हक्काचं आजारपण

Submitted by nimita on 31 August, 2020 - 02:09

"अगं ए विभा, बंद कर ना तो अलार्म....तीन वेळा snooze केलायस तू. उठायचं नसतं तर कशाला सेट करतेस गं रोज? आज रविवारी तरी झोपू दे ना." अरविंदच्या वैतागलेल्या आवाजानी विभावरी खाडकन् जागी झाली. तिनी चाचपडत मोबाईल शोधला आणि त्याला शांत केलं. डोळे किलकिले करून वेळ बघितली..."अरे देवा ! साडे सहा वाजले ?? सक्षम ला उठवायचं होतं आज सहा वाजता...." विभावरी धडपडत उठली खरी पण पुढच्याच क्षणी तिच्या डोक्यात एक सणसणीत कळ उठली.. इतकी जोरात की ती पुन्हा डोकं धरून बेडवर बसली. तिच्या तोंडून निघालेल्या "आई गंsss .." मुळे अवी नी झोपेतच विचारलं," काय झालं आता?"

"डोकं खूप भारी झालंय रे... पहाटेपासूनच दुखतंय...म्हणूनच इतक्या वेळा अलार्म वाजला तरी मला उठावंसं वाटत नव्हतं ,"

'आपल्यामुळे नवऱ्याची झोपमोड झाली' - या जाणिवेमुळे विभाला उगीचच - म्हणजे अगदी विनाकारणच अपराधी वाटायला लागलं.

"झाली का पुन्हा तुझी डोकेदुखी सुरू ? दिवसभर मोबाईल च्या स्क्रीनवर डोळे लावून बसतेस... मग दुसरं काय होणार?" कूस बदलत अवी नी एक शाब्दिक टोला हाणला आणि तो पुन्हा घोरायला लागला.

"चला, झाला एकदाचा - 'दिन का शुभारंभ' !!" अवीच्या दिशेनी एक जळजळीत कटाक्ष टाकत विभा म्हणाली... "हे असे 'शाब्दिक बाण' मारण्या ऐवजी डोकेदुखीचं ते 'रामबाण' औषध दिलं असतंस तर... पण छे.. बायको नी न सांगता, स्वतः समजून उमजून तिच्यासाठी काही करणं हे तर तुझ्या शान के खिलाफ आहे ना ? लग्नात सप्तपदीच्या वेळी दिलेल्या वचनांची validity लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच संपलीये म्हणा... त्यामुळे त्यांची आठवण करून देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. विभाताई, चला, उठा... इथे माथेफोड करून काही फायदा नाहीये... त्यापेक्षा ती 'दर्द का अंत तुरंत' करणारी गोळी घ्या आणि जगाचा सामना करायला सज्ज व्हा!!!"

आता तुम्हांला वाटेल की हे इतकं सगळं आणि तेही इतक्या स्पष्ट शब्दांत ऐकवलं विभा नी आपल्या नवऱ्याला ?? आणि तेही सकाळी सकाIळी.... चांगलीच पंगा मास्टर दिसतीये ही ... पण नाही हो...तसं काही नाहीये. जगातल्या समस्त स्त्री वर्गासारखंच विभाचं मनही खूप मोठं आहे; त्यामुळे तिच्या या मोठ्या मनात...म्हणजे -अगदी मनातल्याही मनात - ती हे असं सगळं बोलून घेत असते... आपलं मन असं मोकळं करायला दुसरं हक्काचं ठिकाण कुठे मिळणार ,नाही का?

असो, तर सांगायचं तात्पर्य म्हणजे- शेवटी विभानी आत्मनिर्भर होत स्वतःच फर्स्ट एड किट मधून ती जादुई गोळी काढली आणि अगदी जाहिरातीत दाखवतात तस्संच - त्या गोळीकडे एकदा खूप प्रेमळ कटाक्ष टाकून मग तिचं सेवन केलं.... 'बस्, आता पाच मिनिटांत मी पण एकदम active mode मधे'

