अळीमिळी गुपचिळी!

Submitted by सुमेधा आदवडे on 16 September, 2020 - 04:53

संध्याकाळी बरोबर 7 वाजता मिलिंद ऑफिस मधून बाहेर पडला. निघताना 5 मिनिटांपूर्वी घडलेला प्रसंग त्याच्या डोळ्यांसमोर जसाच्या तसा उभा राहिला आणि तो आठवून त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं.
"अगं हो, काय करणार.. बॉस म्हणाला आजच तुझं प्रेझेंटेशन दाखव मला, मग काही चेंजेस असतील तर त्यावर तुला उद्या काम करता येईल. महत्वाचा  प्रोजेक्ट आहे नंदू..जरा समजून घे प्लिज. मला माहित आहे मला हल्ली रोज उशीर होतोय घरी यायला. पण हे बघ, माझं प्रमोशन झालं की मिळवलं सगळं! थोडी कळ काढ. आणि हो, जेवायला थांबू नको माझ्यासाठी, तुम्ही दोघी जेवून घ्या अणि झोपून जा लवकर. माझ्या बटरफ्लायची शाळा आहे ना उद्या?"
पलीकडून नंदिनीचा फक्त ठीक आहे म्हणून प्रतिसाद आला  आणि फोन ठेवला गेला. त्याच्या शेजारी  बसलेल्या मित्राने, अनुपने इतका वेळ दाबून ठेवलेलं हसू आता मोकळं केलं.
"गप रे, तुला काय झालं दात काढायला?"
" शहाण्या, सारख्या कसल्या थापा मारतोस रे बायकोला? कसलं प्रेझेंटेशन? कोणतं प्रोजेक्ट? आणि तो अय्यर असताना तुझं प्रमोशन?"
पुन्हा तो खो खो करत हसत सुटला.
" करना पडता है बाबा..तुला नाही कळणार लग्न झाल्याशिवाय! आणि श्रीकृष्णाने पण गीतेत सांगितलं आहे ना, "खोटं बोलणे म्हणजे काही पाप नव्हे!"
" अरे वा! तू गीतेचं नवीन वर्जन काढलंस वाटतं! अरे कन्फ्युझड अर्जुना,श्रीकृष्णाने म्हटलं आहे की ज्या खोट्याने कोणाचं नुकसान होत नाही, एखाद्याचं भलं होत असेल असं खोटं म्हणजे पाप नाही."
" तेच ते रे. ह्यात पण भलंच होतंय की!"
"कोणाचं?"
"माझं!"
अनुपने कापळावर हात मारून घेतला.
" पण कुठे चालला आहेस?"
मिलिंद फक्त हसला आणि त्याला डोळा मारून उठला आणि निघाला सुद्धा.
आज त्याला 'ती' भेटणार होती. त्याच्या कॉलेजची मैत्रीण आणि एके काळची त्याची क्रश,मिताली! खरेतर ती त्याच्या वर्गात नव्हती.ते दोघे कॉलेजच्या नाटकात एकत्र काम करायचे. तिचं लग्न होऊन ती बाहेरगावी स्थायिक झाली आणि नंतर फक्त फेसबुक वर वाढदिवसाच्या आणि खास क्षणांच्या शुभेच्छा देण्याऐवढं नातं उरलं.
पण परवा अचानक तिने त्याचा नंबर तोच आहे का विचारलं चॅट वर.ती ऑफिसच्या कामासाठी एक आठवडा भारतात आली होती आणि 5 मिनिटात कॉल वर आजचा प्लॅन तयार ही झाला.

नंदिनीला, त्याच्या बायकोला, ह्याचा काहीच पत्ता नव्हता. शक्यच नव्हतं तिला कळणे! हा पठ्ठ्या तिला थापा मारून अनेकदा असे प्लॅन करायचा. कधी मित्रांसोबत डिस्कोला, कधी क्लबला, कधी एखाद्या मित्राच्या घरी सगळे एकत्र जमून फुटबॉल मॅच नाहीतर पिक्चर बघायला. बायको फार कटकट करायची म्हणून नव्हे, तर तेवढाच काय तो बॅचलर्स लाईफ चा फील यावा म्हणून! तेवढाच काय तो वेळ आपलं लग्न झालंय, आपल्या जबाबदाऱ्या आहेत, घरी बायको-मुलगी आहे, हे विसरून काही वेळ आयुष्य रिवाईंड करता यावं हा उद्देश!  आफ्टर ऑल, मेन विल बी मेन!

नंदिनी आणि दियाचं जेवण उरकलं. ती दियाला झोपवत होती. दिवसभरातल्या सगळ्या आठवणी तिच्या डोळ्यांसमोर आल्या.
आज तिच्या शाळेच्या मैत्रिणींचा ग्रुप दुपारी जेवायला बाहेर भेटला होता. त्यानंतर तिच्यासोबत आणखी दोघी जणींनी थांबून मनसोक्त शॉपिंग केलं. अनेकदा मिलिंदचं क्रेडिट कार्ड स्वाईप झालं आज. त्याला मेसेजस तर गेले असतील. बोलला कसा नाही काही आपल्याला मघाशी फोन केला तेव्हा? कामात असेल. म्हणतच होता ना कसलंसं प्रेझेंटेशन. आता घरी आला की सूनवेल आपल्याला.
पण काय करू..किती ठिकाणी सेल लागले होते त्या मॉल मध्ये! आणि कलेक्शन पण काय अप्रतिम होतं सगळ्या एक्ससरीजचं! मला घ्यायच्याच होत्या त्या दोन्ही पर्स, तीन सँडल्स चे जोड. आणि एथनिक वेअर पण किती छान होतं. 5 कुर्ते तर घेतले मी फक्त! फार कुठे काही घेतलंय? मी पण सांगते बरोबर त्याला, काही बोलला तर! मनाशी ठरवत ती दियाच्या शेजारी लवंडली आणि झोपून गेली.

