अल्कोहोल डिपेंडेन्सीबद्दल मदत हवीय

Submitted by केअशु on 12 September, 2020 - 00:57

मित्रहो! एक मदत हवीय.

अल्कोहोल डिपेंडेन्सीबद्दल

आधी अल्कोहोल डिपेंडेन्सी म्हणजे काय हे थोडं स्पष्ट करतो.हा खालील मेसेज व्हॉटसअॅपवरुन मिळाला आहे.लेखक कोण आहेत ते माहित नाही.पण अल्कोहोल डिपेंडेन्सी म्हणजे काय ते त्यांनी व्यवस्थित समजावून सांगितले आहे.

अल्कोहोल डिपेन्डन्सी

अल्कोहोल डिपेन्डन्सीचे ४ महत्त्वाचे पैलू आहेत. दारू पिण्याचे समाधान, सतत दारूचा विचार, दारू न मिळाल्यावर अस्वस्थता, दारू पिण्यात वा ती मिळविण्यासाठी भरपूर वेळ घालवणे व दारूच्या अंमलात राहणे तसेच इतर जबाबदार्‍यांकडे दुर्लक्ष करणे, याला अल्कोहोल डिपेन्डन्सी म्हणतात.

मद्यपानाचे दुष्परिणाम साधारणपणे तीन प्रकारात शोधावे लागतात. हे तीन प्रकार म्हणजे

१) शारीरिक २) मानसिक आणि ३) सामाजिक अपाय हे होत.

वारंवार पडणे, फिट्‌स (फेफरे) येणे, डोक्‍याला इजा होणे, रक्ताची उलटी होणे, वारंवार कावीळ होणे, अशा तक्रारी शारीरिक दुष्परिणामात मोडतात. मानसिक अपायाचे लक्षण भीती वाटत राहणे किंवा भीतीचे झटके येणे, विस्मृतीमुळे स्थळ - काल यांच्या जाणिवेत गोंधळ होणे, परिचयाच्या किंवा आपल्या कुटुंबीयातील घटकांना ओळखताना चुका करणे, स्वतःला हेतुपुरस्सर इजा करून घेण्याची प्रवृत्ती असणे, अशा प्रकारच्या घटना होत राहणे या मानसिक अपायाच्या लक्षणात मोडतात. तिसऱ्या प्रकारच्या दुर्घटना म्हणजे कौटुंबिक अथवा सामाजिक दुष्परिणाम होत राहणे. यात वाहन चालवताना वारंवार अपघात होणे, कौटुंबिक घटकांना मारहाण करणे, हे वारंवार घडू लागणे किंवा शेजारी आणि चांगल्या ओळखीच्या माणसांशी वारंवार भांडण-तंटा होत राहणे, हे सामाजिक अपप्रवृत्तीत मोडतात.

माणूस दारू पिण्याच्या आजारात अडकला की काय होते? तो एका बाजूला मानसिक गुलामी आणि दुसऱ्या बाजूला शारीरिक गुलामी या कात्रीत सापडतो. दोन्ही कात्रीची पाती धारदार असतात. मानसिक ओढ इतकी अनावर असते की ती ओढ, आसक्ती त्याला ‘मला आत्ताच्या आत्ता, कोणत्याही परिस्थितीत, आणि कोणतीही किंमत मोजून दारू हवी म्हणजे हवी’ या विचारांच्या तो संपूर्णपणे अधीन होतो. इथे त्याला आपण करतोय ते चांगले का वाईट हे समजत नाही. आपण दारू घेतली तर शरीरावर, कुटुंबीयांवर काय परिणाम होतील याची फिकीर न करता माणूस दारू पितो. हीच ती मानसिक गुलामगिरी.