एका हातानी आपलं गरगरणारं डोकं सांभाळत विभा सक्षम च्या खोलीत गेली. स्वारी नेहेमीप्रमाणे अगदी हातपाय ताणून गादीवर पसरली होती. 'या बाबतीत अगदी माझ्यावर गेलाय.... जर इतकी महागाची गादी विकत घेतलीये तर तिचे पैसे पूर्णपणे वसूल नको का करायला? इतक्या मोठ्या गादीवर आपण एका कोपऱ्यात मुटकुळं करून झोपायचं म्हणजे त्या उरलेल्या गादीचा अपमान केल्यासारखं आहे.' त्यामुळे चारही दिशांचा आढावा घेत हातपाय पसरून झोपलेल्या आपल्या मुलाला बघून विभाच्या मनात अगदी अभिमान दाटून आला. त्याच्या शेजारी बसत, त्याच्या डोक्यावरून अगदी प्रेमानी हात फिरवत ती म्हणाली," बेटा, उठतोस ना ? साडे सहा वाजले ... सहा वाजता उठवायला सांगितलं होतंस ना तू? ऑलरेडी अर्धा तास उशीर झालाय..." आपल्या आईचं ते शेवटचं वाक्य ऐकून सक्षम खाडकन जागा झाला...अगदी चाणक्य नी "उत्तीष्ठ भारत" म्हटल्यासारखा !! आणि विभाकडे बघत म्हणाला," सहा वाजता का नाही उठवलंस गं आई ? आज परत उशीर होणार gym ला जायला - तुझ्यामुळे... "

त्याचं हे बोलणं ऐकून विभाच्या मनात आलं..'.मागच्या जन्मी कॅमेलिऑन सरडा होता की काय हा ? किती पटकन रंग बदलतो....काही क्षणांपूर्वी माझ्यावर गेलाय असं वाटत होतं पण आत्ता अगदी त्याच्या वडिलांसारखा वागतोय ... काहीही झालं तरी चूक शेवटी माझीच ...'

पूर्ण आठवडाभर कुंभकर्णालाही लाजवणाऱ्या आपल्या सुपुत्राला नेमकं सुट्टीच्या दिवशीच लवकर का उठायचं असतं ?? - हा प्रश्न विभाला नेहेमीच त्रास द्यायचा. आज तर जरा जास्तच वैतागली ती; पण तरीही आपलं डोकं शांत ठेवत ती म्हणाली," अरे, मला बरं वाटत नाहीये पहाटेपासून."

"अगं, मग काल रात्रीच सांगायचंस ना तसं... मी उठलो असतो स्वतः .." सक्षम उठून बाथरूम मधे जात म्हणाला.

त्याचं हे गूढ वाक्य ऐकून विभाला एका सिनेमातला डायलॉग आठवला... ती स्वतःलाच समजावत म्हणाली "ये पागल नहीं है... इसका तो सिर्फ दिमाग खराब है।"

आपल्या सुपुत्राच्या खोलीतल्या पसाऱ्याकडे एक नजर टाकत विभा उठली... बाथरूम च्या दिशेनी बघत म्हणाली ,"काय विचार करून तुझं नाव सक्षम ठेवलं काय माहीत.... या जगातलं कोणतंही काम माझ्या मदतीशिवाय करू शकत नाहीस तू... आणि म्हणे 'सक्षम'....हे म्हणजे अगदी 'नाव सोनुबाई आणि हाती कथलाचा वाळा' असंच झालं!! " मगाशी नवऱ्याकडून मिळालेला शाब्दिक आहेर आता आपल्या मुलापर्यंत पोचवल्यामुळे विभावरीला खूप हलकं हलकं वाटायला लागलं....पण डोकं मात्र अजूनही भारीच होतं. त्यात भर म्हणून आता थोडी चक्कर पण येत होती. स्वैपाकघराच्या दिशेनी निघालेली तिची पावलं अचानक रस्ता बदलून पुन्हा बेडरूम च्या दिशेनी चालायला लागली आणि काही कळायच्या आत विभा पांघरुणात शिरली.

