पाश्चात्य संगीत: का आणि कसे.

Submitted by बिथोवन on 23 September, 2020 - 04:36

बऱ्याच मराठी मंडळीनी भारत भ्रमण केले असेल आणि तसे करताना भारताच्या विविध प्रांतात फिरताना भाषेची अडचण कशी येते याचाही अनुभव घेतला असेल. एक कॉमन दुवा साधणारी भाषा म्हणून हिंदी येत असेल तर बरेच प्रश्न सुटतात पण जिथे त्याच प्रांतातली भाषा बोलण्याचा आग्रह होतो आणि समोरचा माणूस हिंदी वा इंग्रजी बोलत नाही तेंव्हा जो गोंधळ उडतो तसाच काहीसा गोंधळ काहीही नवीन करताना होतो. उदाहणादाखल तुम्ही हिंदी गाणी आवडीने ऐकता पण पहिल्यांदा इंग्रजी गाणी तुम्ही ऐकलीत तेंव्हा इतकी आवडली नाहीत. पण त्यांच्यातले शब्द तुम्हाला कळायला लागले तेंव्हा त्याच्यात थोडीशी गोडी निर्माण व्हायला लागली आणि मग संगीत आवडायला लागले आणि मग काही गायक गायिका आवडायला लागले आणि मग काही गायक आणि गायिका फेवरिट झाले अगदी आपल्या मोहम्मद रफी, मुकेश, लता, आशा याप्रमाणे. कोण मायकल जॅक्सन वरती प्रेम करू लागला तर कोणी एल्विस प्रिस्ले हाच कसा महान गायक आहे हे पटवून देऊ लागला. कुणाला शकीरा तर कुणाची बार्बरा स्ट्रायझंड तर कुणाची मॅडोना फेवरिट ठरू लागली. काही जण बीटल्स, आबा, बीजिज यांचे भक्त बनले. बीटल्सचा जॉर्ज हॅरिसन आणि मायकेल जॅक्सन भारतात येऊन गेल्यावर तर त्यांच्या भारतीय चाहत्यांची संख्या वाढत गेली.

संगीत म्हणजे ध्वनिकंपन. कंपन हवेत विरून जातात. ह्या कंपनात जर सुसंगती असेल तर ती मनाला भावतात आणि आपल्या मनावर एक ठसा उमटवतात. ही सुसंगती समजायला फार कष्ट घ्यावे लागत नाहीत ती ऐकताना फक्त आपल्या मनाची कवाडं खुली हवीत. केवळ शांतता जिथे आहे त्याचं ही एक संगीत असतं. जसं ख़ामोशी खुद अपनी सदा हो किंवा सन्नाटा ही गूंज रहा हो. पावसाच्या संततधारेत एक प्रकारचं संगीत असतं. कडाडणाऱ्या विजेच्या आवाजात एक संगीत असतं आणि समुद्राची गाज, खळखळ वाहणारी नदी, झाडांच्या पानांची सळसळ, छापरावरून टपटप गळणारे पावसाचे थेंब यातल्या संगीतात ही सुसंगती साधलेले ध्वनी कंपनं आहेत आणि ते तुम्ही शोधलात की तुम्हाला त्याची मोहिनी निर्माण होते.
या संगीतात एक पॅटर्न असतो. एक रचना असते. डोळ्यांनी दिसणारे दृश्य म्हणजे रंगीत प्रकाश बिंदुंची एक कमी अधिक प्रकाश असणारी एक प्रकारची रचनाच असते आणि त्या रंगात सुसंगती असली की ते दृश्य डोळ्याला भावतं. ती प्रकाश रचना आपण ताजमहाल म्हणून ओळखलं की आपल्याला आवडायला लागतं. आयफेल टॉवरची रचना आपण ओळखतो आणि ते पाहिल्यावर "सुंदर!" असे शब्द आपसूक ओठाबाहेर पडतात. अगदी त्याचप्रमाणे ध्वनी कंपनाची रचना असते आणि एकदा ओळख पटली की आवडायला लागते. आरोह आणि अवरोह यांची एक विशिष्ट रचना तयार झाली आणि ती दोन चारदा ऐकली की त्याची एक इम्प्रीं ट तयार होते आणि ती मनात घर करून बसते. हे संगीताचे आपोआप होणारे रसग्रहण आहे.

