अक्कड बक्कड...

Submitted by कविन on 2 October, 2020 - 23:44

अक्कड बक्कड बंबे बो
अस्सीs नब्बेs पुरेss सो
सो मे निकला धाssगा
चोर निकल के भाssगा

बाहेर मुलांचा खेळ रंगात आला होता. मातोश्रींनी खिडकीतूनच त्यांच्या वरताण आवाज लावत, "इकडे खेळू नका. किती आवाज करताय?" म्हणत त्यांना पिटाळलं.

"तू जरा खिडकी लावूनच पड ना. दिवसभर आता त्यांचं सुरुच रहाणार असं" या माझ्या वाक्यावर परत तणतणून झालं तिचं, " जर्रा म्हणून झोपू देत नाहीत. सकाळ नाही दुपार नाही, यांचं आपलं सुरुच"

मी दुर्लक्ष केलं मुलांसारखंच आणि बाहेरच्या खोलीतल्या बाल्कनीत लॅपटॉप घेऊन येऊन बसले. मुले आता आमच्या बेडरुम समोरुन हाकलल्यामुळे याबाजूला गेटसमोर येऊन खेळत होती. माझ्याकडे लक्ष जाताच मुलं पटकन गप्प झाली. पण मी 'कॅरी ऑन' अशी खूण करताच पुन्हा त्यांचं सुरु झालं, 'चोर निकल के भाssगा'.

एकीकडे मुलांच्या खेळाकडे लक्ष जात होतं, तर दुसरीकडे लॅपटॉपवर हिशोबाचे आकडे बघत होते. डोक्यात पैशाचा विचार घोळत होताच. काहीतरी करायला हवे होते. नाहीतर आत्तापर्यंत जुळवून आणलेलं सगळं एका क्षणात उध्वस्त झालं असतं. मी a b c d असे सुचतील ते पर्याय उलट पालट वापरुन, धागे जोडून.. परम्युटेशन कॉंबिनेशन करुन माझ्यासाठी सगळ्यात सेफ काय राहील ते शोधायचा प्रयत्न करु लागले. तेव्हढ्यात माझा फोन वाजला. अननोन नंबर होता.

"हॅलोss! कोण बोलतय? हॅssलो! अहो नुसतेच हसताय काय? कोण हवय तुम्हाला?" मी वैतागूनच विचारलं.

आवाज ओळखीचा नव्हता आणि त्याच्या बोलण्याचा मला काही संदर्भही लागत नव्हता. एकदा फोन कट करावासा वाटला पण का कोणास ठावूक मी तसेच संभाषण पुढे रेटले.
..
..

"अं कसला गेम? काय बोलताय ? do I know u?" मी त्याला विचारले

त्याने काहीतरी लहान मुलांच्या खेळाचा रेफरन्स दिला.

"राजा मंत्री चोर पोलिस? seriously? लहान मुलांचा खेळ?"

आत्ता बाहेर मुले हाच खेळ खेळत होती. मधेच भांडत होती. कोणीतरी रडीचा डाव केला की परत अक्कड बक्कड बंबे बो ने सुरुवात होत होती. पण त्याचा आणि या माणसाचा काय संबंध? आणि या माणसाचा आणि माझा तरी काय संबंध? मी सरळ विचारलं तसं, आणि हे पण विचारलं, "तुम्ही मला कसं ओळखता? कोण आहात तुम्ही?"
..
..

कोण आहात या प्रश्नाच्या उत्तरादाखल एक कोडं मिळालं सोडवायला.

"हे बघा तुम्ही जे कोणी आहात, प्रॅंक प्रॅंक खेळायचा मूड नाहीये माझा आत्ता. तुम्ही तुमची ओळख सांगा नाहीतर मी ब्लॉक करेन तुम्हाला?" मी ऐकवूनच टाकलं.

खरतर माझा आजवरचा रेकॉर्ड बघता मी आत्तापर्यंत फोन कट करुन नंबर ब्लॉक करायला हवा होता पण आज डोक्यात त्या पैशाच्या विचाराने आधीच गोंधळ घातला होता.

