चमचेगिरी

Submitted by nimita on 12 October, 2020 - 05:03

सकाळपासून ती जरा बेचैन होती. आत्तापर्यंत कमीतकमी दहा वेळा तरी तिनी स्वैपाकघरात सगळीकडे शोधलं होतं.. घरातल्या सगळ्यांना चार चार वेळा विचारून ही झालं होतं; शेजारीपाजारी ही चौकशी करून झाली होती ; पण तिला हवा असलेला 'तो' चमचा काही केल्या तिला सापडत नव्हता.

त्याच्या आठवणीतच पूर्ण दिवस निघून गेला. शेवटी - "आता उद्या स्वैपाकघरातल्या सगळ्या ट्रॉलीज रिकाम्या करून बघते.. देवा, सापडू दे रे तो एकदाचा!" अशी प्रार्थना आणि निश्चय करून तिनी त्या दिवसाची शोध मोहीम आवरती घेतली.

तिच्या या निर्णयामुळे घरातल्या बाकी मंडळींनी पण सुटकेचा श्वास सोडला...' चला, आता उद्यापर्यंत तरी शांति मिळेल या घरात'- या आशेवर सगळे झोपेची आराधना करायला लागले.

थोड्याच वेळात सगळं घर शांतपणे झोपी गेलं... पण स्वैपाकघरातल्या चमच्यांच्या ट्रॉलीमधे मात्र हळूहळू कुजबुज वाढायला लागली. एक छोटा कॉफी स्पून म्हणाला," त्या ताई सकाळपासून कोणाला शोधतायत?" त्यावर कपाळावर हात मारून घेत ट्रॉली मधला एक चमचा म्हणाला," घ्या... इतकं सगळं रामायण झालं आणि आता ह्याला प्रश्न पडलाय की रामाची सीता कोण ? अरे बाळा, त्या ताईंचा एक चमचा सकाळपासून कुठेच दिसत नाहीये.. म्हणून त्या शोधतायत." त्यावर तो छोटू चमचुला म्हणाला," पण इथे तर आपण कित्ती सगळे आहोत - वेगवेगळ्या आकारांचे, वेगवेगळ्या डिझाइन चे... स्टीलचे, प्लास्टिकचे , लाकडाचे... कित्ती व्हरायटी आहे ! तरी पण त्या...."

त्याचं ते निरागस वक्तव्य ऐकून त्याच्या शेजारी उताण्या पहुडलेल्या उलथन्यानी त्याला समजावत म्हटलं," तोच तर प्रॉब्लेम आहे... आपण इतके सगळे जण असलो तरी त्या ताईंना मात्र तो त्यांचा 'खास' चमचा च हवा असतो... आणि त्याला कारणही तसंच आहे... तो चमचा त्यांच्या आई नी त्यांना दिलाय न... संक्रांतीच्या हळदीकुंकवात वाण म्हणून लुटला होता त्यांनी तो चमचा." त्यावर नाक मुरडत दुसरा एक वाकडा झालेला चमचा म्हणाला," हं !! हे म्हणजे काहीतरीच बरं का .….देऊन देऊन काय दिलं तर फक्त एक चमचा ... आणि त्यासाठी शब्द काय तर म्हणे -'लुटला'.... जणूकाही राजाचा खजिनाच!! जर चमचा च 'लुटायचा' होता तर मग चांगला सहा किंवा बारा चमच्यांच्या सेट लुटावा ना !! हे काय ? एक च चमचा !! बिचारा , त्याच्या साथीदारांना किती मिस करतो तो ! मी बऱ्याच वेळा बघितलंय त्याला ट्रॉलीच्या कोपऱ्यात बसून रडताना..."