ही पहिल्या इयत्तेतील कविता पहा. त्यातल्या प्रत्येक ओळीत एक आवाज ऐकवलेला आहे.

गाडि आली गाडि आली - झुक्‌ झुक्‌ झुक्‌
शीटी कशी वाजे बघा - कुक्‌ कुक्‌ कुक्‌

इंजिनाचा धूर निघे - भक्‌ भक्‌ भक्‌
चाके पाहू तपासून - ठक्‌ ठक्‌ ठक्‌

जायचे का दूर कोठे - भूर्‌ भूर्‌ भूर्‌
कोठेहि जा नेऊ तेथे - दूर्‌ दूर्‌ दूर्‌

तिकिटाचे पैसे काढा - छ्न्‌ छ्न्‌ छ्न्‌
गाडीची ही घंट वाजे - घण्‌ घण्‌ घण्‌

गाडीमधे बसा चला - पट्‌ पट्‌ पट्‌
सामानाहि ठेवा सारे - चट्‌ चट्‌ चट्‌

नका बघू डोकावून - शुक्‌ शुक्‌ शुक्‌
गाडी आता निघालीच - झुक्‌ झुक्‌ झुक्‌

हे असे पॅटर्न बनले की आपण ते शोधत जातो आणि कळत नकळत आपल्या मनाच्या खोल कप्प्यात ते सामावतात.

एखाद्या संपूर्ण संगीताचा भाग घेतला की त्यात एक मध्यवर्ती कल्पना येते आणि ती कल्पना परत परत रिपीट होते आणि हेच रीपिटिंग आपल्याला त्या गाण्याकडे खेचते. गाण्यात सुरुवातीच्या ओळी ह्या कडव्या नंतर रिपीट होत राहतात आणि त्याचे रिपीटेशन कसे करावे हे संगीतकार ठरवतो.
थीम तयार झाली की त्याची विविधता रिकॅपि टूलेशन, ट्रांस्पोजिशन, इमिटेशन, एक्सपोजिशन असे तंत्र वापरून वाजवली जाते जेणे करून संगीत जादुमय होईल. स्केल म्हणजे भारतीय संगीतात असणारा थाट. संगीताची सुरुवात करतांना "होम की" नी सुरुवात करतात ज्याला मेजर कॉर्ड असं नाव आहे. मग निरनिराळे मायनर किंवा वेगवेगळे मेजर कॉर्डस् वाजवून परत एकदा "होम की" ला पोचले की जी विविधता निर्माण होते ती निश्चितच सुखावह असते. कॉर्डस् म्हणजे दोन किंवा तीन स्वर एकत्र वाजवणे. उदाहरणार्थ "सी मेजर" कॉर्ड बघू. मेजर कॉर्डचा एक फॉर्म्युला असतो तो १-३-५ असा असतो. इथे "सी" नी सुरुवात केली की "सी" नंतर "इ" येतो आणि त्यानंतर "जी' येतो. म्हणजे सी-इ-जी हे तिन्ही नोट्स एकत्र वाजवले की "सी मेजर" कॉर्ड वाजतो. मग ह्या कॉर्डची एक फॅमिली असते आणि त्या कुटुंबातील सदस्य एकत्र येतात तेंव्हा सुसंवाद होतो. "सी कॉर्ड" फॅमिलीत "डी मायनर," "इ मायनर," "एफ मेजर," "जी मेजर" आणि "ए मायनर" असे कॉर्डस् असतात. नुसते संगीत वाजत राहिले तर त्याला सोनाटा म्हणतात आणि त्याच्यात गाण्याचे शब्द असले की त्याला कॅनाटा म्हणतात. सोनाटा मध्ये मुख्यत्वे पियानो वाजवतात आणि त्याला व्हायोलिनची साथ असते. नुसता व्हायोलिनचा सोनाटा नसतो.

