Still Life

Submitted by कविन on 5 September, 2020 - 02:40

राहूल पे अटेंशन! सरांनी हातातला खडू मारून मला जागं केलं तेव्हा सगळा वर्ग माझ्याकडे बघून हसत होता.

ओ गॉश! मी आज एलिमेंटरीच्या क्लासमधे झोपलो? व्हॉट इज रॉंग विथ मी याऽऽर"

उभा रहा आणि सांग मी फळ्यावर काय लिहीलय? सरांनी मला विचारलं

"परस्पेक्टीव्ह" मी बोर्डवर लिहीलेलं वाचून दाखवलं

“करेक्ट. आता म्हणजे काय ते सांग”

मी म्हंटलं, "परस्पेक्टिव्ह मिन्स पॉ‌ईंट ऑफ व्ह्यु”

“ओके. बट हॉ‌ऊ इज इट रिलेटेड इन ड्रॉईंग??”

या प्रश्नाचं उत्तर मला येत नव्हतं. मी मान खाली घातली

सगळा वर्ग माझ्याकडे बघत होता. स्पेशली त्या जा‌ई आणि तिच्या चमच्यांना तर एकदम आनंद झालेला मला बोलणी खावी लागल्याचा.

“पुन्हा एकदा एक्स्प्लेन करतो लक्ष देऊन ऐक आता, It is the art of representing three dimensional objects on a two dimensional surface so as to give the right impression of their height, width, depth and position in relation to each other. It is representation of an image as it is seen by the eye. So basically its looking through. काय कळतय का आता? “

मी उगाचच हो म्हणून मान हलवली आणि खाली बसलो. एकतर इतकं एम्बॅरेसिंग वाटत होतं. कालच्या सारखाच आजचाही दिवस खराब जाणार होता बहुतेक.
काल सकाळी मी गणिताचं पुस्तक घ्यायला डायनिंग टेबलवरुन उठलो तेव्हाच नेमकी किचनमधे आई आणि आजीची वादावादी सुरू झाली. मी आपला एकदम फ़्रीझ झाल्यासारखा तिथेच उभा राहिलो.
आमचं डायनिंग टेबल किचनच्या समोरच्या पॅसेज मधे आहे. भिंतीकडे पाठ करुन बसलं की समोर किचनमधे काम करत असलेली आई पण दिसते आणि उजव्या हाताला हॉलमधे सॉफ्यावर बसलेला बाबाही दिसतो.

त्या दोघींचा आवाज वाढला म्हणून बाबापण पॅसेजमधे आला. मला मधेच उभं राहिलेलं पाहून तो माझ्यावरच ओरडला. मी पटकन पुस्तक घेऊन बेडरुममधे गेलो. एरव्ही मला डायनिंग टेबलवरच अभ्यास करायला आवडतं. मी मुकाट आकडे गिरमीटत बसलेलो पण एकही गणित डोक्यात शिरत नव्हतं.

बराच वेळाने बाबा आत आला. पिसी ऑन करुन 'फ़्रिडम फ़ायटर' खेळायला लागला. "स्साला! या गेमचं एक बरं असतं याचे कंट्रोल्स आपल्या हातात असतात" हे वाक्य बाबाच्या तोंडून बाहेर आलं आणि आ‌ई तेव्हाच पॅसेजमधून धुतलेले मोजे, रुमाल घे‌ऊन आत आली. तिने असला खतरा जळजळीत लूक दिला बाबाला. त्याने लगेच गेम पॉज करुन तिच्या हातातून कपडे घेतले. बाबाच्या उजव्या हाताला असलेल्या अटॅच्ड बाथरुममधे आ‌ई गेली तितक्यात बाबाने डाव्या हाताच्या खिडकीची जाळी सरकवून बाहेरच्या दोरीवर ते कपडे वाळत घालून त्याला क्लीप लावून टाकला. आ‌ई तिथून बाहेर गेल्यावर बाबा परत 'फ़्रिडम फ़ायटर' खेळायला लागला.पिसीच्या बरोब्बर मागे पलंगावर बाबाच्या डाव्या हाताला मी बसलो होतो. बाबाने आवाज म्युट केला असला तरी माझं सगळं लक्ष तिथेच जायला लागलं. बाबाने मान तिरकी करुन पाहिलं तेव्हा त्याला बरोबर कळलं माझं लक्ष सगळं पिसीवर होतं ते. मग तो ओरडला, "राहूल, बिंडोका अभ्यास कर. मोठ्ठ्या पगाराची नोकरी मिळव. इतके पैसे कमव की सगळ्यांना चुप्प करता आलं पाहिजे. "

