रिया-राणावत

Submitted by Asu on 9 September, 2020 - 23:45

रिया-राणावत

कोण रिया, सुशांत प्रिया!
कोण कंगना राणावत?
भारतासम महान देशी
अस्तित्व त्यांचे कणागत
राईचा मिळून पर्वत करती
माध्यमे आपली अति महान
रोज दळण दळून ठरविती
कोण मोठा कोण लहान

प्रश्न त्यांचे अति वैयक्तिक
सोडवतील यंत्रणा संयुक्तिक
न्यायालयाचा न्याय निर्विवाद
उगाच चर्चा वादविवाद!
प्रश्न जगण्याचे झाले लहान
रिया राणावत त्याहून महान

रोज हजारो लाखो मरती
नाही कुणास त्याची जाण
कोरोना ना कुठे दिसतो
मोकळे झाले सारे रान
कोव्हिड पळतो चित्यापायी
नाही कुणास त्याचे भान
घास घेईल उद्या कुणाचा
पकडेल हा कुणाची मान

बेड, ऑक्सिजन, व्हेंटीलेटर
भकास झाली कोव्हिड सेंटर
छळछावण्यांचा नवा अवतार
रक्षण जनतेचे कोण करणार?
शिळ्या पोळ्या भाजीत अळ्या
उपचारा ना इंजेक्शन गोळ्या
दोन पायांनी भरती होती
चार पायांनीच बाहेर येती
सांगू कुणा ही दर्द कहाणी
जगणे झाले आणीबाणी
जीव असेल तर रोज ऐकू
रिया राणावत कर्मकहाणी

खाजगीचे हे राजकारण
जाळ पेटविते विनाकारण
वेडे बनवून पेढे खाती
खाली कटोरी जनतेहाती
अति झाले अन् हसू आले
कोरोनाचे तर भयच गेले
मास्क मुखावर, गळा आले
सोशल अंतर छू मंतर झाले
कोण दोषी कोण निर्दोष
काळच ठरवील खरेखोटे
रिया राणावत वा कोरोना
कुणीही नाही त्याहून मोठे
तरीही...
कोण रिया, सुशांत प्रिया!
कोण कंगना राणावत?
कुणासही नव्हते माहित
माहित झाले नावांसहित

-प्रा.अरूण सु.पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
(दि.09.09.2020)
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

खाजगीचे हे राजकारण
जाळ पेटविते विनाकारण
वेडे बनवून पेढे खाती
खाली कटोरी जनतेहाती
अति झाले अन् हसू आले
कोरोनाचे तर भयच गेले >>>>> जबरदस्त !

दोन पायांनी भरती होती
चार पायांनीच बाहेर येती
सांगू कुणा ही दर्द कहाणी
जगणे झाले आणीबाणी
जीव असेल तर रोज ऐकू
रिया राणावत कर्मकहाणी

खरच आहे. परिस्थितीचे भान कोणालाच राहिले नाही.

रसिकाजनहो,
आपणा सर्वांच्या अभ्यासपूर्ण प्रतिक्रियांबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
फक्त एवढंच म्हणेन-
लोभ असावा सदा आपुला
प्रेमाचा फक्त कवी भुकेला
अस्तित्व माझे तुमच्या पायी
प्रेम असावे एक दुजा पाई
-असु