भारतीय अभिजात संगीत आणि पाश्चात्य अभिजात संगीत यातला मुख्य फरक हा आहे की भारतीय संगीत कंठ्य संगीत आहे तर पाश्चात्य संगीत वाद्य संगीत आहे. भारतीय संगीत शिकायचे असेल तर गुरुशिष्य परंपरा यातून जावे लागते तर पाश्चात्य संगीत आपल्याला तशी गरज भासू देत नाही. विसाव्या शतकाच्या मध्यापासून भारतात वाद्यसंगीत लोकप्रिय होऊ लागले आहे, आणि गुरु शिष्य परंपरा ही कमी होऊ लागली आहे. आणि याचा परिणाम म्हणजे गिटार, फ्लूट, पियानो, कॅसीओ, हार्मोनियम इत्यादी म्युझिकल इन्स्ट्रुमेंटस् घरोघरी दिसू लागली. भारतीय कंठ्य संगीत आत्मसात करण्यात जेवढा वेळ जातो त्या मनाने कमी वेळेत पाश्चात्य संगीत शिकता येऊ लागले. हौशी कलाकारांना ऑर्केस्ट्रात कामे मिळू लागली, वेस्टर्न म्युझिकचे क्लासेस उघडता येऊ लागले आणि ते एक उत्पन्नाचे साधन झाले, आणि म्हणून पाश्चात्य संगीत लोकप्रिय होऊ लागले.

दोन अडीचशे वर्षांपर्यंत केवळ युरोप खंडात पाश्चात्त्य शास्त्रीय संगीत केंद्रित झाले होतं. अठराव्या शतकात अमेरिकेत गेलं आणि नंतर सगळ्या जगात. गेल्या चार दशकांत चीन, जपान, दक्षिण कोरिया या पौर्वात्य देशांत या संगीताचा स्वीकार झाल्याचं दिसून येतं. आज जवळजवळ तीन कोटी चिनी मुलं पियानो शिकत आहेत, तर एक कोटी मुलं व्हायोलिन शिकताहेत. महत्त्वाचं म्हणजे उत्तर कोरिया आणि इराण मध्ये पाश्चात्त्य संस्कृती बदनाम असताना देखील पाश्चात्त्य शास्त्रीय संगीत उत्साहात शिकलं जातंय.

.....

Group content visibility: 
Use group defaults

छान लिहिलय..
मला वाटते संगीताचा आनंद लुटण्यासाठी भाषेची गरजच नसते..

छान लिहिलं आहे. काही शंका आहेत, त्याबद्दल पुढील भागांमध्ये वाचायला आवडेल.
मेजर कॉर्ड नेहमी 1-3-5 अशीच का असते?
सुरुवात सी पासून का करतात, ए पासून का नाही?

छान.
स्केल म्हणजे पट्टी. थाट म्हणजे (प्रत्येक स्वराला शुद्ध, कोमल, तीव्र पैकी एक) सात स्वरांचा समूह. मग यातील वेगवेगळ्या स्वरांना घेऊन/ वगळून राग बनेल.

मला वाटते संगीताचा आनंद लुटण्यासाठी भाषेची गरजच नसते. >> +1000
त्याच्यापुढे जाऊन मला वाटते की कुठला राग आहे, कुठली पट्टी आहे, G major आहे की G minor आहे, हे माहीत नसते तरी काहीही फरक पडत नाही.

छान लेख
Harmoney आणि melody हाही एक फरक आहेच, पण आता तो पुसट झालाय

मला वाटते संगीताचा आनंद लुटण्यासाठी भाषेची गरजच नसते+111111111

G major आहे की G minor आहे, हे माहीत नसते तरी काहीही फरक पडत नाही. >> आनंद लुटण्याच्या व्याख्येवर अवलंबुन आहे ते, आणि ती व्यक्तीपरत्वे बदलते. प्रत्येक बारकावा समजलाच पाहिजे असं नाही, ढोबळ चित्रातला अर्थही असतोच, पण जसे जसे बारकावे समजत जातात तसं तसं संगीत आणखी आणखी उमगत जातं, वेगळे पैलू दिसू लागतात. जे दिसले नाहीत तरी आधी म्हटलं तसं ढोबळ संगीतही कानाला छानच वाटतं, फक्त ते का आहे व्यक्त करता आलं तर कुणाला आणखी मजा येते.
उदा. हिंदुस्तानी संगीतात एकाच वेळी पट्टी बदलली पण फिजिकल सूर तेच ठेवले की वेगळा राग वाजतो. आता एका गायकाने एक पट्टी मानून एक राग आणि दुसर्‍याने दुसरी मानून दुसरा राग असे एकाच वेळी गायले की येणारी मजा काय होतं आहे ते न समजताही घेता येतेच. पण समजलं तर कुणाला जास्त आनंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (जसरंगी सर्च करा)