डिडरोट इफेक्ट (Diderot Effect)

Submitted by उडन खटोला on 15 October, 2020 - 05:05

ही १७६५ सालची गोष्ट. डेनिस डिडरोट आतापर्यंत ५२ वर्षाचा झाला होता. त्याने खूप जास्त पुस्तके वाचलेली होती आणि जणू त्याची लायब्ररीच त्याच्याकडे होती. तरी त्याने त्याचे पूर्ण आयुष्य गरिबीत काढलेले होते. त्याच्या मुलीच्या लग्नासाठीसुद्धा त्याच्याकडे पैसे नव्हते.
एकेदिवशी रशियाची त्यावेळेची राणी कँथरीनला डिडरोटच्या ह्या गरिबीबद्दल माहित झाले. तिने डिडरोटला त्याच्याकडील लायब्ररी विकत घेण्यासाठी 1000 GBP, म्हणजेच ५० हजार डॉलर्स किंवा आताचे जवळपास साडेतीन करोड रुपये डिडरोटला देऊ केले. आणि डेनिस डिडरोट एका दिवसांत खूप श्रीमंत झाला.
त्याने लगेच त्या पैशातून "स्कार्लेट रॉब" म्हणजे एक उच्च्प्रतीचा सदरा विकत घेतला जो अतिशय महागडा होता. हा सदरा वापरत असतांना त्याला अचानक जाणवले की आपण घालतोय अतिशय उच्चप्रतीचा सदरा आणि आपल्या घरात त्याच उच्चप्रतीच्या वस्तू नाहीत. मग त्याने हळूहळू घरातल्या वस्तू बदलल्या, किचन रूममधल्या वस्तू बदलल्या, फर्निचर बदलले आणि अशा सगळ्या नवीन वस्तू विकत घेतल्या ज्यामुळे आता पूर्ण घर आणि सदरा एकमेकांना शोभून दिसत होते.
परंतु हे सगळे करण्यामध्ये तो पूर्णतः कंगाल झाला आणि त्याच्या नावावर असलेले कर्ज जास्तच वाढून गेले. त्याने हे सगळे दुखः कष्टाने सहन केले आणि हे सगळे आपल्या एका निबंधांत नमूद करून ठेवले.
ह्याला मानसशास्त्रात "डिडरोट इफेक्ट (Diderot Effect)" म्हणतात. मोठ्या कंपन्या, विक्रेते, डेव्हलपर्स ह्या इफेक्टचा वापर छुप्या पद्धतीने करतात.
तुम्ही ३०००० हजाराचा मोबाईल घेणार. मग तुम्हाला काहीतरी कमी वाटेल मग तुम्ही अजून ५०० रुपयाचा गोरील्ला ग्लास लावणार. ५००-६०० रुपायचे महिन्याला कव्हर बदलणार. जिथे ५०० रुपयाचा हेडफोन कामी आला असता तिथे ३००० चा हेडफोन घेणार कारण तो मोबाईलला जास्त शोभून दिसेल. एखादा निळ्या रंगाचा मस्त शर्ट घेतला की त्याला मेचींग असलेले घड्याळ, किंवा पँट घेणार.घरी मस्त मोठा टिव्ही आणला की चांगला टेबल आणणार, त्याला टाटा स्काय लावणार, HD वाहिन्या सुरु करणार. रंग चांगला लावला की खिडकीला पडदे लावणार, सजावट करणार.
डिडरोट इफेक्ट एका वाक्यात थोडक्यात सांगायचा झाला म्हणजे : "एक नवीन वस्तू विकत घेतली असता तिच्यामुळे दुसऱ्या वस्तूंचा दर्जा आपोआप कमी होतो आणि तो वाढविण्यासाठी आपल्या हातून नकळतपणे जास्त खर्च होतो."
तुम्हीच पहा, सगळे विक्रेते छुप्या पद्धतीने डिडरोट इफेक्टचा वापर करतात. एक साधा चहा वाला तुम्हाला चहासोबत सिगारेट देऊ का विचारतो? SIM विकणारा ३ किंवा ४ महिन्याचे packs टाकून द्यायचे म्हणतो, एक laptop विकत घेतांना त्यासोबत २-३ हजाराचा antivirus टाकून मिळतो. लिंबू, आद्रक, टमाटे घेतल्यावर तुम्हाला म्हटले जाते " आले मिरची पण घ्या की!!". भांडे घेतल्यावर त्याच्यावर ५० रुपयात नाव कोरून मिळते, झाडं विकत घेतली की १०० रुपयाला त्याच खत मिळते. अशी असंख्य उदाहरणे आहेत.
आपण घेतो एक वस्तू आणि दुसऱ्या वस्तू आपोआप घ्यावेसे वाटतात भले त्यांची गरज आपल्याला नसते . आणि अशा पद्धतीने आपण एक वस्तू घेऊन अनेक अनावश्यक किंवा फारसे महत्वाच्या नसणाऱ्या वस्तू त्या पण गरज नसतांना घेऊन टाकतो. आणि आपल्याला कळतसुद्धा नाही. ह्याला "spiralling consumption" म्हणतात म्हणजे एकामुळे दुसऱ्या अनेक गोष्टी गरजेचे वाटणे आणी विकत घेतल्या जाणे.
लक्षात ठेवा, हा "डिडरोट इफेक्ट (Diderot Effect)"!!
ही मानवी मनाची वागणूक आहे, ह्युमन टेन्नडन्सी!! आणि ह्याला थांबवले जाऊ शकते. ह्याचे परिणाम भयानक आहेत का?? मी सांगेल जास्त भयानक आहेत. कारण परिणाम उघड्या डोळ्यांनी नाही दिसत. आपण नकळतपणे अनावश्यक खर्च करतच जातो आणि खूप उशिरा लक्षात येत हे सगळे.
माणसाला खर्च करण्याची भीती वाटत नाही. त्रास होतो तो हिशोब न लागण्याचा!! - व.पु.काळे
तुम्हीच स्वतःला प्रश्न विचारायचा. "मला ह्या वस्तूची खरच गरज आहे का?" उत्तर हो आले तर आहे त्या किमतीत न घेता रिसनेबल किमतीत वस्तू शोधावी.
वस्तूंची उपयोगिता किती त्यानुसार त्यांना विकत घ्यायचे, ना की स्वतःचे ते किती स्टेटस वाढवतील त्यामुळे.समोरच्याने दुसरी वस्तू दाखवली तरी भान विसरायचे नाही. लक्षात ठेवायचे की, "वस्तू मस्त, भारी वाटली तरी तिचा तुमच्या आनंदाशी आणि उपयोगितेशी काडीचा संबंध नाही." आनंद वाटत असला तरी तो क्षणिक असतो. कालांतराने आनंद जातो आणि पैसेसुद्धा!!
"डिडरोट इफेक्ट (Diderot Effect)"!!
माहिती संदर्भ :
Understanding the Diderot Effect (and How To Overcome It)

#संपादित

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगली माहिती.
यावरून एक इंग्लीश अवतरण आठवले. त्याचा भावार्थ :

आपण आपल्याला न आवडणाऱ्या शेजाऱ्यांवर छाप पाडण्यासाठी आपल्याला गरज नसलेल्या वस्तू विकत घेत असतो.