रेडिओ खगोलशास्त्र आणि जीएमआरटी (रेडिओ दुर्बीण)- विज्ञानभाषा मराठी

Submitted by वावे on 8 April, 2019 - 10:04

रात्री आकाशात दिसणाऱ्या तारे, ग्रह, चंद्र, धूमकेतू अशा सगळ्यांबद्दल मानवाला नेहमीच कुतूहल वाटत आलेले आहे. अगदी प्राचीन काळापासून मानव नुसत्या डोळ्यांनी आकाशाचे निरीक्षण करत आलेला आहे. इ.स. सोळाव्या शतकात गॅलिलिओने आकाशाकडे दुर्बीण रोखण्यापूर्वी केवळ डोळ्यांचा वापर करून भारतीय, चिनी, ग्रीक, इन्का इत्यादी संस्कृतींमधल्या माणसांनी रात्री दिसणाऱ्या चंद्राचे, ताऱ्यांचे, ग्रहांचे भरपूर निरीक्षण केलेले होते आणि त्यांच्या गतीविषयीही आपले अंदाज मांडलेले होते. दुर्बिणीचा वापर सुरू झाल्यापासून मात्र माणसाच्या खगोलशास्त्रविषयक ज्ञानात मोलाची भर पडली. काळानुसार विज्ञान आणि तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीचा वापर करून खगोलशास्त्रातही बरीच मोठी मजल मारली गेली. विसाव्या शतकात खगोलनिरीक्षणासाठी फक्त दृश्य प्रकाशावर अवलंबून न राहता इतर प्रकारच्या लहरींचा उपयोग करायलाही सुरुवात झाली.

या इतर प्रकारच्या लहरी कोणत्या? अवकाशात असलेले तारे त्यांच्या अंतरंगात घडत असलेल्या घडामोडींमुळे विद्युच्चुंबकीय लहरींचं ( electromagnetic waves) उत्सर्जन करत असतात. आपल्याला दिसणारा प्रकाश हाही विद्युच्चुंबकीय लहरींचा एक प्रकार आहे. एएम आणि एफ़एम रेडिओच्या लहरी, दूरचित्रवाणीच्या लहरी, उपग्रहांकडून होणारे संदेशवहन, क्ष-किरण, मायक्रोवेव्ह्ज ही सगळी या विद्युच्चुंबकीय लहरींची विविध रूपं आहेत. या विविध रूपांपैकी काही रूपांचा वापर खगोलशास्त्राच्या अभ्यासासाठी केला जातो. त्यासाठी ऑप्टिकल दुर्बिणी ( उदा. आपण नेहमी पाहतो त्या लहान दुर्बिणी किंवा आयुकाची गिरवली येथील महाकाय दुर्बीण, अवकाशात असलेला हबल स्पेस टेलिस्कोप इत्यादी), एक्स रे आणि गॅमा रे टेलिस्कोप, रेडिओ दुर्बिणी ( उदा.जीएमआरटी, जॉड्रेल बँक, अरेसिबो इत्यादी) अशी साधने वापरली जातात.

electromagneticspectrum.jpg

हा आहे विद्युच्चुंबकीय लहरींचा वर्णपट ( spectrum). यात आपण जसे उजवीकडून डावीकडे जाऊ, तशी लहरींची तरंगलांबी ( wavelength) कमी होत जाते, तर लहरींची वारंवारिता ( frequency) आणि लहरींमधील ऊर्जा ( energy) वाढत जाते. या वर्णपटातल्या २ ’ खिडक्या’ आपल्याला अवकाशात डोकावून पाहण्यासाठी उघड्या आहेत. त्या खिडक्या म्हणजे दृश्य प्रकाश ( visible light) आणि रेडिओ लहरी. अवकाशातील तार्यांकडून येणार्या लहरींपैकी बाकी जवळजवळ सर्व लहरी ( एक्सरे, गॅमा रे इत्यादी) पृथ्वीच्या वातावरणामुळे वरच्या वर रोखल्या जातात. जणू त्या खिडक्यांवर वातावरणाचा जाड पडदा ओढलेला आहे. त्यामुळे त्या लहरींचा अभ्यास करायचा असेल तर तो त्या पडद्यापलीकडे, म्हणजेच पृथ्वीच्या वातावरणापलीकडे जाऊन करावा लागतो.