मला त्याचा आणि त्यांच्या वादाचा काहीच संबंध कळला नव्हता पण तरी मी काही विचारलं नाही, तसाच गणिताचा होमवर्क पुर्ण करत राहिलो. तो पुर्ण नसता झाला तर तेव्हढाच त्या चुगलखोर जा‌ईला चान्स मिळला असता माझं नाव टिचरना सांगायला. ही जा‌ई तर टपूनच बसलेली असते.
सौऱ्या म्हणतो, "तू 'बी' डिविजनमधून 'ए' मधे आल्यापासून तिचा भाव कमी झाला म्हणुन ती जळते तुझ्यावर.” त्यात गेल्यावर्षी मधल्या सुट्टीत माझा धक्का लागून तिच्या हाताला लागलं होतं. फ़्रॅक्चर-बिक्चर काही नव्हतं झालं नुसती लिगामेन्ट इंज्युरी झाली होती. मी तिला सॉरी पण बोललो नंतर. तरी तिने कंम्प्लेन्ट केली, म्हणून आईबाबांना बाईंनी शाळेत बोलावलं. बाबा मला खुप ओरडला. एम्बॅरेसींग सिच्यु‌एशन आली माझ्यामुळे म्हणाला. मी मुद्दाम धक्का नव्हता दिला पण कोणी ऐकूनच घेतलं नाही माझं. तसही मुलींनी मुलांची तक्रार केली की बाई नेहमी मुलींचच खरं मानतात. फक्त सौऱ्या आणि अनुजा दोघांनीच माझ्यावर विश्वास ठेवला. आमच्या रोहिणी मिस मला म्हणाल्या की माझ्याकडून इन्डिसिप्लीन्ड वागणूकीची अपेक्षा नाही. यापुढे नीट वागायचं. मी नुसतीच मान डोलावलेली तेव्हा. इतका राग आला होता तिचा की मुद्दाम धक्का मारुन तिचं हाड मोडावंसं वाटत होतं. पण तेव्हा आ‌ईचा चेहरा बघून मी नुसतच सॉरी मिस, येस मिस करत राहिलो.

हे सगळं मला आत्ता गणित करताना आठवत राहिल, जोडीने बाहेरच्या भांडणाचे आवाज आणि बाजुच्या खिडकीतून ऐकू येणारा कावळ्यांचा कलकलाट यामुळे नुसतेच आकडे गिरमिटत होतो गणित काही पुर्ण होत नव्हतं म्हणून मी आधी बाबाला हाक मारली पण त्याने नुसतच हु अस केलं स्क्रीनवरची नजर पण न हलवता. मग थोडावेळ वाट पाहून मी माझं पुस्तक आणि वही दोन्ही त्याच्या पुढे ने‌ऊनच आपटलं दाणदिशी. त्यावरुन पण ओरडा खाल्ला त्याचा "पुस्तक विद्या असते. त्याला पैसे पडतात. ते कमवायला घाम गाळावा लागतो ब्ला ब्ला ब्ला"
मला खरतर आ‌ईकडूनच समजून घ्यायला आवडतात गणितं पण आ‌ई आजी जुगलबंदी चालू असल्यामुळे मी बाबाच्या वाटेला गेलो. त्याने आत्ता डिस्टर्ब करु नकोस, तुझं तू बघ थोडावेळ असं म्हणून मला हाकलल्यावर मी अनुजाला फोन करुन तिला आ‌ईच्या व्हॉटसऍपवर सोडवलेल्या गणिताचा फोटो पाठवायला सांगितला आणि एकदाची गणितं संपवली.

तोपर्यंत सगळे वाद घालून थकले होते बहुतेक. घर एकदम शांत झालं होतं. पण तरी नेहमीसारखं नव्हतं काही. सगळे एकत्रं डायनिंग टेबलवर जेवायला नव्हते बसले. बाबा त्याचं ताट घे‌ऊन बेडरुम मधे गेला पिसीवर मुव्ही बघत जेवायला. आजीपण ताट घे‌ऊन तिच्या खोलीचं दार लावून बसली. आणि त्या दोन्ही बेदरुम्सच्या बंद दारासमोरच फ़ुट दोन फ़ुट अंतरावर असलेल्या डायनिंग टेबलवर बसून आम्ही दोघेच अजिबात आवाज न करता जेवलो. जेवण होताच आ‌ईने ताट उचलून सिंकमधे टाकली. डयनिंग टेबलवर बसलो असताना मला डाव्या हाताला बेडरुमची अर्धवट लावलेली दारं दिसत होती. एकातून बाबाने लावलेल्या इंग्लीश मुव्हीचा आवाज येत होता तर दुसऱ्यातून रेडी‌ओचा. आ‌ईने हाक मारली म्हणून मी समोर बघीतलं. तिने ओटा पुसता पुसता मला "उठा आणि हात धुवा" इतकच सांगितलं. मी उठलो खरा पण फ़ार उदास वाटत राहीलं. असली बो‌अर गेली कालची अख्खी दुपार. हे असच रहाणार कायम वाटून अजूनच रडू यायला लागलं. आजीने स्वत:चं ताट धुवून टाकलं आणि ती परत तिच्या खोलीत गेली. आ‌ईने मागचं आवरलं आणि लायब्ररीमधून आणलेलं 'प्रा‌ईड ऍन्ड प्रिज्युडा‌ईस' वाचायला घेतलं माझ्या बाजुला बसून. माझ्या केसातून हात फिरवत ती, "झोप जा" म्हणाली तेव्हा एकदम तिच्या पोटाला मिठी मारुन रडावसं वाटलं पण मी आता लहान बाळ नाही म्हणून तसं काही केलं नाही आणि बेडरुममधे गेलो. बाबा 'मिशन इम्पॉसिबल' बघत होता. त्याने विचारलं, "झोपणार आहेस का? हेडफ़ोन लावू का?"
मी, "नको" म्हंटलं. बेडवर झोपून मी पण थोडावेळ मुव्ही बघीतला आणि मग त्याचा कंटाळा आल्यावर झोपून गेलो.

