कोरोनासोबत कसे जगावे आणि माझी कोरोना मुक्ती!!

Submitted by गणेश शंकर चव्हाण on 20 September, 2020 - 11:45

कोरोनासोबत कसे जगावे !!

प्रथम माझ्याविषयी थोडसं,मी 40 वर्षांचा असून नुकताच कोरोनामुक्त झालो आहे.
यापूर्वी मी मे महिन्यातच "कोरोनामुक्ती नंतर पुढे काय ?" असा लेख लिहून मोकळा झालो होतो आणि जुलैमध्ये Unlock च्या पार्श्वभूमीवर "पुनःश्च हरीओम" या नावाचे तीन भाग लिहिले होते. काही कारणाने ते सगळे पोस्ट झाले नाहीत.

"मी कोरोनाला हरवणारच" ही घोषणा केव्हाच बाद ठरवण्यात आली हे चांगलच पण "आता आपल्याला कोरोनासोबत जगायला शिकलं पाहिजे" ही नवीन संकल्पनाही आपल्याला तितकीशी स्पष्ट करून सांगितली गेली नाही." हे आपल्या परंपरेला साजेसंही आहे आणि गोंधळ वाढवणारेही आहे.तेव्हा जे मला उमगलं ते तुमच्या समोर मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न...

सर्वप्रथम तुमच्या भेटीगाठीचे क्षेत्र मर्यादित ठेवा.असं केल्याने कोरोना होण्याचे chances कमी होतील असं कुणाला वाटत असेल तर ते चुकीचं ठरण्याची शक्यता जास्त आहे.कोरोना उंबरठ्यावर केव्हाच येऊन ठेपला आहे.तो होऊ न देणे हा choice इथून पुढे फार कमी जणांकडे असेल.एव्हाना बऱ्याच जणांना कोरोना होऊनही गेला असेल.तरी सुद्धा भेटीगाठीचे क्षेत्र मर्यादित ठेवावे की जेणेकरून कधी बाधित झालात तर किमान मानसिक त्रास तरी कमी प्रमाणात होईल. शारीरिक त्रास हा प्रत्येक बधिताला होईलच असे नाही पण मानसिक त्रास हा कमी अधिक प्रमाणात जवळपास सर्वांनाच होतो असा माझा निष्कर्ष आहे. कारण भारतीय समाजव्यवस्था ही "रंग बदलणारी" आहे ( पण बदनाम मात्र मुक्या सरड्याला केलं जातं ).आज जरी बऱ्यापैकी Unlock असलं,लोकं एकमेकांना भेटत असली तरी ते त्यांनी नाईलाजाने व नाखुशीने स्वीकारले आहे आणि हा नाईलाज जोपर्यंत कोरोनाचं बालंट अंगावर येत नाही तोपर्यंतच टिकतो.म्हणून आपल्याला साथ देणारी,धीर देणारी माणसे ओळखा आणि संकट टळेपर्यंत इतरांशी संपर्क टाळाच ( अपवाद - नोकरी,उद्योगधंदे इ. ) "कोरोनामुळे आपली माणसे कोण ते समजलं" असले रडगाणे गाण्यापेक्षा ते केव्हाही चांगलं. समोर कुणीही असलं तरी बाधितांनी त्यांच्या संपर्कात आलेल्यांना तशी कल्पना नक्की द्यावी.पुढील निर्णय त्यांना त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने वा अनुभवाने घेऊन द्यावा आणि स्वतःच्या तब्बेतीवर लक्ष केंद्रित करावे.