atm_opacity.jpg

Credit:
ESA/Hubble (F. Granato)

रेडिओ दुर्बिणींमधून अवकाशातल्या रेडिओ स्त्रोतांचा अभ्यास केला जातो. सूर्य हाही एक रेडिओ स्त्रोत आहे. त्याचप्रमाणे आपल्या आकाशगंगेचे केंद्र हाही एक महत्त्वाचा रेडिओ स्त्रोत आहे. याशिवाय इतर तारकाविश्वे/ दीर्घिका (galaxies), स्पंदक ( pulsars) अशा अनेक रेडिओ स्त्रोतांची निरीक्षणे रेडिओ दुर्बिणींद्वारे घेतली जातात. विश्वाची निर्मिती, विश्वाच्या प्रसरणाचा वेग अशा खगोलभौतिकशास्त्रातल्या ( astrophysics) अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर या निरीक्षणांद्वारे संशोधन केले जाते. त्याचबरोबर, परग्रहावर जर कुठे प्रगत जीवसृष्टी असेलच, तर तिचा वेधही रेडिओ दुर्बिणींमार्फत घेतला जाण्याची शक्यता आहे.

आता आपण दुर्बिणींचा आकार ठरवताना कुठल्या कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात ते पाहू.

दुर्बीण ऑप्टिकल असो किंवा रेडिओ किंवा एक्स-रे, भिंग वापरून तयार केलेली असो वा परावर्तक वापरून, तिची बारकावे दाखवण्याची क्षमता ( resolution) प्रामुख्याने दोन गोष्टींवर अवलंबून असते. पहिली गोष्ट म्हणजे दुर्बिणीच्या ग्राहकाचा, म्हणजे दुर्बिणीच्या भिंगाचा/ परावर्तकाचा (लहानमोठा) आकार ( याला आपण D म्हणू) आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुर्बिणीवर पडणार्या लहरींची तरंगलांबी ( Lambda). या दोन्हींमधलं गुणोत्तर ( D/lambda) हे जितकं जास्त, तितकी दुर्बिणीची बारकावे टिपण्याची क्षमता जास्त. तरंगलांबी सारखीच असेल, तर दुर्बिणीचा व्यास जितका जास्त, तितकी बारकावे टिपण्याची क्षमता जास्त. ( मूळ सूत्रात D हा व्यास या अर्थाने नाही, तर आकार मोजण्याचा एक निकष म्हणून घेतलेला आहे. पण आपण सोपेपणासाठी इथे व्यास म्हणतोय) म्हणूनच, डोळ्यांनी जे बारकावे दिसत नाहीत, ते ४ इंच व्यासाचा आरसा किंवा भिंग असलेल्या ऑप्टिकल दुर्बिणीतून अतिशय स्पष्ट दिसतात. ( उदा. डोळ्यांनी आपल्याला शनीची कडी किंवा गुरूचे उपग्रह दिसत नाहीत, पण ४ इंची दुर्बिणीतून दिसतात) कारण डोळा आणि ऑप्टिकल दुर्बीण, दोन्ही दृश्य प्रकाशाचा वापर करतात. म्हणजेच, तरंगलांबी तीच, पण व्यास वाढला, त्यामुळे रिझोल्यूशन वाढलं. रेडिओ दुर्बीण तयार करायची असेल, तर मात्र २ किंवा ४ इंच व्यासाचा अँटेना पुरणार नाही. असं का बरं?

याचं उत्तर शोधण्यासाठी आता आपण परत मगाचच्या वर्णपटाकडे जाऊया. दृश्य प्रकाशाच्या तरंगलांबीपेक्षा रेडिओ लहरींची तरंगलांबी लाखो-करोडो पटीने जास्त असते. त्यामुळे उत्तम resolution मिळवण्यासाठी दुर्बीणही लाखो-करोडो पटीने मोठी हवी, महाकाय असायला हवी.

