पांडुबाबाची लावणी

Submitted by सुमेधा आदवडे on 30 September, 2020 - 13:15

पांडुबाबाची लावणी

भिलजी गावच्या पांडुबाबाच्या दोन बायका. पहिली दम्यानं लगीन होऊन चार वर्षातच गेली त्याच्या पदरी तीन पोरी टाकून. मग पोरींची नि घराची देखभाल करणार कोण म्हणून दुसरी केली. तिला मुलंच होईना. झालं तरी जगंना. मंग पोरासाठी वाटल त्या नि दिसल त्या देवास नवस बोललं गेलं. अन पाच वर्षांनी एकदाची कुठल्यातरी देवाला त्याची दया आली आणि दारी छोटा किसना खेळू लागला. त्याचं नाव किसनच ठेवलं पांडुबाबानी. किसन शाळेत जाऊ लागला. हळूहळू मोठा होऊ लागला. आभ्यासात लय हुशार! दर वर्षी पहिल्या पाचात यायचा. काहीच नाही तर पहिल्या दहात तर नक्कीच!
पांडुबाबाला त्याचं कोण कवतिक!

त्याच्या आजाची सहा एकर जमीन. पांडुबाबाच्या बापानं हात लावला नाय कधी तिला. कसा लावणार? दारुतून शुद्धीत आला तर जमिनीकडे लक्ष द्यायला वेळ मिळेल ना? पांडुबाबाची आई मात्र लंय मेहनती. पोरांसाठी, पोटापाण्यासाठी तिनं जमीन कसली, वर्षाला दोन दोन पिकं घेतली. एक वेळ भाकर तुकडा खाऊन आणि  एक वेळ पोटाला चिमटा काढून दिवस काढले, पण एक तुकडा  विकला नाय जमिनीचा. पुढं जमीन पांडुबाबाच्या हाती आली. तो पण जवानीत भरपूर राबला जमिनीवर. मात्र त्याला सगळीच्या सगळी टिकवता आली नाही. प्रत्येक पोरीच्या लग्नात एक-एक एकर आणि किसनाला बारावी नंतर पुढच्या शिक्षणासाठी परगावी पाठवायला एक एकर जमीन त्यानं विकली. आता उरल्या सुरल्या दोन एकरात म्हातारा म्हातारी जमेल तसं काम करून अंग मोडत होती.

किसनाचं इंजिनियरिंगचं शेवटचं वर्ष होतं. तो पुढे नोकरीसाठी मुंबईत जाणार होता. आता घराकडे, म्हाताऱ्यांकडे, आणि शेतीकडे तो नजर तरी टाकेल अशी आशा करणंच मूर्खपणा होता. पण पांडुबाबाला पोरावर किती विश्वास! आणि त्याचा अभाळाएव्हढा अभिमान. किसनाचा विषय जरी गावातल्या कोणीही काढला तरी त्याची बापाची छाती दहा इंच रुंद होई. तो गावकऱ्यांना सांगायचा, " माझा किसना लय मोठा मानुस होनार हाय.नोकरी लागू दे पोराची एकदा.  बघा आमाला नाय इमानात फिरवलं तर नाव सांगनार नाय हा पांडुबाबा!"

पण हल्ली विमानात फिरायची स्वप्नं बघणाऱ्या पांडुबाबाच्या डोळ्यांसमोर जमीन आली, की त्या विमानातून थेट  तिच्यावर आपटल्यासारखं व्हायचं. उन्हाळयात गावातली पोरं त्याच जमिनीचं मैदान बनवून त्यावर क्रिकेट खेळत, खो-खो  - कबड्डीचे सामने होत तिच्यावर. खेळून खेळून शेत पार भुईसपाट करून टाकत. मग पावसाळा जवळ आला जी बिचारा पांडुबाबा गावतल्या कोणाचा तरी नांगर घेऊन त्या भल्या  थोरल्या शेताला फोडून मातीची ढेकळ उकरुन काढत असे. दिवसभर शेतात राबून, मागच्याला पेरायला बाजूला काढून ठेवलेलं बियाणं दाणा दाणा सगळीकडे उडवीत असे.
पिकावर दोन्ही म्हाताऱ्यांचं पोट. त्यात लेकाला शहरी पैसे धाडावे लागायचे. आणि दोन महिन्यांपासून म्हातारीने अंथरूण धरलं होतं. तिच्या काडी काडी झालेल्या हातापायांनी काही व्हायचं नाही, शरीर उठून काही करायलाच बंड पुकारायचं. पांडुबाबा बिचारा बायकोला दोन टाईम तांदळाची पेज करून देई. तिची वेणी फणी करी, सगळी सेवा करी. गेल्यावर्षी पीक फार झालं नाही. म्हणून घरात पैश्याची सतत तंगी. त्यात बायकोच्या दवापाण्याला होता नव्हता तो सगळा पैसा संपला होता. तांदूळ सोडले तर घरात बाकी काहीच वाणसामान नव्हतं.

