डान्सर साठी आहार

Submitted by नादिशा on 2 September, 2020 - 12:29

गेल्या वर्षीपासून आम्ही स्वयम ला डान्स क्लास चालू केला . त्या निमित्ताने एक कला त्याच्या अंगी येईल आणि व्यायाम पण होत राहील, हा आमचा हेतू होता त्यामागे .
मी स्वतः डॉ. असल्याने स्वयमच्या खाण्यापिण्याची व्यवस्थित काळजी घेत होते. आणि त्यानेही मला चांगली साथ दिली. त्यामुळे या वर्षभरात सतत डान्स करत राहिल्याने त्याची भूक वाढली , आहार वाढला , प्रतिकारशक्ती वाढली , तब्येत सुधारली , हे अनेक फायदे आम्हाला अनुभवाला आले.
पण त्याच्या बरोबरीची काही मुले मात्र डान्स क्लास नंतर थकून जातात , काहींचे हातपाय दुखायला लागतात , डान्स करताना काहींच्या हालचालींमध्ये काही एनर्जी च नसते , हे मला दिसत होते . क्लास संपल्यानंतर पण काही मुलांचे पालक तशा तक्रारी पण करायचे टीचर कडे .
सध्या स्वयमचा ऑनलाईन डान्स क्लास चालू आहे. त्याचे डान्स टीचर प्रशांत भोसले सरांचा काही दिवसांपूर्वी मला फोन आला. त्यांनी मला सांगितले, " माझ्या बऱ्याच विद्यार्थ्यांच्या पालकांची तक्रार आहे , मुले नीट जेवत नाहीत , त्यांच्यात काही उत्साह नसतो , क्लास झाल्यावर एकदम गळून जातात . मी तर त्यांना माझ्या परीने सांगत असतोच , मार्गदर्शन करतोच . पण तुम्ही प्लीज डान्स साठी किती आहार घेतला पाहिजे , कायकाय आणि का खाल्ले पाहिजे , यावर काहीतरी लिहा.आणि प्लीज ही माहिती शक्यतो सर्वसामान्य लोकांना समजेल, अशा सोप्या भाषेमध्ये द्या, जेणेकरून सगळ्या पालकांना समजेल आणि ते सहज फॉलो करू शकतील. "
मी यावर काही दिवस विचार केला . आणि आज हा लेख लिहिते आहे . सरांच्या सूचनेनुसार सायंटिफिक माहितीतील क्लिष्टता टाळून शक्य तेवढ्या सुलभ भाषेत सांगते आहे .
सर्वप्रथम बेसिक गोष्टीपासून सुरुवात करूया . डान्स करणारी व्यक्ती उत्साही , फ्रेश असली पाहिजे . त्यासाठी डान्स करण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकाने दिवसभरात कमीत कमी 5-6 ग्लास पाणी पिले पाहिजे . त्यामुळे तुमच्या शरीराची फॅट्स जाळण्याची क्षमता वाढते . आपल्या शरीराचा चयापचय दर 30% ने वाढतो . आपण खाल्लेल्या अन्नाच्या पचनासाठी आणि शरीराची उत्सर्जन क्रिया व्यवस्थित होण्यासाठी पाणी आवश्यक असते . पाणी हे शरीरात काहीसे वंगणासारखे काम करते . त्यामुळे स्नायू , हाडे यांचे घर्षण होत नाही . योग्य प्रमाणात पाणी पिले तर शरीराचे तापमान वाढत नाही . ते नियंत्रणात राहते . स्नायूंची ऍथलेटिक कामगिरी सुधारते आणि झालेल्या इजा भरून काढण्यात पाणी महत्वाचे काम करते .
शिवाय डान्स करताना स्नायूंमध्ये लॅक्टिक ऍसिड तयार होत असते . त्यामुळे स्नायू कोरडे पडतात . आणि मग दुखायला लागतात . हे ऍसिड पाण्यात विद्राव्य आहे, म्हणजे पाण्यात विरघळते . त्यामुळे डान्सपुर्वी , डान्स करत असताना आणि डान्स झाल्यानंतर डान्सरने स्वतः ला हायड्रेटेड ठेवणे खुप गरजेचे आहे . कलिंगड , चेरी या फळांचाही फायदा होतो कारण यांमुळे डान्स दरम्यान स्नायूंमध्ये तयार झालेले लॅक्टिक ऍसिड बाहेर काढून टाकण्याचा वेग वाढतो . ब्लॅक & ग्रीन टी मध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात . त्यामुळे स्नायूंचे सुकणे कमी होते आणि स्नायूंची ताकद पण झपाट्याने वाढते .