प्रथम सेवनानंतर जी मेंदूच्या संगणकात ' मजा आया ' अशी फाईल तयार झाली ती अधून मधून जेव्हा जेव्हा ..व्यक्तीची मानसिक अवस्था ..कंटाळा आलाय ..बोअर झालोय .. खूप ताण जाणवतोय .. काहीतरी कटकटी होत आहेत .. अवस्थता वाढलीय अशी होते तेव्हा पुन्हा एकदा तो मजा घे अशी आठवण करून देत राहते ..व संधी मिळेल तसे पुन्हा त्या व्यसनाचे सेवन केले जाते ..व मेंदूतील ही फाईल अधिक शक्तिमान होत जाते.

वर सांगितल्यानुसार जे लोक मानसिक दृष्ट्या अधिक मनस्वी ..संवेदनशील .. हळवे ..किंवा हट्टी ..जिद्दी ..स्वत:च्या मनात येईल त्याप्रमाणे जीवन व्यतीत करायला मिळाले पाहिजे अशा मनोवृत्तीचे असतात ते किंवा निराशावादी मनोवृत्तीचे .. वैफल्यग्रस्त ..बंडखोर स्वभावाचे असतात ..व्यक्तिगत जीवनात कसल्यातरी कारणाने नाराज असतात. या नाराजीचे कारण काहीही असू शकते.लहानपणीचं आयुष्य खूपच कष्टात गेलेलं असणं , आईवडीलांचा घटस्फोट , वडीलांकडून सतत मार मिळणे , जवळचा नातेवाईक वारणे.(आई,वडील ,बायको,प्रेयसी इ.) व्यवसायात फसवणूक होणे , नोकरीत वरीष्ठांकडून अपमान ही प्रमुख कारणे आहेत.(ही कारणे मला AA मधे समुपदेशक म्हणून काम करणार्‍या एका स्नेह्यांनी सांगितली आहेत.)

थोडक्यात या लोकांची दु:ख सहन करण्याची क्षमता सामान्य माणसापेक्षा खूप कमी असते. त्यामुळेच हे दु:ख लपवण्यासाठी हे लोक दारुचा आधार घेतात.असे लोक पुन्हा पुन्हा तो आनंद घेण्याची शक्यता वाढते ..त्या नुसार ते तसे करत राहतात ..पुढे त्या उसन्या आनंदाचा मनावर इतका पगडा बसतो की त्यापुढे जीवनातील इतर आनंद तुच्छ वाटू लागतात.
----------------------------------------------------

आता मला काय हवंय ते सांगतो.

या वरच्या लेखात दिल्याप्रमाणे तितक्या प्रमाणात अल्कोहोल घेणारे काही लोक परिचयात आहेत.पण थोडा फरक आहे. म्हणजे तुडूंब दारु पिणारे पण तरीही आर्थिकदृष्ट्या संपन्न अवस्थेत असे हे लोक आहेत.म्हणजे त्यांनी भरपूर कष्ट करुन ती आर्थिक संपन्नता मिळवली आहे.दिवसा उपजीविकेचे काम अगदी मन लावून करतात. त्यांच्या कामातले ते एक्स्पर्ट समजले जातात.

पण संध्याकाळ झाली की दारु लागते.तुडूंब पितात.साहजिकच प्यायले की तोल सुटतो.

तोल सुटला की मग आपण कसे कष्ट घेऊन घवघवीत आर्थिक यश मिळवलं किंवा नोकरीत मानसन्मान मिळवले हे सुरु होतं.इथपर्यंत ठीक आहे.पण एक प्रकार हल्ली फार घडतो आहे.

