डिटेक्टिव्ह निगेटिव्ह (भाग २६ - वाईट हेतू)

Submitted by निमिष_सोनार on 14 October, 2020 - 07:03

भाग २५ ची लिंक: https://www.maayboli.com/node/77004

भाग २६ - वाईट हेतू

दरम्यान भारतातील विविध शहरांत तसेच जगभर, "वाईट लोक येतील, वाईट लोकांना मारतील..." हा मेसेज अजूनही लोकांना आपल्या मोबाईल फोन्सवर येतच होता. ज्या त्या देशातील आणि राज्यातील भाषेतून हा मेसेज येत होता. तसेच काही दिवसांपूर्वी जगातील काही वास्तू, स्मारके, जागतिक सात आश्चर्ये अर्धवटरित्या गायब झाली होती. जगातून मेडिकल, सायन्स आणि पोलिसी क्षेत्रातील बरेच महत्वाचे व्यक्ती गायब होत होते अन्यथा त्यांना ठार मारण्यात आले होते. ज्या वास्तू, स्मारके नष्ट झाल्या त्या संपूर्णपणे नष्ट न होता ओबडधोबड पद्धतीने नष्ट झाल्या होत्या. नष्ट झालेल्या वास्तूंजवळ कसलेही गांभीर्य न ठेवता काही असंवेदनशील लोक तिथे गर्दी करत होते, सेल्फी काढू लागले होते आणि फेसबुक, इन्स्टाग्राम व इतर सोशल मीडियावर ते फोटो अपलोड करून फोटो खाली विविध कमेंट लिहू लागले होते. तशाच प्रकारच्या लाईन्सचे शिर्षक घेऊन न्यूज चॅनल्सवाले सुद्धा विविध प्रोग्राम दिवसभर दाखवायला लागले. वर्तमानपत्रात विविध लक्षवेधी हेडलाईन दिसत होत्या. संपादकीय लिहिले जात होते. सर्व मिडीयाला चघळण्यासाठी आणखी एक नवीन विषय मिळाला होता त्यामुळे ते खुश होते. सोशल मिडीयावर पण वेगवेगळे ट्रेंड आणि हॅशटॅग बनवून चर्चा झडत होत्या.

"भग्न वास्तू जवळ आम्ही आत्म मग्न!"
"भग्न झाल्या वास्तू, नग्न झाली सुरक्षा व्यवस्था!"
"वास्तू आणि स्मारके गायब करण्याचा विरोधकांचा डाव!"
"लवकरच पृथ्वी सुद्धा गायब होणार. आपण सर्व जण आकाशात तरंगणार!"
एक नागरिक म्हणाला, "असे झाले तर फार छान होईल. मी आणि माझी गर्लफ्रेंड दोघेही आकाशात मुक्त विहार करू!"
दुसरा: "सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे ह्या सगळ्या गोष्टी गायब होत आहेत!"
तिसरा: "या सगळ्याला विरोधी पक्ष जबाबदार आहे!"

चौथा: "हे सगळे अपक्ष उमेदवार घडवून आणत आहेत, जे गेल्या निवडणूकीत हारले!"
पाचव्याने माईकवर बोलायला नकार देता देता काढता पाय घेतला आणि मागे वळून तो एवढेच म्हणाला, "जग नष्ट होणार आहे लवकरच. वाचवा स्वत:ला, लोकांचे इंटरव्ह्यू काय घेत बसलात?"

ह्या सगळ्या बातम्या सुरु असतांनाच एके दिवशी भारतातील न्यूज चॅनेल्सकडे एक व्हिडीओ आला. त्यांनी तो जगभरातील इतर चॅनेल्सला सुद्धा पाठवला. त्या व्हिडिओमध्ये मास्क घातलेले पाच जण एका खोलीत बसलेले दिसत होते.

मुंबईहून हाच व्हीडिओ स्वागत टीमकडे पण पाठवला गेला आणि सगळीकडे जगभर त्या त्या भाषेत सबटायटल टाकून आणि काही देशांत डबिंग करून वेळेच्या थोड्याफार फरकाने प्रसारित केला गेला.