अशा महाकाय रेडिओ दुर्बिणी जगात अनेक ठिकाणी बांधल्या गेल्या आहेत ( उदा. अमेरिकेतील अरेसिबो येथील तब्बल ३०५ मीटर व्यासाची एकच डिश असणारी रेडिओ दुर्बीण). परंतु दुर्बीण आकाराने जितकी मोठी, तितकी ती फिरवायला (ऑपरेट करायला) अवघड. यावर उपाय म्हणून अनेक दुर्बिणींचा एक समूह बनवला जातो आणि त्यांनी घेतलेल्या वेधांचा एकमेकांशी समन्वय साधून त्यातून निष्कर्ष काढले जातात. या तंत्राला Interferometry असं म्हणतात.

Interferometry चं तत्त्व वापरणारी अशीच एक अक्षरश: महाकाय, जायंट दुर्बीण आपल्या पुण्याजवळच्या जुन्नर तालुक्यात खोडद या ठिकाणी आहे. तिचं नाव जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (GMRT), म्हणजेच मीटर तरंगलांबी असणार्‍या लहरींचा वापर करणारी महाकाय दुर्बीण. साधारणपणे २० सेमी ते २ मीटर तरंगलांबी असलेल्या रेडिओ लहरींचा अभ्यास येथे केला जातो. जीएमआरटीमध्ये ४५ मीटर्स व्यास असणारे, ३० डिश अँटेना आहेत. त्यापैकी १४ अँटेना केंद्रस्थानी असलेल्या १ चौरस किमी क्षेत्रफळात ( central square मध्ये) आहेत,तर Y अक्षराच्या आकारात पसरलेल्या ३ भुजांवर एकूण १६ अँटेना आहेत. या भुजा साधारणपणे प्रत्येकी १४ किमी लांब आहेत. अशा प्रकारे या अँटेना बसवण्याचे कारण Aperture synthesis या संकल्पनेत आहे. याच्या फार खोलात न जाता आपण एवढेच लक्षात घेऊ, की एकमेकांपासून क्ष अंतरावर असलेल्या २ किंवा अधिक रेडिओ अँटेनांनी एखाद्या रेडिओ स्त्रोताची, तो स्त्रोत उगवल्यापासून मावळेपर्यंत पुरेशी जास्त निरीक्षणे घेतली, तर त्या निरीक्षणांमधून मिळणारा एकत्रित निष्कर्ष वापरून, त्यावर गणिती प्रक्रिया करून त्या रेडिओ स्त्रोताची जी प्रतिमा तयार होते, ती जवळजवळ क्ष व्यासाच्या एकाच मोठ्या दुर्बिणीतून निरीक्षण घेऊन तयार केलेल्या प्रतिमेइतकी चांगली करता येते.

mod1.jpg

जीएमआरटीच्या डिश अँटेना कशा प्रकारे उभारलेल्या आहेत त्याचे एक प्रतिरूप

P1150199.JPG

वरच्या फोटोमध्ये आपल्याला जीएमआरटीचा एक डिश अँटेना दिसतोय. या अँटेनाची जी खोलगट डिश आहे, ती परावर्तक किंवा आरसा म्हणून काम करते. अवकाशातल्या रेडिओ स्त्रोतांकडून येणार्या लहरी या परावर्तकावर आदळतात आणि परावर्तित होऊन त्या परावर्तकाच्या नाभीवर ( focal point) एकत्र येतात. या ठिकाणी या लहरी झेलण्यासाठी दुसरा एक अँटेना बसवलेला असतो. हा दुसरा अँटेना या विद्युच्चुंबकीय लहरी पकडतो आणि त्यांचे विद्युतप्रवाहात रूपांतर करतो. हा विद्युतप्रवाह अगदी क्षीण असतो. त्यामुळे तो विविध टप्प्यांवर वर्धित ( amplify) करून, त्यावर योग्य त्या गणिती प्रक्रिया करून त्याचा अभ्यास केला जातो.