तरीही मी एक धमकीचं वाक्य पुढे फेकत म्हंटलं, "ओह! वेट म्हणजे परवा मी तुम्हालाच ब्लॉक केलं ना? आज दुसऱ्या नंबरवरुन कॉल करताय? सायको आहात का तुम्ही? मी पोलिसात तक्रार करेन तुमची."

पण यावर मला जे ऐकायला मिळालं समोरुन त्यामुळे मात्र टायरमधली हवा काढून टाकल्यासारखं झालं.
..
..

"no way.. हे दिल्लीच्या वर्कशॉपबद्दल तुम्हाला कसं माहिती?" मी विचारलं
..
..

"oh shit! this is really creepy. मीss मीs पैसे चोरले नाहीत. मी फक्त बाबांना न सांगता कपाटातून घेतले." समोरच्याचे पत्तेही माहित नसताना खेळत रहायची रिस्क मला घ्यायची नव्हती पण आता न खेळायचा मार्गही माझ्यापुढे खुला नव्हता.
..
..

"wait! but how do you know about all this? अजून काय माहिती आहे? कोण आहेस तू I mean तुम्ही." मी गेसवर्कला सुरुवात करत विचारलं
..
..

"No I stil prefer 'तुम्ही'. " मी त्याला प्रतिउत्तर देत म्हंटलं

"ठिक आहे मी खेळायला तयार आहे. पण त्यानंतर प्रॉमिस केल्या प्रमाणे तुम्ही मला तुमची आयडेंटिटी सांगायची. हे कबूल? आणखी बरेच प्रश्न आहेत पण सध्या हे सांगा कि कोण कोण खेळतय?" मी एक पाऊल मागे घेत 'सेफ प्ले' चा पर्याय निवडत म्हंटलं
..
..

त्याच्या उत्तराने मात्र मी वैतागून ऐकवलच, "बर ते मीच शोधायचं? कमाल झाली तुमची. आणि तुम्ही काय करणार? वाह! म्हणजे तुम्ही खेळ सुरु करुन मजा बघणार?"
..
..

"ह्म्म! म्हणजे तुम्ही सुद्धा खेळताय तर. मग ठिक आहे." जरा दिलासा मिळाला त्याच्या उत्तराने. म्हणजे मला धागे जोडायला वाव आहे तर, मनातल्या मनातच मी नोंद केली तशी.
..
..

"एक आकडा निवड म्हणजे? ओह ओके. तुम्ही नंबर दिलेत तर चिठ्ठ्यांना. बर मग माझा नंबर ४." त्याच्या विचित्र खेळामध्ये भाग घेत मी एक आकडा सांगितला.
..
..

"चार नंबरला मंत्री आलंय? बरं! म्हणजे मी मंत्री आहे तर खेळात. राजा तरी सांगाल का कोण आहे? ओह! तुम्ही राजा आहात? आलं लक्षात, आता मी तुम्हाला तुमच्या राज्यातला चोर पोलिस आणि जनता शोधून द्यायची आहे" मी त्याला असं सांगितल्यावर त्याने सरकॅस्टिकली मला 'स्मार्ट गर्ल' म्हंटलं.
..
..

"Thanks for calling me smart girl. पण खेळ सुरु करायच्या आधी हे तरी सांगाल का की तुम्हाला हे पैशांबद्दल कसं कळलं? मी घरातही कोणाला बोलले नाहीये." मी आत बेडरूममधे मातोश्रींना आवाज न जाण्याची खबरदारी घेत विचारलं.
..
..

"चोरी काय म्हणताय डायरेक्ट? मी पैसे घेतले हे खरय. कोणाला न सांगता घेतले पण चोरी हा उद्देश नव्हता माझा. मला हेअर स्टायलिंग मेकअप या सगळ्यात खूप इंटरेस्ट आहे. मला त्यात करिअर करायचं आहे. बाबांना आधीच हे सगळं आवडत नाही. तरी आईने बाबांच्या नकळत इथे लोकल पार्लरमधे कोर्स करायला पैसे दिले होते मला." मी माझ्या समर्थनार्थ एक धागा जोडत उत्तर दिलं
..
..

"नकळत म्हणजे? ते पैसे दिले हे नुसतं त्यांना सांगितलं नाही असं नाही. ते पैसे घरात होते हेच त्यांना माहिती नव्हतं" मी दुसरा धागा जोडला.
..
..