संध्याकाळी जाग आली तेव्हा सगळे नॉर्मल हो‌ऊन टिव्ही बघायला लागले होते. थोडं हायसं वाटलं. मला बघीतल्यावर आ‌ई माझ्यासाठी दुध आणायला किचनमधे गेली. मी पण मग नेहमीप्रमाणे आजीच्या गळ्यात हात टाकला तर तिने जोराने माझा हात झिडकारला. म्हणे, "त्रास नको दे‌ऊस मला."
आता मी काय केलं खरतर? नेहमीच तर असा गळ्यात हात टाकतो मी तिच्या. तेव्हा तर, 'माझं लेकरु, माझं लेकरु' करते.

तिकडून आ‌ईचा आवाज आला "राहूल आधी इकडे ये. तुला हज्जारदा सांगितलय ना आजीला आवडत नाही तिच्यापाशी गेलेलं"

"अगं पण नेहमी तर आवडत ना?"

"पण आज नेहमीचा दिवस आहे का? आधीच घरात कमी विषय आहेत वादाला म्हणून त्यात भर घालतोयस? जरा शहाण्यासारखं वाग, लहान नाही आहेस तू आता. जा तुझ्या उद्योगाला लाग"

मी गुपचूप लायब्ररीमधून आणलेलं पुस्तक घे‌ऊन बसलो कोपऱ्यात. रस्कीन बॉन्डचं 'ना‌ईट ट्रेन टू देवळी', माझ्या आवडत्या लेखकाचं पुस्तक हातात होतं पण आ‌ई शप्पथ! आज त्यातली एकही ओळ डोक्यात शिरत नव्हती. जोरजोरात रडावसं वाटत होतं. हे मोठे कशाही वरुन सुरु होतात ते चालतं पण मी नेहमी शहाण्यासारखंच वागायचं असतं, याला काय अर्थ आहे? एक साधा विषय होता घरात रंग लावण्याचा. आजीने प्रत्येकाच्या खोलीचा रंग ठरवलेला. अगदी पडद्याच्या रंगापासून सगळं ठरवलेलं. बाबा, "ठीक आहे बघू आत्ता पैसे नाहीत" असं म्हणून गप्प बसला होता. आजीने लोन काढायचं सुचवल्यावर आ‌ईने, “स्पष्टच सांगते मला या सगळ्या प्रकारात काही ठरवायचं स्वातंत्र्य नसताना निव्वळ पैसे देण्यापुरताच सहभाग घ्यायचा, त्याकरता लोन काढायचं हे जमणार नाही” असं डिक्लेर केलं आणि मग भांडणाला सुरवात झाली.

मग थोडावेळाने रंगाचा मुद्दा कुठच्याकुठे गेला आणि नुसतीच वादावादी सुरु झाली मोठ्या आवाजात. मग चिडलेल्या आजीने बाबाला नंदीबैल म्हंटलं. आ‌ईला सगळं आयतं मिळालय असं ऐकवलं. इतकावेळ शांत असलेला बाबाही मग वादात पडला आणि आजीला म्हणाला जा मग एखाद महिना दादाकडे. तिकडे जा‌ऊन त्याच्याकडेही चालवून दाखव तुझा हेका.

आजी म्हणे, "माझं घर मी कधी मनासारखं लावणार? आधी सासुसासरे होते आता तुम्ही आहात. हे घर माझं आहे. तुम्हाला जायचं तर तुम्ही चालू पडा कुठेही." यावर आ‌ईनेही ऐकवलं की घर तुमचं आहे तर मग तुम्हीच काढा लोन आणि लावा हवा तो रंग आणि करा हवं तसं रिन्होवेशन. आता बॉल आजीच्या कोर्टात. ती म्हणे, "रहाता कशाला माझ्या घरात? काय रेंट देता काय मला?" परत आ‌ईची बॅटींग "इथे रहाण्याचं रेन्ट म्हणून सगळा खर्च करतोय महिन्याचा, बीलं भरतोय एकुण‌एक आणि घरातली कामही उरकतोय. लग्नाला इतकी वर्ष हो‌ऊनपण साधं चहा पावडरचा ब्रॅन्ड बदलला तरी 'माझ्या घरी हे चालणार नाही' हे वाक्य ऐकावं लागतं. पण आता फ़क्त तुमच्या आवडीप्रमाणे घर लावण्यासाठी लोन काढून मी फ़ेडत बसणार नाही.”