डान्स पूर्वी किमान अर्धा ते पाऊण तास काही खाऊ नये . तसेच डान्स केल्यानंतरही किमान अर्धा तास काही खाऊ नये .
जेवणानंतर लगेच डान्स करू नये . कारण त्यामुळे पोटात दुखणे , स्नायूंमध्ये गोळे येणे , हे त्रास होऊ शकतात.
खूप पण पोट रिकामे नसावे डान्स करताना . म्हणून डान्स करण्यापूर्वी अर्धा ते पाऊण तासांपूर्वी थोडे फायबर युक्त(चोथा ), मर्यादित स्निग्धता असलेले आणि उच्च कर्बोदके असलेले काहीतरी हलके खाणे घ्यावे.
उदा. शेंगदाणा लाडू , नाचणी लाडू , फुटाणे इ.
डान्स करून झाल्यावर थोडे पाणी पिऊ शकता . अर्ध्या तासानंतर केळी , बेरी , खजूर , द्राक्षे खावीत . कारण डान्स करताना खूप घाम येतो . त्यामुळे शरीराची ऊर्जा कमी झालेली असते , ती पुन्हा भरून काढण्याचा ही फळे मदत करतात . शिवाय यांमध्ये जीवनसत्त्वे , फोलेट , अँटिऑक्सिडंट्स , कॅल्शियम , पोटॅशियम सारखे मॅक्रो नुट्रीएंट्स असतात .
आपण जेवढी शारीरिक हालचाल जास्त करतो , तेवढे कॅल्शियम आपल्या शरीरातून खर्च होत असते . आणि आपल्या शरीराची जेवढी कॅल्शियमची आवश्यकता असते , ती कधीही एकाच वेळी घेऊन भागत नाही. त्याऎवजी तेच कॅल्शिअम आपण जर 3-4 वेळा विभागून घेतले , तर ते जास्त फायद्याचे ठरते . नाहीतर मग शरीर हाडांमधील कॅल्शियम काढून घेते आणि आपली कमतरता भरून काढते . परिणामी मग हाडे ठिसूळ होऊ लागतात . थोड्या दुखापतीनेही फ्रॅक्चर होण्याचा धोका संभवतो . डान्स करताना स्नायू दुखावू शकतात .
शिवाय जेव्हा खूप घाम येतो , तेव्हा शरीरातून खनिजे (प्रामुख्याने कॅल्शियम )आणि ब - क गटाची जीवनसत्त्वे बाहेर पडतात . जवळजवळ 15% प्रथिनेही घामातून बाहेर जातात . रक्तातील साखरेचे प्रमाण सुद्धा कमी होते , म्हणून डान्स झाल्यानंतर थकल्यासारखे वाटते .
यासाठी सकाळी तर दूध , अंडी घ्यावीतच . पण डान्स झाल्यानंतर जर दूध घेतले , तर ते स्नायू आणि बॉडी फॅट मध्ये निर्माण झालेली कमतरता भरून काढते . शिवाय दुधामुळे डान्स करून थकलेल्या शरीराचे रेहायड्रेशन होते . दुधामध्ये लॅक्टोज असते , ते कॅल्शियमच्या शरीरात शोषणाला आणि पचनाला मदत करते . डान्स मुळे झालेली स्नायूंची झीज भरून काढण्यासाठी आवश्यक असणारे प्रोटिन्स दुधामुळे वाढते . याच उद्देशाने भोपळ्याच्या बिया, गाजर , मासे , सुकामेवा पण डान्स नंतर घेतल्यास फायदेशीर ठरतात .
डान्स करत असताना प्रोटीन संश्लेषणाची क्रिया चालू असल्याने स्नायूंमध्ये प्रोटीन तयार होते . डान्स नंतर अंडी खाल्ली तर शरीराला प्रोटीन्स मिळतात त्यामुळे प्रोटीन संश्लेषणाच्या क्रियेला इंधन मिळते त्यामुळे फायदेशीर ठरते .
डान्स करणाऱ्याला वजन जास्त असून उपयोग नाही आणि डान्स केल्याने स्थूलता कमी होते, असे हे एक चक्र आहे .
डान्स मधील चपळ हालचालींमुळे अतिरिक्त कॅलरी कमी होतात , सुटलेले पोट कमी होते , नितंब सुडॊल होतात . जवळजवळ तीस मिनिटात 300-303 कॅलरी डान्स मधून खर्च होत असल्याने पोहणे , पळणे यांच्या एवढाच फायदा डान्स मुळे होतो . मांड्यांची ताकद वाढते , पाय सडपातळ होतात , त्यांचा टोन वाढतो . स्नायूंची ताकद , सहनशक्ती आणि तंदुरुस्ती वाढते . हृदय आणि फुफ्फुसे यांची परिस्थिती सुधारते .
डान्स करण्यासाठी कर्बोदके (carbohydrates ), प्रथिने (प्रोटीन्स ), स्निग्धपदार्थ (फॅट्स ) यांनी परिपूर्ण असा चौरस आहार गरजेचा असतो . स्नायूंची ताकद वाढण्यासाठी आवश्यक घटक आहेत -