"कसं काय म्हणजे? असं असतं हो आयांचं. त्या साठवतात असे गुपचूप पैसे. नाहीतर आमचे बाबा मोठेपणा घ्यायला घरच्यांना उपाशी ठेवून दारच्यांच्या घशात शिकरण पुरीचा घास भरवतील असं वाटतं तिला." तिसरा धागा जोडत म्हंटलं.
..
..

"ह्म्म! तर राजे मी चोर शोधायचा कसा?
..
..

"आजूबाजूला बघून ते ठिक आहे हो पण हे चेहरा वाचणं जमत नाही मला. चिट कोड्स पण नाहीत. बरं मी बघते. डोळे, बॉडी लॅंग्वेज वगैरे मधून काही हिंट मिळते का तुम्ही म्हणताय तसं" अर्थात हे म्हणताना नक्की कुणाचे डोळे आणि कुणाची बॉडी लॅंग्वेज बघणार होते मी ते मलाही नव्हतं माहिती. पण काहीतरी जुगाड करावाच लागेल मला.

मी आपलं दिलं एक नाव ठोकून आमच्या बंधूराजांचं. घरात पैसे आलेले त्यालाही माहिती होतच की.
.
.
"हाss! हाss! मी सांगितलं चोर कोण तरी म्हणताय पुन्हा विचार कर? तुम्हाला काय उत्तरही माहिती आहेत का खरी? की उगीच खेचताय माझी? आणि आमचे बाबा काही उधळेमाधळे वगैरे नाहीत हा. होss! मीच म्हंटल मगाशी,"ते घरच्यांना उपाशी ठेवून दारच्यांना शिकरण पुरी भरवतील."
..
..

"माझेच शब्द मला काय सांगताय परत? मी म्हंटल की, असं आमच्या आईला वाटतं. पण अगदी असंच नाहीये हा त्यांचं." मी परत मगाचचे धागे गिरवत म्हंटलं
..
..

"मी घेतले ते पैसे? ते त्यांनी पिंट्याच्या नोकरीसाठी ठेवले होते. त्यातले उचलले. सगळे नाही निम्मे फक्तं." पुढला धागा दिसला मला
..
..

"त्यांनी कुठून आणले होते?good question. त्यांनी आईचे दागिने विकले त्यासाठी. तिलाही माहिती नाहीये हे. लॉकरमधे ठेवुया म्हणून मागून घेतले ते विकूनच टाकले. मी चोरुन बोलणं ऐकलं म्हणून कळलं. पिंट्या एक नंबर आळशी आहे. आयतोबा कुठला. एकतर याला कशातच इंटरेस्ट नाही आणि सगळ्यात ॲव्हरेज. पण नोकरी मात्र हवी सरकारी खात्यात नाहीतर बॅंक वगैरे. काका म्हणाले, "एकजण देतो चिकटवून पण त्याचा खिसा गरम करावा लागतो आधी."
आईला यात काही राम वाटत नाही. तिला वाटतं पैसे देऊन पण काम नाही झालं तर काय? पण बाबांना वाटतं आजकाल कामं अशीच होतात. एकदा चिकटलं की फक्त पाट्या टाकत रहायचं रिटायर होईपर्यंत."
..
..

"मी का घेतले म्हणजे? सांगितल ना हेअर स्टाईलिंग पॅशन आहे माझं. लोकल पार्लरमधे शिकायला आईने पैसे दिल्याची काय सारखी आठवण करुन देताय मला? मीच सांगितलय ते तुम्हाला मगाशी. खर सांगू? हे लोकल पार्लर वगैरे ओके ओके आहे. माझ्या पॅशनला त्यात काही मिळत नाहीये. मला दिल्लीला वर्कशॉप करायला जायचं आहे. 'फारुख शामुरातोव' नाव ऐकलं आहे तुम्ही कधी?
..
..

