मानसिक कोरोना

Submitted by SANDHYAJEET on 2 October, 2020 - 09:08

मानसिक कोरोना !!!

हा आठवडा नॉन कोविड ड्युटी असल्याने डॉक्टर विदिशाचा मूड जरा वेगळाच होता कॅप रुपी जेलमधे अडकून गुदमरलेले केस आठवडाभर मस्त मोकळे सोडता येणार होते. फेस शील्ड आणि गॉगल मुळ आजूबाजूचं ढगाळ वाटणार वातावरण एकदम स्वच्छ होणार होत. हॉस्पिटलचे हिरव्या रंगाचे स्क्रब रोज घालायला न लागता आठवडाभर मनासारखे निरनिराळे रंग मिरवायला मिळणार होत. मास्क आणि ग्लव्हज घालायला लागणार असल तरी दिवसभर संपूर्ण पीपीई किट घालून भोगाव्या लागणाऱ्या तुरुंगवासापेक्षा हया आठवडाभरासाठी मिळालेलं स्वातंत्र्य लाखमोलाच होत.

आठवडा सुरु झाला आणि वेगवेगळ्या तक्रारी घेऊन वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट्स तिने बघितले. कोविड पेशंट्स बरोबर काम करताना मोठा वाटणारा आठवडा कसा भुर्रकन निघून गेला तिला कळलं पण नाही. या आठवड्यात बघितलेले तीन पेशंट्स मात्र तिच्या जीवाला रुखरुख लावून गेले.

पहिला पीटर. Scheduled Appointment लिस्ट वर Possible Allergy म्हणून पीटर ला बघितल होत. ऍलर्जी म्हटल्यावर सहसा लहान बाळ पेशंट असतं. काहीतरी नवीन, साबण, पावडर, क्रीम, नवीन कपडे ट्राय केले असं सादरीकरण असत. किशोरवयीन मुलगा आणि ऍलर्जी म्हटल्यावर मुरुमं आणि त्याच्याशी संबधीत काहीतरी असावं असं तिला वाटलं होतं. पण पीटरला बघितल्यावर धक्काच बसला होता. त्याच्या दोन्ही हातावरची त्वचा दोन्ही बाजूंनी लाल, कोरडी होऊन जाड झाली होती. उपचार केले नाहीत तर आता जखमा व्हायला लागतील म्हणून त्याची फॉस्टर पॅरेन्ट त्याला घेऊन आली होती. २ महिन्यापूर्वी त्याला खोकला आणि श्वसनाचा त्रास झाला होता. कोरोना टेस्ट केली होती जी निगेटिव्ह आली होती पण त्याचा खोकला कमी व्हायला बरेच दिवस लागले होते. कोरोनाच्या भीतीने त्याने खूप टेन्शन घेतले होते. तेव्हापासून तो अजिबात घरातून बाहेर जात नाही आणि दिवसभर नुसता साबणाने हात धुवत बसतो, गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना घश्यातुन आत जाऊ नये म्हणून दात पण दिवसातून बऱ्याच वेळा आणि एकावेळी अर्धा अर्धा तास घासतो असे पीटरची पॅरेन्ट सांगत होती.

दुसरी अँजेलिना. आधीपासूनच अँजेलिनाला Anxiety चा प्रॉब्लेम आहे. पण आता कोरोना आल्यापासून काही झालं की सारखं गुगल करायचं आणि आता मला कोरोना मुळ असं होणार आणि तसं होणार म्हणून टेन्शन घ्यायचं रोज चालू आहे. काल रात्री अचानक हिचा श्वास अडकतोय म्हणून ओरडत होती. मला माहिती आहे की तो Panic Attack च होता पण एकदा फुफ्फुस तपासून घ्यावं म्हणून हिला आणलं आहे,असं तिची आई सांगत होती.