1)कर्बोदके - आपल्या शरीराला यांच्यामुळे कार्यशक्ती मिळते . त्यांचे शोषण शरीरात हळूहळू होत असते , त्यामुळे त्यांच्यापासून बनलेली ऊर्जा दीर्घकाळ टिकते . ही स्वस्त असल्याने सर्व लोकांच्या आहारात असतातच . यांचे प्रमाण आहारात जास्त झाले , तर ही अतिरिक्त मिळालेली ऊर्जा चरबीच्या रूपात शरीरात साठते , त्यामुळे लठ्ठपणा येतो. आणि यांचे प्रमाण जर कमी झाले , तर ऊर्जेसाठी शरीरातील प्रथिने वापरली जातात . हे शरीराला हानिकारक ठरते . त्यामुळे स्नायू दुर्बल होतात , त्वचा सुरकुतते .
स्रोत - सर्व धान्ये
सर्व भाज्या
शेंगवर्गीय भाज्या, डाळी, राजमा, वाटाणा इ.
फळे -सफरचंद, केळी, स्ट्रॉबेरी, पीच, कलिंगड,
अवकॅडो इ.
सुकामेवा - बदाम , अक्रोड, शेंगदाणे.
बिया - भोपळ्याच्या, सब्जा(chia) बी.

2) प्रथिने - स्नायूंची बांधणी करण्यासाठी आणि स्नायूंना झालेली इजा बरी करण्यासाठी हे आवश्यक असतात .
सर्वसामान्य लोकांसाठी प्रति किलो वजनाला 0.8-1.0 ग्रॅ . प्रथिनांची गरज असते तर डान्सर ला प्रतिकिलो 1.2-1.4 ग्रॅ. प्रथिने आवश्यक असतात.
स्रोत -अंडी
मासे
चिकन
बीफ
दूध, दही, चीज-यांच्यामध्ये उच्च दर्जाची प्रथिने असतात
, कारण शरीराला आवश्यक असणारी सर्व
अमिनो ऍसिडस् यांत असतात .
डाळी आणि कडधान्ये
- यांमध्ये एखाद्या अमिनो ऍसिडचा अभाव असतो
, त्यामुळे ही दुय्यम दर्जाची मानली जातात.
सोयाबीन
सुकामेवा -जर्दाळू
पेरू, द्राक्षे, कलिंगड, पीच, ब्लॅक बेरी , किवी, अवकॅडो -
यांमधून पण थोड्या प्रमाणात प्रथिने असतात.

