सावली !!!

Submitted by SANDHYAJEET on 21 September, 2020 - 09:16

सावली !!!

दोन दिवसांपासून रमाबाईंच्या जीवाची नुसती घालमेल चालली होती. आजचा दिवस उजाडला आणि बेचैनी नुसती पराकोटीला पोहोचली. मनात आठवणींचं नुसतं काहूर माजलं होत. आज त्यांच्या लग्नाला ४५ वर्ष पूर्ण होत होती. पहिली ४२ वर्ष त्यांच्या सावली बरोबर, श्रीधरपंतांबरोबर, कशी भुर्रकन उडून गेली त्यांना अजिबात कळलंही नव्हतं. पण गेली ३ वर्ष मात्र एक एक दिवस नुसता थांबल्यासारखा वाटतो. बाबा नसले तरीही जोपर्यंत तू आहेस तोपर्यंत तुमच्या लग्नाचा वाढदिवस आपण तुझ्याबरोबर साजरा करत राहू, असं मुलांनी ठरवल्यामुळे त्यांचा नाईलाज होता. मुलांचं पण बरोबर होत. त्या निमित्तानं मुलं दोन जीवांची एक सावली झालेल्या दिवसाच्या आठवणींना वर्षातून एकदा उजाळा देत असत.

दहावीची परीक्षा झाली आणि उन्हाळयाच्या सुट्टीत लग्नाचा विषय निघाला. पहिलचं स्थळ कायमस्वरूपी सरकारी नोकरी असलेल्या मुलाचं आलं आणि महिन्याभरात लग्न आटोपून रमाची,रमाबाई कधी झाल्या हे कळलही नाही. लग्न झाल्यावर आता तू कॉलेज शिकून, नोकरी मिळवून स्वतःच्या पायावर उभे रहावे असे यजमानांनी सुचवले. पुढे मुलांची जबाबदारी पडली आणि शिक्षण अपूर्ण राहिलं. वर्षामागून वर्ष निघून गेली. मुलं लहान होती तेव्हा घरातला मोठा मुलगा आणि मोठी सून म्हणून दीर नणंदांची लग्न, सासू सासर्यांचे आजारपण आणि पुढे मुलं मोठी झाल्यावर त्यांची शिक्षणं, करिअर, लग्न, मुलींची बाळंतपण यात आपलं शिक्षणं करिअर अर्धवटच राहीलं, हे त्यांच्या लक्षात पण आलं नाही. लग्नाला १०, २०, २५, ४० आणि ४२ वर्ष कधी पूर्ण झाली हे कळलंच नाही. आयुष्यात पूर्णपणे स्थिरावलेली मुलांची नवीन पिढी बघून ४२ वर्ष सावलीबरोबर तृप्तपणे घालवलेलं आयुष्य गेली ३ वर्ष रोज मनुष्यजन्माचं सार्थक झाल्याचं समाधान देतं.

आज काल असं म्हणतात की पती पत्नीच्या वयातलं अंतर कमी असलं, दोघांची शैक्षणिक पात्रता सारखी असली तर दोघांचं एकमेकांबरोबर जास्त जमतं आणि लग्न टिकण्याची शक्यता पण जास्त असते. पण रमाबाईंच्या आणि श्रीधरपंतांच्या वयात एक तपाचं अंतर असूनही असं कधी जाणवलं नाही. लग्नात सात फेरे चालताना श्रीधरपंतांच्या पाठमोऱ्या सावली बरोबर चालत आलेल्या रमाबाई कसलेही रुसवे फुगवे, अहंकार, मीपणा काहीही मधे न आणता ४२ वर्ष त्यांच्या सावली बरोबर निरंतर चालत राहिल्या. वयात आणि शैक्षणिक पात्रतेत कितीही अंतर असलं तरीही श्रीधरपंत आपली सावली असणाऱ्या रामाबाईंशी सल्लामसलत केल्याशिवाय कोणताही छोटा मोठा निर्णय कधीही घेत नसत. मी दाढी आज करू का उद्या अश्या छोट्या गोष्टीपासून ते मुलीच्या शिक्षणाचा, घरच्या खर्चाचा ताळमेळ पुढची ५-६ वर्ष कसा बसवायचा अश्या सगळ्या गोष्टीत त्यांचा विचार, सल्ला घेतला जात असे. मग फायदा होऊ की तोटा निर्णयाची जबाबदारी दोघांचीही असे त्यामुळे तुझ्यामुळे वाईट झालं असा एकमेकांना दोष द्यायचा कधी प्रश्नच आला नाही. पुढे पुढे एकमेकांना न विचारताही “हिला काय वाटेल ” आणि “ह्यांना काय वाटेल” ते दोघांनाही कळलेलं असे. कोणत्या समारंभाला गेलं, गर्दीच्या ठिकाणी गेलं की नुसतं एकमेकांकडे बघूनही काय हवं नको, कशाचं चांगलं वाईट वाटेल ते कळतं असे. प्रत्येकवेळी छोट्या मोठ्या गोष्टीत मन मारून मुलांच्या, घरातल्यांच्या सुखासाठी केलेल्या त्यागाची एकमेकांकडून कळत नकळत मिळालेल्या पोचपावती मुळे वर्षानुवर्षे सावली अजूनच एकरूप होत गेली. लग्नाच्या पहिल्या दिवसापासून ते मृत्यूने एकमेकांपासून वेगळं करेपर्यंत त्यागावर आधारित नातं जपणाऱ्या अशा असंख्य जोड्या एकमेकांची “सावली” बनून नवीन पिढीच्या स्थैर्यतेची मुहूर्तमेढ रोवत असतील. रमाबाई आणि श्रीधरपंतांची जोडी त्यापैकीच एक होती.

