डिटेक्टिव्ह निगेटिव्ह (भाग ५ - सायन्स फेस्टिव्हल)

Submitted by निमिष_सोनार on 9 October, 2020 - 05:49

भाग ४ ची लिंक: https://www.maayboli.com/node/76946

५. सायन्स फेस्टिव्हल

काही वर्षानंतर -

बांद्रा येथे प्रचंड मोठा जागतिक सायन्स फेस्टिव्हल सुरु झाला होता. आठ दिवसांसाठी तो चालणार होता. प्रत्येक देशांतून निवडक तरुण जगासाठी आणि मानवजातीसाठी उपयुक्त ठरतील असे आपापले नवनवीन सायन्स प्रयोग येथे घेऊन आले होते. काहींनी आपापल्या प्रयोगांचे पेटंट घेतले होते.

त्यात सुजित लहाने म्हणून एक खेडेगावातून आलेला बुद्धिमान विद्यार्थी होता. अमित बडे या त्याच्या मावसभावाकडे वरळीला तो शिकत होता. सुजितने असे काही उपकरणं बनवले होते की अजूनपर्यंत ते कोणालाही साध्य झालेले नव्हते.

केवळ एक रुपया खर्च करून हवेपासून अतिशुद्ध एक लिटर पिण्याचे पाणी बनवणे आणि दहा रुपये खर्च करून हवेपासून एक लिटर पेट्रोल बनवणे त्या उपकरणांद्वारे शक्य होते. त्यामुळे इंधनाची प्रचंड बचत होणार होती. हे कसे साध्य झाले याचा फॉर्मुला अजून त्याने इतर कुणालाही सांगितलेला नव्हता. त्याने एकट्याने हा प्रयोग केला होता. प्रयोगाबद्दलची संपूर्ण माहिती त्याने लॅपटॉप मध्ये आणि गुगल ड्राईव्हवर ठेवली होती आणि त्याचा पासवर्ड फक्त त्यालाच माहिती होता.

कडेकोट बंदोबस्तात काही शिक्षकांसह एका व्हॅनमध्ये हे उपकरण येथे त्यांनी आणले होते. इंधन क्षेत्रात ही मोठी क्रांती होणार होती. हे मॉडेल रोज रात्री एका अज्ञात स्थळी नेऊन पुन्हा सकाळी सायन्स फेस्टिव्हलमध्ये आणायचे असे ठरले होते कारण स्वस्तात इंधन निर्मिती हा एक आंतरराष्ट्रीय संवेदनशील विषय होता. फेस्टिव्हल बघायला येणाऱ्या लोकांमधून कुणी स्पॉन्सर मिळाले तर हा प्रयोग जागतिक पातळीवर राबवून सर्वांचे भले होईल अशी अपेक्षा होती. सुजित आणि काही हितचिंतक शिक्षक यांनी भारत सरकारकडे सुद्धा याबद्दल प्रयत्न करायचे ठरवले होते.

सायन्स फेस्टिव्हलच्या प्रवेशद्वाराजवळ एंट्रीसाठी आणि तिकिट खिडकीवर प्रचंड रांग होती. तिकिटाच्या रांगेमध्ये पांढरा रुमाल, गॉगल आणि क्रिकेटची उन्हाची टोपी घातलेला माणूस पुढे सरकत होता. त्याच रांगेत सायली प्रथमे ही मुलगी आणि तिचे कुटुंब हे सगळे नंबर लावून उभे होते आणि पार्किंग एरियामध्ये दूर एका गाडीजवळ आणखी एक जण संशयास्पदरित्या एक इलेक्ट्रॉनिक उपकरण हातात घेऊन फिरत होता. सिक्युरिटी गार्डस आणि पोलीस यांच्या नजरेपासून बचाव करून आपला कार्यभाग साधण्यासाठी त्याला बरीचशी कसरत करावी लागत होती.

सायलीचा भाऊ सुमित म्हणाला, "अहो पप्पा, तिथे लिहिले आहे की आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे आणि मोबाईल बंद करायला सांगितले आहे!"

