चिऊताईचं घर होतं......

Submitted by टोच्या on 8 September, 2020 - 03:15

दर पावसाळ्यात पाऊस पाहुणा बनून गॅलरीत अवतरतो. झाडांच्या कुंड्यांना अंघोळी घालून अनेकदा गॅलरीतून हॉलमध्ये डोकावण्याचा प्रयत्न करतो. कुंड्यांमधील मातीबरोबर युती करून तो गॅलरीत यथेच्छ चिखलफेक करून मोकळा होतो. मग, चिकचिक… चिडचिड…! हे टाळण्यासाठी काही दिवसांपूर्वी गॅलरीला बारदाण लावून त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. पण, पाऊस नसला की मग हवाही आत यायला नाक मुरडायची. परस्पर बारदाण्याला शिवून निघून जायची. मग, ठरलं असं की बारदाण्याचा थेटरातील पडद्यासारखा वापर करायचा. पाऊस आला की पडदा खाली पाडायचा, इतर वेळी तो गुंडाळी करून वरच्या बाजूला बांधून ठेवायचा. गेल्या दीडेक महिन्यापासून हे सुरू होतं. मध्ये पाऊस जरासा रुसला. सात-आठ दिवस तोंडच दाखवेना. साहजिक पडदा पडायलाही मुहूर्त मिळण्याचे कारणच नव्हते. पण, आगंतुक पाहुण्याला रोखण्यासाठी केलेल्या पडद्यानेच दुसऱ्या एका आगंतुक कुटुंबाला पाचारण केलं.  

हे कुटुंब होतं चिमणा-चिमणीचं. गुंडाळी केलेल्या बारदाणाच्या एका बाजूच्या गोलाकार भागाची दोघांनी दोन दिवस पाहणी केली. आम्हाला वाटलं यांना घराची आवश्यकता आहे. तसेही आमच्याकडे मुके पाहुणे अनेक आहेत. गॅलरीतच लव्हबर्डसचा किलबिलाट दिवसभर सुरू असतो. इतरही वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी खिडकीच्या तावदानात आपली छबी पाहण्यासाठी येत असतात. आमच्याकडची अशी पंखांवाल्या पाहुण्यांची वर्दळ पाहून चिमणा-चिमणीने थेट चौथ्या मजल्याच्या गॅलरीपर्यंत येण्याचं धाडस केलं. खरंतर गेल्या वर्षभरापासून चिमण्यांसाठी प्लास्टिकचं घर केलं होतं, त्यात दाणे-पाणीही ठेवलं होतं, पण एक चिमणी तिकडे फिरकली नाही.  