मिलींद बरोबर 7.30 ला हॉटेलच्या बाहेर पोहोचला. वेळ आठची ठरली होती. पण त्याच्या सुदैवाने आज जास्त ट्राफिक लागलं नाही आणि तो अर्धा तास आधीच ठरलेल्या ठिकाणी हजार झाला. आता
त्याच्या कडे वेळ होता. त्याने शेजारच्या पानाच्या टपरीवरून  सिगारेट घेतली आणि ती ओढत वाट बघत उभा राहिला. त्याने लग्न ठरल्यापासूनच सिगारेट सोडली आहे हा समज (?) असलेल्या नंदिनीची त्याला आठवण आली आणि चेहऱ्यावर हसू आलं.
किती भोळी आहे नंदू आपली. मी तिच्याशी खोटं बोलायला नको खरंतर! पण भीती वाटते यार कशी रिऍक्ट होईल खरं खरं सांगितलं तर! शेवटी एक बायको आहे, समजूतदार असली तरी!
खरंतर बायको आणि समजूतदारपणा हा 'रेअर काँबो' आपल्याजवळ आहे, आपण लकी आहोत. तिचा असा फायदा घ्यायला नको आपण. बास! हे आजचं शेवटचं खोटं! ह्यापुढे मी नंदूशी खोटं बोलणार नाही! कुठे जायचं असेल मित्रांसोबत तर तिला सांगून जाईन. मुळात फ्रिक्वेनसी कमी केली ना बाहेर जायची की तिला काय प्रॉब्लेम असेल? ती पण जातेच की तिच्या मैत्रिणींसोबत! आज नाही का गेली होती?
जशी ती आपल्याला सांगते, तसंच आपणही सांगून जायचं. ठरलं!

त्याची मैत्रीण मिताली बरोबर वेळेत आली. मधली काही वर्षे जणू पाऱ्यासारखी उडुनच गेली होती..किंवा नव्हतीच जणू! किती सुंदर होती ती अजूनही! तो पाहतच राहिला क्षणभर तिच्याकडे! ती अगदी त्याच्या समोर येऊन उभी राहिली आणि हसली तेव्हा तो भानावर आला. दोघे आत गेली. जेवण छानच होतं. कॉलेजच्या आणि भूतकाळाच्या गप्पांनी त्यात आणखी चव आणली. बोलता बोलता त्याचं लक्ष कोपऱ्यातल्या एक टेबलाकडे गेलं आणि तो अवाक झाला एकदम!त्याची चुलत बहीण रेवा तिच्या मित्र-मैत्रिणींच्या ग्रुपसोबत तिथे जेवायला आली होती. त्याने मुद्दाम तिच्याकडे लक्ष दिलं नाही. तिचं लक्ष तर नव्हतंच! ती त्यांच्या सगळ्यांच्या गप्पात आणि हसण्यात गुंतली होती. रेवा नंदिनीचं अगदी खास गुळपीठ होतं. मिलिंदचं लग्न झाल्यापासून नंदिनी तिची लाडकी वहिनी झाली होती. त्या दोघींची घट्ट मैत्री झाली होती गेल्या काही वर्षात. हिने जर आपल्याला इथे पाहिलं तेही मैत्रिणींसोबत, तर मेलोच आपण!

त्याने पटापट समोरचं डेझर्ट संपवलं. दोघे हॉटेल मधून निघाली तेव्हा दहा वाजत आले होते. त्यांच्या गप्पा काही केल्या संपत नव्हत्या आणि मितालीला किती बोलू आणि किती नको असं दोन तासां नंतरही वाटत होतं.
दोघे चौपाटीला गेली. तिथल्या धक्क्यावर बसत अंधारातल्या समुद्राच्या काळ्या पाण्याकडे पाहत पुन्हा गप्पांमध्ये रंगून गेली दोघे. किती वेळ गेला त्यांचे त्यांनाही कळले नाही. त्यानंतर त्याने टॅक्सीने तिला तिच्या हॉटेल वर सोडले आणि तो घरी गेला.

मिलिंद घरी आला तेव्हा पहाटेचे तीन वाजून गेले होते. त्यानं स्वतःच्या किल्लीने दार उघडलं पण नंदिनीला जाग आलीच! तो घरात नसताना ती फार सावध झोपायची.
"काही हवं का खायला?" तिने डोळे चोळत विचारलं.
" नको ग. झोप तू. कशाला उठलीस? सकाळी लवकर उठायचं आहे ना?"
"बरं.दूध हवं तर घे फ्रिज मधून."
म्हणत ती आत झोपायला निघून गेली.

दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर त्यानं सवयीप्रमाणे मोबाईल चेक केला. क्रेडिट कार्ड स्वाईप झाल्याचे 5-6 मेसेजेस होते. बायकोने चांगलाच चुना लावलाय काल! तिला हाक मारून काहीतरी बोलणार तेव्हढ्यात त्याची नजर आणखी एक मेसेज कडे गेली. तो मेसेज रेवाचा होता.
"गुडमॉर्निंग दादा.कालचा डिनर खूप एन्जॉय केला ना मैत्रिणीसोबत?"
तो डोळे फाडून त्या मेसेज कडे बघतच राहिला!
हिने बघितलं आपल्याला काल? येऊन बोलली नाही काही. आता सांगते की काय नंदिनीला? अख्ख्या कुटुंबाला पण सांगेल ही..चोमडी!
त्याने मेसेजला काही उत्तर द्यायचं नाही असं ठरवलं आधी. थोड्या वेळाने पुन्हा रेवाचा व्हाट्सएप मेसेज:
"वहिनीला माहीत आहे का? नसेलच!"
त्याने मेसेजला उत्तर टाईप करायला सुरुवात केली.
"तुला काय करायचंय? स्वतःचं काम कर चोमडे!"
असा मेसेज पाठवू का? नको नको अंगाशी यायचं. डिलीट केला.
" मैत्रीण होती ग माझ्या कॉलेजमधली. जेवायला भेटलो होतो सहज."
सेंड केला. लगेच रेवाचं उत्तर:
" मग वहिनीला सांगूनच भेटला असशील ना?"
त्याला आता खूप राग आला. हिला कशाला हव्यात चांभार चौकशा? मूर्ख मुलगी खरंच येऊन सांगेल नंदिनीला आणि वाट लावेल सगळी.
"तुझं कॉलेज कसं चाललंय? काल मजा चालली होती फ्रेंड्स सोबत."
डोळा मारणारी स्मायली जोडून हा मेसेज त्याने पाठवला.
" हो. कालच एक्साम संपली. प्रत्येक एक्सामचा लास्ट पेपर झाल्यावर आम्ही डिनर ला जातो सगळे फ्रेंड्स." रेवाचं उत्तर लगेच आलं.
त्याने यावर अंगठ्याची स्मायली पाठवली. थोडा वेळ काहीच नाही उत्तर आलं. त्याने सुटकेचा निश्वास टाकला आणि ऑफिससाठी तयार व्हायला लागला.
दिवसभर ऑफिसमध्ये कामात कसा गेला कळलंच नाही. तो इतका बिझी होता की त्याला दिवसात फोन चेक करायला मिळालाच नाही.
संध्याकाळी तो रोजच्या वेळेत निघाला तेव्हा चालता चालता फोन बघू लागला. रेवाचा व्हाट्सएप मेसेज होता,
"मी आज तुमच्या घरी गेले होते.वहिनी आणि दिया भेटल्या."
त्याच्या पायाखालची जमीनच सरकली एक मिनिटासाठी.
त्याने पटकन सहज वाटावा असा रिप्लाय केला,
" का ग..काय विशेष?"
रेवा सतत ऑनलाइन असायची. तिचं उत्तर यायला वेळ लागला नाही.
"काही नाही रे, बरेच दिवस वहिनीला भेटले नव्हते..म्हटलं जाऊया आणि..."
मेसेज अर्धवटच होता. त्याने वैतागून पुन्हा मेसेज केला.
"आणि काय?"
"म्हटलं कालचं रिपोर्टिंग करूया."  रेवाचं उत्तर.
मिलिंदला घाम फुटायला लागला. ही पोरगी गोत्यात आणणार आहे आपल्याला.
"काय सांगितलंस नंदिनीला तू?" त्याने थरथरत्या बोटाने टाईप केलं.
"चिल दादा! काही नाही सांगितलं. तू तर तिला सांगून गेला होतास ना मैत्रिणीसोबत जेवायला?" रेवाने विचारलं.
त्याने यावर काहीच उत्तर पाठवलं नाही.
थोड्या वेळाने मिलिंदला एक अनोळखी नंबर वरून मेसेज आला.
" जेवणानंतर काय केलंस मितालीसोबत.. मला माहित आहे."
त्याला आता रेवाचा राग येऊ लागला होता खूप. हा काय थिल्लरपणा आहे? आता अननोन नंबर वरून मेसेज कारण्याएवढी मजल गेली हिची!  दाखवतोच हिला!
त्याने लगेच फोन लावला तिला. घरी पोहोचायला अजून अर्धा तास तरी लागणार होता ट्राफिक मूळे. बस मध्ये फार गर्दीही नव्हती.  रेवाने फोन उचलला.
"हॅलो, बोल मिलिंद दादा"
" काय ग रेवा? काय चाललंय तुझं?"
" माझं? माझं काय चाललंय?"
"का छळतेस मला? सकाळ पासून वैताग दिलाय नुसता. आता वेगळ्या अननोन नंबर वरून मेसेज करू लागलीस?"
" अरे दादा, काय बोलतोस तू? कुठला अननोन नंबर?"
"शहाणपणा करू नकोस जास्त. मला धमक्या देतेस काय? ब्लॅकमेल करायचं आहे भावाला? हेच संस्कार झालेत का आपल्यावर लहानपणा पासून?"
"हॅलो..दादा..चिल ओके!मी कुठल्या अननोन वगैरे नंबर वरून तुला मेसेज केलेला नाही. हवं तर आत्ता घरी येऊन माझा मोबाईल बघ. आणि मी पिडत होते तुला फक्त. नाही करणार मस्करी यापुढे तुझी. तू चिडका आणि थापाड्याच आहेच लहानपणापासून. माहीत आहे मला. काकुशी पण खोटं बोलायचास. वहिनीला पण खोटं बोलूनच गेला असशील मैत्रिणीसोबत. ही सवय सोड रे दादा आता तरी. वहिनी किती चांगली आहे. भोळी आहे बिचारी. तिचा असा फायदा घेऊ नकोस.
मी तुला तिला असं फसवू देणार नाही!"
"गप्प बस ग. मी काही तिला फसवत वगैरे नाही. एकदा काय मैत्रिणीसोबत गेलो जेवायला तर काय एवढं आभाळ कोसळलं? आणि तू काय करणारेस ग शहाणे? आमच्यात पडू नकोस तू सांगतोय तुला."
"दादा, तू थांब आता..बघच मी काय करते." म्हणत तिने फोन कट केला.
मिलिंद इथून हॅलो हॅलो ओरडत राहिला. आता मात्र त्याला टेन्शन आलं. आपण चिडून खूप बोललो रेवाला. आता रेवा सगळ्या घराला सांगेल उलट सुलट..मसाला लावून सांगेल. नंदिनी काय करेल रेवाचं ऐकून? त्याला कल्पनाच सहन होईना. बघता बघता त्याचा स्टॉप आला सुद्धा. तो बस मधून उतरला. हवेत अजिबात गारवा नव्हता. एकदम घाम फुटला त्याला.
मिलिंद घरी आला तेव्हा नंदिनी स्वयंपाक करत होती. इतक्या दिवसांनी त्याला लवकर घरी आलेला पाहून दियाला ही खूप आनंद झाला. तिने धावत जाऊन त्याला मिठी मारली.
त्याने तिला जवळ घेतलं, पण नेहमी सारखं 'हॅल्लो बटरफ्लाय!' म्हणत कुरवाळले नाही. तिची दिवसभराची विचारपूस ही केली नाही.
दिया हिरमुसली. नंदिनीने तिला जवळ घेऊन समजावलं आणि आतल्या खोलीत खेळायला पिटाळले. मिलिंदचा चेहरा पाहून पहिले तिने हॉल मधला फॅन लावला आणि त्याला पाणी दिलं.
" काय रे? बरं वाटत नाहीये का? "
त्याने फक्त मान हलवली. नंदिनी त्याच्या जवळ बसली. दोघांना विकडेला संध्याकाळी असं एकत्र सोफ्यावर बसून,बोलून जमाना झाला होता. मिलिंद जवळ जवळ रोजच उशिरा यायचा घरी.
"किती दगदग करतोस. गेले कित्येक दिवस रोज उशिरापर्यंत ऑफिस, दिवसभर मरमर काम, बाहेरचं खाणं. का नाही त्रास होणार? जरा दोन दिवस सुट्टी काढ. मग विकेंड आहे. चार दिवस आराम मिळेल."
"बघू." तो एवढंच बोलला.
"त्यात काय बघायचंय.ऐक माझं. यु नीड अ ब्रेक."
तिला बिचारीला काय कल्पना की हा वाटतो तितका आणि वाटतो त्या कारणामुळे दमलेला नाहीच आहे.
तो उठून सरळ आत आराम करायला गेला. रात्री झोपण्यापूर्वी नंदिनीने पुन्हा त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला.
"घेणार आहेस ना रजा उद्यापासून?"
"काम आहे ग ऑफिसमध्ये."
"दोन दिवस नाही केलंस तर बंद होणारे का कंपनी?"
"बघू. उद्या सकाळी ठरवतो."
"बरं, ऐक ना. आज रेवा आली होती. तुला सांगायचंच राहिलं."
"काय म्हणत होती?" त्याने उत्सुकता लपवत विचारलं.
"काही नाही. एक्साम संपली कालच म्हणे. सो आता सुट्टी आहे.मज्जा चालू आहे. गप्पा मारल्या खूप आम्ही. जेवलो. दियासोबत खेळली थोडावेळ आणि मग गेली."
त्याला आणखी काही विचारायचं होतं, काय गप्पा मारल्या म्हणून. पण त्याने स्वतःला थांबवलं. ज्या अर्थी नंदू आपल्याशी इतकी नॉर्मल वागतीये, ह्या अतिशहण्या रेवाने अजून तरी काही घोळ घातलेला नाही. ह्या विचाराने तो जरा स्वस्थ झाला आणि झोपून गेला. पण ह्या गोष्टीचं काहीतरी कायमचं सोल्युशन काढणं अगदी गरजेचं होतं.   तिला दोन नंबर किंवा दोन मोबाईल काही काका घेऊन देणार नाहीत. इतके शिस्तबद्ध आणि काटेकोरपणे वागणारे आपले काका, रेवाच्या बाबतीत कशी कसूर करतील? त्यामुळे बहुतेक ती खरंच बोलत असावी.पण मग रेवाचा नाही तर कोणाचा असेल तो अननोन नंबर? तेही शोधून काढायलाच हवं.
दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने नंदिनीचा विरोध न जुमानता ऑफिस गाठलं. अनुपला कँटीनमध्ये चहासाठी घेऊन गेला आणि गेले दोन दिवस घडलेल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या.अननोन नंबर बद्दल ऐकून त्यालाही आश्चर्य वाटलं. आपल्या मित्राला यातून बाहेर कसं काढायचं याचा विचार तो करू लागला.