माझ्यापुरते बोलायचं झालं तर, मला कसलीच लक्षणे नव्हती पण संपर्कात आल्याने माझीही तपासणी झाली आणि जेव्हा रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे असं समजलं तेव्हा कुठे मला थोडासा ताप आला आणि थकवा जाणवू लागला.दोन तीन दिवसात ते ही निवळलं.होम आयसोलेशन मध्ये मला काय हवं नको ते विचारायला रोज न चुकता फोन यायचे.सुरक्षिततेचे नियम पाळून अखंडित पुरवठा सुरू होता. ओळखीच्या डॉक्टरांनी औषधे आणि दिनचर्या याबाबतीत मार्गदर्शन केले.मी ज्यांच्या संपर्कात आलो होतो त्यांनीही प्रथम धीर दिला आणि आम्ही स्वतःला मॉनिटर करू,काही लक्षणे आढळली तर तपासणी करून घेऊ,तू स्वतःच्या तब्बेतीवर लक्ष दे असं सांगितलं.थोडक्यात काय,तर माझं काहीही अडलं नाही आणि हे आजवर फार कमी जणांच्या बाबतीत घडलं आहे. आपल्या बाबतीतही असं घडावं असं ज्यांना वाटत असेल,त्यांनी आत्तापासूनच वातावरण मोकळं करण्यास सुरुवात करावी.प्रथम कोरोनाची अवास्तव भीती मनातून काढून टाका.जे बाधित झाले आहेत त्यांच्याबद्दल भीती,घृणा बाळगू नका आणि त्यांची अति प्रमाणात काळजीही करू नका.मला किंवा आपल्यापैकी कुणाला कोरोना झाला तर ? या विषयावर खुलेआम चर्चा होऊ द्यात आणि होम आयसोलेशनसाठी एकमेकांना मदत करता येईल का याची चाचपणी करा. कारण
गोळ्या,औषधे,इंजेक्शने,बेड आणि व्हेंटिलेटरची गरज सर्वांनाच नसते.
रिपोर्ट पॉझिटिव्ह आला म्हणून आभाळ कोसळल्या सारखा चेहरा करू नका.बरेच जण म्हणतात की कोरोना झाला की मग सगळं डिस्टर्ब होतं,पण आता अजून काय डिस्टर्ब व्हायचं राहिलं आहे ? गेली 6 महिने मानसिक तणावाखाली,दहशतीखाली Lock/Unlock,आत/बाहेर सुरू आहेच की.मग होम आयसोलेशन किंवा कोविड सेंटरमधील 14 दिवसांनी असा काय मोठा फरक पडणार आहे ? ज्यांना आपल्याला कोरोना होऊ नये असं वाटतं त्यांच्यासाठी "घराबाहेर न पडणे" हा पर्याय सुध्दा आता उरला नाही.किती दिवस घरात बसून राहणार ? आणि कोरोनाची साथ आहे म्हणजे कोरोना होऊही शकतो इतकं साधं गणित आहे ते.आपली व कुटुंबियांची काळजी घेणं इतकच तर आपल्या हातात आहे आणि त्यात कुणी हलगर्जीपणा करू नये,बाकी पुढचं पुढं.....

अधूनमधून व्हाट्सअप्पवर काही अर्थपूर्ण मेसेजेसही येत असतात.
अगदी अलीकडच्या काळातील दोन आवडलेले मेसेज
पहिला - कोरोना कशामुळे होतो ? तर टेस्ट केल्यामुळे....
आणि
दुसरा - कोरोना पॉझिटिव्ह पाच दहा दिवसांत बरे होतात पण न झालेले कायम विवंचनेत असतात.त्यांना दिवसातून एकदा तरी वाटतच की,झालाय बहुतेक !!