पावसाळा सुरू झाला होता. सगळीकडे पेरलेलं उगवलं होतं. वाऱ्याच्या आणि पावसाच्या तालावर शेतात हिरवळ डोलू लागली होती. भाताची रोपटी शेतात कशीही ओबडधोबड येत. त्यांना अलगद उकरून एका ओळीत लावली की ती छान वाढत आणि भरपूर पीक देत. हे काम अजिबात सोपे नसे. गुदघाभर चिखलात शेतात उतरून पडत्या पावसात खाली वाकून हे काम करावे लागत. ह्या साठी मजूर मिळत पण त्यांना प्रत्येकी, दिवसा साडेतीनशे रुपये द्यावे लागत. शिवाय सकाळचा नाश्ता, दुपारी जेवण आणि दोन वेळा चहा.
पांडुबाबाला हे सगळं कुठून जमणार होतं? शेत लावलं नाही तर पीक नीट येणार नाही आणि परत वर्षभर दारिद्र्य!
सकाळी झोपडीबाहेर येऊन पांडुबाबा कपाळावर हात ठेवून समोर पसरलेल्या हिरव्यागार शेताकडे बघत होता. शेत लावायला हवंच होतं नाहीतर काही खरं नव्हतं. मनाशी काहीतरी ठरवून तो आत गेला.म्हातारी च्या अंथरुणाजवळ बसला.
" बरा वाटतंय काय?"
म्हातारी काही बोलली नाही. पांडुबाबा तिच्या डोक्यावर थोपटत परत बोलला,
" अगे, काय म्हनतो मी, बरा वाटतंय काय तुला?"
"चालायचाच हो, आता ह्यो दुखना माज्या संगतीच वर जानार हाय!"
" असा का बोलतंस? वाटल बरा, दवा घेतलास ना?"
" हा"
" बरा, मी काय सांगतंय, शेत लावाया झालाय."
" हा, काय कराचा? यंदा मानसं घ्यायला तरी पैसा हाय कुठं आपल्याकडं? होता नव्हता तो माज्या दवापान्यात घालवला. कसा लावाचा शेत आता?"
" अगे तू कशाला कालजी करतंस? मी हाय ना, मी लावन शेत आपला. मी बघन सगला."
" आवो, दोन एकरी जमीन एकटा कुठून लावनार हात?"
" अगे, रोज थोडी थोडी करीन. होईल हलूहलू. माज्या अंगात ताकत हाय तवर सगला करीन त्या जमिनीचा, माय हाय ती आपली! औरी वर्स पोसतंय आपल्याला. तिची देखबाल नको कराया!"
म्हातारी ह्यावर काही बोलली नाही. काय बोलण्यासारखं होतं ह्यावर नाहीतरी?

दुसऱ्या दिवशी पडूंबाबा कोंबडा आरवे पर्यंत उठायचा थांबला नाही. सकाळी घरातला केर कचरा केला. बायको साठी पेज करून ठेवली.  चहाचा घोट घेतला आणि जरासं फटफटताच शेतात उतरला. पावसाची रिमझिम चालू होती. म्हणून तसा काळोखच होता अजून. एक बाजूनं त्यानं इवली इवली भाताची रोपटी उकरून एक रेषेत सरळ लावायला सुरुवात केली. लहानग्या नाचऱ्या पोरांना अलगद धरून  एका ओळीत उभं करावं, मग त्या पोरांनी आपल्या माती मायचा हात धरून शिस्तीत एका मागोमाग एक उभं राहून वाऱ्यावर मजेत डोलावं, खेळावं असंच ते काम. रोपटी म्हणजे लहान बाळंच! त्यांची तशीच काळजी घ्यावी लागायची.