पप्पा म्हणाले, "अरे हरकत नाही सुमित! आपल्यासोबत सायली असल्यावर मग कॅमेराचे काय काम?"

असे म्हणून दोघांनी एकमेकांना टाळी दिली आणि सायलीसुद्धा त्यावर मनापासून हसली.

त्यावर मम्मी म्हणाली, "अरे तुम्हा दोघं बाप बेटे मिळून उगाच सायलीला त्रास देत असता. प्रत्येक गोष्टीसाठी तिच्यावरच अवलंबून राहायची सवय लागली तुम्हाला. पण तुमच्या मेंदूची क्षमता त्याने घटते आहे हे लक्षात ठेवा!"

सायलीच्या नजरेतून एक विचित्र दिसणारा भुंगा सुटला नाही. तो बराच वेळ तिच्या आसपास घोंगावत होता आणि मग प्रवेशद्वारातून तो आतमध्ये गेला. रांग पुढे सरकत होती. अनेक जिज्ञासू विद्यार्थी, विज्ञाननिष्ठ व्यक्ती हे सगळे रांगेत उभे होते. सर्वांना उत्सुकता होती आत मध्ये कोणकोणते वैज्ञानिक शोध, उपकरणे बघायला मिळणार याची!

आत मध्ये भव्य हॉल होता. त्यात एकूण पन्नासच्या वर सेक्शन होते. चार रोबोट पहारेकरी आळीपाळीने प्रत्येक सेक्शनमध्ये फिरत होते, सर्वांना वेलकम करत फिरत होते. पर्यावरण, इंधन, अवकाश विज्ञान आणि संशोधन (स्पेस सायन्स), डिफेन्स सायन्स (संरक्षण विज्ञान), इलेक्ट्रॉनिक्स, इनस्ट्रुमेंटेशन, मेकॅनिकल, बायोलॉजी, बायो फ्युएल (जैव इंधन), बायो डायव्हर्सिटी (जैव विविधता), केमिस्ट्री, फिजिक्स, वगैरे असे विविध विभाग होते. तो भुंगा प्रत्येक सेक्शन मध्ये घोंगावत जाऊन थांबत होता आणि पुढे सरकत होता. जणू काही इतर माणसांसारखे त्यालाही प्रत्येक प्रयोगाबद्दल जाणून घ्यायचे होते!

* * *

सुनिल आता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि सायबर सिक्युरिटी (ITCS) या शाखेत इंजिनिअरिंग करत होता आणि शेवटच्या वर्षाला होता तसेच अनिलला एका कंपनीत जॉब मिळाला होता. सुनिलला ते स्फटिकवाले घड्याळ सांभाळून ठेवायला फार त्रास व्हायचा. डोळ्यात तेल घालून ते घड्याळ त्याला इतर कोणाच्या हाती जाऊ नये हे बघावे लागत होते.

याच दरम्यान सुनिल साहसबुद्धेची मध्य प्रदेशात दिलेली आत्या सुमन हिचे मिस्टर रणजित बहादूर यांची मुंबईत दादर येथे सुप्रीटेंडन्ट ऑफ पोलीस (एस पी) म्हणून नुकतीच बदली झाली होती. म्हणून सर्वजण दादरला त्यांना भेटायला गेले होते. त्यांचे पोलीस स्टेशन आणि घर दादर परिसरातच होते.

सुनिलला पोलीस डिपार्टमेंटबद्दल खूप कुतूहल होते. विज्ञानाच्या विविध उपकरणांच्या मदतीने पोलीस डिपार्टमेंटला गुन्हेगारांना पकडण्यासाठी कशा प्रकारे मदत होऊ शकेल याबद्दल सुनिल बराच वेळ रणजित यांचेशी चर्चा करत होता. या विषयावर दोघांना सारखाच इंटरेस्ट होता. सध्या ते ऑफ ड्युटी होते आणि आता साध्या वेशात होते. सुनिलला त्यांच्या पोलीस डिपार्टमेंटचे काम जवळून बघायचे होते म्हणून रणजित आणि सुनिल हे दोघे पोलीस स्टेशनमध्ये जाणार होते, अनिल त्याच्या कॉलेजमध्ये आणि राधा राघव लोकलने घरी जाणार होते आणि त्याप्रमाणे झाले.