आपल्याकडे बधितांच्या बाबतीत कोरोनामुक्त झालेले आणि मृत पावलेले अशी दोन्ही उदाहरणे आहेत. मग बरे झालेल्यांच्या लक्षणीय आकड्यांकडे दुर्लक्ष करून जर कुणी नुसते मृतांचेच आकडे मनात साठवत असेल तर हे कोरोनाच्या जाहीर केल्या गेलेल्या लक्षणाहूनही भयानक लक्षण आहे. एकदा का कोरोना पॉझिटिव्ह असा शिक्का पडला आणि पुढे दुर्दैवाने मृत्यू झाला तर तो कोरोनामुळे झाला अशी त्याची नोंद होते.हा दावा खोडून काढायला "पोस्ट मोर्टम" होत नाही हे एकच कारण पुरेसं आहे पण आपण त्याविषयी न बोललेलच बरं.कारण हा अधिकार तर खुद्द भारत सरकारच्याही अखत्यारीत येत नाही.कितीही झालं तरी जागतिक सत्ता,संघटना यांचा देशोदेशीच्या सरकारांवर प्रभाव आणि दबाव असतोच.
इतर आजारांनी त्रस्त बाधितांना कोरोना घातक आहे असं सांगितलं जातं.पण मग कोरोना झाला आहे असं समजताच त्यांचे जुने आजार कसे बळावतात ? हा विषाणू एका रुग्णाच्या थेट फुफ्फुसातच शिरतो आणि दुसऱ्याला साधा तापही येत नाही,ते कसं काय ?? रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतरच छातीत कसं दुखू लागतं,श्वास घ्यायला त्रास जाणवतो,ऑक्सिजनची पातळी खालावते या गोष्टींचा सर्वांनीच विचार करायला हवा.
यात थोडं जरी तथ्य आढळलं तर असच म्हणावं लागेल की, पॉझिटिव्ह कोरोना नाही तर निगेटिव्ह मनोवृत्तीच माणसाला मारक ठरत आहे.
आजवरच्या आकडेवारी वरून जर हे पुरेसं स्पष्ट होत असेल की,ज्येष्ठ नागरिक आणि इतर आजारांनी त्रस्त बाधितांना जास्त धोका असतो तर मग त्याच आकडेवारी वरून हे देखील स्पष्ट होतं ना की,तरुण व पन्नाशीतील धडधाकट जनतेला तुलनेत कमीच धोका आहे.मग त्यांना का मनमोकळेपणाने काम करू दिलं जात नाही ?? सरसकट सर्वांना एकाच तराजूत तोलून कशाची आणि नेमकी कुणाची टक्केवारी वाढणार आहे हे तर येणारा काळच सांगेल. हे जेव्हा व्हायचं तेव्हा होईल,तूर्तास
घरातील कर्त्या स्त्री पुरुषांनी ज्येष्ठांना वा इतर आजारांनी त्रस्त मंडळींना उगाचच घाबरवणं बंद करावे.तुम्हाला जास्त धोका आहे असा जयघोष त्यांच्यासमोर वारंवार करू नये. म्हणजे ते ही तणावमुक्त राहतील आणि जर कोरोना झालाच तर त्यालाही धैर्याने सामोरे जातील. ज्येष्ठांनीही त्यांना सहकार्य करावे. मला बाजारात,बँकेत जायलाच हवं असले बालिश हट्ट करू नयेत.
प्रवासाचा हट्ट धरू नये आणि आमच्या वेळी असं नव्हतं,
कधी जाणार हा कोरोना वैगेरेची जपमाळ एकसारखी ओढू नये.
कर्त्यांनी अगदी चुकूनही घरातील बाळगोपाळांचा कोरोनाबद्द्ल समुपदेशन करण्याचा अतिशहाणपणा करू नये.
त्यांच्याइतका संयम आणि समजूतदारपणा या कोरोनाकाळात दुसऱ्या कुणीच दाखवला नाही. तेव्हा या बाळगोपाळांचं फक्त आणि फक्त कौतुकच व्हायला हवं.
जर कुणी कोरोनाबधित झालं तर बातमी पसरायला वेळ लागत नाही. प्रत्यक्ष भेटून पेशंटची विचारपूस करणे,सल्ले देणे,
झालच तर पेशंटला घाबरवणे ही सोय कोरोनात नाही पण हे कार्य तर Unlimited talktime आणि व्हाट्सअप्प हे सुद्धा करू शकतात.त्याचा नाहक त्रास होऊ शकतो.फोनवर बोलताना घसा दुखतोय वैगेरे कारणे सांगून वेळ मारून नेता येईल पण आपण सोशल मीडिया तर पाहणारच. जर कोणी "कोरोनाबधित माणूस आज चांगला असतो तर उद्या या जगात नसतो" अशा आशयाची पोस्ट बाधित व्यक्तीशीच शेअर केली तर ? किंवा "कोरोनाला lightly घेऊ नका,तो अमका तमका कोरोनाने गेला" असा मेसेज केला तर ?? खरं तर अशा वेळी एखादा लक्षणविरहित बाधितही झटक्यात आडवा होईल,त्याला लक्षणे जाणवायला लागतील.हे असं होऊ पण शकतं म्हणून बाधित झाल्यानंतर फोनवर कमी बोलणे,काही काळासाठी सोशल मीडियावरून exit किंवा स्वतःला काहीही ऐकण्यासाठी निगरगट्ट बनवणे हे तीनच पर्याय उरतात.
हे झालं संभाव्य कोरोना बधितांचं,पण आम्हा कोरोनामुक्त मंडळींनाही जागतिक आरोग्य संघटना,भारत सरकार आणि सोशल मीडिया सुखाने जगू देईल असं वाटत नाही.शरीरात तयार झालेली प्रतिपिंडे तीन चार महिनेच टिकतात.मग त्यांना पुन्हा संसर्गाचा धोका इतरांहूनही अधिक असतो,फुफ्फुसावर,
वा शरीराच्या इतर भागांवर दूरगामी परिणाम होतात इत्यादी मेसेजेस काही दिवसांनी शेअर केले जातील.जसजसा लस बाजारात येण्याचा कालावधी जवळ येत जाईल तसतशी त्याची तीव्रताही वाढत जाईल.आज दिवसभरात लाखाच्या आसपास बाधित आढळतात ते त्या काळात अगदी 5 लाखाच्या आसपासही आढळतील,जरी दिवसाला 2 लाख टेस्ट झाल्या तरी.WHO च्या कोरोनाच्या लक्षणांच्या वाढीव यादीची सांगता आजवरच्या सर्वात विनोदी लक्षणाने होईल आणि ते लक्षण म्हणजे "कोणतेही लक्षण नसणे"..