पांडुबाबाचा जवळजवळ अर्धा कोपरा लावून झाला.  शेताच्या बांधावरून गावातली दोन विशीतली पोरं जात होती, त्यांनी एकट्या पांडुबाबाला शेतात वाकून काम करताना बघीतलं. ती तशीच आल्या पावली मागे गावाकडं फिरली. गावात जाऊन त्यांनी त्यांच्या आणखी चार मित्रांना हे सांगितलं. ही सगळी पोरं उन्हाळ्यात वाटेल तेवढं दिवस ह्याच शेताचं मैदान करून खेळायची. पांडुबाबाला एकटा शेतात राबताना बघून त्यांना वाईट वाटलं. सगळे तसेच घरांकडे धावले. पोपट, राम्या, विशल्या, नित्या, भैऱ्या, आणि राहुल्या सगळे शेताच्या दुसऱ्या बाजूने खाली उतरले आणि शेत लावायला सुरुवात केली.
राम्याच्या आयशीने त्याला सकाळ सकाळ अंघोळ पण ना करता जुने कपडे घालताना बघून त्याला हटकले
" काय रं? सकाल सकालीच कुठं दौरा? जुनं कापडं काय घालतोयस? आनी सालन नाय जायचं काय आज?"
" आये, मी कालेजान जातो आता, सालन नाय! आनी आज दांडी मारतोय सगले. पांडुबाबाच्या शेतान चाललोय सगले जन, येकटाच लावतोय बिचारा सकाल पासून!"
"व्हय काय? जा जा बाबा. करा म्हाताऱ्याला मंदत."
बराच वेळ खाली वाकून काम करणाऱ्या पांडुबाबाच्या कमरेने आता बंड पुकारला. थोडा वेळ जाऊन बांधावर जाऊन टेकावं म्हणून तो सरळ उभा राहिला. वर उठल्यावर त्याला आश्चर्य वाटलं. शेताच्या पलीकडच्या कोपऱ्यात ती पाच- सहा पोरं वाकून काम करत होती.
त्यानं आवाज दिला,
"ए पोरानो ss काय करताय? चिखल हाय सगला तिथं!"
" शेत लावतोय पांडुबाबा!" एक जण उत्तरला.
"अरं कसाला नसती कामं करताय? सालन नाय जायचा काय?"
" आज दांडी मारली पांडुबाबा!" दुसरा जण ओरडला.

सगळे खाली वाकून एक चित्ताने काम करत होते. पांडुबाबाला उत्तरं देताना पण कोणी वर बघितलं नाही. शेताला लागून गावचा मुख्य डांबरी रस्ता जायचा. सगळ्या गावांना जोडणाऱ्या हा रस्ता पुढे गावच्या बाजाराकडे जायचा. दिवसातून चार एस ट्या इथून जायच्या. बाकी टमटम आणि खाजगी दुचाकीवरून जाणाऱ्यांची वर्दळ असायची. आज बाजाराचा दिवस होता. सकाळचे दहा वाजून गेले होते. जो तो आठवड्याच्या बाजारातून घराला लागणाऱ्या वस्तू आणायला जात होता. शेतात काम करणाऱ्या ह्या पोर कंपनीला बघून सगळ्यांना आश्चर्य वाटलं. पांडुबाबाची परिस्थिती गावात सगळ्यांना माहीत होती. त्यामुळं त्यांना हे दृष्य बघून बरं पण वाटलं. रस्त्यावरून रजीला जाताना बघून सगळी पोरं विशल्याला चिडवू लागली.

"विशल्या, वहीनी बाजाराला चालल्या वाटतं. "

"हो, आता त्यो दमून जानार नाय घरी? रांधायला नको व्हय त्याच्यासाठी?"
विशल्या खाली मान घालून लाजत होता. रजी त्याला आवडायची. तिला पण तो आवडायचा. पण तिचा बाप होता जमदग्नी! त्याला कळलं तर महाभारत होणार होतं. म्हणून त्याचं शिक्षण पूर्ण होऊन तो मार्गाला लागायची ती दोघे वाट बघत होती.