त्याचं हे बोलणं त्यांच्यातल्या बऱ्याच जणांना अजिबात पटलं नाही. त्यांनी सगळ्यांनी अगदी एका सुरात आपला निषेध दर्शवला.. त्यांच्यातला एक जण पुढे म्हणाला ," नाटकं रे - नुसती नाटकं !! इतकं जर वाईट वाटतं तर मग जेव्हा ताई चमचा घ्यायला म्हणून ट्रॉली उघडतात तेव्हा नेहेमी त्यांच्या पुढे पुढे का करतो रे तो ? सतत त्यांच्या समोर गोंडा घोळत असतो .. आणि म्हणे बिचारा !! खरं म्हणजे त्याच्यासारख्या चापलुसी करणाऱ्या जातभाईंमुळेच आपल्या जातीची बदनामी झालीये... कायमचा ठप्पा लागलाय आपल्या कपाळी.... तुम्हाला म्हणून सांगतो....ती माणसं - त्यांच्यातल्या अशा पुढे पुढे करणाऱ्या लोकांना 'चमचा' म्हणतात.... आपल्या नावाची ही अशी बदनामी होताना ऐकून किती अपमान होतो माहितीये !! पण काय करणार ? आपलंच नाणं खोटं आहे ना ! "

या मुद्द्यावर मात्र ट्रॉलीमधल्या वेगवेगळ्या जाती धर्माच्या चमच्यांनी आपली संमती दिली.

"आणि याच्या जोडीला अजून ते दुसरे चपटे चमचे !!"आता हळूहळू इतर चमचे देखील आपलं मन मोकळं करायला लागले..." बाहेर- काकांच्या बार मधे आहेत ते रे !! मी तर असं ऐकलंय की - केवळ बाहेर बार मधे राहून त्या ग्लासातली दारू चाखता यावी म्हणून त्यांनी सगळ्यांनी आपलं रूप, आपला चेहेरा मोहरा च बदलून टाकलाय म्हणे.... म्हणजे मागचं शरीर साधारण आपल्यासारखंच पण मुख्य चेहेरा पूर्णपणे वेगळा... आणि हे सगळं कमी होतं की काय.... म्हणून स्वतःचं नाव ही बदलून घेतलंय. आता ते सगळे स्वतःला 'चमचा' म्हणत नाहीत बरं का .... ते आता stirrers आहेत stirrers !" एका खोलगट चमच्यानी आपला राग जगजाहीर करत म्हटलं.

ही नवीन माहिती कळताच मगाचच्या त्या छोटू चमच्यानी विचारलं," पण हे stirrers करतात तरी काय?" त्यावर बार च्या दिशेनी एक तीक्ष्ण कटाक्ष टाकत एक जण म्हणाला," दुसरं काय करणार? दुसऱ्याच्या आयुष्यात ढवळाढवळ करतात... भोचक कुठले ! "

त्याला नक्की कशाचा राग आला होता ते मात्र नीटसं समजलं नाही.... म्हणजे त्या stirrers नी रूप परिवर्तन केलं त्याचा .. का त्यांना रोज दारूच्या ग्लास मधे डुंबायला मिळतं त्याचा !!!

पण त्याच्या या रागाचं समर्थन करत एक काटा - म्हणजे - आपला फोर्क म्हणाला," मी अगदी पूर्णपणे सहमत आहे तुमच्या या मुद्द्याशी.... काही जण असतातच असे भोचक आणि संधिसाधु.... 'आपण इतरांपेक्षा कसे वेगळे आणि स्पेशल आहोत' हे दाखवण्यासाठी वाट्टेल ते करतात... अहो, परवा आपल्या ताईंची मुलगी तिच्या त्या maggi बरोबर मला पण बाहेर बाल्कनी मधे घेऊन गेली होती... मी त्या नूडल्स च्या गुंत्यातून स्वतःला सोडवून घ्यायचा प्रयत्न करत होतो ना तेव्हा माझं लक्ष समोरच्या बाल्कनीत गेलं... बघतो तर काय ??? तिथे एक मुलगा फोर्क ऐवजी चक्क दोन काड्यांनी त्याच्या नूडल्स खात होता. त्या दोघांच्या बोलण्यातून समजलं की त्या काड्यांना चॉप स्टिक्स म्हणतात म्हणे... आणि दुसऱ्या कुठल्या तरी देशात म्हणे लोक फोर्क ऐवजी ह्या चॉप स्टिक्स च वापरतात.... हे सगळं ऐकल्यापासून माझी रात्रीची झोप उडालीये हो... आता आमच्या अस्तित्वावरच गदा येणार असं दिसतंय.... लोक काट्याने काटा काढतात हे ऐकून होतो...पण आता 'चॉप स्टिक्स नी काट्याचा काटा काढला' अशी नवी म्हण येईल वाटतं बाजारात !!!"