या सगळ्यात एकदा आ‌ईबाबाचही चांगलच वाजलं. बाबा आ‌ईला म्हणे तुला कम्युनिकेशन्स स्कील्स नाहीत आणि आ‌ई बाबाला म्हणे, "तुझ्यात आहेत ना ती स्कील्स? मग तुमचे का होतात वाद? का स्वत:चे होतात ते वैचारिक मतभेद आणि माझे होतात ते कम्युनिकेशन गॅपचे वाद? पेद्रट कारणं तुझी."

झालं मग वाद परत परत होतच राहिले आणि या माझ्या आवडत्या माणसांपैकी कोण चुक आणि कोण बरोबर हे न कळून माझं डोकं मात्रं दुखायला लागलं

या सगळ्यामुळे मला रात्रभर झोपच नव्हती लागली. झोप लागलीच तर चित्र विचित्र स्वप्न पडायची. मी दचकून जागा व्हायचो. त्याचा परिणाम आज चित्रकलेच्या तासाला मला झोप लागली.

"राहूल पे अटेंशन" म्हणत सरांनी हातातला खडू मारून जेव्हा जागं केलं तेव्हा सगळा वर्ग माझ्याकडे बघून हसत होता. जा‌ई आणि तिच्या चमच्यांना तर जास्तच उकळ्या फ़ुटत होत्या. आमच्या गृपमधल्या कोणालाही शिक्षा झाली की यांच्या गृपला फ़ारच आनंद होतो. त्यातून तिला मॉनिटर केल्यापासून तर काय? बारीक लक्ष ठेवून असते आमच्यावर. मनात म्हंटलं "बच्ची देख लेंगे तुझेभी. रोटेशनच्या नियमाने पंधरा दिवसांनी सौऱ्या मॉनिटर होईल की मग बघतोच तुमच्या गृपकडे.”

"सरांना विचारुन तोंडावर पाणी मारुन ये. झोप का येतेय? मुव्ही बघत होतास काय रात्रभर?" सौऱ्याने बेंचखालून चिठ्ठी पास करुन विचारलं.

मुव्ही काय? डोंबल याचं. घरात झालेल्या वादामुळे मला रात्रंभर झोप नाही लागलेय इथे. पण हे मी कोणालाच कधीच नाही सांगणार. अगदी सौऱ्या आणि अनुजालाही नाही. ते ही हसतील मला मग.
मी सरांची परमिशन घे‌ऊन बाहेर आलो. तोंडावर पाणी मारलं. डोळे चुरचुरतच होते. या मोठ्यांना बरी झोप लागते भांडण झाल्यावर! आता हे कालचं झालं त्या आधीच्या आठवड्यात काय झालं होतं सांगू? माझी पुस्तकं आमच्या खोलीत जमिनीवर राहीलेली. कुणालने हाक मारली म्हणून मी बाहेर गेलो त्या नादात मी ती तशीच विसरलो. आजीने ते पाहीलं आणि बाबाला ती म्हणाली की "हे लक्ष असतं तुझ्या बायकोचं घरात! हाऽऽ असा पसारा पडलेला असतो जिकडे तिकडे". मग काय? नेहमीचीच बॅटींग चालू झाली सगळ्यांची. आ‌ई म्हणे, तो मोठा आहे आवरायला. आवरेल आल्यावर.

"घर आहे की उकीरडा? म्हणे आल्यावर आवरेल! बा‌ई म्हणून तुझं लक्ष नको का?

"मी ही कामात आहे. त्याचा बाबा मॅच तर बघत बसलाय नुसता. तो आवरेल इतकच असेल तर. त्याचाही लेक आहे तो. घर फ़क्त बा‌ईने आवरायचं असतं हा कन्सेप्टच मला मान्य नाही"

त्यावर आमच्यावेळी... म्हणत आजी सुरु झाली. मी परत आलो तेव्हा वातावरण भलतच तापलेलं. मी आलो तेव्हा हे वरचं फ़क्त कानावर पडलं पण विषय नक्की काय तेच कळेना. सकाळी उठल्यावर तर सगळे नॉर्मल होते मधेच काय झालं असं वाटून गेलं. बराच वेळा नंतर कळलं की हे वह्या पुस्तकांमुळे सुरु झालय. एक साध सांगायचं ना मला हाक मारुन. इतका का विषय वाढवायचा? पण हे मोठ्यांना सांगणार कोण?

तसही मोठ्यांना काही सांगायची सोय नसतेच म्हणा. किती हार्शली भांडतात हे एकमेकांशी. आणि दरवेळी माझा प्रॉब्लेम होतो. आ‌ईशी बोलताना तिचंच बरोबर वाटतं. आज्जी एकदम दुष्ट वाटते. आ‌ईशी भांडणाऱ्या बाबाचाही राग येतो तेव्हा. पण आज्जी माझ्याशी पत्ते खेळते, हातावर ताज ताज लोणी देते, पदराने तोंड पुसते तेव्हा वाटतं ही दुष्टं कशी असेल? ही तर माझे किती लाड करते, माझ्यावर किती प्रेम करते.

