९ ऑक्टोबर जागतिक टपाल दिनानिमित्त

Submitted by SANDHYAJEET on 8 October, 2020 - 23:19

९ ऑक्टोबर जागतिक टपाल दिनानिमित्त

तीर्थस्वरूप श्री पोस्टमन काकांना शि. साष्टांग नमस्कार.

वि. वि. पत्रास कारण की,

आपण आणि आपले सारे कुटुंबीय कसे आहात. खरं तर तुम्ही माझ्या आणि माझ्याबरोबर समाजातल्या असंख्य कुटुंबांचा अविभाज्य घटक आहात. सगळ्यात पहिल्यांदा मनापासून तुमची माफी मागते की इतकी वर्ष ऊन-पाऊस, थंडी, प्लेग सारख्या साथीपासून ते आजच्या कोरोनाच्या साथीतही अविरतपणे सेवा बजावून सुद्धा तुमचे आभार मानायला मी इतका उशीर केला. इतक्या वर्षात तुमची साधी विचारपूस सुद्धा न करण्याची तसदी घेतल्याबद्दल क्षमस्व. जागतिक टपाल दिनाच्या निमित्ताने तरी पत्रलेखन करावं असा जेव्हा विषय झाला तेव्हा ३ वर्षांपूर्वी आम्हाला सोडून देवाघरी गेलेल्या पण आमच्या सगळ्यांच्या मनाच्या एका कोपऱ्यात हळुवारपणे रोज आमच्या बरोबर जगणाऱ्या बाबांना पत्र लिहावं. का बाबा गेल्यापासून आमची आई आणि बाबा दोन्ही बनून आमचा सांभाळ करणाऱ्या आईला लिहावं. का कधी पत्रलेखन तर सोडा साधं ज्याच्याशी जन्मल्यापासून निवांत बोललो पण नाही अश्या "मी" ला पत्र लिहावं असा प्रश्न मला पडलेला. पण आई शपथ सांगते, जागतिक टपाल दिनाच्या निमित्ताने पहिला मान तुमचाच म्हणून " उशिरा सुचलेलं शहाणपण म्हणून का होईना " पण तुम्हालाच पत्रं लिहल पाहिजे, असा विचार मनाला शिवून गेला.

तुमची आणि माझी पहिली भेट मला आजही जशीच्या तशी आठवतेय. आमची आई तिसऱ्या बाळंतपणाला महाराष्ट्राच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या माहेरी गेलेली. शाळा चुकायला नको म्हणून मी आणि ताई बाबांबरोबर नोकरीच्या ठिकाणी राहिलेलो. आपला भाऊ किंवा बहीण जन्माला आली कि नाही कधी कळणार म्हणून रोज वाट बघायचो. त्यावेळी फोनची सोय नसल्याने आपण घेऊन येणारी बातमीच सर्वश्रेष्ठ ठरायची. बाबा रोज सांगायचे पोस्टमन काकांना कळले की ते लगेच बातमी घेऊन येणार. रोज आम्ही आपली वाट बघायचो. आणि तो दिवस उजाडला, आम्हाला लहानगा भाऊ झाल्याची बातमी घेऊन आपण आलात. त्या दिवसापासून देवदूताशी घट्ट नातं झाल्यासारखं आपल्या नात्याची सुरुवात झाली. मग त्यानंतर आमच्या सगळ्या सुखदुःखाचे आपण भागीदार असायचात. बऱ्याच वेळा आजी आजोबाना तर आपण पत्रही वाचून दाखवायचात. चुकून काही वाईट घडलं तर वाचता वाचता सगळ्या कुटुंबाच्या अश्रूत तुमचेही अश्रू सोबत करायचे. आनंदाच्या बातम्या आधी गुळ खोबर आणि आता पेढे खाऊन तुमच्याबरोबर साजऱ्या व्हायच्या.

वर्षानुवर्षे घरापासून नोकरीनिमित्त दूर राहणाऱ्या बाबांची, सासरी राहणाऱ्या ताईच्या सासुरवासाची, तिच्या फुलणाऱ्या संसाराची, सैन्यात असलेल्या काकांची खुशाली कळवण्याबरोबर माझ्या पहिल्या नोकरीच नियुक्ती पत्रं पण आपणच घेऊन आला होतात. पुढे नोकरीनिमित्त अमेरिकेला जाणं झालं. आपलं नातं दुरावण्यापेक्षा अजूनच घट्ट झालं. तुमचं कुरियर का फुरीयर मला काही कळत नाही, आपलं पोस्टच बर म्हणत मला दरवर्षी दिवाळीचा फराळ आईकडून पोस्टानेच येतो आणि मनोमन आपल्याप्रती कृतज्ञता व्यक्त होते. इथे आल्यापासून सायकल वर फिरणारे पोस्टमन काका दिसत नाहीत. टेकनॉलॉजी ने सुसज्जीत झालेल्या गाडीतूनच आपण पत्रपेटीत पत्रं टाकून जाता. पण तेच स्मितहास्य, तोच जिव्हाळा अनुभवायला मिळतो. सगळ्या United States Postal Services च्या ऑफिसेस बाहेर लावलेले बोर्ड " इथे कोविड सैनिक काम करतात " वाचून आपला सार्थ अभिमान वाटतो. जगाच्या पाठीवर कधीही कोणत्याही पोस्ट ऑफिस मध्ये ग्राहकाला मिळणारी तत्पर, आपुलकीची वागणूक बघितली की हमखास आपली आठवण होते.