तिसरी राधिका. राधिकाची आई सांगत होती की, आधी अनोळखी लोकांना कोरोना व्हायचा. आता भारतातल्या जवळच्या नातेवाईकांना, ओळखीच्यांना पण कोरोना होत आहे. दरवर्षी आम्ही उन्हाळ्यात भारतात जायचो. आजोबा आजी, काका, काकी, मावशी, मामा, चुलत मावस भावंडं भेटायची. दरवर्षी एक महिना भारतात जाऊन वर्षभरासाठी पुरेल एवढा उत्साह घेऊन यायचो. यावर्षी मात्र सगळंच हुकलं. उन्हाळ्यात मनाला आणि मुलांना समजावलं की ख्रिसमसच्या सुट्टीत भारतात जायचं. पण जसजसा डिसेंबर जवळ येत आहे आणि कोरोना जायची काही लक्षणं नाहीत बघून मुलांना काय सांगायचं. कस समजवायचं, ते कळतच नाही. बोलता बोलता एकदा राधिकाने, कोरोना संपून भारतात जाईपर्यंत आपल्याला भेटायला सगळे जिवंत असतील ना असाही काळजीपूर्वक प्रश्न विचारल्याच ती सांगत होती.

एकटेपणा, पालक आणि मुलांमधला हरवत चाललेला संवाद, अनिश्चित काळासाठी राहू पाहणारा कोरोना या सगळ्यामुळे सगळ्याच वयोगटातील माणसं थोड्या बहोत प्रमाणात घाबरून गेली आहेत. कोरोना संपेपर्यंत आपल्यातलं कोण कोण जिवंत राहणार हा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला आहे. गुगल काय आणि किती करायचं, प्रसारमाध्यमं यामुळे अफवांनाही बळी पडत आहेत. लहान मुलांना कोरोनाची भीती आणि मोठ्या लोकांना हे असच चालू राहील तर उद्या घर कस चालवायचं याची भीती गिळू पहात आहे ह्या विचाराने विदीशाचं मन कष्टी झालं.

सुदैवाने भारतात लॉक डाऊन असलं, ग्रामीण भागात सगळ्याच वयोगटातल्या मुलांच्या शाळा बंद असल्या तरीही एकत्र कुटुंब पद्धती, आपण स्वतः नव्हे तर मुलं हीच आईवडिलांची प्राथमिकता, शेजारधर्म, फोन करून आणि फोन आला की लगेचच एकमेकांची चौकशी करणं असा नातेवाईकांमधला जिव्हाळा यामुळे माणूस अजून तरी एकटा पडलेला नाही. आपण जेव्हा भारतातलया डॉक्टर मित्र मैत्रिणींशी बोलतो तेव्हा अमेरिकेतल्या मुलांसारख्या केसेस भारतात तरी झाल्याचं ऐकिवात नाही याच तिला मनोमनी समाधान वाटलं.

पेशंटचा विचार केलयावर विदिशाला प्रश्न पडला की, शारीरिक कोरोना झालेलया उद्यापासून बघायला लागणाऱ्या कोविड पेशंटची अवस्था जास्त काळजी करण्यासारखी, का शारीरिक कोरोना झालेला नसतानाही मानसिक कोरोना रुग्ण होऊ पाहणाऱ्या पेशंटची. शारीरिक कोरोना आज ना उद्या नक्की जाईल पण मनामनावर आघात करून बसलेला कोरोना कधी आणि कसा जाईल काय माहित. अमेरिकेतल्या पेशन्टसना थेरपिस्टला सोपवून आणि भारतातली मुलं समर्थ अश्या कुटुंबव्यवस्थेत सुरक्षित आहेत असा विश्वास बाळगत, उद्यापासून सुरु होणाऱ्या कोविड ड्युटी साठी आपण मात्र शारीरिक आणि मानसिक दोन्ही रित्या खंबीर असलं पाहिजे असा मनाशी निर्धार करत विदिशा झोपेच्या अधीन झाली.

डॉ संध्याजीत
© सर्व हक्क स्वाधीन

आपल्यापैकी कोणाला कोरोनाशी संबधीत मानसिक त्रास झाल्याचे काही अनुभव ऐकण्यात, बघण्यात किंवा अनुभवण्यात आले असतील तर वाचायला आणि त्यातून शिकायला आवडेल. धन्यवाद !

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण अश्या लोकांनी कमीत कमी स्वतः बर होईपर्यंत इतर लोकांच्या संपर्कात तरी येऊ नये
प्रतिसादाबद्दल धन्यवाद

शारीरिक कोरोना आज ना उद्या नक्की जाईल पण मनामनावर आघात करून बसलेला कोरोना कधी आणि कसा जाईल काय माहित>> अगदी खरं आहे.
कोणत्याही व्यक्तीच्या संपर्कात आल्यावर समोरील व्यक्ती करोनाने बाधित तर नसेल ना? अशी शंका मनात येत राहते एवढी मानसिक दहशत ह्या करोनाने बसविली आहे.