मग माझा गोंधळ उडतो मला यांच्यात नेमकं कोणाचं चुकतय हे तर कध्धीच कळत नाही. या विचारातच अख्खी रात्रं संपते पण उत्तर मिळत नाही आणि डोळे चुरचुरत राहून अशी शाळेत झोप येते मला.

आय प्रॉमिस्ड मायसेल्फ़ व्हेन आय वील बी अ ग्रोन अप ला‌ईक देम ऍक्च्यु‌अली मोर प्रिसा‌ईजली व्हेन आय वील बी अ पॅरेन्ट आय वोन्ट फ़ा‌ईट ला‌इक देम इन्फ़्रंट ऑफ़ माय चा‌ईल्ड. उफ़्फ़ हे पॅरेन्टवालं स्क्रीप्ट जरा जास्तच झालं फ़ॉर माय एज. असो मी आता सरांकडे लक्ष द्यायचं ठरवून तोंड पुसून वर्गात ये‌ऊन बसलो. सुरवातीला जेव्हा सर लेक्चर देत होते शेडींग बघा, आकार बघा, वेगवेगळ्या कोनातून बघा इ.इ. तेव्हा थोड्या जांभया येत होत्या तोंड धुवून आल्यावर सुद्धा पण तरी एकंदर माझ्या आवडीचं काम असल्याने मनाने रेखाटन करायला सुरवातही केली होती.

आज माझं चित्रं बेस्ट चित्रं म्हणून निवडलं जायलाच हवं होतं. आज तर काय स्टील ला‌ईफ़ म्हणजे माझ्या आवडीचा विषय होता. पण जा‌ई पण तर होती कॉम्पीटिशन मधे आणि आज ती माझ्या बरोब्बर समोर बसली होती. अनुजा माझ्या उजव्या हाताला होती आणि सौरभ डाव्या हाताला. अर्थात बाकीही मंडळी होतीच पण आम्ही चौघे आत्तापर्यंत वॉलचे मानकरी झाल्यामुळे माझं जरा या तिघांकडे विशेष लक्ष होतं.

त्यात गेल्या आठवड्यात त्या जा‌ईने मला मुद्दाम चिडवलेलं तिचं चित्रं वॉलवर लागल्यावर. अनुजाने कूल डा‌ऊन हो सांगितलं म्हणून नायतर एक ठोसा देणार होतो चांगला तिला. अनु म्हणे मी लास्ट वीक शा‌ईन मारलेली म्हणून तिने यावेळी मारली पण मी तर नव्हती मारली शा‌ईन बि‌ईन. या जा‌ईडीची खोपडी असेल उलटी म्हणून तिला वाटलं असेल तसं. या अनुला वाटतं आम्ही उगाचच पंगे घेतो. ती म्हणते की तिला कारणच कळत नाही आमच्यात दुश्मनी असायचं. लेट हर बी. मी काय करु? ती जाईडी आहेच तशी म्हणून भांडण होतं. अनुच म्हणण ती काही भांडखोर वगैरे नाही आहे. मग काय मी वेडा आहे भांडायला? आता मी मलाच बजावलं की हे सगळे विचार बंद करुन कामावर लक्ष द्यायचं. आज काही करुन सरांची शाब्बासकी मिळवायची आणि मगाशी वर्गात झोप लागल्याने मला हसलेल्या सगळ्यांना दाखवून द्यायचं राहुल क्या चीज है ते.

आमच्या क्लासची रचना पुर्ण वर्तुळाकार आहे. आमचं टेबलही मधे आहे वर्गाच्या. आणि त्या टेबलभोवती गोलाकार आमचे डेस्क आहेत. तर आज त्यांनी स्टिल ला‌ईफ़ करता टेबलवर वस्तु ठेवल्या. एक स्टीलचा ग्लास ठेवला. त्या ग्लासच्या समोर एक सफ़रचंद ठेवलं होतं. त्या सफ़रचंदाचं प्रतिबिंब त्या ग्लासमधे दिसत होतं.

सरांनी ’ओके गो अहेड" म्हणताच आम्ही कामाला लागलो. मी स्टीलचा पोत, त्यात दिसणारं प्रतिबिंब, पुढे असलेलं सफ़रचंद इ.इ. सगळं रेखाटत गेलो दिसेल तसं.

सरांनी नेहमीप्रमाणे सगळ्यांची रेखाटनं बघीतली. माझं चित्रं बघून मला म्हणाले परफ़ेक्ट टिपलयस आणि माझं चित्रं वॉलसाठी सिलेक्ट केलं. मी सुप्पर खुष झालो.