कित्येक महिन्यांनंतर चिमण्यांची लगबग दिसल्याने आमचा आनंद गगनात मावेना! मग, घाईगडबडीत घरातील एक बॉक्स घेतला. त्याला दोन-तीन ठिकाणी गोलाकार छिद्रे पाडली. आतमध्ये मऊसूत कापूस ठेवला. काही गवताच्या काड्याही ठेवल्या. सगळ्यांना वाटलं, रात्रीतून किंवा सकाळी तरी चिमण्या त्यात येतील. कसचं काय? आयत्या घरात यायला ती माणसं थोडीच आहेत? त्यांना त्यांच्या चोचीवरच जास्त विश्वास. रोज एकएक काडी घेऊन येत चिमणा-चिमणी आणि त्यांच्याच नात्यातील एखाद-दोन चिमणी त्यांना मदत करायची. चार-पाच दिवस हे सुरू होतं. एक दिवस सहज कॅमेऱ्याने आत फोटो काढला तर सुतळ्या, गवत, दोऱ्या काय काय साधनांचा वापर करून सुरेख गोलाकार मऊसूत जागा बनविलेली. म्हटलं आता तर घर बनवलंय, कधीतरी चिमणी अंडी देईल, त्यानंतर काही दिवसांनी त्यातून पिले बाहेर येतील. बराच वेळ लागेल. पण, चार दिवसांपूर्वी अचानक तीच चिमणी ‘झीरो फिगर’ झालेली दिसली. पूर्ण भिजून पंख फेंदारलेले, थकवा आल्यासारखा तिचा एकंदरीत अवतार. चोचीत एक अळी घेऊन आलेली. अरेच्चा… ही अळी कोणाला घेऊन आली, असा विचार करतो तोवर गोलाकार बारदाणातून नाजूकशी पिवळी चोच बाहेर आली आणि चिऊताईने तिच्यात घास भरवलादेखील!!! घरटेही बांधले, अंडी दिली आणि पिल्लेही बाहेर निघाली. निसर्गाची डेडलाइन कशी कळते ना प्रत्येक प्राण्याला. त्या वेळेत घरटे बांधून झालेच पाहिजे. आणि किती ती निगुती. लहानपणी ऐकलेल्या गोष्टीसारखी. चिऊताईचं घर होतं मेणाचं. म्हणजे अगदी सुव्यवस्थित. पिल्लाला खाऊ घातल्यानंतरही बाहेर येऊन प्रत्येक वेळी दोरीवर आडवी तिडवी घासून चोच साफ केल्याशिवाय ती तेथून उडत नसायची. किती तो टापटीपपणा! अगदी त्या लहानपणीच्या गोष्टीत ऐकल्याप्रमाणे ‘थांब माझ्या बाळाला अंघोळ घालू दे’, ‘तीट काढू दे’ सारखी चिऊताईची लगबग होती.   

आधी वाटलं एकच पिल्लू आहे. दोन-तीन दिवस एकच चोच दिसायची. पण हळूहळू कळलं, दोन आहेत. आणि या पिल्लांना पोसण्याची जबाबदारी एकट्या चिऊताईची नाही बरं! आख्खं कुटुंबच या सरबराईत गुंतलं होतं...दोन चिमणे आणि दोन चिमण्या या पिल्लांना चिमणचारा भरवत. डेडलाइन पाळणं चिमण्यांकडून शिकावं. आपल्या कामात जराही चुकारपणा करीत नाहीत, की ‘हे मी का करू?’ वगैरे तक्रार नाही. प्रत्येकजण आपापली जबाबदारी पार पाडतोय. दर चार-पाच मिनिटाला कधी चिमणा तर कधी चिमणी तोंडात अळी घेऊन येतो आणि आतमध्ये जाऊन पिल्लांना भरवत. चिमणी आली की काय ती पिल्लांची बारीक चिवचिव… आख्खं घरटं डोक्यावर घेत. चोचीत अळी मिळाली की मग आवाज बंद होई. इकडे पिंजऱ्यातील लव्हबर्डसही त्यांच्या गलबल्याने गलका व्हायचा. चिमणी पिल्लांना भरवेपर्यंत चिमणा घराबाहेरच्या दोरीवर बसून राखण करीत राही.  

