच्या व्हिडिओ कॅसेट्स भाड्याने आणायच्या. कधीतरी एकदोनदा ’स्वदेस’ मधे दाखवलाय तसा मोठा पडदा आणि प्रोजेक्टरही आणला होता. रात्रीची जेवणं झाली, की ज्यांच्या घरी पूजा असेल त्यांच्या अंगणात एखाद्या टेबलावर सगळा सरंजाम मांडायचे. दोन सिनेमांपैकी एक मराठी आणि एक हिंदी. आधी मराठी लावायचा. म्हणजे तो संपला की जनरली बायका उठून झोपायला निघून जायच्या आणि मग मुलं हिंदी सिनेमा बघायला मोकळी. मराठीत एक तर अशोक सराफ-लक्ष्मीकांत बेर्डे-सचिनचे चित्रपट किंवा मग ’माहेरची साडी’, ’हळद रुसली कुंकू हसलं’ टाईपचे आणि हिंदीत अजय देवगण-अक्षयकुमार हे नेहमीचे यशस्वी कलाकार असायचे.

तर अशा दृश्य मनोरंजनाच्या बाबतीतल्या अभावग्रस्त परिस्थितीत असताना Wink १९९६-९७ साली आमच्याकडे डिश ॲंटेना बसला. शहरांमध्ये तेव्हा केबल टीव्ही येऊन काही वर्षं झालेली असल्यामुळे नातेवाईकांकडे गेल्यावर झी, सोनी वगैरे चॅनेल्स पाहिलेली होती. आता आमच्याकडेही झी टीव्ही दिसायला लागला (आणि त्याच्याबरोबरच पीटीव्हीसुध्दा दिसायला लागलं, पण आता आडव्या पट्ट्या नाही, तर स्वतंत्र, वेगळ्या चॅनलच्या रूपात.) झीवरचे अंताक्षरी, सारेगम असे लोकप्रिय कार्यक्रम, हम पॉंच ही विनोदी मालिका आम्ही बघायला लागलो. तेव्हा स्टार टीव्ही नुकताच भारतात सुरू झाला होता. त्याच्यावर बरेचसे कार्यक्रम इंग्लिशच असायचे. ’लॉस्ट इन स्पेस’ नावाची एक इंग्लिश मालिका संध्याकाळी लागायची, ती मी कधीकधी बघायचे. तेव्हा संवाद फारसे कळत नसले, तरी कथा कळायची.

संध्याकाळी साडेसात वाजता ’स्मॉल वंडर’ ही इंग्लिश मालिका (हिंदीत डब केलेली) लागायची. रोबोटिक्स इंजिनिअर असलेला टेड लॉसन, त्याची बायको जोन, मुलगा जेमी आणि टेडने तयार केलेली यंत्रमानव विकी, ही या मालिकेतली प्रमुख पात्रं. शेजारी रहात असलेली हॅरिएट आणि तिचे आईवडील, हे काहीसे त्रासदायक आणि नाक खुपसणारे शेजारी. ही मालिका मात्र आम्ही अगदी एन्जॉय करायचो. रोबो असल्यामुळे विकीकडून होत असणार्‍या करामती, ती रोबो आहे हे इतरांपासून लपवून ठेवण्याच्या प्रयत्नात टेड, जोन आणि जेमीची उडणारी तारांबळ, त्यातले छोटेछोटे शाब्दिक आणि प्रासंगिक विनोद हे सगळं आम्हाला खूपच आवडलं. हिंदीतलं डबिंगही खूपच चांगलं होतं. अमेरिकन सीरियल पहिल्यांदाच बघत असल्यामुळे त्यातल्या अनेक गोष्टी (नवराबायकोंनी एकमेकांना ’हनी’ म्हणणं, जेमीचं मैत्रिणीबरोबर ’डेट’ वर जाणं वगैरे वगैरे) तेव्हा आमच्यासाठी नवीन होत्या. सगळ्यांचा अभिनय छानच होता, विशेषतः विकीचा. हॅरिएटच्या आईचं विशिष्ट लकबीत ’नो..नो..नो..नो..नो..नो’ म्हणणं अगदी लक्षात राहण्यासारखं ( जसं ’फ्रेंड्स’ मधल्या जेनिसचं ’ओ. माय. गॉड.’). एक नवीनच जग बघायला मिळाल्यासारखं वाटलं होतं. त्यामुळे ’स्मॉल वंडर’ आठवलं की ’टीव्हीत पाकिस्तान घुसण्यापासून आमची मुक्तता झाली ते दिवस’ आठवतात. Proud