या दिवसा नीट राहणार्‍या आणि रात्री तुडूंब पिणार्‍यांपैकी काहीजण मी असलेल्या WhatsApp समुहात आहेत. या लोकांना अशी तरुण मुलं खटकतात ज्यांचे पालक आर्थिकदृष्ट्या संपन्न आहेत आणि जी मुलं थोडी मौजमजा करतायत किंवा नुकतीच नोकरी लागली असल्याने पगार कमी आहे. एखाद्या WhatsApp ग्रुपात हे असतील तर अशा मुलांना आपण कसं यश मिळवलं आणि तुम्हाला सगळं आयतं कसं मिळालंय, तुम्ही कष्ट न घेता मौजमजा करता वगैरे बादरायण संबंध जोडून शेलक्या भाषेत त्या मुलांचा उद्धार करणं सुरु होतं.आता या मुलांनी या बोलणार्‍याइतकं आर्थिक किंवा शैक्षणिक यश मिळवलं नसेल तर ती मुलं हे बोलतील ते ऐकून घेतात.काहीजण नाराज होऊन ग्रुप सोडतात. Even काही वेळा हे स्वत:च्या मुलांनाही आपले आर्थिक यश, मी लहानपणापासून कसा कष्टात वाढलो नि तुला कसं सगळं आयतं मिळालं वगैरे सांगत बसतात. हे सांगितल्यामुळे किंवा शेलक्या भाषेत उद्धार केल्यामुळे समोरच्याला काय वाटेल, त्याचा अपमान करण्याचा अधिकार आपल्याला आहे का याचा विचार हे लोक करत नाहीत. त्यांना फक्त आपल्या मनातलं भडाभडा बोलायचं असतं ,मनातला राग, दु:ख बाहेर फेकायचं असतं.

असे लोक खरोखरच एखाद्या विषयातले चांगले ज्ञानी असतात.आम्हाला त्यांच्या ज्ञानाशी देणंघेणं आहे. त्यांच्याकडून त्यांच्या तज्ञता विषयातली चांगली माहिती मिळाली तर हवीच आहे. पण आम्हाला त्यांचं दारुच्या नशेतलं उद्धट बोलणं , त्यांच्यापेक्षा कमी क्रिडेन्शिअल्स असणार्‍यांचा उद्धार करणं , लायकी काढणं हे नकोय.व्हॉटसअॅपचा प्रॉब्लेम असा आहे की काही आक्षेपार्ह,अयोग्य भाषेतला मेसेज आला तर तो पाठवणाराच डिलीट करु शकतो.अॅडमिनला इतरांचे मेसेज डिलीट करता येत नाहीत.

या लोकांना अशाप्रकारे वागू नका असे काही सांगायला गेलं की आपण कशी महाग दारु पितो आणि ती आपण स्वकमाईतून पितो, तुमचे क्रिडेन्शिअल्स काय? तुमचं शिक्षण काय? काय दर्जा तुमच्या शिक्षणाचा? तुमचा पगार किती वगैरे प्रश्न विचारुन गप्प करण्याचे प्रयत्न होतात.

असंही नाही की दरवेळी यांचंच चालतं.काहीवेळा या 'क्ष' ला त्याच्याइतकीच किंवा जास्तच क्रिडेन्शिअल्स असणारा तुल्यबळ 'य' देखील भेटतो.तो यांची व्यवस्थित भादरतो. मग अशावेळी हे ग्रुप सोडून पळून जातात किंवा आपला इथे कसा अपमान केला जातो वगैरे कांगावे करत बसतात.थोडावेळ त्या त्रासदायक 'क्ष' ला चांगला शाब्दिक मार मिळाल्याचा आनंद यांचा त्रास भोगलेल्या इतरांना मिळाला तरी हा वाद पुढे चालूच राहिल्यास त्यातून समुहाचे वातावरण खराब होऊ शकते.किंवा अजून काही समुहबाह्य नुकसानही होऊ शकते.दुसर्‍या ग्रुपात जाऊन सूड घेणे वगैरे होऊ शकते.

हे लोक AA सारख्या ठिकाणी गेल्यानंतर १००% बरेच होतील अशी शक्यता नसते.कारण AA दारुपासून लांब रहायला मदत करते.पण ज्यामुळे यांना तुडूंब पिण्याचं व्यसन लागलं ती कारणे AA बदलू शकत नाही, मनातून काढू शकत नाही किंवा तो भुतकाळ बदलू शकत नाही.हे काम मानसोपचारतज्ज्ञ चांगल्या प्रकारे करु शकतात.