"अहो, आता जग बदलतंय.... त्यामुळे आपल्या नवीन पिढ्यांमधेही कोणत्या ना कोणत्या स्वरूपात हे बदल दिसणारच ना !! कोणीतरी म्हटलंच आहे- परिवर्तन हाच जगाचा नियम आहे.. त्यामुळे आता आपणही हे नवे बदल स्वीकारायला हवेत....." देवघरातल्या पळीने आपले उदात्त विचार मांडत म्हटलं.

तिच्या बोलण्याला दुजोरा देत ट्रॉलीमधली एक जुनी लोखंडी पळी म्हणाली," तुझं म्हणणं पटतंय गं पोरी.... पण आमची अवस्था म्हणजे- तुज कळते परी ना वळते- अशी झालीये बघ. आता माझंच उदाहरण घे... माझ्या तरुणपणी या स्वैपाकघरात मला किती महत्व होतं. रोजच्या स्वैपाकात तर माझा अगदी हक्काचा वावर असायचाच.. पण इतर वेळी सुद्धा माझी गरज भासायची या लोकांना... जर कधी घरातल्या एखाद्या व्यक्तीला घरी यायला उशीर झाला तर माझीच मदत घ्यायचे हे सगळे. जोपर्यंत ती व्यक्ती घरी येत नाही तोपर्यंत मला दाराच्या कडीला अडकवून ठेवायचे...पण आजकाल या नव्या मोबाईल मुळे कोणीच कोणाची वाट बघत नाहीत बघ.. त्यामुळे साहजिकच माझी कोणाला आठवणच होत नाही. "

त्यावर तिला सांत्वना देत एक प्लास्टिकचा चमचा म्हणाला," अहो आजी, आता जरी तुमची गरज भासत नसली तरी निदान तुमच्या अस्तित्वाला तर काही धोका नाहीये ना ? पिढ्यानपिढ्या या ट्रॉलीमधे विराजमान आहात तुम्ही.... आमच्या सारख्यांचा जरा विचार करा ... आम्ही सगळे प्लास्टिकचे चमचे disposable या कॅटेगरी मधे मोडतो....मोडतो म्हणजे अगदी शब्दशः मोडतो बरं का ! 'गरज सरो वैद्य मरो' या धर्तीवर एकदा का आमचा वापर झाला की हे कृतघ्न लोक सरळ आम्हांला फेकून देतात... आणि नुसतं फेकत नाहीत तर परत कोणीही वापरू नये म्हणून अगदी छिन्नविच्छिन्न करतात हो आम्हांला !

पण मी तर असंही ऐकलंय की आता या लोकांनी नवीन प्रकारच्या चमच्यांचा शोध लावलाय म्हणे.... edible spoons !! म्हणजे आधी त्या चमच्यानी एखादा पदार्थ खातात आणि मग चक्क चक्क त्या चमच्यालाच खातात !! किती ही क्रूरता !!!"

हा नवीन अपडेट ऐकून तर सगळ्याच चमच्यांच्या हृदयात धडकी भरली. काही वेळ कोणीच काही बोलले नाही. तेवढ्यात एका छोट्या dessert spoon ची आई- म्हणजे - आपली टी स्पून हो... हळू आवाजात त्याला दटावून गप्प करायला लागली ; पण तो काही केल्या गप्प बसायला तयार नव्हता. शेवटी त्याच्या वडिलांनी- टेबल स्पून - नी वैतागून विचारलंच ; त्यावर ती 'टी स्पून' म्हणाली," कोणाचं काय तर कोणाचं काय... आपण इथे किती महत्वाच्या विषयावर चर्चा करतोय - आणि याचं आपलं वेगळंच टुमणं ... याला म्हणे मोठा झाल्यावर मिलीटरीत जायचंय !"

