त्याग...

Submitted by माझी लेखणी.... on 25 September, 2020 - 17:25

“नवी कोरी कार रस्त्याच्या कडेला येऊन थांबली,कारचा दरवाजा उघडला आणि कोण बर बाहेर आलं?वाह किती देखणा तरूण आहे हा,अगदी राजकुमारासारखा.त्याने खुप उंची कपडे परिधान केले आहेत. श्रीमंती तर अगदी ओसंडून वाहतेय.तो कोणाचीतरी वाट पाहतोय.इतक्यात ती आली.अरे ही तर मी आहे.किती सुंदर दिसतेय मी हया ड्रेसमध्ये.त्या तरूणाच्या चेहर्यावर एक ओळखीचं हसू पसरलं मला पाहून.त्याने माझ्यासाठी कारचा दरवाजा उघडला.मी आत बसले.कार सुरू झाली आणि काही वेळातच एका पंचतारांकित हॉटेलजवळ थांबली.तो माझी खूप काळजी घेत होता.माझ्या आवडीनुसार सर्व जेवणाचे पदार्थ होते.मी जेवणावर चांगलाच ताव मारला.जेवुन झाल्यावर तो मला मॉलमध्ये घेऊन गेला.आम्ही मनसोक्त खरेदी केली.अचानक त्याने माझा हात हातात घेतला आणि म्हणाला,”माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर “ मी थोडीशी लाजले आणि म्हणाले,”खरचं?” तो म्हणाला,”मी तुझ्यासाठी काहिहि करू शकतो” मी म्हणाले, “खरचं?” अचानक त्याचा चेहरा उग्र झाला.तो जोरजोरात ओरडून बोलू लागला.त्याने सपकन पाणी मारलं माझ्यावर.मी डोळे चोळू लागले समोर बघते तर काय आई पाण्याचा रिकामी ग्लास घेऊन उभी.”काय गं आई पाणी का ओतलस माझ्यावर” ऐश्वर्या डोळे चोळत म्हणाली.”तुला कधीपासून ऐशु उठ उठ बोलतेयं तर तुझं आपल कधीपासून खरंच,खरंच हेच चालू.मग ओतलं पाणी,आता कळलं खरं कि खोटं ते?” आई रागारागाने म्हणाली.स्वप्नाबद्दल आठवून ऐशूने जीभ चावली.तिच्यावर खुप प्रेम करणाऱ्या राजकुमाराची स्वप्ने तिला नेहमीच पडायची.ती अंथरूणावर उठुन बसली तिची नजर बाबांकडे गेली.मागच्या काही दिवसांत आजारपणामुळे हाडांचा सापळा झालेलं त्याचं शरीर पाहून तिला कसनूस झालं.आई तर बिचारी त्यांच्या आजारपणामुळे खुप खंगली होती.ऐश्वर्याची नुकतीच बारावी झालेली.ती नोकरीच्या शोधात होती पण यश मिळत नव्हतं.भाऊ मवाली मित्रांसोबत वाया गेलेला.”काय पण नाव ठेवलंय,बाबांनी ‘ऐश्वर्या’.फक्त नावातचं ऐश्वर्य.बाकी द्रारिद्र तर आमच्या पाचवीलाचं कायम पूजलेलं.”ऐश्वर्या स्वतःशीच पुटपुटली.फ्रेश होऊन ती आईला स्वयंपाकात मदत करू लागली.आई म्हणत होती,”काल ताईंनी पगार दिला तो ह्यांच्या औषधपाण्यावरच खर्च झाला.घरात काहीच किराणा भरता आला नाही.घरात उरलेलं सुरलेलं दोन दिवसांत संपेल मग पुढे काय?आपण एकवेळ ऊपाशी जगू कसेतरी पण,ह्यांच काय?आजारी माणसाच्या पोटात दोन घास जायला नको?तुझ्या नोकरीचं लवकर झालं असतं कुठे तर तेवढा तरी आधार असता.देव पण किती परिक्षा बघतोय आपली.”ऐश्वर्या फक्त ऐकत होती.ती तरी काय बोलणार.तिची आई दोन घरची धुणीभांडी करायची.त्यात मिळकत अर्थातच कमी.
“ऐशु कुठे आहेस गं?काय करतेयसं?”अचानक गीताचा आवाज कानावर पडला.गीता म्हणजे ऐशुची बालमैत्रिण. “अरे गीता आज इकडे कशी ऊगवलीस सकाळीच”ऐशु तिच्या जवळ जात म्हणाली.”काही नाही म्हटलं,तू कुठल्या अंधारात हरवलीस ते तरी बघु” दोघींच्या इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या.बोलता बोलता ऐशुने तिला नोकरीची गरज असल्याचे सांगितलं.गीताला अचानक आठवलं कि तिचा दादा अॉडिटींगला जातो तिथे बारावी उतीर्ण साठी एक जागा रिकामी आहे.पण पगार खुप कमी मिळेल.ऐशु म्हणाली, “पगार कमी असला तरी चालेल.मी जाईन तिकडे ईंटरव्हुला.”गीता दादाला सांगते म्हणाली आणि निघाली.
दोन दिवसांनंतर...
“आई,मला खुप भूक लागलीय गं,थोड्या वेळाने मी निघेन ईंटरव्ह्युला.चालत चालत जाईन.अर्धा पाऊण तास लागेल पोहोचायला.”आईने अर्धा भाकरीचा तुकडा तिला दिला.आज घरातलं सर्वच अन्न संपलं होतं.शेवटचं उरलेल्या भाकरीच्या पीठाने दोन भाकऱ्या कशाबश्या झाल्या.एक ऐशुच्या बाबांना आणि अर्धी अर्धी दोन्ही मुलांना.आई तशीच फक्त पाणी पिऊन भूक शमवण्याचा प्रयत्न करत होती.“ऐशुचे बाबा नोकरी करत होते तेव्हा सगळं कसं नीट होतं.अचानक आजारी पडले आणि सगळी परिस्थितीच बदलली.ऐशुला खुप शिकायचं होत पण पुढच्या शिक्षणासाठी पैसा कुठून आणणार? इथे दोन वेळच्या जेवणाचीचं पंचाईत.अमर तर मित्रांच्या संगतीने पार बिघडलाय.त्याला जराही जबाबदारी कळत नाही. “आई स्वतःशीच बोलत होती.
“आई चल निघते गं” ऐशुच्या आवाजाने आई भानावर आली.ऐशु एव्हाना झपझप पाऊले टाकून निघालीही.तुटलेल्या चप्पलला तसंच रेमटवत ती चालत होती.पाऊण तासात ती दिलेल्या पत्त्यावर पोहोचली.ते एक औंषधांच्या डिलरचं गोडाऊन होतं.सगळीकडे औंषधांनी भरलेली कपाटे होती.जिकडे नजर जाईल तिकडे औंषधांच साम्राज्य पसरलेलं.ऐशुला औंषधाच्या नावानेचं उलटी येई.इथे तर आख्खा समुद्र.किती दिवस आपला निभाव लागेल काय माहित,ऐशु सगळीकडे पाहत विचार करत होती.तिथे कोपऱ्यात एक कंम्पुटर टेबल होतं.एक चाळीशीतली बाई त्यात डोकं खुपसून बसली होती.ती मधेच डोकं वर करून ऐशुला म्हणाली, “तिथे बसा.सर येतीलंच इतक्यात.” ऐशु पटकन जाऊन खुर्चीवर बसली.तिच्या समोरच एक मोठ्ठी केबिन होती.तिने हळूच डोकावून पाहिलं,केबिनच्या एका कोपऱ्यात देव्हाऱ्यात पार्श्वनाथ आणि पद्मावती देवीचा फोटो होता.ह्यावरून सर जैन असावेत असा तिला अंदाज आला.थोड्या वेळात एक ४५ च्या आसपास वय असलेली व्यक्ती आत आली.तेच सर असावेत बहुतेक.त्यांनी ऐशुच्या डोक्यापासून पायापर्यंत नजर फिरवली,आणि ते केबिनमध्ये जाऊन बसले.त्यांची नजर विचित्र वाटली तिला.थोड्यावेळाने ऐशुला आत बोलावलं.
“ऐशु बाळा आलीसं? कसा गेला ईंटरव्ह्यू?आणि इतका ऊशीर कसा झाला गं यायला?आजपासूनच काम करायला लावलं की काय?” आल्या आल्या आईच्या प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. ऐशु किंचित हसून हो म्हणाली.तिने आईच्या हातात ५०० ची एक नवीकोरी नोट ठेवली.
“ऐशु,हे पैसे कोणी दिले गं?”
“आई सरांनी दिले आणि म्हणाले,नवीन चपला घे.तुटलेल्या चपलाने गरिबी येते.उरलेले पैसे तुला खर्चाला ठेव म्हणाले.”
“भलामाणूस आहे गं,आजकाल अशी माणूसकी कुठे बघायला मिळते.मला प्रश्नच पडलेला आताच्या जेवणाच कसं होणार.पीठ पण सकाळीच संपलेलं.देवालाचं काळजी असते बघ.”आई डोळे पुसत म्हणाली.आईच्या डोळ्यांतले आनंदाश्रू पाहून ऐशुच्या मनातलं चूक की बरोबर हया विचारांनी व्यापलेलं वादळ थोडं शांत झालं.आणि ती मनाशीच म्हणाली, “आईच्या चेहऱ्यावरच्या आनंदासाठी मी केलेला कोणताही त्याग चूकीचा नक्कीच नाही.”