WHO ने आणि सरकारने जरी कोरोनाची सांगड थेट मृत्यूशीच घालून दिली असली तरी किमान मला तरी हा कोरोना अगदीच लेचापेचा वाटला.मी कुणी तज्ञ नाही आणि अगदी Typical असा विश्लेषकही नसल्याने माझं म्हणणं मनापासून आणि आत्ताच मांडू शकलो.सध्या बहुतांश तज्ञ, विश्लेषक मंडळी शांतच आहेत.
कदाचित सारं काही स्थिरस्थावर झाल्यानंतर ते बारीक सारीक तपशीलासह घडून गेलेल्या घटनांचे अर्थ लावतील.अहवाल आणि पुस्तकेही लिहितील.पण मग तो सगळा नेहमीसारखाच "वरातीमागून घोडे" असा प्रकार होईल."कोरोना आणि त्याची हाताळणी" हा विषय मांडण्याची खरी गरज आज आहे.सामान्य माणसाला तर जास्तच.कोरोना पुढचे अजून काही महिने म्हणजे लस बाजारात येईपर्यंत तरी ठाण मांडून असणार आहे हे नक्की.
लस उपलब्ध झाल्यानंतरही तो क्षणार्धात गायब होईल असं ही काही नाही.
तेव्हा जनतेनेही आता "आंतरराष्ट्रीय षडयंत्र,मेडिकल रॅकेट" वैगेरे गोष्टींकडे साफ दुर्लक्ष करावे कारण अगदी सगळीकडेच समज,गैरसमज यांचा बराच राडारोडा पडला आहे आणि उपाययोजनांचाही पुरता बट्ट्याबोळ झाला आहे. त्यामुळे प्रत्येकानेच सर्वप्रथम आपल्या सभोवतालच्या परिस्थितीचा विचार करावा आणि परस्पर सामंजस्याने आपले जीवन अधिक सुकर कसे होईल याकडे लक्ष द्यावे.असं केल्याने जरी " कोरोनाची साखळी " तुटणार नसली तरी कोरोना सोबत असतानाही एका " नवीन जीवनमानाची सुसह्य साखळी " नक्की तयार होईल.

त्यासाठी मी माझ्या परीने केलेले हे विश्लेषण.
बाकी ज्याची त्याची इच्छा !!