" तू नंदिनी ला सगळं खरं सांगून टाक मिलिंद." अनुप म्हणाला.
" वेडा आहेस का? डिव्होर्स देईल ती मला!"
"चल रे! फक्त मैत्रिणीसोबत जेवायला बाहेर गेलं म्हणून डिव्हीर्स मागणारी बायको आहे का तुझी?"
"अरे पण मी अर्धी रात्र बाहेर होतो. एवढा वेळ मैत्रिणीसोबत गप्पा मारत होतो यावर विश्वास ठेवण्याएवढी मुर्खही नाही आहे ती.त्या अननोन नंबर वाल्याने जर नंदिनीला भलतेच काही सांगितले, तर कसं पटवून देणार आहे मी तिला की आमच्यात काहीच नाही आहे आणि त्या रात्री जेवण आणि गप्पांच्या ओघात उशीर झाला, दुसरं काहीच झालं नाही? एव्हाना मिताली पण परत गेली असेल.नाहीतर तिलाच सरळ घरी घेऊन जाऊन खरं सांगून टाकलं असतं. च्यायला, इतक्या वेळा खोटं बोललो तेव्हा काही झालं नाही. ह्यावेळी ठरवलं होतं, हे शेवटचं. यापुढे नंदूला सगळं खरं सांगेन तर..फक्त एक डिनर अंगाशी आला यार!"
"एक डिनर नाही, तुझी बायकोशी थापा मारण्याची सवय अंगाशी आलीये. तेवढं ट्रानस्परेंट रिलेशन ठेवलं असतं तर ही वेळ आली नसती. तरी बरं, इतकी समजूतदार बायको मिळाली आहे."
"माहीत आहे रे. आता आणखी मारू नकोस मला लेक्चरने. प्लिज मला सोडव यातून! काहीतरी शक्कल लढव त्या अननोन नंबर पर्यंत पोहोचायची. सोडणार नाही मी त्याला!"
"थांब, जरा विचार करू दे. ही सेन्सिटिव्ह सिच्युएशन आहे खूप. एक चुकीची स्टेप घेतलीस तर जाशील बाराच्या भावात!"
अनुप पुन्हा विचारात गढून गेला. त्या रात्री रेवा व्यतिरिक्त आणखी कोणी ह्याला तिथे पाहिले असण्याची शक्यता होती? तिचे मित्र-मैत्रिणी. त्यातल्या कोणीही त्या अननोन नंबर वरून ह्याला मेसेज करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
"तू एक काम कर. सर्वात आधी रेवाला सॉरी बोल. माफी माग तिची. आणि तिला सांग की तू नंदिनीला सगळं खरं सांगणार आहेस."अनुपने खुप विचारांती मिलिंदला सांगितलं. मिलिंद टेन्शन मध्ये होताच, तो वैतागला त्याच्यावर.
"रेवाची माफी? गेली उडत ती! मी का माफी मागू? आणि तुझं काय चाललंय कधीपासून नंदिनीला सांग, नंदिनीला सांग. दुसरा काहीच ऑप्शन नाही का तुझ्याकडे?"
"अरे भल्या माणसा, ऐकून घे आधी माझं. त्या रात्री रेवा व्यतिरिक्त आणखी कोणी तुला तिथे पाहिले असण्याची शक्यता आहे? तिचे मित्र-मैत्रिणी. त्यातल्या कोणीही त्या अननोन नंबर वरून तुला मेसेज करू शकतो/ते. तुला कसं कळणार तिच्या फ्रेंड्स बद्दल? तिच्याशी गोड बोलून त्यांची माहिती काढलीस तरच ना?"
"हो रे. बरोबर आहे." मिलिंद आता पूर्ण नरमला.
"पुढे ऐक. तिला घरी बोलव काही कारणाने. तिचा मोबाईल मिळवून त्यातले कॉन्टॅक्टस बघ. व्हाट्सप पण चेक कर तिचं. फार कोणाशी बोलतीये, एखादा फ्रेंड्सचा ग्रुप असला तर त्यातले कॉन्टॅक्टस बघ.स्क्रीनशॉट्स वगैरे घे. काहीही कर पण तिच्या सर्कल मधल्या सगळ्यांचे कॉन्टॅक्ट मिळवून ठेव. तेव्हा आपल्याला तो अननोन नंबर ट्रेस करता येईल."
"चालेल. उद्याच बोलवतो तिला घरी!"
ठरल्याप्रमाणे मिलिंदने रेवाला फोन करून तिची माफी मागितली. मी नंदिनीला सगळं खरं सांगणार आहे आणि यापुढे तिच्यापासून काहीच लपवणार नाही याची तिला हमी दिली. आणि तिला रविवारी घरी जेवायला बोलवलं.
नंदिनी आणि ती किचन मध्ये गप्पात रंगलेल्या असताना त्याने हळूच तिचा मोबाईल पळवला आणि बाहेरून काहीतरी आणायचं कारण सांगून खाली निघून गेला. मोबाईल  मधून तिच्या फ्रेंड्स ग्रुपचे सगळे कॉन्टॅक्टस स्वतःला व्हाट्सप वर शेअर केले. तिच्या मोबाईल मधून हे सगळे शेअर  मेसेजेस डिलीट केले आणि मग वर आला. मोबाईल होता तिथे ठेवला. सुदैवाने नंदिनी आणि रेवा अजूनही किचन मध्येच होत्या. त्यामुळे रेवाला काही कळणं शक्यच नव्हतं.
रेवाचा धोका आता तरी टळला होता. तिला मिलिंदने पूर्ण विश्वासात घेतलं होतं. हा विषय नंदिनीकडे किंवा फॅमिली मध्ये कोणाकडेच ती कधीच काढणार नाही असं तिच्याकडून प्रॉमिस घेतलं होतं. त्यासाठी तिला दर महिन्याला तिचा फोन रिचार्ज करून देण्याचे अमिष दिलं. एवढं तिच्यासाठी पुरेसं होतं.
जेवण झाल्यावर रेवा निघून गेली आणि मिलिंद लगेच बेडरूम मध्ये आला. त्याने प्रत्येक नंबर चेक केला. पण त्या अननोन नंबरशी एकही नंबर जुळला नाही. मिलिंद निराश झाला. अजून त्याच्यावर टांगती तलवार होतीच!
रात्री दहा नंतर नंदिनी अगदी घाबरलेल्या अवस्थेत बेडरूम मध्ये आली. मिलिंद काहीतरी वाचत बसला होता.
"मिलिंद, अरे रेवा अजून घरी पोहोचलेली नाही. काकांचा फोन होता आताच!"
"काय? कुठे गेली ही?" म्हणत तो तिला फोन करू लागला.
"अरे स्विचड ऑफ येतोय तिचा फोन..मी ट्राय केला!"
"काका-काकू खूप टेन्शन मध्ये आहेत रे. आपण गेलं पाहिजे तिकडे."
दोघे दियाला घेऊन लगेच निघाली.
काका काकूंच्या घरी गेल्यावर त्यांना कळलं की रेवा दुपारी त्यांच्या घरून निघाल्यानंतर तिच्या घरी परत गेलीच नाही.तिच्या सगळ्या मित्र मैत्रिणींना काकांनी फोन करून विचारलं होतं. ती दिवसभरात ना कोणाशी बोलली होती, ना मेसेज केला होता. काका आणि मिलिंद दोघे पोलीस स्टेशनला तक्रार करायला निघाले.
दाराबाहेर पडताच त्यांना आश्चर्य वाटलं. समोरून रेवा जिने चढून वर येत होती. तिने फक्त रागाने एकदाच मिलिंद कडे पाहिले आणि कोणाशी काहीच न बोलता ती आत निघून गेली.  आत गेल्यावर पण काकू आणि नंदिनी कडे न बघताच ती सरळ आत तिच्या खोलीत गेली. काकूंनी हाक मारली, बोलवलं पण ती काही आली नाही. नंदिनी काकूंना थांबवत म्हणाली,
" काकू, आता काही बोलू नका तिला. रागात दिसत होती. शांत होऊद्या. उद्या बोला तिच्याशी."
" अगं पण होती कुठे ही पोरगी? ही काय वेळ आहे घरी यायची... रात्रीचे बारा वाजत आलेत. आपण इथे इतक्या टेन्शन मध्ये बसलोय,काही आहे का हिला त्याचं?"
" काकू, आता आलीये ना ती घरी? राहूदे आता. उद्या बोला तिच्याशी.मी येते उद्या हवं तर परत. आपण बोलूया."
"हो. ये ग. माझ्याशी नाही तर तुझ्यापाशी तरी मोकळी होईल!" काकू म्हणाल्या.
मिलिंद आणि नंदिनी झोपलेल्या दियाला घेऊन निघाले. घरी आल्यावर झोपायच्या आधी मिलिंदने एकदा मोबाईल चेक केला. रेवाचा मोठा मेसेज होता व्हाट्सप वर:
"मला वाटलं नव्हतं दादा तू इतक्या लो लेव्हल वर उतरशील! मी तुला प्रॉमिस केलं होतं की मी कोणाला त्या रात्रीबद्दल सांगणार नाही. तरी तू मला धमकवायला माणसं पाठवलीस? स्वतःच्या बहिणीला?त्यांनी चार तास मला एका खोलीत डांबून ठेवलं होतं. काही वाईट झालं असतं तर?? मला नाही वाटत मी आता माझं प्रॉमिस पाळू शकेन.मी आता तुझ्या कुठल्याही गोष्टीत तुला सपोर्ट करणार नाही! उद्या आई- बाबांनी मला विचारलं तर मला खरं सांगावच लागेल आजच्या बद्दल. तू खुप वाईट आहेस! यु हॅव डीमिण्ड मी!"
मिलिंदला आश्चर्य वाटलं. रेवाला धमकवायला माणसं आली होती?कोणी पाठवली? माझं सिक्रेट जपण्यात कोणाचा काय फायदा? हे अनुप शिवाय इतर कोणालाही माहीत नाही. आणि तो आपल्याला न सांगता असं काही कसं करेल?
त्याने मेसेजला रिप्लाय केला:
"रेवा, अगं काय बोलतेस तू? कुठली माणसं? कोणी धमकावलं तुला? मी असलं काही नाही केलंय ग...मी नंदिनीला सगळं सांगणार आहे तुला बोललो ना ग?"
तिचं उत्तर आलं," तू तिला सांग नाहीतर काही पण कर, मी आता तुमच्या  दोघांच्यात पडणार नाही. मात्र आई बाबांना मला आजच्या प्रकाराबद्दल सांगावं लागणार आहे. आणि मला तुझ्याशी बोलण्यात काहीच इंटरेस्ट नाहीये. सो प्लिज मला आता मेसेज करू नकोस!"