सध्या हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे टाटा स्काय हिट्स नावाच्या वाहिनीवर सध्या ’स्मॉल वंडर’ लागतेय. तीही संध्याकाळी साडेसातलाच. जवळजवळ वीसबावीस वर्षांनंतर परत एकदा टेड, जोन, जेमी, विकी, हॅरिएट आणि तिच्या आईला पहायला छानच वाटतंय. तेव्हा जशी मजा येत होती, तशीच आजही येते. यात नॉस्टॅल्जियाचा भाग आहेच, पण फक्त नॉस्टॅल्जिया नक्कीच नाहीये. Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्मॉल वंडर हिंदी डब एपिसोड्स मुलीला दाखवायचे आहेत. पण ईंटरनेट वर शोधून मिळाले नाहीत. कृपया लिंक द्यावी.
तसेच आवडीचे कार्यक्रम डेनीस दी मेनीस, आणि जिनी हे ही होते.

छान !
टीव्ही विषयावर बरेच आठवणी आहेत..
पण हे पाकिस्तान टीव्ही लागायचा थेट हि नवीन माहीती माझ्यासाठी

वावे, नॉस्टॅल्जिया!
She is a smaaaaaaallll wonder ..
मला ५:३० वाजता सोनी वर लागणार स्मॉल वंडर आठवतंय

आमच्याकडे ब्लॅक अँड व्हाइट टीव्ही होता, त्यामुळे स्मॉल वंडर, different Strokes, Bewitched, I dream of .. The Nanny यांच्या कृष्णधवल आठवणी आहेत Happy

पाफा, हिंदी डबिंग असलेल्या भागांच्या लिंक्स नाहीत हो माझ्याकडे. मुळात यूट्यूबवर स्मॉल वंडर आहे हेही मला माहिती नव्हतं. म्हणजे मी शोधलंच नव्हतं. आता टीव्हीवर लागतेय हे सांगितल्यावर आतेबहिणीने सांगितलं की यूट्यूबवर आहे.
ऋन्मेष, तुम्हा मुंबईकरांना मुंबई दूरदर्शन केंद्राचे सिग्नल चांगले स्ट्रॉन्ग मिळत असल्यामुळे पाकिस्तान टीव्हीचे सिग्नल त्यात घुसण्याचा प्रश्नच नाही. पुण्यातसुद्धा सिंहगडावर रिपीटर असल्यामुळे सिग्नल स्ट्रेंग्थ चांगली असायची.
इलेक्ट्रॉनिक्स किंवा फिजिक्सच्या दृष्टीने बघायला गेल्यावर लक्षात आलं की हा एक interference होता. दोन साधारण सारख्या फ्रिक्वेन्सीच्या लहरी एकत्र आल्यामुळे हा interference pattern दिसायचा. थंडीच्या दिवसात हा त्रास कमी असायचा. पावसाळ्यात सगळ्यात जास्त.

डिफरंट स्ट्रोक्स वगैरे सोनीवर लागायचं का? तेव्हा सोनी आमच्याकडे दिसायचं नाही. (सोनीचा उपग्रह वेगळ्या दिशेला होता.तेव्हा केबलवाल्यांकडे दोन तीन डिश असायच्या वेगवेगळ्या दिशेला रोखलेल्या. आमच्याकडे केबल नव्हती. स्वतःपुरती एक डिश होती. हे डायरेक्ट टु होमच्या आधीचं आहे. आता सगळी चॅनल्स दिसतात.)