हे सगळं गोडगुलाबी चित्र पाहत असतानाच अचानक एक दिवस मनात आलं… ही पिल्लं जराशी मोठी झाली आणि बाहेर येण्याचा प्रयत्न केला तर? तर थेट चौथ्या मजल्यावरून खालीच… नाहीतर थेट गॅलरीत. बरं आमचा बोक्या तेथे कायम गॅलरीत येणाऱ्या कबुतरांवर डाव धरून बसलेला असतो. त्याच्या ती कधीच हाती येत नाहीत, हा भाग वेगळा. नाही म्हणायला एकदा त्याने टेरेसवरून एक कबुतर मानगुटीला पकडून थेट किचनमध्ये आणलं आणि बेडरुममध्ये जाऊन खाण्याच्या विचारात होता. तासाभराच्या प्रयत्नानंतर त्याच्या तोंडून ते सोडविण्यात आमच्या आम्हाला यश आलं. कबुतर वाचलं आणि उडून गेलं. तेव्हापासून किट्ट्याने शिकारीचा नाद सोडला. आताही तो चिमण्या, लव्हबर्डसकडे पाहत राहतो. पण, त्यांच्यापर्यंत तो पोहचू शकत नाही. असो. इतक्या कडेला घरटं केलेलं. करायचं काय? पिल्लांना हात लावला, ते तेथून हलवले तर चिमणी पुन्हा तेथे येणार नाही, अशी भीती. मग, तेथेच खाली एक शाल अशा पद्धतीने बांधली की पिल्लं खाली जरी पडली तरी ती अलगद त्यात झेलली जातील. पण, शाल बांधल्यानंतर चिमणा-चिमणी तेथील बदल पाहून येतील की नाही, ही शंका होती. ती खोटी ठरली.  ते आले. आधी थोडे गडबडले. पण, नंतर त्यांनी शाल अॅडजेस्ट केली. हे घरटं बनण्यापूर्वी आम्ही गॅलरीला लोखंडी ग्रील बनवायला टाकलेलं आहे. ते बनवूनही झालंय. पण, चिमणीच्या संसारात, तिच्या आईपणाच्या आनंदात अडथळा येऊ नये म्हणून ते बसविणं जरा थांबवलंय.  

चिमणीचं आयुष्य किती असतं माहिती नव्हतं. असं वाटलं पिल्लांना पंख फुटायला किमान महिनाभर तरी लागेल आणि तोपर्यंत ते घरट्यात दडून राहतील. पण कसचं काय? चौथ्या दिवशी एक पिल्लू थेट बाहेर धुणं वाळत टाकण्याच्या दोरीवर येऊन बसलं आणि इवल्या इवल्या पंखांना आळोखे पिळोखे देऊन चोचीने साफ करू लागलं. आम्हाला वाटलं बाहेरचं पिल्लू आलंय की काय?  पण चिमणा-चिमणी आले आणि त्यांनी चोचीत आणलेल्या अळ्या त्या पिल्लाला भरवल्या. पिल्लू बाहेर आल्याचा जितका आनंद झाला तितकीच भीतीही वाटली. कारण ते थोडंफार उडू लागलं होतं. चुकून गॅलरीत पडलं तर…? बोक्याला एक क्षणही लागणार नाही त्याच्यावर झडप मारायला. त्याला पकडून पुन्हा घरट्यात ठेवलं. एक दिवस घरट्यातून त्याने चारा खाल्ला. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा कालचं पिल्लू दोरीवर दिसलंच, पण दुसरंही इवलंसं पिल्लू त्याच्या मागे घरट्याच्या दारात येऊन बसलं होतं. आता दोन्हींची भीती होती. थोडा वेळ गेला आणि पहिल्या पिल्लानं जे पंख फडफडवले ते थेट टेरेसवर जाऊन बसलं. तिसऱ्यांदा त्याने थेट भरारी घेतली आणि समोरच्या झाडांमध्ये गायब झाले. चार दिवसांतच पिल्लू ‘आत्मनिर्भर’ झालं होतं. चिमणा चिमणी आले. त्यांना पहिलं पिल्लू काही दिसलं नाही. पण दुसऱ्या पिल्लाला ते भरवत होते. आता दुसऱ्या पिल्लाची काळजी होती. पण, जे होऊ नये तेच झालं. अचानक त्याने पंख फडफडवले आणि थेट गॅलरीत पडलं. नशीब, बोक्या तेथे नव्हता. मी पटकन ते उचललं आणि घरट्यात अलगद ठेवलं. पण शांत बसेल ते पिल्लू कसलं? दुपारी घरातले सगळे लोक वेगवेगळ्या कामात मग्न असताना ते खाली पडलं आणि हाय रे दैवा! ज्याची भीती होती, तेच घडलं. क्षणार्धात बोक्याने त्याच्यावर झडप मारली. इवलंसं पिल्लू. सोडवावं कसं? किट्टू त्याला घेऊन बेडरुममध्ये त्याच्या जागेवर गेला. त्याने पिल्लू तोंडातून खाली ठेवायचा उशीर दुसऱ्याच क्षणी ते पिल्लू उचलून आम्ही बाजूला केलं. जिवंत होतं. हालचाल करीत होतं. जखम झालेली दिसली नाही. हुश्श… म्हटलं चला. बिचारं वाचलं. पुन्हा त्याला घरट्यात आतमध्ये ठेवून दिलं. म्हटलं सकाळपर्यंत पुन्हा चिवचिव करू लागेल. सकाळ झाली पण नेहमीची चिवचिव ऐकू आली नाही. चिमणा-चिमणी तोंडात अळ्या, भात घेऊन दोरीवर येऊन बसले पण त्यांना पिल्लाचा रिस्पॉन्स मिळेना. तीन चार वेळा त्या चिमण्यांनी चारा आणला पण, उपयोग झाला नाही. मग त्यांची चलबिचल सुरू झाली. आख्खं कुटुंब जमलं, दोन चिमणे, दोन चिमण्या. तास-दोन तास तेथेच बसून होते. इकडून बघ, तिकडून बघ. पण चिवचिव काही ऐकू येईना. चिमण्याने घरट्यात जाऊन पाहिलं, पण त्याला रिस्पॉन्स येईना. मग मी घरट्यात हात घालून पिल्लू बाहेर काढून पाहिलं तर ते निस्तेज, निष्प्राण झालं होतं. कवीवर्य ना. वा. टिळक यांच्या कवितेच्या ओळींची प्रचिती आली‘ मातीत ते पसरले, अतिरम्य पंख, केले वरी उदर पांडुर निष्कलंक, चंचू तशीच उघडी, पग लांबविले, निष्प्राण देह पडला, श्रमही निमाले’. त्याचं निस्तेज कलेवर पाहून सगळ्यांना खूप वाईट वाटलं. मुलांना रडू आलं. स्वत:वर चीड आली. बोक्याचा राग आला. पण त्याची तरी काय चूक? सर्वतोपरी काळजी घेऊनही ते खाली पडलं. चिमणा-चिमणीचीही चूक नव्हती. त्यांनी बारदाण्यात आतमध्ये सुरक्षित घरटं केलं होतं. पण पिल्लाने भरारी घेण्याच्या नादात थेट खाली उडी मारली. त्याला तरी काय माहिती होतं, आपला काळ पुढे टपून बसलेला असेल?  