मिलिंदला वाईट वाटलं. रेवा खूप हर्ट झाली होती. पण ती आता निदान नंदिनीला तरी काहीच सांगणार नाही हे कन्फर्म झालं होतं.
पण अजूनही त्या अननोन नंबरची ब्याद त्याच्या पाठीशी होती. त्याला रोज त्या नंबरवरून मेसेज यायचा, " जेवणानंतर मितालीसोबत काय केलंस.. मला माहित आहे. बायकोला कळलं तर..."
त्याने अनेकदा त्या नंबरवर कॉल केला,पण फोन कधीच उचलला गेला नाही. टृकॉलर वर पण त्या नंबरचं नाव कोणीतरी "शहाणा" असं सेव्ह केलं होतं. त्यामुळे तिथूनही काही पत्ता लागत नव्हता.
त्याने एक-दोनदा मेसेज केला होता त्या नंबर वर:" कोण आहेस तू? तुला काय हवंय?"
त्यावर उत्तर आलं होतं: बायकोला सगळं खरं खरं सांग..नाहीतर..
त्याने रिप्लाय केला होता: नाहीतर काय करशील?
त्यावर एकच उत्तर आलं होतं: कळेल!
त्या माणसाने स्वतःचा काहीच थांगपत्ता लागू दिला नव्हता, न मिलिंदच्या मेसेजसना सरळ उत्तरं दिली होती. कोणीतरी उगाच आपली खोडी काढतोय असं आता त्याला वाटू लागलं होतं.