व्हीडिओमध्ये पाचपैकी एक जण जो त्यांचा प्रमुख वाटत होता तो एका मोठ्या स्क्रीनच्या समोर उभा होता. बाकी चार जण खुर्च्यांवर बसलेले होते. दोन जण डावीकडे, दोन उजवीकडे. त्यात दोन लेडीज होत्या ज्यांनी काळ्या रंगाचा तंग टीशर्ट आणि पांढऱ्या रंगाच्या शॉर्ट जीन्स पॅन्ट तर जे बसलेले जेन्ट्स होते त्यांनी पांढऱ्या रंगाचा तंग टीशर्ट आणि काळी जीन्स पॅन्ट असे कपडे घातलेले होते. त्यांच्या उभ्या आलेल्या प्रमुखाने जांभळे जॅकेट आणि लाल रंगाची ट्राउझर घातली होती, पण जशी तो हालचाल करत होता तसे ट्राउझरचे रंग चमकत चमकत बदलत होते. कधी हिरवा तर कधी तपकिरी तर कधी पिवळा. प्रत्येकाच्या टीशर्ट वर विरुद्ध रंगाने WAAAIT असा शब्द लिहिलेला होता. वाईट?

प्रमुखाने व्हायरस सारख्या दिसणाऱ्या चेहऱ्याचा मास्क घातला होता. खुर्चीवर बसलेल्या दोघा जेन्ट्सपैकी एकाने एक असा मास्क घातला होता की तोंडाच्या जागी पासवर्डचा आयत आणि त्याजागी स्टार स्टार स्वरूपात लिहिलेला पासवर्ड होता तर दुसऱ्याने भीतीदायक जळत असला राक्षसी चेहरा असलेला मास्क घातला होता.

लेडीज पैकी एकीने नेटवर्क दर्शवणारे बॅकराउंड असलेला चेहरा तर दुसरीने grep ही युनिक्स ऑपरेटिंग सिस्टिम ची एक कमांड छापलेला एक चेहरा असा मास्क घातला होता.

प्रमुखाने म्हणजे त्या पाचही जणांच्या लीडरने एक रिमोट उचलला आणि एक बटन दाबले आणि समोर स्क्रीनवर WAAAIT अशी अक्षरे उमटली आणि खाली त्याचा लॉंग फॉर्म लिहिलेला होता.

WAAAIT = War Against Automation, Artificial Intelligence and Technology

मग तो मोठ्याने हसायला लागला, त्याचे हसणे वाढतच गेले, मग त्याने स्वतःच्या डोक्यावर जोराने दोन चार टपल्या मारल्या आणि हसता हसता तो खाली बसला. थोडा वेळ त्याने खाली चेहरा केला, मान गुडघ्यात घातली आणि जमिनीकडे बघून मान अनेकदा डावीकडे आणि उजवीकडे वळवली. मग अचानक गंभीर झाला आणि वेगाने पुन्हा उठून उभा राहिला आणि हवेत वेगवेगळे असंबद्ध हातवारे करत म्हणाला,

"नमस्कार, तुम्हा सगळयांना आम्ही आधीच थोडे घाबरवायला सुरू केले आहे. तुमच्यापैकी बरेचजण आतापर्यंत गायब झाले असतील, तसेच बऱ्याच निर्जीव गोष्टी ज्यांचा तुम्हा मानव जातीला अभिमान होता त्या आता अर्ध्या नष्ट झाल्यात, विद्रुप झाल्यात. हे सगळे आम्ही केले. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्ही कोण? आतापर्यंत कुणालाच आम्ही कोण आहोत हे माहिती नव्हते. आम्ही आहोत वाईट लोक! शब्दशः 'वाईट' आणि वृत्तीनेही वाईट! पण आम्ही सुरुवातीपासून असे नव्हतो बरं का! जन्मापासून कुणीही वाईट नसतं, व्हिलन नसतं! परिस्थिती तसे बनवते! आतापर्यंत अगणित चित्रपटांत तुम्ही हा डायलॉग ऐकला असेल, नाही? होय, कारण ते खरे आहे!"