कॉलर ताठ करत त्या शिष्ठ जा‌ईकडे बघीतलं एकदा आणि सौरभला हाय फ़ाय दिला. जा‌ईच चित्र बघायला मी मगाशी डोकावलं तर तिने चित्राला हाताने झाकत तोंड वाकड करत एक कुचकट लुक दिलेला. आता सर बाजूला ये‌ऊन उभे राहील्यावर तिला हात काढावाच लागला चित्रावरचा. तिचं चित्रं माझ्यापेक्षा बरच वेगळं होतं. तिच्या रेखाटनात स्टिल ग्लास पुढे होता आणि सफ़रचंद त्याच्या मागे अर्धे लपलेले होते. तिच्या स्टिल ग्लासमधे रिफ़्लेक्शनपण नव्हतं सफ़रचंदाचं. मी सौरभकडे बघून थंप्स डा‌ऊनची खुण केली. तिने ते पाहुन मला एक खुन्नस दिला. अनुजाने मला डोळ्यानेच दटावलं. हिला भारी पुळका तिचा. आता मजा ये‌ईल सर तिला ट्राय अगेन म्हणाले की. मी मनात हे म्हणायला आणि सरांनी तिला 'परफ़ेक्ट टिपलयस' म्हणायला अगदी एक वेळ गाठली.

"ऑऽ" ऐसा कैसा हो गया बा? मी सरांना विचारलं सुद्धा. माझ चित्रं वेगळ आहे. तिचं वेगळं आहे आणि माझ परफ़ेक्ट असेल तर तिचही कसं काय परफ़ेक्ट असेल?

पण सर म्हणाले की, "इट ऑल डिपेन्ड्स अपॉन परस्पेक्टिव्ह ऍन्ड ऍन्गल."

तरिही माझा प्रश्नार्थक चेहरा बघून ते म्हणाले तिने तिला दिसलं तसं काढलय राहूल आणि तू तुला. इन्फ़ॅक्ट प्रत्येकानेच वेगळं काढलय बघ. क्लास सुरु होताना मी हे सांगितलं होतच. perspective is look through. So keep that in mind always

सर म्हणाले म्हणजे असेल बुवा खरं

आज तरी मी त्याचा विचार करायचा नाही ठरवलं. चित्रं वॉलवर लागलं, कालच्या सारखा आजचा दिवस खराब गेला नाही याचाच इतका आनंद होता मनात की मी आपणहून जा‌ई आणि कंपनीला वर्ग सुटल्यावर आमच्या पुढे जा‌ऊ दिलं आणि अनुजा आणि सौऱ्या बरोबर सगळं मागे टाकून शीळ घालत घरी निघालो.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त !
टीन एजमधल्या मुलाचे भावतरंग छान टिपलेत कविता Happy

फ़्रॅक्चर-बिक्चर काही नव्हतं झालं नुसती लिगामेन्ट इंज्युरी झाली >> नुसता धक्का लागल्याने कसे काय? मला कळले नाही.

“स्पष्टच सांगते मला या सगळ्या प्रकारात काही ठरवायचं स्वातंत्र्य नसताना निव्वळ पैसे देण्यापुरताच सहभाग घ्यायचा, त्याकरता लोन काढायचं हे जमणार नाही” >> अगदी योग्य स्टॅन्ड...

"माझं घर मी कधी मनासारखं लावणार? >> त्यासाठी आपलाच हेका चालवणे गरजेचे असते का? समोरच्याच्या आवडीचा विचार केला तर... ते पण घरातलेच ना!

पेद्रट कारणं तुझी." >>> जाम हसले. Lol

बरेचदा मनात येते की मुलांसमोर जोरजोरात भांडणारे फॅमिली मेंबर त्या कोवळ्या मनाच्या मुलाचा विचार का करत नाहीत? Sad

मुलांसमोर भांडण नकोत. पण वेगळा असा वेळ सुध्दा कुठे मिळतो!
गोष्ट अगदीच पटली पण मार्ग कसा काढावा यातून?

अर्थात मुलांबरोबरचे निरोगी नाते, पुरेसा वेळ यांत नक्कीच जपता येईल.

खूप सुंदर लिहिलयं... मुलांचं भावविश्व उत्तम रंगवलयं.. कधी कधी आपणं मुलांना गृहित धरत नाही पण त्यांच्या भावविश्वाचा नक्कीच विचार करायला पाहिजे हे या कथेतून पटलं.

मस्त जमली आहे गोष्ट!
प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा. त्यामुळे दिसणारं चित्र वेगळं. पण प्रत्येकाला वाटतं आपलंच चित्र बरोबर Happy आणि आपलं लाईफ काही स्टिल नसतं Wink चालतंबोलतं असतं. मग तर आणखी किती तरी शक्यता, किती तरी पर्स्पेक्टिव्ह्ज. किती ती गुंतागुंत. मग वादावादी होणारच.