दुसऱ्या दिवशी सकाळी कधी एकदा अनुपशी आजच्या प्रकाराबद्दल बोलतोय असं त्याला झालं होतं. तो लवकरच ऑफिसमध्ये गेला आणि अनुपला ही त्याने सकाळी फोन करून लवकर बोलवून घेतलं. तो येताच दोघे कँटीन मध्ये गेले. मिलिंद काही बोलायच्या आतच अनुप बोलला,
" रेवाचा बंदोबस्त झालाय, ती आता तोंड उघडणार नाही!"
"काय? हे सगळं तू केलंस अनुप?"
"मी नाही रे, माझ्या एका मित्राच्या ओळखीची टपोरी पोरं आहेत नाक्यावरची, त्यांनी धमकावलं तिला काल!"
"अरे पण का? कशाला त्रास दिला रेवाला? मी तिला हँडल केलं होतं!"
"हँडल? वेड्या, ती कधी नंदिनीकडे तोंड उघडेल तुला गॅरंटी होती? मला आता गॅरंटी आहे ती तोंड बंद ठेवेल!"
" अरे पण.."
"तू आता पण बीण करत बसू नकोस. रेवापासून आता काही धोका नाही तुला."
"अरे पण तो अननोन नंबर.."
" त्याचा पण बंदोबस्त केलाय. काळजी करू नको!"
" काय? तुला कळलं का तो कोण माणूस आहे? मला सांग, सोडणार नाही मी त्याला!"
"हो, मी मोबाईल नंबर ट्रेस करायचे ऍप्स शोधत होतो, काही ट्राय पण केले. शेवटी एक ऍप ने काम केलं. तू सांगितलेला मोबाईल नंबर ह्याच शहरातला आहे. तो नंबर आणि तो माणूस ट्रेस झाला आणि काल त्याला ही त्या टपोरी पोरांनी धुतलाय चांगला!"
" कोण होता तो? मला का त्रास देत होता?"
" रेवाचा बॉयफ्रेंड. तिच्या सांगण्यावरूनच तो तुला मेसेज करत होता!"
"काय??"
मिलींदला सकाळ सकाळ धक्क्यावर धक्के बसत होते.
"अरे पण मला कसा नाही सापडला त्याचा नंबर तिच्या मोबाईल मध्ये, मी तो पळवला होता तेव्हा?"
"तो तुला त्याच्या ओरिजिनल मोबाईल नंबर वरून फोन करण्याएव्हढा मूर्ख वाटतो का तुला? हं, आता थोडा मूर्खपणा केला त्यांनी. पण दोघांनी डोकं लावून छळलं तुला!"
"शप्पथ! ह्या रेवाला ना..सोडणार नाही मी! वाटलं नव्हतं एवढी धूर्त पोरगी आहे रे!"
"अहं, तू आता काहीच करणार नाहीस. तिला तिचा धडा मिळालाय आणि त्या मुलाला पण चांगलीच समज दिलीये. काल चार तास दोघे त्या पोरांच्या ताब्यात होती. आता ती तिच्या आई बाबांना काल उशिरा येण्याबद्दल काहीतरी स्टोरी बनवून सांगेल. पण तुझ्याबद्दल तोंड उघडणार नाही."
"अरे पण ती म्हणत होती की ती काका काकूंना सगळं सांगणार आहे, आज नंदिनी पण जाणार आहे तिकडे तिच्याशी बोलायला. सांगेल रे ती सगळं!"
"अरे बाबा, नाही सांगणार. विश्वास ठेव माझ्यावर. हे बघ, ती तिच्या बॉयफ्रेंड बद्दल खरं तर सांगू शकत नाही. तूच म्हणाला होतास ना की तुझे काका स्ट्रिक्ट आहेत. मुलीचा सेटल नसलेला मुसलमान बॉयफ्रेंड सहन होणार आहे का त्यांना? तिने जर तुझ्याबद्दल सांगितलं, तर हे सगळंच तिला सांगावं लागेल. आय डोन्ट थिंक ती ही रिस्क घेईल. आणि बाय द वे, त्या मुलाने तो नंबर सरेंडर केलाय.सो तुला आता त्या नंबर वरून मेसेज येण्याचा प्रश्नच नाही. तुझ्यावरचं संकट टळलं आहे आता. कॉंग्रेट्स!" चहाचा शेवटचा घोट संपवत अनुप म्हणाला.