धन्यवाद Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>.शरीरात तयार झालेली प्रतिपिंडे तीन चार महिनेच टिकतात.मग त्यांना पुन्हा संसर्गाचा धोका इतरांहूनही अधिक असतो,फुफ्फुसावर,
वा शरीराच्या इतर भागांवर दूरगामी परिणाम होतात इत्यादी मेसेजेस काही दिवसांनी शेअर केले जातील>>> अगदी खरं आहे, अशा बातम्यांचा अगदीहुशार डॉक्टरांकडून सुध्दा सुळसुळाट पसरवण्यात मदत होत आहे, यात कुठल्या स्तराच्या गंभीर ऋग्णास हे झाले, किती टक्के लोकांना झाले याचा काहीही उल्ले़ख नसतो, मान्य आहे डेटा गोळा करण्या इतपत अजून परिस्थिती नाही मग संशोधन झाल्यावर निष्कर्ष प्रकाशित करा ना.... सामान्य ले मन ला का ताप देता... या व्यतिरिक्त हे कोणत्या गावी, देशात झाले, वय काय होते, इस्पितळात किती वेळ होते, इ. माहितीचे विश्लेषण करून कळवा, नुसती सनसनी निर्माण करण्यासाठी हे प्रकाशित केले जाते... नुसता वात आहे!!

चांगला लेख आहे !

आधीचे स्वाईन फ्लू वगैरे मला नावेही माहीत नाही अश्या साथी कधी आल्या कधी गेल्या कळलेही नाही. ईथे एवढा धुमाकूळ घातला नाही हे खरेय. पण तरी ट्रेनमध्ये बरेच लोकं मास्क घालून फिरताना दिसायचे आणि मला त्यांच्यावर हसायला यायचे.
कोरोनाबाबतही सुरुवातीला तशीच धारणा होती पण वेगाने बदलली. लॉकडाऊन लागल्यावर तर उरल्यासुरल्या शंकाही नष्ट झाल्या. मास्क सॅनिटायझर न चुकता सारे पाळू लागलो. पण आता अनलॉक जसे जसे होतेय तसे कोरोना डोक्यातून केव्हाच निघून गेलाय. मास्क सॅनिटायझर सोशल डिस्टन्सिंग सारे पाळतो पण ते सवयीने होतेय. कोरोनाशी लढायचेय असे डोक्यात कुठेही नाही. उपलब्ध परिस्थितीत शक्य तितके जगायचेय असेच आयुष्य चालू झालेय. यात कोरोना झाला तर आपल्याकडे ॲक्शन प्लान नाही अशी माझी जी भिती होती ती सुद्धा आता डोक्यातून निघून गेलीय. पावसाळा आहे कधीतरी ताप येणारच. जास्त भिजू नये. किंवा उन्हाळा आहे, पाईल्सचा त्रास होणारच, तर जास्त तिखट खाऊ नये. असेच आता कोरोनाबाबत वाटू लागलेय. सवयीने काळजी घ्यायची. झाला तर झाला. उपचार घ्यायचे. बाहेर पडायचे.

सिरीअसली, आणि बरेच लोकांनी प्रतिसाद दिला म्हणून हा लेख वाचला. अन्यथा कोरोनाबद्दल आता वाचायलाही बोअर होऊ लागलेय Happy

खूपच छान आहे लेख. छान समजावुन सांगीतले आहे. शेलक्या शब्दात काही काही अ‍ॅनॉयिंग अ‍ॅटिट्युडसचा समाचार घेतलेला आहे.

लेचापेचा नक्कीच नाही. अनुभव घेतोय सध्या.
एरवी आंघोळीची बकेट लीलया उचलणाऱ्या मला सध्या पाण्याची बाटली देखील उचलण्याचे त्रान नाही.
मानसिक रित्या खंबीर आहे अजून पण कोरोनाने शारीरिक क्षमता खाऊन टाकली आहे.

आपल्याला साथ देणारी,धीर देणारी माणसे ओळखा आणि संकट टळेपर्यंत इतरांशी संपर्क टाळाच ( अपवाद - नोकरी,उद्योगधंदे इ. ) "कोरोनामुळे आपली माणसे कोण ते समजलं" असले रडगाणे गाण्यापेक्षा ते केव्हाही चांगलं. समोर कुणीही असलं तरी बाधितांनी त्यांच्या संपर्कात आलेल्यांना तशी कल्पना नक्की द्यावी.पुढील निर्णय त्यांना त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने वा अनुभवाने घेऊन द्यावा आणि स्वतःच्या तब्बेतीवर लक्ष केंद्रित करावे. >>> असे काही विचार खूप आवडले. बरंचसं पटलं आणि आवडलं.