तिचं हे विस्फोटक विधान ऐकून सगळ्या चमच्यांनी त्या छोट्या dessert spoon च्या दिशेनी बघायला सुरुवात केली... "हे काय? चक्क चक्क धर्म परिवर्तन ?? पण हे खूळ आलंच कसं याच्या डोक्यात?" एका सुजाण चमच्यानी प्रश्न केला; त्यावर त्या खुळ्याची आई म्हणाली,"अहो, मागच्या आठवड्यात आपल्या ताईंच्या एका मैत्रिणीचा वाढदिवस होता, म्हणून ताईंनी तिच्यासाठी गाजर हलवा करून पाठवला होता. तेव्हा त्या डब्याबरोबर माझ्या मुलाला पण पाठवलं होतं तिकडे. इतक्या दिवसांनंतर काल तो डबा आणि माझा मुलगा परत आलेत. तेव्हापासून ह्या खुळ्यानी माझ्या जीवाला नुसता घोर लावलाय. "

"पण त्या मैत्रिणीचा काय संबंध ह्या सगळ्याशी?" कोणीतरी शंका विचारली.

त्यावर स्पष्टीकरण देत खुळ्या चमच्याची आई म्हणाली," नाही कसा? अहो, ती मैत्रीण आहे मिलिटरी वाली !! साहजिकच तिच्या घरी सगळा मिलिटरी खाक्या...प्रत्येक बाबतीत अगदी नको तेवढी शिस्त !! अहो, कालपासून एकेक गोष्टी ऐकतीये ना ... बाई,बाई बाई... ऐकावं ते नवलच !! अहो, त्यांच्या घरात म्हणे सगळे चमचे सुद्धा नियमात बांधलेले... जो चमचा ज्या कामासाठी बनलाय त्यानी तेच काम करायचं म्हणे !" आपल्या या मुद्द्याचं स्पष्टीकरण देत ती पुढे म्हणाली," आता आपल्याकडे कसं.. आपण सगळे गुण्यागोविंदानी या एकाच ट्रॉली मधे एकत्र राहतो.. ज्याला जे काम पडेल - म्हणजे आपल्या ताई आपल्याला जे काम सांगतील ते आपण अगदी मन लावून करतो.. आता हेच बघा ना- परवा जेवायच्या वेळी ती भातवाढी कुठे सापडली नाही तर ताईंनी चक्क झारा घेतला भात वाढायला ! आणि आज सकाळी ताईंच्या मुलानी चक्क तो छोटू कॉफी स्पून सरळ सरळ लोणच्याच्या बरणीत खुपसला !!! पण त्याच्या तोंडातून तक्रारीचा एक तरी सूर बाहेर पडला का ? आपल्या कोणाच्या स्वभावातच नाहीये ते !!

पण त्या मिलिटरी वाल्यांच्या घरात म्हणे - अगदी तुपाच्या चमच्यापासून ते फोडणीच्या पळी पर्यंत- प्रत्येकाला जे काम वाटून दिलंय तेच करायची प्रथा आहे. कामावरून इतका भेदभाव ? म्हणजे स्वैपाकाचे चमचे वेगळे; अन्न वाढायला घ्यायचे चमचे वेगळे...आणि खायला वापरायचे चमचे वेगळे !!

अहो, माझा छोटू तर सांगत होता की - त्यांच्याकडे म्हणे जेवणाच्या ताटाभोवती अगदी रांगोळी काढल्यासारखी वेगवेगळ्या चमच्यांची सजावट करून ठेवलेली असते...चमचे, काटे, सुऱ्या !!! प्रत्येक पदार्थ खाण्यासाठी वेगळा चमचा .... अगदी सूप पासून शेवटच्या स्वीट डिश पर्यंत ... नुसतं ऐकूनच काटा आला बाई माझ्या अंगावर !"