कॉट च्या दुसऱ्या टोकाला चहाची वाट बघत झोपलेल्या अविनी वळून बघितलं.... विभाला पुन्हा असं पांघरुणात गुरफटलेलं बघून त्यानी थोड्या काळजीच्या सुरात विचारलं," काय झालं गं? गोळी घेतलीस ना ? तरी बरं नाही वाटलं का अजून?" बोलता बोलता त्यानी विभाच्या कपाळाला स्पर्श करून बघितलं... तिचं कपाळ गरम लागत होतं. अचानक अविचा असा प्रेमळ स्पर्श झाल्यामुळे विभावरी ला आतून खूप बरं वाटलं... 'चला, या दुखणाऱ्या डोक्याचे आभारच मानले पाहिजेत, वरून जितका दाखवतो तितकाही हृदयशून्य नाहीये हा....' विभा पुन्हा मनात म्हणाली. आणि अवीच्या पुढच्या वाक्यानी तर तिला अजून एक जबरदस्त पण सुखद धक्का बसला.

अवी म्हणाला," अगं, ताप आलाय तुला.. नक्की शंभरच्या वर असेल. आज दिवसभर आराम कर तू...घरातलं सगळं मी manage करतो." विभाच्या अंगावरचं पांघरूण सारखं करून अवी स्वैपाकघराच्या दिशेनी निघाला.." मी चहा करून आणतो आणि औषधं कुठे ठेवतेस घरात ?? तुला गोळी देतो तापासाठी .."

विभाच्या दिशानिर्देशानुसार एकदाचा अवी औषधांच्या खजिन्याशी पोचला. त्यातली तापाची गोळी शोधून विभाला देत म्हणाला," अगदी अली बाबाच्या गुहेत ठेवलीयेस औषधं.... पटकन सापडतील अशा जागी ठेवायची ना ?? Emergency मधे लगेच मिळायला हवी."

"हो रे, कपाटात अगदी समोर ठेवलेली औषधं तुला दिसली नाहीत म्हणजे माझंच चुकलं बघ.....पण आता तू योग्य जागी ठेवलीस ना ?? पटकन सापडतील अशा ठिकाणी? "

अवीच्या बोलण्यामुळे कडू झालेली ती बेचव गोळी गिळत विभानी विचारलं. त्यावर .." आता ते पण मीच करायचं का ?" असं काहीतरी पुटपुटत अवी चहा करायच्या मोहिमेवर रवाना झाला.

विभानी कितीही झोपायचा प्रयत्न केला तरी स्वैपाकघरातली भांड्याची आदळआपट आणि त्याच्या जोडीला अवीच्या अस्पष्ट आवाजात ऐकू येणाऱ्या तक्रारी यांमुळे तिचं डोकं अजूनच ठणकायला लागलं होतं. पुढच्या काही मिनिटांतच अवी चहाचे दोन कप्स घेऊन आला.

असा आयता चहा आणि तोही रविवारी सकाळी सकाळी... क्षणभर विभानी आपल्या आजारपणाचे आभार मानले..... हो ना, जसा मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही - अगदी तस्साच - स्वतः आजारी पडल्याशिवाय बायकांना आयता चहा मिळत नाही !

पण त्या आयत्या चहाची गोडी काही जास्त वेळ चाखता नाही आली विभाला... कारण एकीकडे अवीची नॉनस्टॉप complaint box चालूच होती.... "चहा साखरेचे डबे किती मागच्या बाजूला ठेवलेस.. इतक्या मागचा डबा काढताना पुढचे डबे पडणारच ना !"

"झालं...म्हणजे काहीतरी सांडलवंड झालीये हे नक्की..." इति विभा...अर्थात मनातल्या मनात हं!!

"आणि तो गॅसचा knob पण दुरुस्त करायला पाहिजे... sim वर करताना चक्क off होतोय तो..एखाद्या दिवशी काहीतरी सिरीयस किचन accident झाला तर केवढ्याला पडेल ते?" अविनी ओव्हर चा दुसरा बॉल टाकला.

"गेल्या दोन वर्षांत एक तरी accident झाला का? तुला कळलं सुद्धा नव्हतं इतके दिवस..." विभा हळूच हसत म्हणाली....अर्थात...पुन्हा मनातल्या मनात च !

या आणि अशा विविध चविष्ट तक्रारी ऐकत ऐकत विभानी तो चहा संपवला. दोन्ही कप्स घेऊन ती खोलीबाहेर जायला निघालेली बघून अवी तिला म्हणाला, "अगं, मी म्हणालो ना...तू आराम कर म्हणून. मी करीन आज सगळं काम."

