मागणे

Submitted by Sameer Jirankalgikar on 29 September, 2020 - 09:17

लाखो स्वप्ने वसतिल इतके काळिज देवा विशाल दे.
आव्हानांचे असंख्य काटे मार्गावरती खुशाल दे.

ध्येयपथावर प्रवास करता कष्ट भलेही अपार दे.
विश्वासाची अथांग शक्ती, धैर्याचे बळ अफाट दे.

काळोखाने काजळलेले मेघ कितीही नभात दे.
त्या मेघांना उजळवणारी उन्मेशाची प्रभात दे.

पदरामध्ये पराभवाचे दान भले तू भरून दे.
परि आशेचे मृगजळ थोडे थकल्यानंतर मनास दे.

पंखांवरती तुफान झेलू इतकी शक्ती अम्हास दे.
उंच भरारी नभात भरता आस धरेची मनास दे.

- समीर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults