सुहृद -भाग १

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago
Time to
read
<1’

पहिल्यांदाच कथा लिहायचा प्रयत्न करतेय, पाहू कितपत जमतय!! Happy गाजराची पुंगी, वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाल्ली!! Happy Happy

**************************************************************

दीक्षित मास्तरांच्या घरी जरा लगबग सुरु होती. आज त्यांच्या लेकीला, जाईला, बघायला येणार होते. घरात सर्वात जास्त अस्वस्थ मास्तरच होते! खर तर, त्यांच्याच शेजारी रहात असलेल्या कुलकर्ण्यांनी हे स्थळ आणल होत, म्हणजे तस माहितीच असणार होत…

कुलकर्णी स्थळाची माहिती देताना म्हणालेही होते, "काळजी करू नका सर, अगदी चांगली माणस आहेत ही. मला ठाऊक आहे, तुम्हांला जाईची काळजी वाटते, तुमच्या काळजाचा तुकडा आहे जाई, पण माझी खात्री असल्याशिवाय मी तुम्हांला अस तस घर दाखवणार नाही. अहो, माझ्या चांगल्या परिचयाची माणस आहेत….."

"नाही हो अप्पा, तुमच्या हेतूविषयी काहीच शंका नाहीत माझ्या मनात, पण तरीही मनात आपले नाही नाही ते विचार येतात हो… आणि पुन्हा, मी काही खूप काही डबोल बाळगून असलेला माणूस नाही. साधासुधा शिक्षक या गावातला. शिक्षणाचा बाजार करण आणि माया जमा करण, मला काही शक्य झाल नाही, यापुढे होणार नाही, त्यामुळे व्यवहारात माझ्यासारख्या माणसाची किंम्मत तशी शून्यच! मी आपला या गावातच राहिलो, शाळेत, विद्यार्थ्यांत रमलो. मनापासून शिकवल. पण या सार्‍याला व्यवहारात किंम्मत नाही हो.... आजच्या जगात तरी नाही! अन आताशा मला हे फार टोचत, खर सांगायच तर, तत्वांवर चालणारा माणूस मी, पण अस वाटत हल्ली कधी कधी की या तत्वांपायी मी आमच्या हिच्यावर अन जाईवर अन्याय करतो की काय... आता ह्या बघायला येणार्‍या मंडळींच्या काय अपेक्षा असतील, काय माहीत? उगाच न झेपणार काही असल तर? हुंडा वगैरे माझ्या तत्वांत बसणार नाही, रीतीप्रमाणे, खुशीने जमत तेवढ करणारच मी सगळ, पण त्यांच्याही मनाला आल पाहिजे... अश्या बाबी वरून बैठक मोडली तर, तुम्हालाही वाईट वाटायच...."

"पैजेवर सांगतो सर मी तुम्हांला, अस काहीही होणार नाही बघा. अहो, ती माणसही तुमच्याच सारखा विचार करणारीच आहेत, पहालच तुम्ही....." आज परत एकदा, मास्तरांना हे बोलण आठवून गेल. अप्पांनी दिलेला भरवसा होता, पण स्वत: भेटल्याशिवाय, बोलल्याशिवाय काही खर नाही... मास्तर मनाशीच म्हणत होते.

मास्तरांच्या पत्नीची फारशी वेगळी अवस्था नव्हती. त्यांनाही चिंता लागलीच होती, जरा धाकधूकच होती. मनातल्या मनात, गजाननाला आळवून झाल होत... "देवा गजानना, सगळ काही व्यवस्थित पार पाड रे बाबा! तुला एकवीस संकष्ट्या मोदकांचा नैवेद्य दाखवीन बाबा... एवढस गाव रे, त्यात असली बातमी लपूनही राहणार नाही, आणि हे जमल नाही तर, लोकांना लगेच चघळायला विषय!! नकोरे गजानना, असल काही..." किती वेळ त्या गजाननाला आळवत होत्या....

अन जाई? जराशी गोंधळलेली, जराशी वैतागलेली... उगाच जरा धडधडत पण होत! शेजारच्या अप्पांची सुनिता येऊन चिडवून गेलीच होती!! एकदम छान जोडा शोभेल म्हणे!! एवढ काही कौतुक नकोय करायला त्याच!! जाईने उगाच नाक उडवल!!

तिला आठवल, सुनिताने फ़ोटो आणला होता दाखवायला....

जाईने आपल खूप लक्ष न देऊन पाहिल्यासारख दाखवल खर सुनिताला, पण सुनिताही जाईला, आपल्या मैत्रिणीला ओळखत होतीच!! "इथेच ठेवून जाऊ का ग फोटो?" मिश्किलपणे हसत हसत सुनिता विचारत होती, "नाही म्हणजे कस, की मी इथून गेले ना, की कस अगदी नीट बघता येईल हो फोटो!! काय??"

"सुनिटलेऽऽऽऽ!!" सुनिताच्या पाठीत एक धपाटा बसला!! तरीही सुनिताच हसणं काही आवरेना! मग दोघी मैत्रिणी हसत सुटल्या!!

थोड्या वेळाने सुनिताच जरा गंभीर होत म्हणाली, "जाई, अनिकेत खूप चांगला मुलगा आहे, समजूतदार आहे, आवडेल तुला ग.... माझ्या चांगल्या ओळखीचा आहे. त्यांच कुटुंबच चांगल माहितीतल आहे आमच्या. अप्पांची इथे बदली होऊन यायच्या आधी आम्ही दुसर्‍या गावी होतो तेह्वा ते शेजारीच होते आमचे, एकत्रच वाढलोय ग आम्ही, अगदी बहिण भावासारख.. अगदी तुला जस आवडेल तसच घर आहे ग त्यांच.. काका आणि काकी खूप प्रेमळ आहेत बघ. तू नाही म्हणू नकोस ग..."

"अग पण..."

"पण काय आता? जाई, माणस चांगली आहेत, संस्कारांना मानणारी आहेत, स्वाभिमानी, सचोटीने वागणारी आहेत. अनिकेतलाही चांगली नोकरी आहे, एकमेकांना जपून, धरून राहणारी माणस आहेत ग... तुझ्या सारख्या मुलीला जस मिळायला हव, तस घर आहे ग अगदी.. असच होत नं मनात तुझ्या?"

"हो, अग पण , त्या मुलालाही आवडायला हवी ना मी?? मी अशी साधी..."

परत एकदा मिश्किल हसत सुनिता म्हणाली, "आवडलीयेस ग!! पाहिलय त्याने तुला फ़ोटोत, मीच दाखवला त्याला फोटो..."

थक्क झालेल्या जाईच्या हातावर फोटो ठेवून सुनिता हसतच तिथून निघून गेली होती... जाईची नजर आपसूक फोटोकडे गेली, तेह्वा, अनिकेतची हसरी नजर आपल्याला काही विचारतेय अस उगीच तिला वाटून गेल! इतकी मनाचा ठाव घेणारी नजर.......

आता परत एकदा जाईला सगळ आठवल, आणि उगाच तिची धडधड वाढली! आज प्रत्यक्ष भेट होणार होती......

अपूर्ण***

विषय: 
प्रकार: 

गाजराची पुंगी छान वाजतीये बर... मोडुन खायची नाहीच वेळ येणार Happy मस्त सुरवात केलीयेस.

मस्त सुरुवात झालीय. पण पूर्ण कर ना लवकर.

जमतेय.. जमतेय.. लवकर पुर्ण करा!

दिव्या, vrushs, सुप्रिया खूप धन्यवाद Happy मी पहिल्यांदाच कथा लिहितेय ना, कोणी वाचतय की नाही इथपासून सुरुवात होती!! तुम्ही तर चक्क अभिप्राय नोंदवलेत!! खूप बर वाटल!! धन्यवाद.