मिलिंद आता जरा शांत झाला आणि दोन मिनिटे विचार केल्यावर त्याला पटलं आणि त्याच्या चेहऱ्यावर एक सुटकेचं हसू आलं.
" येस! अनुप यार खूप मोठं काम केलंस रे माझं..मी जन्मात विसरणार नाही तुला!"
" नकोच विसरुस.आता काही विसरायचं असलेच तर तुझी थापा मारायची सवय विसर. बायकोशी प्रामाणिक रहा. तुझी बायको चांगली आहे खूप."
"हो रे बाबा!आता कानाला खडा! परत कधीच असं करणार नाही. नंदिनी पासून काहीच लपवणार नाही. आता माझ्या बायको-मुलीवर मी नीट फोकस करेन आणि त्यांना खूप प्रेम देईन.आय प्रॉमिस मायसेल्फ!"
"दॅट्स माय फ़्रेंड, इज अ जेटलमन्स प्रॉमिस!"
"येस!" दोघानी हात मिळवले.
******
अनुप ऑफिसमधून निघाला तेव्हा संध्याकाळचे 6 वाजून गेले होते. त्याला 6.15 ला हॉटेलमध्ये पोहोचायचे होते. उशीर झाला होता.
तो 6.25 नंतर हॉटेलमध्ये गेला आणि त्यांचं टेबल शोधत त्यांच्यापर्यंत पोहोचला.