स्क्रीनवर आता एक चित्र दिसत होते ज्यात जगभरातील चित्रपटातील गाजलेल्या खलनायकांचे फोटो एकत्र केलेले होते. स्क्रीनकडे बघून त्याने सुस्कारा टाकला आणि स्वतःच्या हाताने मानेच्या मागच्या बाजूला दोन तीन चपट्या मारल्या आणि मग गोल फिरून म्हणाला, "अरे अरे मी बोलतांना भरकटत चाललोय! तुम्हाला तत्वज्ञान शिकवायला लागलो, सॉरी सॉरी! आता मुद्द्यावर येतो. आधी माझे नाव सांगतो. मी आहे व्हायरसिक! आणि हो जरा थांबा, सगळ्यात आधी मी एक गोष्ट क्लियर करतो, आमची भाषा जात धर्म याबद्दल कोणतेच तर्क वितर्क लढवू नका आणि आमची वर्गवारी करू नका. आम्हाला जवळपास सगळ्या भाषा अस्खलितपणे बोलता येतात. आणि हो, आमची एकच वर्गवारी आहे! ती म्हणजे आम्ही सगळे बेरोजगार आहोत म्हणजे तुमच्या भाषेत बेकार! या सर्व बेकार लोकांना शोधून शोधून मी काम दिले, रोजगार दिला! हे बेकार होते पण आता माझ्यासाठी काम करून करून हे सगळे लई बेक्कार झालेत हां! यांच्या नादी लागू नाका बरं तुम्ही!"
खुर्चीवर बसलेल्या दोघा जेन्ट्सकडे बोट दाखवून तो म्हणाला, "हे आहेत पासवर्डन आणि फियरवॉल!"

आणि दोन्ही लेडीजकडे बघून तो म्हणाला, "या दोघी आहेत नेटवर्किता आणि युनिक्सा!"

"फक्त हे चारच नाहीत तर आम्ही खूप जण आहोत, सगळीकडे विखुरलेले आणि पसरलेले आहोत. तुमच्या शहरात गावात सगळीकडे! ऑटोमेशन (स्वयंचलित मशीन), आर्टिफिशयल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) आणि रोज येणारी नवनवीन टेक्नॉलॉजी (तंत्रज्ञान) यामुळे बेरोजगार झालेली ही सगळी लोकं आहेत! या सर्वांच्या विरोधात आम्ही युद्ध पुकारले आहे. एक वर्ष सरत नाही की आले नवीन तंत्रज्ञान, मग आधीचे तंत्रज्ञान बेकार आणि ते शिकलेला माणूस पण बेकार! किती बेक्कार परिस्थिती आहे, नाही?"

आता स्क्रीनवर अनेक रोबोट मानवांच्या पाठीवर बसून त्यांना चाबूक मारत हसत आहेत असे चित्र होते.

जगभर सगळे लोक टीव्हीवर हा व्हीडिओ बघत होते. न्यूज चॅनेल्सनी लगेचच स्वतःचे डोके उथळपणे चालवून वेगवेगळे तर्क वितर्क लढवायला सुरुवात केली. स्वतःच निष्कर्ष काढायला सुरुवात केली. स्वागत टीम सुद्धा सुपर नेचर बेटावर हे सगळे बघत होती.