3)स्निग्ध पदार्थ - यांच्यामुळे भाज्यांमधील पोषक तत्वे योग्य रीतीने शोषली जातात. अ , ड , इ , के यांसारखी जीवनसत्त्वे फक्त स्निग्ध पदार्थांतच विरघळतात. स्नायूंची झालेली झीज यांच्यामुळे लवकर भरून निघते . शरीराला सौष्ठव मिळते . शरीरात हे वंगणासारखे काम करतात. यकृत , हृदय सारख्या महत्वाच्या अवयवांभोवती यांच्यामुळे चरबीसारखे आवरण तयार होते , त्यामुळे त्या अवयवांना इजा होत नाही .
पण हे पण लक्षात ठेवावे , की स्निग्ध पदार्थ
जास्त प्रमाणात खाल्ले गेले , तर स्थूलता वाढते .
उदा. अंडी, मासे
लोणी, तूप, पीनट बटर
काही प्रमाणात शेंगतेल, तीळ, सोयाबीन, मोहरी,
करडई, सूर्यफूल तेल.
काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड.

4)कॅल्शियमयुक्त अन्नपदार्थ -
हाडांच्या व स्नायूंच्या वाढीसाठी , मजबुतीसाठी हे आवश्यक असते .स्नायूंवर ताबा(कंट्रोल )मिळवण्यासाठी आवश्यक असते .
स्रोत - मासे
दूध, चीज, दुग्धजन्य पदार्थ
सोयाबीन, टोफू
सुकामेवा
नाचणी
हिरव्या पालेभाज्या, पालक, अळू, मेथी.
फळे -संत्री, किवी, तुती ,ब्लॅकबेरी , पेरू, पपई, इ.

5)बायोटिन असणारे अन्नपदार्थ -
मटण
अंडी
मासे
सुकामेवा -बदाम ,
बिया
भाज्या -पालक, ब्रोकोली
रताळे

6)क जीवनसत्त्व - यामुळे लोहाचे शोषण होते , झालेल्या जखमा लवकर भरून येतात .
स्रोत - आवळा , संत्री , पेरू , अननस , लिंबू , मोसंबी , कैरी ,
कच्चे टोमॅटो.
कोबी , मोड आलेली कडधान्ये.

7)सेलेनियम युक्त अन्नपदार्थ -
संपूर्ण धान्ये.
दूध, दही.
बीफ, मासे, चिकन, पोर्क, अंडी.
लसूण
केळी .

8)ओमेगा 3 युक्त अन्नपदार्थ -
मासे & इतर सीफूड.
सुकामेवा - अक्रोड.
बिया - जवस, सब्जा.
तेले -सोयाबीन तेल,
जवसाचे तेल.

9)लोह युक्त अन्नपदार्थ -
यकृत किंवा मटणाची कलेजी.
मांस, मासे, चिकन.
हिरव्या पालेभाज्या -उदा. पालक.
डाळिंब.
शतावरी , बटण मशरूम.
हिरव्या शेंगवर्गीय भाज्या.
सुके खोबरे.
गूळ, पोहे .
बीन्स, मसूर.
टोफू.
काजू , काळे मनुके , खजुर , सुके अंजीर.
भाजलेले बटाटे .

10)ड जीवनसत्त्व - यामुळे हाडे बळकट होतात.
स्रोत - दूध & दुग्धजन्य पदार्थ , चीज .
मासे , कॉडलिव्हर ऑईल , शार्क लिव्हर ऑईल.
अंडी.
सोयाबीन दूध.

11)जीवनसत्त्व B12 युक्त अन्नपदार्थ -
दूध, दही, चीज.
अंडी.
मासे, मांस.
चिकन.