भौतिक, मानसिक, सामाजिक, आर्थिक आणि भावनिक अश्या पशुपक्षांपेक्षा वेगळ्या मूलभूत गरजा असणाऱ्या मनुष्यप्राण्याच्या स्थैर्यतेसाठी लग्न ही संकल्पना जन्माला आली असावी. पुढे पुढे जसजसा मनुष्यप्राणी विकसित होत गेला ही संकल्पना बदलत गेली. वेगवेगळ्या वयोगटाच्या लोकांची लग्न संस्थेबद्दल वेगवेगळी मत बनायला लागली. काही तरुण लोकांना ही संकल्पना प्रत्येक मनुष्यप्राण्यासाठी गरजेची आहेच का असाही प्रश्न पडायला लागला. तर काही लोकांनी स्थैर्यतेसाठी अजून दुसरा काही पर्याय उपलब्ध न झाल्याने लग्न ही संकल्पना अंगिकारली आणि टिकवली.

लग्न ठरवताना सगळ्या मूलभूत गरजा पूर्ण होत आहेत असं बघूनच लग्न ठरवली आणि केली जाऊ लागली. पुढे पुढे पाच पैकी एक दोन गरजा जरी पूर्ण होत नाहीत असं वाटलं तरीही लग्न मोडू लागली. खरं लग्न हे फक्त लग्न करणाऱ्या दोन जीवांना नव्हे तर येणाऱ्या नवीन पिढीलाही स्थैर्यता देते. आपल्या समाजात लग्न हे फक्त एका मुलाचं आणि मुलीच न होता मुलाच्या कुटुंबाच मुलीच्या संपूर्ण कुटुंबाशी होत. एकमेकांचं कुटुंबातल्या प्रत्येकाशी एक नातं निर्माण होत आणि प्रत्येक नातं संपूर्ण कुटुंबाला आणि शेवटी समाजाला स्थैर्यता देत. मनुष्यप्राण्याच्या पाच मूलभूत गरजांपैकी दोन लग्न झालेले जीव एकत्र येऊन एकमेकांची सावली बनून आयुष्यभर जेव्हा भावनिक स्तरावर नातं जपतात तेव्हा लग्न पूर्णपणे यशस्वी होत. घटस्फोट होताना फक्त मूलभूत गरज पूर्ण न होणं हे कारण कदाचित नसावं. मी पणा, इगो वेळोवेळी एकमेकांच्या त्यागाची पोचपावती न मिळाल्याने होणारी घुसमट, मुलांच्या समोर एकमेकांनी केलेला अपमान हे असावं. रमाबाई आणि श्रीधरपंतांसारख्या आपल्यापेक्षा कमी पुस्तकी ज्ञान असणाऱ्या जोडप्यासारखं अगदी छोट्या छोट्या गोष्टीत एकमेकांना पोचपावती द्यायचं ठरवलं, माझ्या मीपणा पेक्षा माझ्या हीच आणि ह्याच मन जपलं तर नाईलाजाने दुसरा अजून कोणता चांगला पर्याय नाही म्हणून फक्त तुझ्याबरोबर राहतेय, राहतोय असं न म्हणता आनंदाने आपली आणि नव्या पिढीची स्थैर्यता निश्चित करता येईल,असं मला वाटतं.

एकंदरीतच अमेरिकेत राहणाऱ्या लोकांना भारतीय रीतिरिवाज परंपरा, एकत्र कुटुंबपद्धती, भारतीयांचे लग्न सोहळे, लग्नातील वेशभूषा संगीत, कायमच टिकणार लग्न याबद्दल खूप अप्रूप आहे. हॉस्पिटलमध्ये रोटेशनला येणारे मेडिकल स्टुडंट्स पेडिऍट्रिकबद्दल प्रश्न, शंका कमी विचारत असतील पण भारतीय Ever lasting Arranged Marriages बद्दल मात्र हुमखास कुतूहलाने विचारताना दिसतात. भारतीय फक्त लग्नसंकल्पना नव्हे तर मृत्यूने एकमेकांपासून वेगळं करेपर्यंत लग्न टिकवून पुढच्या पिढीला, समाजाला स्थैर्यता देणारी “पती पत्नी एकमेकांची सावली ” ही संकल्पना सध्या मी समजावून घेण्याचा आणि समजावून देण्याचा प्रयत्न करीत आहे.

Foster care examination साठी येणारी, दर ४ – ६ महिन्याला, आईवडिलांचा थांगपत्ता नसल्याने संगोपनासाठी घर बदलायला लागणारी अमेरिकेतली मुलं बघितलं की भारतातल्या असंख्य सावल्यांचा सार्थ अभिमान वाटतो. स्वतःच्या सुखदुःखाचा, इगोचा अजिबात विचार न करता, प्रसंगी मन मारून मनुष्यप्राण्याच्या पुढच्या पिढीच्या स्थैर्यासाठी ‘सावली” चा आदर्श ठेवणाऱ्या जोडप्याना मनापासून वंदन.

डॉ संध्याजीत

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users