तो माणूस चिडून टेबलावर तीन चार वेळा रिमोट आपटून आपटून पुढे म्हणाला, "कॅसेट गेली, सीडी आली, डीव्हीडी आली, नंतर लगेच पेन ड्राईव्ह आले, मेमरी कार्ड आले. अरे काय चालवलं काय तुम्ही? एकावर आधारित नोकरी व्यवसाय करा आणि त्यात जम बसेपर्यंत दुसरा शोध लागतो. लगेच तिसरा. इंटरनेट आले, सायबर कॅफे सुरू झाले मग काही वर्षातच मोबाईल आले आणि मोबाईलवर इंटरनेटची सोय आली मग सायबर कॅफे बंद पडले. एसटीडी बूथ सुरू झाले, कॉइन बॉक्स आले त्यात जम बसत नाही तोवर मोबाईल आले, म्हणून एसटीडी बूथ आणि कॉइन बॉक्सचा धंदा बसला. मोबाईलमध्ये कॅमेरे आले, तर फोटो स्टुडिओवाल्यांचा धंदा बसला. डिजिटल स्वरूपात फोटो साठवता यायला लागल्यामुळे फोटो प्रिंटिंगचा धंदा बसला! अशी किती उदाहरणे देऊ?"
स्क्रीनवर त्याने सांगितलेल्या सगळ्या वस्तू दिसत होत्या आणि प्रत्येक वस्तूवर लाल फुली मारलेली होती.
पुढे तो म्हणाला, "हे झाले टेक्नॉलॉजी बद्दल! मग तुम्ही महान सायंटिस्ट दिमागवाल्या लोकांनी ऑटोमेशन संस्कृती आणली आणि अनेकांचे जॉब पुन्हा गेले. ऑटोमेशन आले, स्वयंचलित मशीन आले त्यामुळे त्यावर काम करणारे कामगार देशोधडीला लागले. ऑफिसमध्ये कॉम्प्युटर आले आणि दोन चार माणसांचे काम एकच कॉम्प्युटर करायला लागले! वेगवेगळे फास्ट प्रिंटर आले आणि त्यांनी अनेक कलाकाराची रोजीरोटी हिसकावून घेतली. ऑइल पेंटने अगदी छान हाताने पोस्टर चित्र आणि शब्द लिहिणारे कलाकार देशोधडीला लागले कारण प्रिंटर त्यांचे काम करू लागले. आता तर थ्रिडी प्रिंटर आणले तुम्ही! म्हणजे अनेक प्रकारच्या वस्तूपण आता कॉम्प्युटर आपोआप निर्माण करणार म्हणजे उत्पादन करतांना ज्या कामगारांच्या हाताला काम मिळत होते ते बंद झाले!"

प्रिंटरमधून कागदाऐवजी सपाट आणि चपटा झालेला एक माणूस बाहेर यतोय असे चित्र स्क्रीनवर होते.

"मोबाईलचा शोध लागला त्यामुळे माणसे जगभर एकमेकांशी जोडली गेली, जगाच्या कानाकोपऱ्यात काही झाले तरीही त्याचे पडसाद जगाच्या दुसऱ्या टोकाला उमटू लागले. पण फायद्यापेक्षा नुकसानच खूप झाले. मोबाईलद्वारे चोवीस तास उपलब्धतेमुळे ऑफिसचे काम घरी यायला लागले. घरचे ऑफिस झाले. मोबाईलवर दहशतवादी अगदी सहजपणे एकमेकांच्या संपर्कात राहू लागले!"

एक दीर्घ श्वास घेऊन तो पुन्हा म्हणाला, "मेडिकल क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान आले पण त्यातही लोक गौरफायदा घेऊ लागले. एकाचा अवयव दुसऱ्याला बसवता येऊ लागला, दुसऱ्याचा डोळा तिसऱ्याला, तिसऱ्याचे हृदय चौथ्याला. मान्य आहे यामुळे प्राण वाचले पण सर्व सामान्यांना याचा उपयोग होतोय का? मूठभर श्रीमंतांनाच याचा उपयोग होतोय! उलट सजीव शरीराशी खेळून तुम्ही त्यात बदल करून मानवजातीला नष्ट करण्याचा घाट घातलाय. कधी तुम्ही काही आगाऊ डॉक्टर लोक कृत्रिम व्हायरस तयार करता तर कधी सायंटिस्ट लोक चेन रियाक्शनचा शोध लावता आणि अणुबॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब यासारखी विघातक अस्त्रे बनवून देशादेशातील युद्धाच्या आणि शत्रुत्वाच्या नावाखाली आपल्याच मानवजातीला नष्ट करायला निघालात? मूर्ख लेकाचे!"

नंतर तो पाठमोरा झाला, मास्क काढून त्याने पाणी पिले, पुन्हा मास्क लावला आणि कॅमेरासमोर आला आणि म्हणाला, "आता तर तुम्ही हद्द केली! कलाकार लोकांनाही सोडले नाही. तुमचे कॉम्प्युटर आणि रोबोटच कविता पण करायला लागले, कथा लिहायला लागले, कथा वाचून दाखवायला लागले भाषांतर करायला लागले, चित्र काढायला लागले. ह्युमन टच नाहीसा होत चाललाय सगळीकडे! "

आता स्क्रीनवर लेखकाचा पेन आणि कलाकाराचा ब्रश एक रोबोट पायाखाली चिरडत आहे असे चित्र होते.