"वाटलंच होतं, ऐकलं नसेल नाव कधी. बाप माणूस आहे हेअर आर्ट मधला. जगभरात वर्कशॉप होतात त्याची. यावेळी दिल्लीला आहे आणि मला जायचं आहे. पण बाबा तर या गोष्टीच्याच विरोधात आहेत आणि यावेळी आईचा पण विरोध आहे. म्हणे, "दिल्लीत कुठे रहाणार? माणसं बरी असतील नसतील आणि मुख्य म्हणजे इतके पैसे दोन दिवसांसाठी घालवायची काय गरज?"
..
..

"बाबांना फक्त पिंट्याची नोकरी महत्वाची वाटते आणि आईला वाटतं इथे शिकून हौस भागवली हेच खूप झालं. आता ९-५ जॉब बघायचा स्थळांना सांगता येण्यासारखा."

..

"बरं दुसरा अंदाज सांगितला मी चोराचा तो तरी बरोबर आलाय का?नाही? आतातरी काही हिंट द्याल का?
..
..

"पैसे चोरतो तो चोर आणि चोरी पकडतो तो पोलिस. चोराला चोर ठरवतो तो राजा आणि चोराला दरबारात उभा करतो तो मंत्री. ही कसली हिंट झाली?"
..
..

"अजून प्रयत्न करु? बरं करते. पण त्याआधी एक सांगाल प्लीज? तुम्हाला माझ्याबद्दल इतकी माहिती कुठून मिळाली? कोण आहात नक्की तुम्ही? राजा नाही हो. ती खेळातली चिठ्ठी झाली तुमची. मी ओळखणार नाही. तुम्ही खर सांगा नाहीतर मी खेळणार नाही. नंबर ब्लॉक करेन आणि पोलिसात तक्रार करेन."
..
..

"हेs! हेs! ब्लॅकमेलिंग आहे. मी चोर नाही. तुम्ही राजे आहात? हसताय काय जोरजोरात? मी खेळेन. मीs मीss काढेsन शोधून. होs होss कळतं मला एकदा सांगितलेलं. मी उद्यापर्यंतच काढते शोधून."
..
..

"सारखं सारखं त्या दिल्लीच्या वर्कशॉपबद्दल आणि त्या पैशांबद्दल घरी सांगायची धमकी देऊ नका. मी सांगतेय ना काढेन शोधून म्हणून!"
..
..

"ओके बाय."

मी चोर आहे? नाही, मी तर मंत्री आहे.
मंत्री चार नंबरची चिठ्ठी आहे. चोर शोधायच्याही आधी या धमकी देणाऱ्या राजाचं प्रोफाईल शोधून काढायला हवं आणि त्याला माहिती कोणी पुरवली हे ही कळायला हवं.

आईच्याss गावाssत .. ट्रू कॉलरवर दिसलेल्या नावाचे ५ प्रोफाईल फेसबुकवर! आणि एका प्रोफाईलमधे चक्कं एक कॉमन फ्रेंड!

आता मात्र राणीला फोन करायलाच हवा. "पैसे कधी देणार?, असं टुमणं लावेल ती परत, पण तरीही तिला फोन करण्याशिवाय काही पर्याय नाही आता दुसरा.

तसंही तिच्याकडे कुठे होते इतके पैसे? तिनेही कुणा मित्राचे पैसेच मला दिले. त्याने तिच्याकडे ठेवले होते काही कारणांमुळे. तिला म्हंटलं अर्धे दिल्लीच्या वर्कशॉपसाठी हवे आहेत आणि उरलेल्यात पार्टनरशीपमधे बिझिनेस करुया.

तेव्हा पटकन तयार होऊन दिले. पण आता, "नको म्हणे बिझिनेस बिजनेस. परत कर पैसे. मित्र मागतोय परत."

सकाळपासून एकतर मी त्याच चिंतेत. डोक्यात गुंता झालाय. धागे जोडून काहीतरी करायला हवेय. नाहीतर इतके सगळे आत्तापर्यंत जुळवत आणलेले एका क्षणात विस्कटेल. त्यात आता ही फोनची भानगड.

पैसे चोरतो तो चोर आणि चोरी पकडतो तो पोलिस. चोराला चोर ठरवतो तो राजा आणि चोराला दरबारात उभा करतो तो मंत्री……. मला खेळायच आहे खेळत रहायच आहे, चोर मिळेपर्यंत.. पोलिस कळेपर्यंत हा खेळ संपणार नाही.