पौरांपैकी कोणीतरी जोरात हाक मारली तिला, " ओ वहिनी!"
विशल्याला मेल्याहून मेल्या सारखं झालं. त्यानं जी मान खाली घातली शेतात ती अजिबात वर उचलली नाही.

थोड्या वेळाने आणखी काही गावकरी रस्त्यावरून जात होते. त्यांनी पण ह्या पोरांना बघून हटकले:
"काय रे पोरांनो, सकाल सकाल शेतात काय करताव?"
"शेत लावतोय दादा, पांडुबाबाला मंदत करतोय" भैऱ्यानं उत्तर दिलं
"व्हय काय? थांबा आम्ही पण येतु! पांडुबाबाला मानसं घ्यायला पर्वडाचा नाय. त्यान म्हातारीला बरा नाय. काय काय करल येकटा."
बोलताच आणखी पाच जण शेतात उतरले. त्यांनी दुसरा कोपरा घेतला.
" पांडुबाबा माझ्या बाबाचा लंय जिगरी दोस्त. माझा बाप मेला तवा तेरा दिवस तो बी आमच्या संग आमच्या घरात दुःख धरून बसलेला. लंय केलं त्यानं माझ्या बाबा साठी. माझ्या लहानपनी, मना कलाया लागल्या पासून आमच्या घरी त्याच्याच शेतातला भात यायचा." मोहनराव भाताच्या काड्या लावता लावता म्हणाले.
"व्हय रं! माझं बी लंय लाड केलंत दोघां म्हाताऱ्यांनी. भात तयार झाल्यावर यक भाग पोह्यांचा ठेवायचं दोघा. सालन जाताना काकू रोज पोह्याचं लाडू द्यायची मना." सुधीर पाटील म्हणाला.
प्रत्येक जण मग आपल्या लहानपणीच्या काही न काही आठवणी सांगत काम करत राहिले.
सकाळचे साडे अकरा वाजले तरी अजिबात सूर्याचा पत्ता नव्हता. पाऊस जरा ओसरला होता. पण सगळीकडे दमट हवा होती.
थोड्या वेळाने रस्त्यावरून गावचे सरपंच जात होते. त्यांनी शेतात ह्या सगळ्यांना काम करताना पाहिलं. पांडुबाबाची अवस्था त्यांच्यापासून काय लपलेली नव्हती. त्यांनी स्वतःची आणखी तीसेक माणसं शेतात कामाला धाडुन दिली.
आता शेतात जवळपास पन्नास माणसं लावणी करत होती. दोन कोपरे अर्धेअधिक लावून झाले होते. पांडुबाबाच्या अंगणात तेवढ्या वेळात गावच्या काही सात-आठ बायका जमल्या. एकीकडे तीन विटांची चुल मांडून भाकऱ्या थापल्या जात होत्या. दुसरीकडे दोघी तिघी जणी गावच्या बाजारातून नुकतीच आणलेली ताजी भाजी साफ करत होत्या. हौसाक्का आली आणि तिथलं वातावरणच बदललं. तिनं सगळी सूत्र हातात घेतली.
" ए पोरी, त्या भाकऱ्या पुरनार नाय. अग येवढं बाप्या मानुस हाय शेतान, मानसी दोन दोन तरी धर. भूक लागतीया बाप्याना कामं करून अजून पीठ घे!"
" शेवंते, अग किती येल घालवताय त्या लसनाला सोलाया. पटापटा वरवंट्यानं ठेचा नि सोला!"
" ए कुंदे, त्यो पोरगा रडतोय  बघ कंदीपासना. त्याला पाज आंधी!"
" ए पोरींनो, भाज्या साफ झाल्या काय? इलीवर कापून घ्या चला.हात चालवा चटचट. नुस्त्या खिदलत बसू नका. भुका लागतील सगल्याना आता!"
हौसाक्काच्या एका मागोमाग एक ऑर्डर सुटत होत्या. सगळ्या बायका पटापटा राबू लागल्या. बरोबर एक वाजता  जेवण सगळं तयार होतं.
हौसाक्कानं बांधावर उभी राहून हाक दिली,
"ए sss पोरांनो, चला दोन दोन घास पोटात घाला, मंग जा कामाला आपल्या!"
एक एक करून सगळे नळावर जाऊन हात पाय धुवून आले. मग
पांडुबाबाच्या अंगणात आणि ओटीवर जेवणाच्या पंगती बसल्या. बायका जेवणं वाढू लागल्या. पावसाळ्याचे दिवस आणि गरमागरम ताज्या गावठी भाज्यां. त्यात कामं करून सगळयांनाच खूप भूक लागली होती. पांडुबाबा आधी जेवायला बसत नव्हता. त्याला खूप अवघडल्यासारखे झाले. आपल्यासाठी खपणाऱ्या ह्या सगळयांना काही देऊ शकत नाही आहोत याची त्याला लाज वाटली. त्याला बळजबरी हौसक्का आणि सगळ्यांनी पहिल्याच पंगतीला बसवलं. सगळ्यांना भाकरी, भाजी आणि लसणाच्या चटणीची जणू मेजवानीच मिळाली. त्यामुळे पटापट जेवण संपत होतं. पंगती उठल्या, सगळ्यांनी हातावर पाणी घेतलं आणि परत शेतात उतरले.
मग बायकांनी सगळं जेवण मध्ये घेतलं आणि जेवायला बसल्या. पांडुबाबाच्या  म्हातारीला कोणीतरी  घरात जाऊन ताट देऊन आलं. तिला बसवलं आणि खायला लावलं. प्रत्येक घासास म्हातारीचे डोळे भरून येत होते.
संध्याकाळ होत आली होती. साडे पाच वाजेपर्यंत सगळं शेत हिरव्यागार एकामागे एक अशा  शिस्तीत डोळणाऱ्या भाताच्या रोपांनी गदागदा हलत होतं. हे लावलेलं शेत बांधावर उभा राहून बघत असताना, त्याला आपलीच दृष्ट लागेल की काय असं पांडुबाबाला वाटलं.