"कोणताही नवीन शोध, नवीन टेक्नॉलॉजी हे सर्वसामान्य लोकांच्या आवाक्यात नसेल तर त्याचा काय उपयोग? आयटी क्षेत्रात रोजगार निर्माण केले, प्रोग्रॅम लँग्वेज बनवल्या! ओके! त्यामुळे घरबसल्या कॉम्प्युटर आणि मोबाईलवर वेबसाईट, अँपद्वारे बिल भरता येते, ऍडमिशन घेता येते, खरेदी करता येते, बँकिंग व्यवहार ऑनलाईन सुरळीतपणे आणि सोपे होतात, वेळ वाचतो हे खरे!! पण ऑनलाईन फ्रॉड पण त्याच प्रमाणात वाढले. व्हायरस टाकता येईल, हॅकिंग करता येईल असे प्रोग्रॅम का बनवले? काय उपयोग तुमच्या या सगळ्या गोष्टींचा? एखादा दरोडेखोर कॅश चोरायचा पण त्याला मर्यादा तरी होत्या. पण आता? ऑनलाईन बँकिंग मध्ये काय होते आहे? एक पासवर्ड माहीत झाला तर क्षणांत हॅकर लाखो करोडो रुपये इकडचे तिकडे करू शकतो!"

आता स्क्रीनवर चमचामध्ये टाकून पैसे खाणाऱ्या हॅकरचे चित्र होते.

"आयटी क्षेत्र निर्माण झाले आणि नंतर तुम्हीच तुमच्या पायावर धोंडा मारला. त्यातही तुम्ही आणखी कमी वेळेत जास्त आणि अचूक काम करण्याच्या हव्यासापोटी ऑटोमेशन आणले आणि परत काही जॉब गेले. म्हणजे इतरांचे जॉब ज्यांच्यामुळे आणि ज्या टेक्नॉलॉजीमुळे गेले त्याच टेक्नॉलॉजीमुळे पुन्हा त्यांचेच जॉब गेले!!"

आता स्क्रीनवर पृथ्वीचे चित्र होते पण त्यावर झाडांऐवजी ज्वाला होत्या.

"ह्या सर्व विज्ञानाच्या नादात आपण सर्वजण निसर्गाला विसरत चाललो, निसर्गाचे नुकसान करत चाललो आहोत! मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड, जंगलतोड करून सिमेंटचे जंगल वसवले! आणि निसर्ग? त्याने तुम्हाला दिलेल्या साधन संपत्तीच्या बदल्यात तुम्ही निसर्गाला काय दिले रे बिनडोक मानवांनो? स्वतःला विज्ञानवादी म्हणवणारांनो? विज्ञान विज्ञान करत करत मानवता आणि निसर्ग हेच तुम्ही विसरलात? बावळट आणि बिनडोक लोकांनो! अकलेच्या कांद्यानो! ज्या फांदीवर बसता तीच कापणाऱ्या विश्वासघातकी आणि कृतघ्नांनो!"

असे म्हणून त्याने स्वतःचे डोके स्क्रीनवर तीन चार वेळा आपटले. आपटत राहिला!! स्क्रीन होल्डर धडपडून खाली पडण्याच्या बेतात होता तसेच प्रोजेक्टरच्या वायरी ताणल्या जाऊन तुटू शकणार होत्या तेवढ्यात नेटवर्किता आणि युनिक्सा खुर्चीवरून उठल्या आणि दोघींनी त्याला धरले आणि एका रिकाम्या खुर्चीवर बसवले आणि म्हणाल्या, "बॉस, जास्त डोक्याला त्रास करून घेऊ नका. जास्त स्पष्टीकरण पण देऊ नका. फक्त आता यांना आपला पुढचा प्लॅन सांगा म्हणजे यांच्या पायाखालची जमीन सरकेल!"

सावरून नेटवर्किताच्या रिकाम्या खुर्चीवर बसत हताश व्हायरसिक म्हणाला, "नेटवर्किता, आता तूच सांग पुढचं!"

^^^

Group content visibility: 
Public - accessible to all site users