________________________

"हॅलोs! राणी.. हा मी बोलतेय"
.
.
"हो ss अग ऐक तर आधी. मी टाळत नव्हते तुला. पण सध्या खरच अडकलेय मी कशाकशात. त्यात ते दिल्लीवालं वर्कशॉप जवळ आलय. आधीच घरात उल्हास आहे. पिंट्यासाठी पैसे हवेत बाबांना. त्यासाठी आईकडे दागिने मागितल्यावरुन राडा झाला घरात. पण ते जाऊदे. महत्वाचं बोलूदे मला आधी. तू त्या दिल्लीच्या वर्कशॉपबद्दल कोणाला बोलली होतीस कधी?"
.
.

"तसं नाही गं राणी, म्हणजे चुकून.. असंच..बोलता बोलता वगैरे?"
.
.
"नाही?अं अगं तसं नाही गं मी संशय नाही घेतेय तुझ्यावर. पण मला कळत नाहीये ही बातमी 'त्याला' लागलीच कशी? हीच नाही ते अं ते पैशांचही.."
.
.
"त्याला म्हणजे? आहे एक कोणी ब्लॅकमेलर. कोण ते मला नाही माहिती. ट्रू कॉलरवर कोणी 'राजा जाधव' नाव दिसतय."
.
.
"नाही अजून काही माहिती मिळाली नाही मला. फेसबुक प्रोफाईल पण नाही ना मिळालं अजून त्याचं. no no its ok. I am fine. Just a bit curious. आणि त्या विअर्ड गेम विषयी बोलले ना तुला? नक्की काय म्हणायचं असावं त्याला?"

माझ्या फोनने वैतागून गेलेय बहूतेक ती पण तरी आता ती ही धागे जोडत रिप्लाय देत बसलेय असं वाटलं उत्तरांवरुन.
.
.
"काय गं काय झालं? तुझा आवाज का असा येतोय एकदम बारीक? ओह! नेटवर्क प्रॉब्लेम. मला वाटलं पॅनिक बिनिक झालीस की काय उगाच"
.
.
"chill. मी तुला माहिती असेल असं नाही म्हणत आहे. Its just loud thinking. सोड विसरुन जा.'"
.
मधेच मुलांचा गलका वाढला. आता नवीन खेळ सुरु करायचा म्हणून परत राज्य कोणावर ठरवायला अक्कड बक्कड सुरु झालं. चोर निकल के भागाला तर इतका आवाज वाढला की बेडरुमच्या खिडकीतून परत एकदा मातोश्रींनी मुलांना झापलं. यासगळ्यात राणीचं वाक्य विरुन गेलं. मी परत एकदा, "अम्म! काय?" म्हणताच तिने, "पोलिसात नको जाऊस हा इतक्यात" असं ऐकवलं त्यावर मी ही, "हो होs मी पोलिसात तक्रार नाही करणार सध्या. होss, त्याला फक्त धमकी दिली तशी." असं ऐकवलं

"पोलिसात गेले तर दिल्ली माझंच बारगळेल तसही. पोलिस सोड त्याच्या त्या खेळामधला चोर नाही शोधला मी दोन दिवसात तर तोच माझं दिल्ली वर्कशॉप एक्सपोज करणार घरी येऊन म्हणालाय. तसं झालं तर मी फिनिश, राणी. लग्न लावून देतील लगेच आणि तोपर्यंत होम अरेस्टमधे ठेवतील. बाकी इमोशनल अत्याचार तर …आईक्स मी विचारही नाही करु शकत" अजून एक धागा जोडत हे ही ऐकवलं तिला.
.
.
"पोकळ धमकी? नाही वाटत मला तसं. त्याने जितके तपशील मला सांगितले त्यावरून तो मला खूप जवळून ओळखतो हे नक्की. तो हे स्वत: करत असेल तर का? आणि कोणाच्या सांगण्यावरुन करत असेल तर ते कोणाच्या हे कळायलाच हवय. येस्स त्यासाठीच मी खेळायचं ठरवलय." मी म्हंटलं.
.
.