त्याचा self confidence बघून विभाच्या मनात त्याच्याबद्दल अभिमान उफाळून आला. पण पुढच्याच क्षणी तिच्या मनात धडकी भरली.... ती मनात म्हणाली," नुसत्या ट्रेलर मधेच इतके प्रॉब्लेम्स येतायत..… असली picture तो अभी बाकी है मेरे दोस्त !!"

पण वरकरणी अगदी साळसूद चेहेरा ठेवून तिनी म्हटलं," ब्रेकफास्ट मधे साबुदाण्याची खिचडी करायचं ठरलं होतं ना काल...मी ऑलरेडी साबुदाणा भिजवून ठेवलाय... तुला जमेल ती करायला?"

हा घाव चांगलाच वर्मी लागला असावा... कारण समोरून लगेच उत्तर आलं," न जमायला काय झालं? स्वैपाकघराच्या बाहेर असलो तरी आत काय चाललंय तिकडे लक्ष असतं माझं नेहेमी. नुसता ब्रेकफास्ट च नाही तर आज पूर्ण दिवसभर किचन माझ्या ताब्यात....You just wait and watch."

खरं सांगायचं तर कित्येक वर्षांपासून हे शब्द ऐकायला विभाचे कान तरसले होते. आणि आज या आजारपणामुळे का होईना पण ही सुवर्णसंधी चालून आली होती...विभानी तिचा फायदा घ्यायचं ठरवलं. "ठीक आहे, आता तू म्हणतोच आहेस तर जाते मी आराम करायला, पण काही मदत लागली तर सांग ..... ह्याला !" तेवढ्यात तिथे आलेल्या सक्षम कडे बघत विभा म्हणाली आणि दोन्ही बापलेकांना युद्धभूमीवर सोडून आपल्या कक्षात गेली.
गोळीचा परिणाम म्हणून की काय पण थोड्याच वेळात विभाचा डोळा लागला....

"आई, बाबा विचारतायत की घरात ब्रेड आहे का? " सक्षमनी विभाला जागं करून विचारलं. "का रे? खिचडी होती ना आजच्या मेन्यू मधे?" विभानी बेडवर बसत विचारलं.

तेवढ्यात पराभूत होऊन छावणीत येणाऱ्या योद्ध्यासारखा आत येत अवी म्हणाला," कसला बेकार साबुदाणा आहे... गिच्च गोळा झालाय नुसता. तू किती पट पाणी घालतेस त्यात?"

"काय ? तू साबुदाण्याच्या खिचडीत पाणी घातलंस ? म्हणूनच गिच्च झाली ती.." विभा किंचाळली .

त्यावर खांदे उडवत अवी म्हणाला," कमाल आहे... साबुदाणा भिजताना पाणी घातलं तर चालतं; पण तेच शिजताना घातलं तर काय चुकलं?"

त्याच्या या अजीबोगरीब लॉजिक पुढे नतमस्तक होत विभा म्हणाली ,"नाही, तुझं म्हणणं बरोबर आहे...पण त्या साबुदाण्याला ते पटलं पाहिजे ना ?"

त्यानंतर दिवसभर विभाच्या स्वैपाकघराचं पानिपत झालं होतं आणि तिथे दोन खंदे वीर त्यांच्याकडे नसलेलं कसब पणाला लावून वेगवेगळ्या आघाड्यांवर नामोहरम होत होते. पण त्या प्रत्येक पराभवाचा ठपका हा विभावरीच्याच कपाळी लागत होता.... सबबी जरी वेगवेगळ्या असल्या तरी गुन्हेगार एकच...विभावरी !

"कुकर ची शिट्टी नीट वाजतच नाहीये, कसं कळणार डाळ शिजली की नाही ते?"

"किती बोथट चाकू आहे हा....भाजी बारीक कशी चिरणार?"

"ही विकतची कणिक कशाला आणतेस गं ?... एक तर घट्ट भिजते नाही तर मग अगदी पातळ !! Useless !!!"

"अगं, मोहरी आणि जिरे शेजारी शेजारी कशाला ठेवतेस? Confusion होतं उगीच घाईघाईत..."

"यातलं ओटा पुसायचं फडकं कोणतं आणि टेबल पुसायचं कोणतं? सगळा सावळा गोंधळ आहे नुसता."