हे एवढे मोठे अँटेना बनवताना त्यात व्यावहारिक अडचणी अर्थातच बर्याच असतात. शिवाय भारतासारख्या विकसनशील देशात खर्चावरही मर्यादा येतात. अमेरिकेतील व्हेरी लार्ज अ‍ॅरे ( VLA) या रेडिओ दुर्बिणीच्या धर्तीवर जीएमआरटीची Y आकाराची रचना केली गेली आहे, पण VLA मधील डिश अँटेना या रेलवर सरकू शकणार्‍र्‍या आहेत. त्यामुळे त्यांच्यातील अंतर आवश्यकतेप्रमाणे कमीजास्त करता येते. ही खर्चिक सुविधा GMRT मध्ये नसली, तरी केंद्रस्थानी एकमेकींजवळ असलेल्या १४ दुर्बिणी आणि तीन भुजांमध्ये लांबवर पसरलेल्या एकूण १६ दुर्बिणी ही ( कमीजास्त अंतरांची ) कसर भरून काढतात. परावर्तकाच्या नाभीवर असलेले, लहरी ’झेलणारे' अँटेना ( feed antennas) तयार करतानाही कमीतकमी खर्चात जास्तीत जास्त परिणामकारक आणि उत्कृष्ट परिणाम कसे मिळवता येतील याचा विचार केला गेलेला आहे. डिशचे एकूण वजन आणि वार्यामुळे होणारा अवरोध कमी करण्यासाठी SMART ( Stretched mesh attached to rope trusses) हे नवीन तंत्रज्ञान शोधून काढण्यात आले. म्हणजेच, एक सलग डिश न बांधता जाळी वापरून, तिला योग्य आकारात ताणून धरून हे अँटेना तयार करण्यात आले.

gmrt1.jpg

जीएमआरटीच्या भव्यतेची कल्पना यावी म्हणून हे प्रकाशचित्र.

प्रथमच बघत असू, तर अँटेनाजवळ गेल्यावर त्याच्या आकारामुळे आणि उंचीमुळे आपल्याला दडपून जायला होतं. शिवाय, ऑप्टिकल दुर्बिणीतून जसे आपल्याला तारे, ग्रह ’दिसतात’ तसे या दुर्बिणीतून थेट ’दिसत’ नाहीत. अनेक किचकट गणिती प्रक्रियांनंतर रेडिओ स्त्रोताची ’ प्रतिमा’ मिळते.

दर शुक्रवारी जीएमआरटी सर्वसामान्यांना भेट देण्यासाठी खुली असते. अर्थातच आधी परवानगी घेऊन. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त तिथे मोठे विज्ञान प्रदर्शनही भरवले जाते.

तांत्रिकदृष्ट्या बराच गुंतागुंतीच्या आणि आव्हानात्मक असणार्या या संशोधनक्षेत्रात प्रा. गोविंद स्वरूप यांच्या नेतृत्वाखाली भारतीय शास्त्रज्ञांनी बरीच मोठी कामगिरी केली आहे. प्रा. गोविंद स्वरूप हे भारतातल्या रेडिओ खगोलशास्त्राचे प्रणेते. स्टॅनफर्ड विद्यापीठातून १९६० साली पीएचडी केल्यानंतर ते १९६३ मध्ये भारतात परत आले आणि टाटा मूलभूत संशोधन संस्थेत (TIFR) रुजू झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली १९७० साली उटी येथील रेडिओ दुर्बीण आणि २००० साली खोडद येथील जीएमआरटी या भारताला अभिमानास्पद असलेल्या रेडिओ दुर्बिणी बांधल्या गेल्या. आज एक्क्याण्णवाव्या वर्षीही प्रा. स्वरूपांना रेडिओ खगोलशास्त्राबद्दल आणि विज्ञानप्रसाराबद्दल तितकीच आस्था आणि तितकाच उत्साह आहे.

GSwarup.jpg

प्रा. गोविंद स्वरूप

संदर्भ: http://www.eso.org
http://www.gmrt.ncra.tifr.res.in
http://www.ncra.tifr.res.in
https://www.miniphysics.com
https://en.wikipedia.org
आकाशाशी जडले नाते - प्रा. जयंत नारळीकर

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप सोप्या शब्दात माहिती. खोडदच्या प्रकल्प उभारणीत मी काम केले आहे. अर्थात मेकॅ इंजीनिअर म्हणून. त्यामुळे हातातल्या ड्रॉईंगप्रमाणे काम करणे हेच आव्हान होते. आम्ही या डिश कशासाठी उभारतोय, त्यांचा काय उपयोग होणार आहे याची प्रत्यक्ष काम करताना आम्हाला फारशी माहिती नव्हती आणि तो आमचा प्रांतही नव्हता. खोडदवरुन गाव जवळ आहे म्हणून ही साईट कामासाठी मी निवडली होती इतकेच. पण हे ॲन्टेना उभारणे अत्यंत जिकरीचे आणि आव्हानात्मक काम होते हे नक्की. (व्हि. एम. जोग या कंपणीने हे ॲन्टेना उभारायचे काम स्विकारले होते)