"चोराला चोर ठरवतो तो राजा, चोराला शोधतो तो पोलिस आणि चोराला राजापुढे उभा करतो तो मंत्री. मलातर आता राजाही शोधायचाय आणि चोरही. चल बाय ठेवते. उद्या बोलू"

फोन कट करुन मी परत एकदा त्याच्या फेसबुक प्रोफाईलवरच्या इतर गोष्टी बघायला सुरुवात केली. आत्ता मला त्याची प्रोफाईल दिसतेय व्यवस्थित. पण मला खात्री आहे जर माझा अंदाज खरा असेल तर अजून काही मिनिटात त्याच्या प्रोफाईलच प्रायव्हसी सेटिंग चेन्ज होईल. ना फ्रेंडलिस्ट दिसेल ना रिसेंट पोस्ट. सेटिंग 'only me' वर शिफ्ट होईल आणि त्याआधी राणीचा फोन एंगेज असेल बराच वेळ आणि राजाचाही.

दोघांचे फोन लावून पाहीले. खरच एंगेज होते. डोक्यात उगाच सगळे धागे जोडून पाहिले. तिने त्याला फोन करुन ऐकवलं असेल. मग त्यानेही घरात चोरी केल्याची माहिती तोंडावर फेकली असेल. तरी उरलेल्या अर्ध्या रकमेचं काय हा प्रश्नही विचारला असेल त्याने कदाचित.

त्याने जोडलेले धागे आणि तिने जोडलेले धागे यात कोणते अधिक ठळक दिसतायत त्याला यावर पुढचे चित्र अवलंबून असणार.

बाहेर मुलांचा गलका आणि आत मातोश्रींचा तणतणात आता टिपेला पोहोचलाय. एक खिडकीच्या आत एक बाहेर. दोघेही अडमुठे. मजा येतेय त्यांच्या जुगलबंदीला बघताना.

पाणी मागायला याल तर खबरदार असं आता ती मुलांना ऐकवतेय.

मन एकीकडे त्यांच्या फोनकॉलचा विचार करतय. माझे अंदाज खरे ठरले तर .. तर नक्कीच त्याचे धागे भारी पडतील आणि उद्या तोच मला फोन करुन राणीबद्दल माहिती देईल. आता उद्याची वाट बघत बसणे आले.

_____

दिवस बदलला, वेळ तीच. आता वाजेल ना फोन? वाट बघावी की आपणच करावा समोरुन? काय चेहरा होईल ना मीच केला फोन तर? फोन उचललाच तर आपण काय म्हणायचं आधी? हॅलो राजा? की हॅलो …
9820… its busy. परत लावू?
9820.. लागला .. वॉव its ringing.
"चलो इक बार फिरसे अजनबी बन जाए हम" कॉलर ट्यून पूर्ण व्हायच्या आत मी फोन कट करुन मोकळी.

काय करत्येस तू हे? तुला काय गरज या खेळात उतरायची? आणि उतरायचंच असेल तर अपर हॅंड तुझा हवा. स्वत:लाच दम द्यायला मला आरशासमोर उभं रहायची गरज भासत नाही. हे असं स्वगत मनात सुरुच असतं २४/७

फोन लांब ठेवून आलतू फालतू कामात स्वत:ला गुंतवलं पण कान फोनकडेच होते. कालची वेळ टळून गेली तरी त्याचा फोन नाही. मी केलेला फोन कळला तर असेलच. मिस्ड कॉल मधे नंबर नक्कीच दिसला असेल त्याला तरी कॉल बॅक नाही. आज मलाच बोलायची उत्सुकता आहे. हा खेळ आता मलाच खेळायचा आहे पण माझ्या टर्म्सवर.

तब्बल २० मिनिटांच्या प्रतिक्षेनंतर रिंग वाजली. मलाही उतावीळपणा दाखवायचा नाहीये. मी नाही उचलणार पहिल्या रिंगला. फोन हातात घेऊन सुद्धा मी तो वाजू देणार. पण कॉल अनअटेंडेड जाऊ नाही द्यायचाय. कट व्हायच्या आधी घ्यायला हवा.

"बोला राजे!" आज माझ्या आवाजात कॉंफिडंस आहे भले उसना का असेना. ऑडीओ कॉलमधे आवाज महत्वाचा.