धन्यवाद विनिता, मुग्धमोहिनी, रुपाली आणि वावे

नुसता धक्का लागल्याने कसे काय? मला कळले नाही.>> हे त्याचं म्हणणं/मानणं आहे की नुसता धक्का लागला Wink तिचं वर्जन वेगळही असेल

वावे परफेक्ट

प्रत्येकाचं still life वेगळं कारण प्रत्येकाचा perspective वेगळा.. खूप छान.
Stand घेणारी आई आवडली.
वादही कमी झालेले आवडले असते पण मग हे प्रत्येकाला आपल्याच घरातलं वाटलं नसतं.
मुलांचं भावविश्व मांडणं कठीण असतं. ते खूप छान उतरलं आहे.
कथा आवडली.

सुंदर लेख.
परस्पेशन ची व्याख्या पण सुंदर सांगितली आहे.

मस्त कथा आहे.परस्पेकटिव्ह कल्पनेचा चोख उपयोग.
मुलांसमोर भांडू नका वगैरे ठिके.पण फक्त भांडायला म्हणून स्पेशल मुलांना घरी ठेवून बाहेर जाता येत नाही त्याचं काय. Happy आणि उगीच ठरवून संयत शांत राहिलं तर ती स्फोटक शांतता मुलांना जाणवते.
मुलांसमोर अधून मधून पर्सनल अटॅक न करता योग्य मुद्द्यांवर एथिक्स ठेवून नक्की भांडावं.तसेच एखाद्या मुद्द्यावर दोन वेगळी मतं आहेत म्हणून त्यांना त्या कॉन्फलिक्ट चा फायदा घेता येणार नाही इतकं अंडरस्टँडिंग सगळ्यांमध्ये नक्की असावं.

फक्त भांडायला म्हणून स्पेशल मुलांना घरी ठेवून बाहेर जाता येत नाही त्याचं काय.>> हो ना.. Biggrin कधीकधी फारच अडचण जाणवते ही

फक्त भांडायला म्हणून स्पेशल मुलांना घरी ठेवून बाहेर जाता येत नाही त्याचं काय>> Lol

परस्पेकटिव्ह कल्पनेचा चोख उपयोग.>> धन्यवाद अनु

कविन, खुप छान वेगळ्या परस्टेक्टिव्हमधून गोष्ट.
(पण मला त्या आई आणि आजीच्या वादाने डोक्याला भुंगा लागलाय. ती गोष्ट पण पूर्ण कर ना. त्यांचं काय झालं असेल पुढे )
रोहन खुप छान उभा केलायस. डोळ्यासमोर च आला अगदी.

खूप सुंदर कथा... आवडली, असे प्रसंग मी लहान असताना बघितलेत आणि माझ्या मुलीनेही बघितलेत.

मुलांसमोर अधून मधून पर्सनल अटॅक न करता योग्य मुद्द्यांवर एथिक्स ठेवून नक्की भांडावं.तसेच एखाद्या मुद्द्यावर दोन वेगळी मतं आहेत म्हणून त्यांना त्या कॉन्फलिक्ट चा फायदा घेता येणार नाही इतकं अंडरस्टँडिंग सगळ्यांमध्ये नक्की असावं.>>>

भांडणे होताना इतकी अचानक होतात, विशेषतः सासू सुनेतली, की हे भान ठेवणे दोघीनाही अशक्य आहे Lol

मला त्या आई आणि आजीच्या वादाने डोक्याला भुंगा लागलाय. ती गोष्ट पण पूर्ण कर ना. >>>

मला त्या आजीचाही मुद्दा पटला. तिचे पूर्ण आयुष्य सासूच्या हाताखाली, तिच्या तालावर गेले. तिने तिचे आयुष्य जगायला अजून सुरवातही केली नाही तेवढ्यात पुढची पिढी येऊन उभी राहिली, बाजूला होऊन आम्हाला जागा द्या म्हणत. तिने कधी जगायचे? सुवर्णमध्य काढायला हवा वगैरे बोलणे जोवर आपल्यावर परिस्थिती येत नाही तोवर ठीक आहे. पण जे प्रत्यक्ष त्या स्थितीत आहेत, ज्यांनी अन्याय सहन केलाय त्यांना आता दुसऱ्यावर तोच अन्याय होऊ नये म्हणून तडजोड करणे कठीण जाते.

भांडणे होताना इतकी अचानक होतात, विशेषतः सासू सुनेतली, की हे भान ठेवणे दोघीनाही अशक्य आहे Lol

खरं आहे साधना ताई, लहानपणी आई आणि आजीची भांडण चालू असताना त्यांच्या गिणतीत हि नसायचं,मुलं आजुबाजुला आहेत.

कालच वाचलेली . प्रतिसाद द्यायचा राहून गेलेलं.

छान लिहिलेय . वेगवेगळ्या दृष्टीने लिहिलेलं विश्लेषण आवडले

छान कथा आहे कविन., आवडली. मुलांचं भावविश्व छान उतरलय लेखणीतून.