Group content visibility: 
Use group defaults

बापरे.
त्याग कोणत्या स्वरूपाचा केला हे कथेत सांगितलं नाही तेच बरं.
(तो त्र व्यवस्थित टाईप करता आला तर बघा प्लिज.)

mi_Anu,तुम्ही सूचवलेला बदल केला आहे.धन्यवाद .मराठी टायपिंग मध्ये थोडा घोळ झालेला.

वाचली...
पुढील लेखणास शुभेच्छा।

@peacelily2025- हो.म्हणूनच त्यागाबद्दल
विस्तार न करता एका ओळीत मांडण्याचा प्रयत्न केला.धन्यवाद.
@mrunali.samad - धन्यवाद .
@वावे -धन्यवाद.

कृपया मला कोणीतरी सांगेल का, प्रतिसाद लिहिताना हव्या त्या
आयडी ला टॕग कसं करायचं ?मी '@ ' हे वापरून टॕग करण्याचा प्रयत्न केला पण होत नाही.

दिवसाची सुरवात...
एका निरागस मुलीचे नाजूक स्वप्न, राजकुमार, पंचतारांकित हॉटेल.
दिवसाच्या अखेरीस...
औंषधांच्या डिलरचं गोडाऊन, तिथला बॉस, तिला करावा लागलेला त्याग.

कथेची मांडणी फार परिणामकारक! पुढील लेखनास शुभेच्छा.

>> प्रतिसाद लिहिताना हव्या त्या आयडी ला टॕग कसं करायचं ?

फेसबुक, व्हाट्सप सारखे म्हणत असाल तर तसे इथे आयडीला टॕग करता येत नाही. @ लिहून आयडी पेस्ट करू शकता.