कॉलची सुरुवातच अशी होईल याची त्याला अपेक्षा नसावी. समोरुन कालच्या बेफिकिरीत प्रत्युत्तर आलं नाही तेव्हाच मला समजल "मै बाजी पलट सकती हू"

"आज विचारणार नाही मला चोर कोण ते मिस्टर राजे? आता का गप्प? आता मला ब्लॅकमेल नाही करु शकत तुम्ही. दिल्लीच वर्कशॉप लॉकडाऊनमुळे कॅन्सल झालं आणि रिफन्डही जमा झाला अकाऊंटला. आता टेक्निकली मी पैसे चोरलेच नाहीत. फारतर अस सांगेन घरी, मी पैसे अकाऊंटला जमा केले आईच्या सांगण्यावरून. आता? आता कोणत्या कारणावरुन ब्लॅकमेल करणार? बाजी पलटलेय राजे. बोला, आता नाही विचारणार कोण चोर?"

"नाही विचारणार. आज सांगणार"

"आं काय?"

"इतक 'ऑ काय' करण्यासारख काही नाहीये यात. आज मी बोलणार तू ऐकणार."

"पण.."

"चूप एकदम चूप. आता काय सांगतोय ते नीट ऐक. चोर अजूनही मोकळा आहे. शोधायला लागेल त्याला. चोर तुझ्या जवळचा आहे म्हणून शोधायला लागेल तुला? जवळची व्यक्ती म्हणून विश्वास ठेवतो ना आपण एखादीवर?पहिला विश्वासघात तेच करतात."

"काय बोलताय तुम्ही?"

"राणी आठवतेय का राणी. चौकट राणी? मैत्रिण आहे ना तुझी? एकदम खास. सगळी गुपितं माहिती असतात ना तिला? मी त्याच राणीचा राजा आहे. म्हणजे होतो. साली डबल गेम करतेय. माझ्याकडून पैसे घेतले ते म्हणे तुला दिले. तू तर तुझ्या घरात चोरी केलीय. साssला, म्हणजे राणी खोट बोलली"

"तिने सांगितलं तुम्हाला असं ब्लॅकमेल करायला? गेमची आयडीया पण तिची? का केलं असं तिने? मी .. मी चांगली मैत्रिण समजत होते तिला. मला सुचत नाहीये काही आत्ता. सॉरी पण हे सगळ .. इतकं .."

"No worries I can understand. take care.आणि आता तू काळजी करु नकोस. तू मगाशी बरोबर बोललीस. आता खेळात बाजी पलटलेय. तू चोर शोधायची गरज नाही. मी आता तिला असा सहज सोडणार नाही."

"Thank you thank you so much Raja. मी पण तिला प्रत्यक्ष भेटून जाब विचारणार आहेच,माझ्यापुरतं क्लोजर मला मिळवायला हवंच तसही. Thanks once again. जवळचेच विश्वासघात करतात हे तुमचं वाक्य बरोबर आहे. मी कायम लक्षात ठेवेन हे. बरं ठेवू फोन? हो बाय."

फोन कट करुन मी राणीला कॅफेत भेटायला बोलावलं. फोनही करता आला असता पण फोन रेकॉर्ड होण्याची शक्यता होतीच. रिस्क टाळायला हवीच ना!

बाहेर मुलांचा गलका वाढलाय. राज्य कुणी घ्यायचं यावरून वाद सुरु आहेत. परत एकदा अक्कड बक्कड म्हणत राज्य कुणावर ठरवणे सुरु आहे. अक्कड बक्कड म्हणत एक एक जण सुटतो. शेवटी एकजण राहीपर्यंत अक्कड बक्कड सुरु रहातं. शेवटी जो एकटा उरतो त्याच्यावर राज्य येतं.

मातोश्री मुलांना ओरडून थकल्यात आणि स्वतःच माघार घेत कानात कापसाचे बोळे घालून बसल्यात. आजचा चहा एकदम फक्कड जमला आहे.

चहाचा घोट घेत मी गॅलरीला पाठ टेकवून आत बघत उभी आहे. पाठीमागे चोर निकलके भागा ऐकू येतय. कुणावर तरी राज्य आलं असावं कारण आता परत खेळाला सुरुवात झालेली आहे. नवा बिझनेस गेमप्लॅन सगळे धागे जोडून आता डोक्यात पूर्ण तयार आहे आणि बिझिनेस कॅपिटल आता पूर्ण सुरक्षित आहे.

कॅफेत भेटलो तेव्हा राणी माझ्यावर चिडली. मला खोटारडी म्हणाली. ऱाजा तिला पैसे परत करण्यासाठी धमकी देतोय म्हणून रडली. तिचे पैसे परत करायची विनंती करताना तर अगदी पायावर लोळणच घ्यायची बाकी होती.

पण मी कुठे घेतले होते पैसे? काही पुरावा? रेकॉर्ड? अहं काही नाही. मी तर बाबांचे पैसे नाही का चोरले घरातून? त्यांनी पिंट्यासाठी ठेवले होते,आईचे दागिने विकून आलेले पैसे. माझ्या आईचे दागिने फार पूर्वीच विकले गेलेत हे तसही फक्त राणीला माहिती आहे आणि ते ही मी सांगितलय म्हणून. तसं तर मी हे ही नाही का सांगितल की मी बाबांचे पैसे घेतले, बाबांनी दागिने विकले दिल्लीला वर्कशॉप आहे वगैरे वगैरे.

काहीतरी खरं आहे, काहीतरी नाही. अर्थात काहीतरी खरं असायला काहीतरी खोटं असावंच लागणार ना इथे? पण काय खरं? काय खोटं? हे मी सांगणार नाही. आता चोर शोधायची जबाबदारी माझ्यावर नाही कारण आता राज्यही माझ्यावर नाही.

पण खेळ मात्र सुरुच रहाणार आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खेळ खरंच सुरू राहणार.
वाचता वाचता गुंता झाला. मग सोडवला म्हणेतोवर back to square one!
भारी लिहिलंय Happy

धन्यवाद Happy

@किल्ली मा बु दो कशाला म्हणताय स्व:ताला. ते, मा लि दो पण असू शकतो Lol

मला लगेच समजली होती,म्हणजे मुळात किचकट वाटलंच नाही काही,नायिका खोटं बोलत आहे राणीचे पैसे तिने घेतले आणि नंतर पुरावा नसल्याने हात वर करतेय असं वाटलं
पण इतर लोकांच्या कळली नाही अशा कमेंट वाचून मलाच वाटतंय की मला तरी नक्की कळली की नाही,कधी नव्हे ते कॉम्प्लिकेटेड स्टोरी लगेच समजली म्हणून हुर्ये झाले होते Uhoh

आदू, तुम्हाला समजलेलं योग्यच आहे.
अक्कड बक्कड बंबे बो अस लहान मुले राज्य कुणावर हे ठरवताना म्हणतात. शेवटी चोर निकलके भागा म्हणताना ते भागा ज्याच्यावर येतं तो सुटतो. आता यात ती सुटलेय. उरलेल्या दोघांत राज्य कोणावर खेळ सुरु राहील कदाचित. ती खरं बोलली होती की खोटं आणि नेमकं काय खरं आणि काय खोटं हे आता तिला सांगायची गरज नाही ती सुटलेय.

<<<मला लगेच समजली होती,म्हणजे मुळात किचकट वाटलंच नाही काही,नायिका खोटं बोलत आहे राणीचे पैसे तिने घेतले आणि नंतर पुरावा नसल्याने हात वर करतेय असं वाटलं>>> मलाही हेच वाटले होते,
मी दुपारी वाचली होती कथा, समजली वाटले पण बोअर झाली म्हणून प्रतिसाद दिला नव्हता. पण आता मलाही शंका आहे की समजली की नाही.

कविन मला तुमच्या कथा आवडतात मला पण ही झेपली नाही.

Vb प्रामाणिक प्रतिसादाकरीता धन्यवाद

चालतय की, प्रत्येक कथा प्रत्येकालाच आवडते अस नाही. Happy

माझ्यासाठीही हा फॉर्मॅट एक्सपिरिमेंटच होता इतर फॉर्मॅट हाताळून बघते तसाच

Googly.
KaLatey ga without explanation.