आता दादर स्टेशनवर सुनिल आणि रणजित हे दोघेच होते. तिथून मग वेळ मिळाल्यास आज सायन्स फेस्टिव्हलला जाण्याचा सुनिलचा विचार होता. सुनिलने हाताला ते घड्याळ बांधलेले होते. त्याने स्फटिकाला स्पर्श केला किंवा नाही केला तरीही त्याचे डोळे मात्र इतरांना तसेच रंगीत दिसायचे. त्यामुळे तो गॉगल घालायचाच. सध्या त्याच्या शक्ती कार्यरत (ऍक्टिव्ह) नव्हत्या कारण स्फटिक काचेत झाकलेला होता. शरीराला स्पर्श नव्हता. पण आता पोलिस डिपार्टमेंटला जायचे तर विविध गुन्हेगार दिसतील तेव्हा निरीक्षण आणि अभ्यास म्हणून शक्ती कार्यरत केलेली बरी म्हणून त्याने डायल उघडून स्फटिकाला बोटाने स्पर्श केला. अचानक सुनिलसाठी सृष्टी निगेटिव्ह झाली. ते दोघे आता रेल्वे स्टेशनमधून बाहेर निघण्यासाठी फुटओव्हर ब्रिजवरून चालत होते. रणजित साध्या वेषात होते पण त्यांच्याजवळ रिव्हॉल्व्हर होतीच.

"तुमचं काम काय असतं नेमकं मामा?"

"कायदा सुव्यवस्था कायम राखणं, शक्यतो गुन्हेच न होऊ देणं आणि विविध ठिकाणी पोलिसांची व्यवस्था करणं!"

"गुन्हा होऊ न देणं? ते कसं?"

'त्यासाठी आम्हाला गुन्हेगार जसे विचार करतात तसा विचार करावा लागतो, खरे तर पोलीस हा मानसोपचारतज्ज्ञ सुद्धा असावा लागतो असे माझे मत आहे. व्यक्तींची आणि समूहाची मानसिकता पोलिसांना ओळखता आली पाहिजे! चेहेरा एखाद्या व्यक्तीबद्दल बरंच काही सांगून जातो, मनातले विचार चेहऱ्यावर उमटतात म्हणून आम्हाला गुन्हा टाळण्यासाठी फेस रिडींगपण जमलं पाहिजे."

"आणि समजा गुन्हा घडलाच तर?"

"घडलाच तर? घडतोच. काही गुन्हे टाळता येतात, हे नक्की आणि गुन्हा घडलाच तर गुन्हेगाराला पकडणं हे आमच्यासमोर मोठं आव्हान असतं!"

फुटओव्हर ब्रिजवरच्या गर्दीत दोघांच्या थोडं पुढे जाड काळा कोट घातलेला एक माणूस जड दिसणारी बॅग घेऊन इतरांपेक्षा लगबगीने चालत होता असे सुनिलला दिसले आणि त्याच्या डोक्याभोवती प्रचंड आग ओकत तळपणारे अस्थिर लाल वर्तुळ दिसले.

"आणि समजा गुन्हा घडत असतांना पोलीस त्या ठिकाणी योगायोगाने उपस्थित असले तर?", सुनिलने सूचकपणे विचारले.

रणजित हसून म्हणाले, "म्हणजे"?

सुनिल म्हणाला, "म्हणजे असे की, तो बघा तो काळा कोट वाला माणूस! तो मला जरा गडबड वाटतोय मामा! त्याचा चेहरा तर मी पाहिला नाही पण त्याच्या बॉडी लँग्वेज वरून मला तसं वाटतंय", सुनिल घाईत बोलून गेला पण ते त्या माणसाला ऐकू गेले! त्यामुळे तो दचकून अचानक पळू लागला. सुनिल रणजित यांना असे तर सांगणार नव्हता की त्याला त्या माणसाच्या डोक्याभोवती लाल वर्तुळ दिसले म्हणून त्याला संशय आला!