त्या दोघी त्याची वाट पाहत होत्या...नंदिनी आणि रेवा!
एकमेकांना बघून तिघेही हसायला लागले.
"काय अनुप, काय म्हणतोय मित्र तुझा?" नंदिनी म्हणाली.
" जाम टरकली होती त्याची गेला आठवडाभर! काल तर थरकाप उडाला असेल ना? तुम्ही दोघींनी थांबवलं म्हणून नाहीतर मला अजून जिरवायची होती त्याची!"
" नको रे,बस झालं. त्याला त्याचा धडा मिळाला बहुतेक!"
" बहुतेक नाही, मिळालाच!"
" पण तुमच्या दोघांमुळे हा प्लॅन वर्क आउट झाला हं. तुमच्यशिवाय हे शक्य नव्हतं. रेवाने मला त्याच रात्री फोन करून सांगितलं होतं की मिलिंद कुठल्यातरी मैत्रिणीसोबत हॉटेलमध्ये आहे. आणि तुला फोन करून सांगितल्यावर तुही लक्ष ठेवलंस त्याच्यावर. बाय द वे सकाळी काय बोलणं झालं तुमच्यात?"
अनुपने त्याचं आणि मिलिंदचं सकाळचं बोलणं त्या दोघांना सांगितलं. दोघी जोरजोरात हसत सुटल्या. रेवाला तर हसू आवरतच नव्हतं.
"टपोरी पोरं? मुसलमान बॉयफ्रेंड?" ती हसता हसता मध्येच बोलत होती.
"हो मग! आहे की नाही मी पण स्टोरी मास्टर?"
"मित्राचा वाण नाही पण गुण लागला म्हणायचा!" रेवा म्हणाली.
"पण अनुप खरंच, थँक्स टू बोथ ऑफ यु. नाहीतर मिलिंदची ही थापा मारण्याची सवय म्हणजे अगदी जित्याची खोड होती."
" वहिनी, दादा तसा चांगला आहे ग. पण त्याची ही सवयच फार वाईट आहे."
"आहे नाही रेवा, होती म्हण. मला नाही वाटत तो आता परत असं काही करायची हिम्मत पण करेल!"
नंदिनीने मिलिंदला फोन लावला. मोबाईल स्क्रीन वर "तोच" अननोन नंबर फ्लॅश होताना पाहून मिलिंद अवाक झाला. त्याने घाबरतच फोन उचलला.
"हॅलो..मिलिंद"
" नंदू, तू..तू..हा कुठला नंबर..तू..तुझ्याकडे कसा?"
"अरे हा मी नवीन नंबर घेतला. आई बाबांना फोन लागायचाच नाही ना गावी, दिवसेंदिवस बोलणं व्हायचं नाही.म्हणून म्हटलं सर्व्हीस प्रोव्हायडर चेंज करूया. आताच चालू झालाय."
मिलिंदला आठवलं अनुप म्हणाला होता त्या मुलाने तो नंबर सरेंडर केलाय. तोच नंदूला मिळाला असेल. काय योगायोग आहे..पण राहूदे आता..अळीमिळी गुपचिळी!
तो भानावर येत नंदिनीशी बोलू लागला,
" ओके, मी अर्ध्या तासात घरी येतो बरं का. आपण तिघे खूप दिवस बाहेर नाही गेलोय. आज जेवायला जाऊ बाहेर."
नंदिनीने फोन ठेवत त्या दोघांकडे पाहिले.
"अनुप, मित्र सुधारला रे तुझा. इतका लवकर सुधारेल वाटलं नव्हतं!" ती हसून म्हणाली.
" हो, पण ह्या आपल्या प्लॅन बद्दल आता आपल्या तिघांच्या शिवाय कोणालाही काही कळता कामा नये. काल हिच्या आई बाबांना उगाच त्रास झाला आपल्या प्लॅन मुळे."
"हो ना रे. मला तर काकूंची दया येत होती. किती रडत होत्या त्या रेवाच्या काळजीने!" नंदिनीला वाईट वाटत होतं.
"इट्स ओके, ते बरे आहेत आता. मी केलं मॅनेज!" रेवा म्हणाली.
"हो पण हा प्लॅन आपल्यातच होता आणि आता आपल्यातच संपला..अळीमिळी .." अनुप उठत म्हटला.
"गुपचिळी!" रेवा आणि नंदिनी एकत्र म्हणाल्या आणि  हसत उठल्या.

-सुमेधा आदवडे

Group content visibility: 
Use group defaults

छान लिहिलंय. फ्लो चांगला आहे कथेचा. शेवटाक्डे नेताना वेगही वाढवलाय.

अनुपने गुंडांची स्टोरी सांगितली तिथे पुढलं काय ते कळलं मात्र.

Mast