त्याची चिंता आता मिटली होती. कुठे तो एकटाच थोडं थोडं करून शेत लावायचा विचार करत होता, आणि आज गावातील एवढी माणसं त्याच्या मदतीला धावून आली. आणि एक दिवसात त्याचं शेत लावून झालं. त्याच्याकडे पैसे नव्हते, पण त्याने जोडलेली माणसं हीच त्याची कमाई होती आणि तीच कमाई आज त्याच्या कामी आली. मळणी झाल्यावर ह्या सगळ्यांच्या घरात अर्धा मण तरी तांदूळ पोहोचला पाहिजे ह्याची त्याने मनातल्या मनात नोंद करून ठेवली होती. बाकी भात विकून किसनाचा खर्च काढून ठेवू, मग उरल त्यात भागवू आपण असं त्यांन ठरवलं.

तर अशी ही पांडुबाबाची लावणी सुफल संपुर्ण झाली.
आपण सगळ्यांनी मिळून पण, एकमेकांच्या आयुष्यात थोडासा फरक पाडून.. प्रेमाची, आपुलकीची, माणुसकीची लावणी केली तर किती सुंदर होईल हे जग? त्या हिरव्या डौलदार शेतासारखं!

-सुमेधा आदवडे

Group content visibility: 
Use group defaults

छान..
आगरी भाषा बोलायला, ऐकायला गोड वाटते.

किती मस्त लिहीलेय Happy

माणसं जोडणं अवघड असत, पण जोडलेली माणसंच वेळेला मदतीला येतात Happy

'लावणी' म्हणल्यावर वेगळीच लावणी डोक्यात आली होती. पण ही जास्त चांगली लावणी आहे.

इतकं सकारात्मक काहीतरी वाचलं की फार बरं वाटतं.

लावणी' म्हणल्यावर वेगळीच लावणी डोक्यात आली होती. पण ही जास्त चांगली लावणी आहे+11
आमच्याकडे 'रोवणा' म्हणतात भाताचा..
>> खूप छान आहे कथा.

खूप सुंदर कथा आहे! गावी गेल्यासारखं वाटलं.
लावणी केल्यानंतर काही दिवस रोपं तिरकी तिरकी दिसतात. नंतर ती सरळ होतात आणि मग थोडी मोठी झाली की वाऱ्यावर डोलतात. ते दृश्य डोळ्यासमोर आलं!