हा अत्यंत फेमस झालेला फोटो.
5C5F3B9F-CC91-4B44-8DBE-D058036D3916.jpeg

वावे ,खूपच छान ! अभ्यासपूर्ण लेख . खूप छान, सविस्तर आणि सोप्या शब्दात सांगितलंत !
आवडला लेख ! केव्हापासून होती उत्सुकता या दुर्बिणी कश्या काम करतात याची .
कारण दुर्बीण म्हंटल्यावर जे डोळ्यासमोर येतं तश्या या दिसत नसल्यामुळे "अशी कशी हि दुर्बीण?!" असं वाटायचं Happy
केवढी मोठ्ठी आहे हि .. माणसं/झाडं किती छोटी दिसतायत!
पु ले शु !
@शाली, फोटो मस्तच !

माहितीपूर्ण लेख.

या दुर्बिणींच्या आकाराविषयी प्रश्न मनात येत. केवळ आपल्याला (म्हणजे मानवांना) "भव्य दिव्य" वाटणारे हे मनोरे खरेच विश्वाचा वेध घेण्याइतके मोठे आहेत का? इतके मोठे काय किंवा दोन फुट आकाराचे काय किंवा दोन इंच आकाराचे काय. विश्वाचा पसाऱ्याच्या तुलनेत स्केल वर विचार करता हे तिन्ही आकार जवळपास सारखेच म्हणावे लागतील. मग इतके मोठे आकार का बनवले असतील? समजा मानवप्राणी मुंगीच्या आकाराचा असता तर त्याने "भव्य दिव्य" म्हणत जास्तीतजास्त अर्ध्या-पाऊण सेंटीमीटरचीच दुर्बीण बनवली असती आणि विश्वाच्या पसाऱ्याचा शोध घेण्याचे काम केलेच असते ना?

अशा अनेक चित्रविचित्र प्रश्नांची उत्तरे या लेखामुळे मिळण्यास मदत झाली Happy

वावे जी उपग्रह व मानवासह अंतरिक्षात पाठवलेल्या यानाशी संपर्क करताना कुठल्या लहरी वापरल्या जातात. तिकडून पाठवलेली छायाचित्रे अशीच गणिती प्रक्रिया केल्यानंतर दिसतात काय.

शशिरामजी, होय, अंतरिक्षयानांशी संपर्क साधण्यासाठी रेडिओ लहरीच वापरल्या जातात. In fact, गेल्या वर्षी युरोपियन स्पेस एजन्सीने मंगळावर पाठवलेल्या यानातून जे मॉड्यूल मंगळावर उतरलं किंवा सोडून दिलं, त्याच्याकडून येणाऱ्या क्षीण रेडिओ लहरी पकडण्यासाठी GMRT चा यशस्वीरीत्या उपयोग केला गेला.
फरक असा आहे की या यानांकडून येणारे संदेश हे आपल्यासाठी 'अर्थपूर्ण' असतात. ते ज्या प्रकारे संकेतबद्ध ( coded) असतात, त्याची सगळी माहिती आपल्याला असते. त्यामुळे त्यांचा अर्थ कसा लावायचा हे आपल्याला ठाऊक असतं.
याउलट अवकाशातील एखाद्या ताऱ्याकडून येणाऱ्या लहरी या कुणी पाठवलेल्या नसतात. त्यांचा अर्थ कसा लावायचा ते आपण शोधून काढतो. त्या काही coded नसतात. त्या लहरींमधून त्या ताऱ्याबद्दल शास्त्रज्ञ अधिकाधिक माहिती मिळवतात.
उ. बो. , अंजली, atuldpatil, धन्यवाद!

उत्तम आणि सोप्या भाषेत लिहिलेला लेख. आवडला.

या दोन्हींमधलं गुणोत्तर ( D/lambda) हे जितकं जास्त, तितकी दुर्बिणीची बारकावे टिपण्याची क्षमता जास्त. >>> मग अवकाशात (वातावरणाच्या पलीकडे) हबल सारखी एक्स रे / गॅमा रे दूर्बिण स्थापित करणे व्यवहार्य नाहीये का? या लहरींची तरंगलांबी कमी असल्यामुळे दुर्बिणीचा आकारही कमी असेल.