दिवसभर चारही चिमण्या घरट्याच्या आसपास बसून राहिल्या. इकडून तिकडून फिरत राहिल्या. पिल्लू मेल्याचं पाहून आणखी एका जोडप्याने तेथे येत घरट्यावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला. पण या चिमण्यांनी त्यांना पिटाळून लावले. तीन-चार दिवस चिमण्या येत होत्या. सवयीने तोंडात अळ्या घेऊन यायच्या, पण येथे आल्यानंतर त्यांचा हिरमोड व्हायचा. शेवटी बारदाणातलं घरटं काढून जवळच्या कृत्रिम घरात ठेवलं आणि बारदाण खाली सोडलं. तेव्हा त्यांनी वस्तुस्थिती स्वीकारली. त्यानंतर दोन दिवस प्रचंड पाऊस झाला. त्यामुळे बारदाण सोडून त्याचा पडदा केला. पण, गेल्या दोन दिवसांपासून पाऊस कमी झाल्यामुळे बारदाणाची पुन्हा वळकटी करून ठेवली आहे. आणि हो…आता चिमण्यांच्या आणखी दोन जोडप्यांनी फेऱ्या सुरू केल्या आहेत. दोघांनी जागाही निश्चित केल्या आहेत. दोन्ही जोडपी घर बांधायच्या तयारीत दिसताहेत… बघू या पुढे काय होतं ते!  