यावर काही उपाय आहे का? कसं वागावं या लोकांशी? पुन्हा लिहितो की आम्हाला त्यांच्याशी ते ज्या विषयातले तज्ञ/जाणकार आहेत त्या विषयासंबंधी बोलण्यात इंटरेस्ट आहे. ते कोणती दारु पितात, ते इतकी का पितात , प्यावी की न प्यावी या विषयांमधे अजिबात स्वारस्य नाही.यांच्या त्रासामुळे यांना त्यांच्याच शब्दात फाडकन ,शेलकं बोलून अपमान करणं फारसं अवघड नाहीये.पण ते शक्यतो टाळता येईल का हे पहायचे आहे.

तुमचे विसंवादी असणे खटकते; सुसंवाद करायला शिका हे त्यांना न दुखावता तरीही स्पष्टपणे सांगता येणे शक्य आहे का? _/\_

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

(हे खूप बोट्चेपं वाटेल )
त्या तरुण मुलांना बाहेरच्या जगात, नोकरीतही असे एस ओ बी भेटणारच आहेत. व्हॉटसप मेसेज वरचे उपदेश का मनाला लावून घ्यावे? स्पेशली ते काहीतरी वेगळ्या गंडातून येतायत हे सर्वांना स्पष्ट माहित असताना. तुम्हाला (म्हणजे ग्रुप ला) या अद्वा तद्वा बोलणार्‍यांचे ज्ञानही हवेय.ते सोडूनही जायला नकोयत.
अश्या बोलण्याच्या रिसीव्हींग बाजूला जो असतो त्याला पब्लिक चा अप्रत्यक्ष आधार आणि पाठींबा मिळतो. याचा दूर भविष्यात फायदा होईल असे वाटते.

अनु यांच्याशी सहमत..
आणि असं कोणी सांगितलं कि दारू पिणारेचं असं बोलतात? न दारू पिणारे, इतर स्त्रिया ही असं बोलतातचं कि... आम्ही यावं केलं नी त्याव केली... तुम्हाला बरं आयता मिळतंय.. सगळीकडे आहे असं.
ही मानसिकता आहे, हा एक समाज आहे. हे बदलन अवघड आहे.
असे न बोलणारे खुप कमी असतात.. दारू पिण्याशी काहीही संबंध नाही.

तरुण मुलांनी एवढं लागून घेऊ नये, घेत ही नसतील. यांची बडबड ऐकन्यापेक्षा ग्रुप सोडलेला बरा.
ज्ञान मिळवण्याची साधने कमी नाहीत..

थोडीशी टाकली की आपण कसे ग्रेट आहोत हे सांगायचा अनुभव अतिशय कॉमन आहे. हे ग्रेटपण सांगताना इतरांना तुच्छ लेखणे हे आलेच.

तुमचे विसंवादी असणे खटकते; सुसंवाद करायला शिका हे त्यांना न दुखावता तरीही स्पष्टपणे सांगता येणे शक्य आहे का? >>
नशेत नसताना सांगितले तर एकवेळ मान्य करतीलही. पण घेतली की करायचे तेच करतील.

आणि घेणे कमी करा बंद करा सांगून फायदा नाही. कारण आता त्यावर त्यांचा ताबा राहिला नाही असे दिसतंय.

अंमली पदार्थात जगभरात सर्वात जास्त उदो उदो झालेला आणि सर्वात जास्त समर्थन होत असणारा पदार्थ म्हणजे दारू. दारू विनाकारण बदनाम आहे असे म्हणणे हे त्याचेच उदाहरण. त्यामुळे दारू हा आता आपला प्रॉब्लेम झालाय हे मान्य करणेही विरळाच.

तेव्हा त्यांच्याकडुन हवी असलेली माहिती मिळण्यास संध्याकाळ नंतरच्या गोंधळाकडे दुर्लक्ष करायचे किंवा नाही हे ठरवून निर्णय घ्यावा.