>> मग अवकाशात (वातावरणाच्या पलीकडे) हबल सारखी एक्स रे / गॅमा रे दूर्बिण स्थापित करणे व्यवहार्य नाहीये का? या लहरींची तरंगलांबी कमी असल्यामुळे दुर्बिणीचा आकारही कमी असेल.

नवीन Submitted by माधव on 10 April, 2019
--- लवकरच आपला देश व आपले शास्त्रज्ञ हेही आव्हान नक्कीच प्रत्यक्षात आणतील.

माधव, बरोबर! तरंगलांबी कमी असल्याने क्ष-किरण आणि गॅमा किरण या प्रकारच्या किरणांमध्ये भरपूर ऊर्जा असते. त्यामुळे क्ष-किरण आणि गॅमा किरणांचा वापर करणाऱ्या दुर्बिणींचं तत्त्व ( Working principle) थोडं वेगळं असतं. पण अशा दुर्बिणी तयार करून सोडलेल्या आहेत. भारतातर्फे सोडला गेलेला ॲस्ट्रोसॅट हा उपग्रह खगोलशास्त्रविषयक संशोधनासाठी तयार केलेला आहे. त्यात क्ष-किरण तसेच इतर अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या लहरींवर काम करणारी उपकरणे आहेत. नासाने सोडलेली चंद्रा क्ष-किरण वेधशाळा ( Chandra X-RAY observatory) आहे. नोबेल पारितोषिक विजेते महान भारतीय शास्त्रज्ञ सुब्रमण्यम चंद्रशेखर यांच्या सन्मानार्थ चंद्रा हे नाव या अवकाशातल्या वेधशाळेला देण्यात आले आहे.

आज सर्वप्रथमच कृष्ण विवराचा फोटो घेतला गेला.
पूर्ण मानव समाजासाठी इतकी महत्वाची बातमी पण मायबोलीवर याचा चकार शब्दानेही उल्लेख नाही. वाईट वाटले.

उबो, मी चकार शब्द लिहायलाच आलो होतो पण तुम्ही आधीच लिहिले आहे.

काळसर गाभा, भोवती नारिंगी प्रभा! कृष्णविवराची पहिलीच प्रतिमा जारी
https://www.loksatta.com/desh-videsh-news/first-image-of-black-hole-rele...

यात कृष्णविवराचे छायाचित्र घेतले, असा उल्लेख असला तरी प्रत्यक्षात दुर्बिणींनी मिळवलेल्या माहितीच्या आधारे अनेक तुकडे जोडून डिजिटल सादृशीकरणाने त्याची प्रतिमा मिळवण्यात आली आहे.

सर, मी आपला जनरल बोललो, व्यक्तिशः नाही. तुमच्याबद्दल आदरच आहे. मिसळपाव आणि ऐसीअक्षरेवर ही बातमी आली पण मायबोलीकर फक्त राजकारण आणि बिर्याणीत मग्न. त्या विशाल आकाशगंगेकडे पाहिले की आपण किती क्षुद्र आहोत ते पटते. (मराठी आंजावर पण तसेच वाटते, ते सोडून देऊ) Wink

खूप छान लिहिलंय, अगदी सोप्या भाषेत. ह्या GMRT दिशेस खूपच मोठ्या आहेत. आणि तुम्ही लिहिल्याप्रमाणे सगळ्यांनी मुलांना इकडे घेऊन जायला पाहिजे.
ह्या दुर्बिणीच्या शेजारीच नारायणगड नावाचा एक छोटेखानी किल्ला आहे तो हि बघा.

ह्या किल्ल्याबद्दल मी माझ्या ब्लॉगवर लिहिले होते त्याची हि रिक्षा:
https://madhyalok.wordpress.com/207/08/27/narayangad-and-mount-kilimanjaro/

मध्यलोक, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद Happy
नारायणगडावर मीही एकदा गेले आहे.
Srd, धन्यवाद Happy

हर्पेन, लिंक दिलीत ते छान झालं. त्या बातमीत म्हटले आहे त्याप्रमाणे या कृष्णविवराची प्रतिमा मिळवण्यासाठी दुर्बिणीचा जो व्यास आवश्यक होता, तो चक्क पृथ्वीच्या व्यासाइतका होता. तो synthesize केला गेला अनेक वेगवेगळ्या ठिकाणच्या रेडिओ दुर्बिणी वापरून.