श्रद्धा, सोनीवर साडेपाच वाजता स्मॉल वंडर लागायचं ते आठवतंय मला. २०००/२००१ मधे ना? तेव्हा नेमका माझा एक क्लास असायचा त्यामुळे मी नेहमी नाही बघायचे.

स्मॉल वंडर आवडती!
त्याच बरोबर बुनियाद, वडीलांची फेव्हरेट 'ल्युसी शो' हा पण आवडता!
मोजकेच कार्यक्रम असल्याने सगळेच बघितले जायचे....अगदी 'आमची माती आमची माणसं' सुध्दा Lol

आमच्या भागात काहींना शोध लागला की दुबईइच्या कुठल्यातरी चॅनेलवर शुक्रवारी संध्याकाळी हिंदी सिनेमा दाखवतात. मग त्या चॅनेलचा सिग्नल शोधंणं आणि मुंगळे मुंगळे दिसत असलेल्या पडद्यावर तो सिनेमा बघायचे. तसा दर रविवारी दूरदर्शनवर हिंदी सिनेमा असेच. पण तरीही हा दुबईवाला दिसतोय का बघायचे.

वावे खूप छान लेख आणि मस्त आठवणी जाग्या केल्यात !
स्मरणरंजन .. +११
आमच्याकडे केबल फार फार उशिरा आली ..त्यामुळे स्मॉल वंडर काय मी पाहिलेलं नाही .. पण बाकीच्या बऱ्याच वाक्यांना अगदी अगदी झालं .. अँटेना कायम सारखा करणे आणि tv वरच्या मुंग्या घालवणे , "आणि आलं का ?- नाही अजून , आलं का ?- नाही अजून " यात अर्धा कार्यक्रम संपलेला असायचा .. किंवा वातावरणात जर्रा हलकेच वारा यायचा झाडाचं थोडं पण हलण्याच निमित्त व्हायचं आणि सगळं मुसळ केरात !
मुंबई पुण्याला नातेवाईकांकडे गेल्यावर tv च्या रिमोट च मुळात कौतुक आणि त्यातून इथे २ पेक्षा जास्त चॅनेल दिसतात याचं तर कायम हेवा वाटायचा

स्मॉल वंडर.. अतिशय आवडती मालिका. लहानपणी ५:३० वाजता बघायचो आम्ही भावंड मिळून..
आता मुलांना दाखवायची आहे.. हिंदीत ड्ब केलेली आहे का ? युटुब वर नाही सापडली. त्यांच्या सोबत मलाही परत बघता येइल. इंग्लिश मध्ये ती मजा नाही येणार.. इतका प्रत्येकाचा हिंदीतला आवाज डोक्यात आहे अजून. ..!

माझ्या एका मित्राला खूप आवडायची ही सिरीयल. मी पाहिले दोन चार भाग पण जास्त आवडली नाही. याच काळात संध्याकाळी थ्री स्टुजेस लागायची पाच वाजता. 15- 20 मिनिटे पोट दुखेपर्यंत हसायचो. आता दोन एक वर्षांपूर्वी युट्युबवर पाहिले काही भाग, पण का माहीत लहानपणी हसायचो तसं हसू नाही आलं. कालानुरूप माणसाच्या आवडीनिवडी बदलत जातात.

थ्री स्टूजेस लहान मुलांसाठी पहायला थोडं ब्रुटल आहे. म्हणजे त्यात मारण्याचे, काहीतरी इजा होण्याचे प्रसंग खूप आहेत
आम्ही 'आय अ‍ॅम मंकीज अंकल' आणि बीअर बॅरल पोलकॅटस एपिसोड अजूनही बघतो. मजेशीर आहेत.