त्यामुळे खिशातील लपवलेलं रिव्हॉल्व्हर चपळाईने काढून रणजित त्याच्या मागे पळू लागले आणि ओरडले, "ए, थांब, का पळतोयस? बॅगेत काय आहे? थांब नाहीतर गोळी घालीन!"

रणजितच्या मागे सुनिल पळू लागला. तेवढ्या भागात हलकल्लोळ माजला. लोक घाबरून सैरावैरा पळू लागले. त्या कोटवाल्या माणसाने थोड्या वेळाकरता मागे पाहिले. त्याने चेहऱ्यावर प्रदूषणविरोधी काळा मास्क असतो तसा मास्क घातलेला होता. फुटओव्हर ब्रिजवरून इतरांना हाताने दूर करत खाली गर्दीत पायऱ्या उतरू लागला. दोन चार जण धडपडत खाली पडले तर रणजितनी त्यांना आधी उचलून उभे केले. सुनिल ब्रिजवरच एके ठिकाणी बाजूला थांबला.

रणजित यांनी अत्यंत वेगाने दोनचार लोकांच्या खांद्यावर दाब देऊन उडी मारून त्या माणसाच्या पायाला जोराचा धक्का दिला आणि गर्दी बाजूला झाल्याने रिकाम्या झालेल्या पायऱ्यांवरून धडपडून खाली पडला. रणजित यांनी त्याला पटकन उठून पळू न देता त्याच्या मांडीवर उजवा पाय दुमडून गुडघ्याने जबरदस्त दाब दिला आणि त्याचे हाड काडकन मोडलं.

तो कोटवाला पालथा पडला होता आणि त्याचा मांडीवर पाय देऊन त्याच्या कानाला उजव्या हाताने रणजित यांनी रिव्हॉल्व्हर टेकवली आणि त्याचा मास्क ओढून बाहेर काढला. आतापर्यंत पाहिलेल्या गुन्हेगारांपैकी हा वाटत नव्हता. बॅग ओपन केल्यावर त्यात आधी कधीही न पाहिलेली स्टेनगनसारखी दिसणारी नवीन प्रकारची शस्त्रे होती.

"कुठे घेऊन जात होतास शस्त्रे बोल लवकर?", बराच वेळ कानफटात मारून सुद्धा तो बोलला नाही.

"तुला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बोलतं करतो!"

दरम्यान एक लोकल प्लॅटफॉर्मवर धडाडत येऊन थांबली. आसपास बघ्यांची गर्दी जमली. काहीजण मोबाईलवर शूटिंग करायला लागले. सुनिलपण तोपर्यंत पायऱ्या उतरत तिथे आलेला होता.

"ए, चला आपापल्या कामाला लागा आणि हे काय करताय? शूटिंग करू नका. आजकाल काय काहीही घडलं तरीही त्याची मोबाईलवर शूटिंग करायची सवय लागलीय सगळ्यांना!"

रणजित यांनी फोन करून इतर पोलिसांना बोलावून घेतले आणि त्या मास्कवाल्याच्या मुसक्या बांधून त्याला आणि सुनिललासुद्धा प्रत्यक्षदर्शी पुरावा म्हणून सोबत पोलीस स्टेशनमध्ये स्पेशल व्हॅनमध्ये घेऊन गेले.

पोलीस स्टेशनमध्ये कित्येक गुन्हेगारांच्या डोक्याभोवती प्रचंड प्रखर जळतं अर्धवर्तुळ त्याला दिसलं.

जगात प्रचंड प्रमाणात नकारात्मकता भरली आहे ते या निमित्ताने त्याला कळत होतं.

^^^

Group content visibility: 
Public - accessible to all site users