तिचं हे सगळं वर्णन ऐकून बाकी सगळ्या चमच्यांना पण धडकी भरली. आपल्या बोलण्याचा योग्य परिणाम होतोय हे लक्षात आल्यावर ती पुढे म्हणाली," आता तुम्हीच सांगा... हे असं सगळं जमणार आहे का आपल्या सारख्यांना ? आपण आपले साधे भोळे ! जसे आहोत- जिथे आहोत- तिथेच ठीक आहोत ; हो की नाही ? पण माझं हे म्हणणं माझ्या या खुळ्या बाळाला पटेल तर शप्पथ !"

त्या खुळ्या बाळाला समजावण्यात अख्खी रात्र उलटून गेली. सकाळी सकाळी ताईंच्या आवाजानी पुन्हा एकदा ट्रॉलीमधे हालचाल व्हायला सुरुवात झाली.. आज त्या सगळयांना थोड्या वेळासाठी का होईना पण स्थित्यंतर करावं लागणार होतं... सगळ्यांनी आपापल्या मनाची तशी तयारी करून ठेवली होती. पण ताईंनी ट्रॉलीच्या दिशेनी बघितलं देखील नाही. त्या घरातल्या सगळ्यांना खूप उत्साहाने काहीतरी दाखवत होत्या. "हे बघा, माझ्या आईनी अधिक मासाचं वाण म्हणून काय पाठवलंय !! चांदीचा कटलरी सेट !!! "

त्यांचं बोलणं ऐकून साहजिकच ट्रॉली मधल्या सगळ्या चमच्यांची उत्सुकता वाढली.. "कटलरी सेट म्हणजे काय?" एकानी विचारलं. त्यावर ट्रॉलीच्या तुटक्या हँडल च्या भोकातून बाहेर बघत दुसरा चमचा म्हणाला," अरे, हा तर चमच्यांचा सेट आहे.. एकदम नवा कोरा, चकचकीत ... आणि नुसते चमचेच नाही तर त्यांची ती पेटी सुद्धा खूप छान आहे...एकदम मखमली !! पण मला एक कळत नाही... हे सगळे चमचे त्या पेटीत असे एका ओळीत सीट बेल्ट लावून का बसलेत? "

त्याचं हे वर्णन ऐकून सगळ्या चमच्यांनी एकेक करून त्या भोकातून बाहेरच्या कटलरी सेट चं दर्शन घेतलं.

थोडा वेळ सगळेच गाप होते...' या नव्या कटलरी मुळे आता आपला पत्ता कट होणार ' याची त्यांना जाणीव झाली होती.

तेवढ्यात त्यांच्यातला एक डिटेक्टिव्ह चमचा म्हणाला," मला काय वाटतंय सांगू का ? काल ताई ज्या चमच्याला शोधत होत्या ना - त्याचाच डाव आहे हा! आपण सगळे त्याच्या नावानी खडे फोडतो ना म्हणून त्यानी मुद्दाम हा कट केलाय आणि म्हणूनच हा कटलरी सेट घरात आलाय.....मला तर सुरुवाती पासूनच त्याच्यावर संशय होता...एक नंबर चा कटप्पा आहे तो... आपल्याच नातेवाईकांच्या पाठीत सुरा खुपसलाय त्यानी !!

त्याचं वाक्य संपायच्या आधीच ट्रॉली मधले सगळे चमचे त्या कटप्पाच्या शोधात निघाले..
समाप्त

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक नंबर चा कटप्पा आहे तो... आपल्याच नातेवाईकांच्या पाठीत सुरा खुपसलाय त्यानी !!

त्याचं वाक्य संपायच्या आधीच ट्रॉली मधले सगळे चमचे त्या कटप्पाच्या शोधात निघाले..
---->
मला शोधताय?