डिफरंट स्ट्रोक्स, सिल्वर स्पून हे आठवतात Happy

पाकिस्तान टीव्ही पण आमच्याकडे कधीमधी अचानक लागायचा. त्यातल्या सिरियल्स अगदी घरगुती बजेटमधे बनवलेल्या पण मनोरंजक असायच्या. मजा म्हणजे प्रत्येक एपिसोडमधे एकदातरी भारताचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष उल्लेख असायचा Happy

बोकलत, काळानुरूप आवडीनिवडी बदलतात हे खरंच. त्यामुळे स्मॉल वंडर मला आत्ता बघायला आवडतेय याचं मलाही जरा आश्चर्यच वाटतंय. आत्ताच्या मुलांना आवडेल असं नाही. त्यांना कार्टून्स बघायची सवय झाली आहे. माझा मोठा मुलगा बघतो माझ्याबरोबर अजून तरी.

बी एस, तुम्ही इंग्लिशमधलं स्मॉल वंडर ऐकून बघा. आवडेल तुम्हाला.
बाकी तुम्ही सगळ्यांनी इथे लिहिलेल्या कुठल्याच इंग्लिश सीरिअल्स मला माहिती नाहीत. डेनिस द मेनेस वगैरे नावं फक्त ओळखीची आहेत. 'हूज द बॉस' चा वर उल्लेख झालाय तीपण सीरियल चालू आहे टाटा स्काय हिट्स वर. आणि 'माईंड युअर लँग्वेज' नावाची हलकीफुलकी मस्त विनोदी सीरियलपण लागते।

भरत, तुम्ही हे दुबईच्या चॅनलचं लिहिलंय ते मलाही ऐकल्यासारखं वाटतंय. पण नीट आठवत नाहीये. रविवारी आपल्याकडे मराठी सिनेमा लागायचा ना? शनिवारी हिंदी. आणि शुक्रवारी रात्री पण हिंदी लागायचा का?

मोजकेच कार्यक्रम असल्याने सगळेच बघितले जायचे....अगदी 'आमची माती आमची माणसं' सुध्दा>>>अगदी बरोबर विनिता! आणि आमची माती आमची माणसं लागायच्या आधी हमखास ती सामाजिक वनीकरणाची जाहिरात लागायची. " पोरी...ये पोरी, पावनं आलं बग! " Wink

आता दोन एक वर्षांपूर्वी युट्युबवर पाहिले काही भाग, पण का माहीत लहानपणी हसायचो तसं हसू नाही आलं. कालानुरूप माणसाच्या आवडीनिवडी बदलत जातात.
>>>

मी देखील थ्री स्टुजेस पाहून प्रचंड हसायचो. पण आता एकदा पाहिल्यावर हसू आले नाही. तुम्ही म्हणताय ते खरे आहे.

कालानुरूप माणसाच्या आवडीनिवडी बदलत जातात. >>>> खरं आहे. तेव्हा काही खूप आवडणारे कार्यक्रम आता पाहिले तर साधारण वाटतात किंवा मग फारसे आवडत नाहीत.

वावे, मस्त लिहिलं आहे. स्वानुभव नसल्याने रिलेट नाही करता आलं तरी लेख खूप आवडला.

पोरी...ये पोरी, पावनं आलं बग! " >>> मस्तच जाहिरात होती Happy

माझ्या धाकट्या बहिणीच्या एका मैत्रिणीला मी अजून पण हे चिडवते Happy

खुप पुर्वी रविवारी हिंदी. चित्रपट आणि.शनिवारी मराठी . नंतर हे उलटे केले गेले.

स्मॉल वंडर’ नाही बघितले पण ल्युसी आणि स्टार्टट्राक बघितल्याचे आठवते. मि स्पॉक हा फेवरेट कलाकार होता. जपान ची जायंट रोबो नावाची पण एक मालिका यायची.

खुप पुर्वी रविवारी हिंदी. चित्रपट आणि.शनिवारी मराठी . नंतर हे उलटे केले गेले.>> ओह! नाही, हे मला आठवत नाही.

सगळ्यांना धन्यवाद. हा लेख तसा casually च लिहिला. स्मॉल वंडर परत टीव्हीवर लागतं, तेही साडेसात वाजताच, या आनंदामुळे Happy

Pages