भांडणं अशी वेळ- काळ ठरवून होतंच नाहीत कधी, त्यामुळे मुलांसमोर भांडू नये हे माहीत असलं तरी नकळत कोणत्यातरी कारणावरुन कोणाचातरी रागाचा पारा चढतो, तोल सुटतो आणि भांड्याला भांडं लागतंच, सासू - सून, नवरा-बायको कोणतंही कॉम्बो असो. यावर काही इलाज आहे असंही वाटत नाही. याच कथेत मला सासू आणि सून दोघींचा पर्स्पेक्टीव्ह पटतोय.

एक मात्र आहे- मुलं अनुकरण करतात. मुलांसमोर भांडण जरी झालं तरी त्या मुळ नात्यातली वीण उसवली जाता कामा नये. हीच घरातील माणसं एकमेकांना कशी सांभाळतात, जपतात हे देखील मुलं पाहत असतात त्यामुळे मुलांसमोर जरी भांडण झालं तरी नॉट अ बिग डील. ते भांडण त्या व्यक्तीशी नसून त्या व्यक्तीने त्या वेळी मांडलेल्या मताला/ विचाराला दर्शवलेला तो विरोध आहे हे मुलंही शिकतातच.

प्रतिसाद देणाऱ्या सगळ्यांना धन्यवाद Happy

याच कथेत मला सासू आणि सून दोघींचा पर्स्पेक्टीव्ह पटतोय.>> Happy

कथा फक्त इतकीच आहे. विषय perspective & angle हाच आहे. राहूलची चित्रकला आणि स्टील लाईफ एक निमित्त. शेवटी प्रत्येकजण आपापल्या जागी योग्यच असतो. जो तो त्याला दिसतं तसं चित्र रंगवतो स्वतःपुरते. म्हणजे ती 6 & 9 वाली थिअरी आहे ना तसं काहीसं.
मला वाटतय ते योग्य आहे पण समोरच्याच्या दृष्टीने योग्य म्हणजे काही वेगळं असू शकतं माझ्या कल्पनेपेक्षा आणि तसं असणं हे अगदी नॉर्मल आहे हे ॲक्सेप्ट करणं बस राहूलची गोष्ट इतकच सांगते

एक मात्र आहे- मुलं अनुकरण करतात. मुलांसमोर भांडण जरी झालं तरी त्या मुळ नात्यातली वीण उसवली जाता कामा नये. हीच घरातील माणसं एकमेकांना कशी सांभाळतात, जपतात हे देखील मुलं पाहत असतात त्यामुळे मुलांसमोर जरी भांडण झालं तरी नॉट अ बिग डील. ते भांडण त्या व्यक्तीशी नसून त्या व्यक्तीने त्या वेळी मांडलेल्या मताला/ विचाराला दर्शवलेला तो विरोध आहे हे मुलंही शिकतातच.

>> +१२३

अजिबात भांडण न बघितलेली मुलगी लग्न होऊन सासरी गेल्यावर सासरी जराजरी वादावादी झाली तरी जीव दडपताना, घाबरून जाताना, बीपी वाढताना ऐकलेले आहे. अशी मुलगी सासू झाल्यावर पुढे सुन आणि मुलगा यांच्यात किरकोळ जरी कुरबुरी झाल्या तरी त्यावरून दोघांना भयंकर गिल्ट देणारी (त्यातही विशेषकरून "तू माझ्या मुलाशी भांडलीच कशी" हे जास्त) झालेली आहे. त्यामुळे मुलांसमोर हेल्दी भांडणे झालेली बरी या मताची मीही आहे.

भांडण झाल्याने नाते संपत नाही. उलट भांडण झालेले असतानाही तेवढ्या मुद्द्यावरचे मतभेद कायम ठेवून इतर बाबतीतले प्रेम, एकमेकांची काळजी घेणे, आपापल्या जबाबदार्‍या पार पाडणे हे करता येते.. एकत्र कुटुंबात घरातल्या एका व्यक्तिशी वाद झाले तरी इतर नात्यांवर त्याचे प्रतिबिंब पडू न देता तिथले वर्तन सुरळीत ठेवता येते हे पुढे मुलापर्यंत पास ऑन करता आले तर करायचे आहे.

गोष्ट आवडली. पण धनुडीप्रमाणे उत्सुकता वाटते की शेवटी काय होते? खरंच प्रत्यक्षात अशा प्रसंगामध्ये, वाचलेल्या थिअरीचा काही फार उपयोग होतोच असे नाही. मुलं हळूहळू (कि पहिल्यापासूनच) हुश्शार बनत जातात व वाऱ्याची दिशा ओळखून पाठ फिरवतात. Wink Wink

छान लिहिलंय कविन! सासूचा पर्स्पेक्टिव्ह, सुनेचा आणि मुलाचा पर्स्पेक्टिव्ह, आणि लहान मुलाचे भावविश्व आणि त्याला समजलेलं 'पर्स्पेक्टिव्ह' ही सगळी गोष्ट एकदम मस्त जुळून आली आहे.

Pages