काही काही गोष्टी नाहीत पटल्या. विशेषतः वैद्यकीय इशा-यांबाबत नकारात्मकता नाही पटली. इथे कुमार सर लिहीत असतात. काही संशोधक आहेत ते ही नियमित लिहीत आहेत. यात त्यांचा एक पैशाचाही फायदा नाही. सुदैवाने अशा लोकांच्या संपर्कात गेल्या वर्षापासून असल्याने गैरसमजांना थारा नाही दिला. मी डॉक्टर किंवा साथीच्या रोगाशी संबंधित नसल्याने यावर माझे मत मांडणे योग्य ठरणार नाही.

फक्त केबळ सकारात्मकेतेन कोरोना होत नाही किंवा लवकर बरा होता अशा अंधश्रद्धा पसरवू नयेत ही विनंती. नकारात्मकतेने जुने आजार उफाळून येतात असे मत चुकीचे वाटते. आमच्या शेजारचे प्रवासातून आले. त्यांना ताप, थंडी वाजून आली. खोकत होते. तरीही शेजारीपाजारी जात होत. माझ्या आईने त्यांना घरात येऊ नका असे स्पष्ट सांगितले तर ते म्हणाले एव्हढे काय घाबरता ? कोविड नाही साधा ताप आहे. आता चार दिवसांनी टेस्ट केल्यावर सगळे पॉझिटिव्ह आलेत. त्या माणसाला क्रिटीकल सांगितले आहे. व्हेंटिलेटर मिळत नाहीये.

परिस्थिती गंभीर आहे. मी स्वतः: बेडसाठी प्रयत्न करत असताना परिस्थिती काय आहे याचा अनुभव घेतला आहे.

डॉक्टरांचे आभार मानण्यासाठी आले.
आजीची केस अत्यंत गुंतागुंतीची. तिला आधीपासून श्वसनाचे त्रास, हाय बीपी, हृदयरोग असे आजार. त्यात कोविड झाला. बेड मिळेपर्यंत फुप्फुसात इन्फेक्शन वाढू लागलेले. तरीही त्यांनी अ‍ॅडमिट करून घेतले. सुरूवातीला काही समस्या होत्या. नातेवाईकांना आत सोडत नव्हते. पण नंतर रूम मिळाल्यानंतर फरक पडला. तिला रक्तही कमी आहे (हे काही समजले नाही) असे डॉक्टरांनी सांगितले. शुगर चेक करण्यासाठीही पुरेसे रक्त मिळत नाही असे मामाला सांगितले (हे ही समजले नाही). त्यामुळे पोटात आयर्नची इंजेक्शने दिली. रॅनबॅक्सी सतत चालू होते. आता कोविडची लक्षणे नाहीत असे एका हाऊसमन कडून समजले. बहुधा कोविडचा रिपोर्ट निगेटीव्ह येईल ही शक्यता आहे.
कदाचित घरी सोडतील लवकर. आजी बरी झाली तर डॉक्टरांचे आभार कसे मानावेत हे समजत नाही. काही डॉक्टरांनी तर मनाची तयारी करा असे सांगितले होते. अशा महामारीच्या परिस्थितीत अशा केसमधे इतके बारीक लक्ष देऊन वाचवल्याबद्दल मी खरोखर डॉक्टरांची, हॉस्पिटलची आणि सेवा करणा-या सर्वांची मनापासून कृतज्ञ आहे.
कोविड बरा होतो आणि अशा केस मधेही बरा होतो. फक्त वेळेत हॉस्पिटल गाठायला हवे (बेड मिळायला हवा अर्थात).

तुमची काळजी घ्या.
Bed साठी खूप धावपळ करावी लागली आईसाठी. मला कदाचित त्यामुळे झाला असेल संसर्ग (mask आणि इतर काळजी कटाक्षाने घेतली होती मी).

आजी कोविड मधून बऱ्या झाल्या हे नक्कीच चांगले आहे. त्यांना इतर काही त्रास असेल तर लवकर त्यातून बऱ्या होवोत ह्यासाठी सदिच्छा!

Pages