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किती गोड.. Happy
पुढे काय झालं त्याचे update द्या इथे नक्की

किती निरागस लिहिलय..आवडले..
लहानपणी घराच्या बाल्कनीत किती चिमण्या यायच्या.. चिवचिवाट असायचा नुसता..
आता मुलांना दाखवायला कधीची वाट बघतेय, एकही चिमणी दिसली नाही अजून..
माझ्या घराच्या समोरच नारळाची तीन-चार झाडं आहेत. त्यातल्या एका झाडाच्या ढोलीत आधी पोपट राहायचे, एके दिवशी पाहिले तर घुबड दिसले,3-4 महिने होते ते तिथे मग ते पण गेले..आता साळुंक्या जाऊन बसतात..
दुसऱ्या नारळाच्या झाडावर मधमाश्यांनी मोठे पोळे तयार केले होतं.जोरदार वार्याने एके दिवशी ते पोळे खाली पडले.
मधमाशा हि गेल्या.

लहानपणी गावात अंगणात, आजबाजूच्या फुलझाडांवर, मोठ्या वृक्षांवर पोपट, कावळे, चिमण्या, मैना, मटमट्या, असे विविध पक्षी, खारूताई, सरडे, घोरपड, गवतावर फुलपाखरे
आणि पक्षी पकडता येईल या आशेने धावणारी कुत्री' मांजरी आणि आम्ही लहान पोरे सगळ्यांचा धुमाकूळ, घरटी शोधायची, पिल्ल शोधायची पक्षी पिल्लांना भरवणखरू

मानव पृथ्वीकर, मृणाली, प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
का कुणास ठाऊक, पण इतर कोणत्याही पक्षापेक्षा चिमणी सगळ्यांना आपलीशी, हवीशी वाटते.

मस्त वाटले वाचून.
आमच्याही टेरेस गार्डन मध्ये गेली 3-4वर्षे शिंपी पक्षी घरटे बनवतो. दरवर्षी तोच येतो का वेगवेगळे असतात, काय माहिती !पण माझ्या मुलाने त्याचे नाव चिंटू चिंगी ठेवले आहे. किती कौशल्याने घरटे विणतात, त्यासाठी कसे सामान जमवतात, हे सर्व पाहण्यासारखे असते. छोटी छोटी बोरा एवढी गुलाबी अंडी घालतात. इतके नाजूक घरटे असते, की जवळपास लटकत च असते. (त्यामुळे बोलीभाषेत त्या पक्ष्याला "लटक्या "म्हणतात, ही माहिती मला कालच मिळाली आहे. )जोराचा वारा आला, की त्याबरोबर घरटेही हलत असते. अंड्यांच्या काळजीने आमचा जीव खालीवर होत असतो.. पिल्ले उडून जाईपर्यंत आम्ही काळजीवाहू पालक बनतो मग..रोज लक्ष ठेवतो, घरात त्याचीच चर्चा चालते रोज.. काही दिवसांनी उडून जातात पिल्ले, तेव्हा जिव्हाळ्याचे पाहुणे आपापल्या गावी परतल्यावर घर जसे सुने सुने वाटायला लागते, तसे होऊन जाते काही दिवस आम्हाला.
दरवर्षी च्या त्या रिकाम्या घरट्यांनी स्वतःची कॉलर tight करतो आम्ही, आपल्या घरी पक्षी घरटे बनवतात, आपल्यावर विश्वास ठेवतात, याचा अर्थ आपण चांगले माणूस आहोत, असे उगाचच डोक्यात विचार येतात. स्वतः च स्वतः चे कौतुक करून घेतो आम्ही तिघे. मजा असते सगळी.

नादिशा, आपण चांगले आहोत म्हणूनच तर ते येतात हे खरंच आहे. नाहीतर अनेक लोक पक्षी गॅलरी घाण करतात म्हणून जाळ्या बसवतात किंवा त्यांना हुसकावून लावतात. आमच्या जवळच्या एका सोसायटीच्या टेरेसवर एका महिलेने कबुतर जाळ्यात पकडून त्याला मारून खाल्ल्याचं माझ्या मुलांनी पाहिलं होतं. असेही लोक असतात.
वावे, प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

छान लिहिलंय, पुढच्या जोडप्याचे ही अपडेट द्या. जमल्यास एखादा फोटो ही टाका. बिचारं पिल्लू. माझ्याकडेही ह्याची एक आठवण आहे. लिहिते.