आज मोबाइल फोनच्या युगात आम्ही सगळेचजण पत्रं लिहायचं विसरून गेलो आहोत. मोबाइल वर रोज बोलत असतो पण आपण घेऊन येत असलेल्या पत्रातून हर्ष, उल्हास, दुःख, आनंद एकाच वेळी मनात उठणाऱ्या भावनांची दिवाळी मात्र मोबाइलला वर अनुभवता येत नाही. व्हिडिओ कॉल वर तर आम्ही एकमेकांना बघत बोलतो पण पत्रातून आठवणीच जे जिवंत चित्र उभं रहायचं त्याची सर मोबाईलच्या व्हिडिओ कॉलला पण येत नाही.

या शेकडो वर्षात बदलणाऱ्या टेकनॉलॉजी बरोबर आपण टपालसेवेत केलेले आधुनिकीकरण वाखाणण्याजोगे आहे. वयाची तमा न बाळगता संगणकीकरण आत्मसात करून ज्या ई सेवा आपण पुरवत आहात त्याबद्दल आपले अभिनंदन. भविष्यातल्या बचतीसाठी सगळ्यात विश्वसनीय म्हणून आजही पोस्टाचा पर्याय पहिला निवडला जातो यातच आपलं कर्तृत्व, लोकांची आपल्याप्रती विश्वासार्हता सिद्ध करत.

आपल्या पुढच्या वाटचालीस अनेक शुभेच्छा. परत एकदा आमच्या सगळ्या सुखदुःखात जन्मोजन्मी आमची सोबत करीत राहिल्याबद्दल आपल्याला कोटी कोटी धन्यवाद.

एक समाधानी, कृतज्ञ ग्राहक
डॉ संध्याजीत

आपल्याला कोणाला आणि कसं पत्रं लिहायला आवडेल. नक्की कळवा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा ! काय छान लिहीलयं. Happy जुन्या आठवणी छानच असतात. आज आत्ता झी युवा वर बहुतेक टपाल म्हणून सिनेमा चालू आहे.

कृतज्ञता छान व्यक्त केलीत.
पत्रास कारण की... यावरून अरविंद जगताप यांची सुंदर कविता आठवली. "पत्रास कारण की.. "अशीच सुरुवात आहे. अवधूत गुप्ते नी सुंदर संगीत देऊन स्वतः गायले आहे.
"चला हवा येऊ द्या " मध्ये अरविंद जगतापांनी लिहिलेली सुंदर पत्रे सादर केली होती. ती सर्व पुस्तकरूपाने उपलब्ध आहेत.

धन्यवाद नादिशा. चला हवा येऊ द्या मधली पत्रं नेहमीच डोळ्याच्या कडा ओल्या करायची.
आरे वा. पुस्तकरूपात उपलब्ध आहेत हे मात्र माहिती नव्हतं

मस्त ! आम्ही गेल्या ५-६ वर्षांपासून आमच्या जवळच्या प्रत्येक पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन तिथल्या कर्मचाऱ्यांना घरी बनवलेला गोड खाऊ भरवतो आणि शुभेच्छा पत्र देतो. तसेच नवरात्रीला हॉस्पिटल मधल्या नर्सेस आणि दायांना देखील असेच करतो. कारण नवरात्र म्हणजे देवीचा उत्सव. पण खऱ्या आयुष्यातल्या देवी म्हणजे या नर्सेस आणि दाया. दिवाळीला बस ड्राइवर आणि कंडक्टर. दसऱ्याला लोखंडाचा महत्व असतं म्हणून रेल्वे ट्रॅक दुरुस्त करणारे कर्मचारी ज्यांना आपण gangman म्हणतो. त्यांना गोड खाऊ भरवतो. कारण या सगळ्यांमुळे आपण सुरक्षित आहोत.आमच्या मित्र परीवरातले सगळे जण पूर्ण भारत भर हा कार्यक्रम करतात.