सर्व प्रकारच्या फळांमध्ये चांगली साखर असते.. जी शरीरात लवकर शोषली जाते आणि त्वरित आपले काम चालू करते . त्यामुळे डान्स करून झाल्यानंतर फळ खाल्ले, तर डान्स मुळे कमी झालेले रक्तातील साखरेचे प्रमाण लवकर वाढते आणि आलेला थकवा लवकर निघून जातो .
त्यातही केळी आणि सफरचंद ही सर्वात जास्त फायदेशीर फळे ठरतात . केळ्यामध्ये उच्च दर्जाची कर्बोदके असतात . पोटॅशिअम असते , ते शरीराची ग्लुकॅगॉन पातळी व्यवस्थित ठेवते , जे दुखावलेले स्नायू असतील , त्यांची पुनर्बांधणी करायला मदत करते .
सफरचंद मध्ये फ्लॅवोनॉइड्स असतात , ते डान्स दरम्यानची सहनशक्ती वाढवतात , डान्स नंतर स्नायूंची दुखापत भरून काढण्याचा वेग ते वाढवतात . नैसर्गिक सुजरोधक असल्याने सफरचंदे डान्स मुळे थकल्यानंतर स्नायूंमध्ये जी सूज आणि कोरडेपणा येतो , तो कमी करण्याचे काम करतात .

प्रत्येक अन्नघटकाचे कार्य वेगवेगळे आहे. त्यामुळे डान्स करू इच्छिणारांनी आपल्या आहारात विविधता ठेवावी . सर्व प्रकारची धान्ये , डाळी , कडधान्ये , सर्व प्रकारच्या भाज्या , फळे , बिया सर्वांचे नियमित सेवन करण्याचा प्रयत्न करावा .

थोडक्यात सांगायचे तर रोजचे वेळापत्रक असे बनवू शकता -
*सकाळी उठल्यानंतर - दूध, सुकामेवा किंवा नाचणीचा /डिंकलाडू.
*9 वाजता नाश्ता - चहा /कॉफी, पोहे /उपमा /शिरा इ., एखादे फळ.
*12 च्या दरम्यान जेवण - चपाती /भाकरी, व्हेज /नॉनव्हेज भाजी, वरण - भात.
*4 वाजता - चहा /कॉफी , एखादे फळ.
*6 वाजता -दूध, ड्रायफ्रूट, फुटाणे.
*8-9 वाजता रात्रीचे जेवण -सकाळप्रमाणेच.

अजून एक सूचना म्हणजे कितीही आवडत असले , तरी मैद्याच्या पदार्थांचे , पॅकबंद पदार्थ , तळलेल्या पदार्थांचे जास्त सेवन करू नये . त्यामुळे आळस येतो , स्थूलता येण्याचा धोका संभवतो . अतिरिक्त साखरेचे पदार्थ सुद्धा टाळावेत . कारण त्यामुळे रक्तातील कॅल्शियमची पातळी खालावते . जर इच्छा झालीच अशा गोष्टी खाण्याची , तर त्यातल्या त्यात पौष्टिक गोष्टी शोधाव्यात . उदा. बिस्कीटे मैद्या ऐवजी नाचणीची , मल्टीग्रेनची खावीत . ब्रेड मैद्या ऐवजी गव्हाचा /ब्राऊन ब्रेड खावा. पिझ्झा , पास्ता, नूडल्स बनवताना जास्तीत जास्त भाज्यांचा वापर करावा . गोड पदार्थ बनवताना शक्य तिथे खजूर , गूळ , मध यांचा वापर करावा .

थोडक्यात काय , जर अशा प्रकारचा आवश्यक अन्नघटकांनी युक्त आहार तुम्ही व्यवस्थित घेतलात , तर नक्कीच तुमची प्रकृती उत्तम राहील , तुमच्या डान्स मध्ये एनर्जी असेल आणि डान्स करताना उत्साह राहील . शिवाय स्वतः ला तंदुरुस्त ठेवून दीर्घकाळ तुम्ही डान्स करत राहू शकाल .

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे लहान मुलांना तरी मनाप्रमाणे खाऊ द्या....##मनाप्रमाणे च आहे फक्त पालकांच्या

मी शक्यतो 1 जेवण मी करेन ते(ज्यात फायबर,प्रोटीन,दही,लिंबू,तूप, असं सर्व समावेशक पदार्थ असतात)
आणि 1 वेळचं जेवण मुलीला आवडेल ते(ते पदार्थ घरी बनवता आले पाहिजेत ह्या अटीने) असा नियम गेली 10 वर्ष पाळत आलेली आहे...
So दोन्ही चा मेळ राखला जातो(माझ्या मते)
रविवारी मात्र विकत आणावस वाटलं तर पुर्ण मुभा असते