आमच्या garden मध्ये केलेले शिंपी पक्ष्याच्या घरट्याचे फोटो

6e8d6820-b142-4c15-a255-b1167a3f58a8.jpg502a1c36-5eb6-4d32-9238-3869d06583eb.jpg732dabe8-adff-49d4-9f24-a308994c7299.jpge74f707c-f76e-4673-b063-f7d51ccaac9f.jpg

आम्ही एवढे उत्सुकतेने रोज सकाळ -संध्याकाळ लक्ष ठेवून होतो, की पिल्ले कधी बाहेर येतील...
पण काल जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. त्यामध्ये चिंटू चे घरटे तुटून गेले. अंडी पण खाली पडून फुटून झाली. काहीच करू शकलो नाही आम्ही हळहळण्याशिवाय.

अजून एक चिमणीसारखा, पण थोडा आकाराने मोठा पक्षी कायम येतो आमच्याकडे. तपकिरी रंग असतो त्याचा. त्याने मागच्या वर्षी केलेल्या घरट्याचा फोटो.

47a10389-924e-4ad6-8f56-54cbbb1ba87a.jpg

छान लिहिलंय.
चिमणीच्या पिल्लाला घरट्यात इतर चिमण्या पण भरवतात हे पहिल्यांदाच ऐकलं. अद्भुतच.

@नादिशा
ते घरटं राखी वटवट्याचं वाटतंय

घरात, बागेत पक्ष्यांनी यावं, गावं, घरटी मांडावीत यासारखं सुख नाही.

तुम्ही सारे नशीबवान आहात.

अरिष्टनेमी, प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
आम्हीही पहिल्यांदाच पाहिलं. आता नवीन दोन जोडपी आलीयेत त्यांचं एकमेकांशी अजिबात जमत नाही, अगदी एकमेकाला पाण्यात पाहणारे शेजारी. दोघांनी दोन टोकांना त्याच वळकटीत घरं करायला सुरुवात केली आहे. त्यात एका जोडप्यातील चिमणाचिमणीचे आपसातच भांडणं सुरू असतात नवरा बायकोसारखे. आम्ही त्यांच्यासाठी सुतळी, दोरे, काड्या असं काहीबाही जवळपास टाकतो, जेणेकरून त्यांना घरट्याचं मटेरियल शोधायला लांब जावं लागू नये. बिचारा चिमणा या सुतळ्या, काड्या घेऊन वळकटीत ठेवतो, दुसर्‍याच क्षणी चिमणी त्याच्यावर डाफरते नि त्याने मध्ये नेलेली सुतळी लगेच बाहेर फेकून देते. कितीतरी वेळा असं होतं. बहुधा फारच स्वाभिमानी असावी. माणसांत आणि पक्ष्यांच्या भावभावनांतही बरंच साम्य असल्याचं आम्ही सध्या अनुभवतोय. मजा येते.

बिचारा चिमणा या सुतळ्या, काड्या घेऊन वळकटीत ठेवतो, दुसर्‍याच क्षणी चिमणी त्याच्यावर डाफरते नि त्याने मध्ये नेलेली सुतळी लगेच बाहेर फेकून देते. >> Very interesting!

टोच्या, आम्हीही असेच करतो. एखादा पक्षी साहित्य गोळा करतोय, असे दिसले , की सुतळ्या, कापूस ,सुकलेल्या काड्या, लोकरीचे तुकडे अशा गोष्टी त्यांना सहज दिसतील अशा टाकून ठेवतो. बरोब्बर घेऊन जातात ते.
गणपतीच्या 11दिवसातले निर्माल्य, कापसाची वात, जानवे, कार्पसवस्त्र घराच्या आजूबाजूला टाकतो. पक्षी बरोब्बर घेऊन जातात.