जीएमआरटीला नक्की भेट द्यावी. एखाद्या संस्थेच्या सहलीबरोबर गेलं तर जाणकार लोक बरोबर असल्याचा फायदा होतो. त्यांनी तिथल्या तज्ज्ञांना/ तंत्रज्ञांना विचारलेल्या प्रश्नांनी परस्पर आपल्या माहितीत भर पडते Happy उदा. पुण्यातली ज्योतिर्विद्या परिसंस्था दरवर्षी जीएमआरटीची सहल आयोजित करते. इतरही कुठल्या संस्था करत असतीलच. मुलांना कुतूहल निर्माण झालं तर उत्तमच. फक्त दुर्बीण असूनही दुर्बिणीसारखी दिसत नाही, प्रत्यक्ष काहीच घडताना आपल्याला दिसत नाही त्यामुळे कदाचित सगळं क्लिष्ट वाटू शकतं. त्या दृष्टीने थोडी तोंडओळख म्हणूनच हा लेख लिहिला.

पुण्यात ज्योतिर्विद्या परिसंस्था नावाची हौशी खगोलनिरीक्षकांची ( भारतातील सर्वात जुनी) संस्था आहे. मी वर एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे त्यांच्या जीएमआरटी, लोणार, नेहरू तारांगण अशा अनेक सहली असतात.

योगायोगाने ३१ मेच्या शुक्रवारी जीएमआरटी आणि गिरवली येथील आयुकाची महाकाय दुर्बीण (२ मीटर व्यासाचा परावर्तक आरसा असलेली) पाहण्यासाठी त्यांनी दिवसभराची सहल आयोजित केली आहे. दोन्ही ठिकाणी तिथले शास्त्रज्ञ/ संशोधक माहिती देण्यासाठी उपलब्ध असतील. संस्थेचे सदस्य नसलेल्यांनाही सहलीला जाता येईल. संस्थेचे ऑफिस टिळक स्मारक मंदिरात तळमजल्यावर ( कॅन्टीनच्या बाजूला) आहे. मात्र ते फक्त रविवारी संध्याकाळी उघडं असतं. तिथे अधिक चौकशी करता येईल. (संपर्कासाठी असलेला फोन नंबर वैयक्तिक असल्याने मी इथे देत नाहीये.)

वावे, धन्यवाद. त्यांच्या वेबसाईटवर तर याविषयी मला काही आढळले नाही. तिथे काही संपर्क नंबर दिलेले आहेत त्यावरून याबाबत माहिती मिळेल का कि प्रत्यक्षच जावे लागेल?

अतुलडीपाटील, हो, त्या नंबर्सवर फोन करून तुम्हाला नक्कीच माहिती मिळेल.
डिंपल, लेख वाचून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद Happy

एक अतिशय दुःखद बातमी.
भारतातील रेडिओ खगोलशास्त्राचे प्रणेते प्रा. गोविंद स्वरूप यांचं आज निधन झालं. नुकतीच त्यांनी वयाची नव्वदी पार केली होती. अगदी काही महिन्यांपूर्वीपर्यंत ते NCRA (राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्र) मध्ये नियमितपणे येत होते.
भारतातल्या विज्ञान विश्वात एक नवीन युग सुरू करणाऱ्या या शास्त्रज्ञाला विनम्र श्रध्दांजली _/\_

श्री. सुधीर फाकटकर यांनी प्रा. गोविंद स्वरूप यांना वाहिलेली श्रद्धांजली.
(श्री. सुधीर फाकटकर गेली तीस वर्षं NCRA-GMRT मध्ये तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. प्रा. गोविंद स्वरूपांशी त्यांचा शेवटपर्यंत निकटचा संपर्क होता. )

https://www.loksatta.com/vishesh-news/article-on-father-of-indian-radio-...

श्री. सुधीर फाकटकर यांनी प्रा. गोविंद स्वरूप यांना वाहिलेली श्रद्धांजली.

लोकसत्ता मधल्या लेखाकरता धन्यवाद

Pages