मद्यपान करणारयांना नेहमी सहानुभुतीच द्यावी

तरी जिव्हारी बोलत असतील आणि त्याचा बदलाच घ्यायचा असेल तर त्यांच्या हो ला हो मिळवावे, त्यांची आणखी स्तुती करावी. त्यांच्यातील अहंकाराला आणखी खतपणी घालावे. मग तोच त्यांचा विनाश करेल Happy

पण नका करू असे
सहानुभुतीच द्या
कारण दारू हे एक असे पेय आहे जे तुमच्या मेण्दूवर ताबा मिळवते आणि तुम्हाला आपल्या तालावर नाचवते.
तर ते नाही बोलत त्यांची दारू बोलत असते.

@mi_anu
हे सुद्धा खरंय.ही बाजू विचारात घेतली नव्हती.आभार्स!!

@shitalkrishna
तुमचा अशा फुल टाईट लोकांशी आंजावर कधी सामना झालाय की माहित नाही.पण आमच्यासाठी हे नित्याचेच झाले आहे. सामान्य न पिणारे उद्धट हे त्यांच्या बोलण्यातले दोष दाखवल्यावर कदाचित नरमतीलही.पण हे तुडूंब पिणारे पिल्यावर एकाच उद्देशाने प्रेरीत होतात. "मला हवं तसं या जगात घडत नाहीये,मला याचा राग आलाय आणि मला बोलायचंय" मग हे करताना आपला मुद्दा वास्तवाला धरुन आहे का याचा विचार न करता भडाभडा गरळ अोकत राहतात.

@मानव पृथ्वीकर
मी आता एक अलिखित नियमच केला आहे.असे तुडूंब पिणारे कितीही ज्ञानी असोत.ते नसल्यामुळे कितीही नुकसान झाले तरी चालेल.त्यांचा तोल सुटला की आपण त्यांचा नं Remove करणे.यामुळे ग्रुपातले त्यांचे काही सपोर्टर चिडतातही.पण त्याकडे दुर्लक्ष करण्याचे ठरवले आहे.

@ऋन्मेऽऽष
छान! म्हणजे सुधरायचं ते शुद्धीत असणार्‍यांनीच? टाईट असणारे दंगा करायला मोकळे?? वर सहानुभूती द्यायची?

कसलं एवढं ज्ञान आहे त्यांच्याकडे?
ज्यांना ज्ञान घ्यायचे त्यांनी घ्यावे. बाकी ज्याना, तरुणांना अपमान उध्धट बोलणं पटत नाही त्यांनी ग्रुप सोडावा.

मुंबईत अल्कोहोल अनोनिमस म्हणून संस्था आहे

डॉ अनिल अवचतांचीही पुण्यात आहे , त्यांची मदत घ्या

http://www.aagsoindia.org/

पण तुमचा प्रश्न एकदम भिन्न आहे , मला पूर्ण नीट वाचल्यावर समजले,

अशा लोकांचा उद्धटपणा कमी होऊ शकत नाही , गरज असेल तरच अशा लोकांशी संबमध ठेवा

असे उद्धट लोक आमच्या डॉकटर ग्रुप मध्येही आहेत , सगळे एकाच कॉलेजचे , पण ज्यांना एम डी मिळाली ते लोक , आम्ही एम डी करत असताना कसे राबत होतो व तू नुसता MBBS असल्याने आमच्या पेक्षा कसे कष्ट कमी घेतलेस , हे बोलत रहातात , कोणत्याही मुद्द्यावर बोलले तरी. दारू पिणारे नसले तरीही ते असे बोलतात.

त्यांच्याशी बोलू नये , त्यांच्या शिवाय सूर्य उगवणार नसतो , असे काही नाही

नशा शराब मे होता तो नाचती बोतल
किसीं को हुसन का नशा है किसीं को इष्क का
नशे मे कौन नही है ये बताओ जरा

स्वतः मद्यपी AA कडे गेला तर उपयोग, दुसऱ्यांनी तक्रार करून काहीच फायदा नाही, ते म्हणतील त्यांना इकडे घेऊन या.

नशा शराब मे होता तो नाचती बोतल
>>> जहर KCN मे होता तो मर जाती बोतल?