इतक्या सगळ्या द्राविडी प्राणायामा नंतर दुपारी जेव्हा सक्षम विभाचं जेवणाचं ताट घेऊन खोलीत आला तेव्हा त्यात वाढलेला तो मऊ गिच्च भात आणि anaemia झाल्यासारखी फिक्कट रंगांची ती आमटी बघून विभा हसून म्हणाली," म्हणूनच तुला पाठवलं ना बाबांनी ताट घेऊन ?"

पण विभाचा प्रश्न सक्षमपर्यंत पोचलाच नाही... त्याच्या कपाळावरच्या आठ्या बघून विभा त्याला काही विचारणार इतक्यात तो फिस्कारला ,"आई, तू प्लीज लवकर बरी हो गं.... तू नसलीस की सगळीच गडबड होऊन जाते.... ते वॉशिंग मशीन पण नीट काम नाही करत तुझ्याशिवाय... माझ्या लाल टी शर्ट चा रंग लागला तुझ्या पांढऱ्या ओढणीला...." विभाच्या डोळ्यांसमोर तिची ती नाजूकशी ओढणी नाचायला लागली.. अगदी 'लागा चुनरी में दाग...' च्या तालावर ! पण ती काही न बोलता गप्प राहिली...काय करणार...असं अचानक आजारी पडून तिनी सगळीच गडबड केली होती ना !

संध्याकाळ पर्यंत औषधाचे दोन dose पोटात गेल्यावर विभावरीचा ताप उतरला; डोकेदुखी पण आता कमी होती. जरा बरं वाटतंय म्हटल्यावर ती उठून खोली बाहेर आली. घरात सगळीकडे शांतता पसरली होती...इतर वेळी सुट्टीच्या दिवशी कोकलणारा टीव्ही आज मौन धारण करून होता. विभानी सक्षमच्या खोलीत जाऊन पाहिलं तर ...बापलेक दोघंही 'चारो खाने चित' या अवस्थेत बेडवर पसरले होते.... त्या दोघांची ती 'घोरायमान' अवस्था बघून त्यांच्यावर दिवसभर झालेल्या 'घोर' आघातांची कल्पना येत होती. विभाच्या मनात अचानक एक अपराधी भावना निर्माण व्हायला लागली.... हो ना, किती घोर अपराध झाला होता तिच्याकडून.... थोड्या वेळासाठी का होईना पण आजारी पडण्याचा अपराध ! आपल्यामुळे नवरा आणि मुलाला घरकाम करायला लागलं ... हा अपराध !!

ती बोचणी मनात बाळगतच तिनी स्वैपाकघर गाठलं....कधी काळी स्वैपाकघर म्हणून ओळखली जाणारी ती खोली आता कुरुक्षेत्राच्या रणभूमीपेक्षाही भयाण दिसत होती. दिवसभरात लढलेल्या युद्धाचे पुरावे जागोजागी दिसत होते. आपल्या या कर्मभूमीला तिचं मानाचं स्थान परत मिळवून देण्याच्या उदात्त हेतूनी विभा कामाला लागली. पुढच्या तासाभरात सगळं काही पुन्हा 'जैसे थे' झालं...

पण तो सगळा पसारा आवरत असताना विभाच्या मनात मात्र विचारांचं मळभ साठत होतं. सकाळपासून घडलेले प्रसंग, त्यातून झालेले संवाद, प्रत्येक वेळी तिच्या दिशेनी वळलेली जबाबदारीची सुई.... आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून तिला झालेली अपराधी भावना.. सगळं काही आठवत होतं.. अवीच्या झालेल्या फजितीमुळे मधूनच हसू फुटत होतं ... सक्षम ची झालेली ससेहोलपट बघून तिचं आईचं मन कष्टी होत होतं.....पण त्याचबरोबर 'आपल्याशिवाय या घरात कोणाचंही पान हालत नाही'- या नुसत्या विचारानीच ती आत कुठेतरी सुखावतही होती...

रोजच्या सवयीप्रमाणे विभानी संध्याकाळच्या चहाचं आधण ठेवलं. तेवढ्यात अवी तिथे आला आणि म्हणाला," अगं, मी चहा करायलाच आलो होतो..." विभाच्या हातातून आपला कप घेत तो पुढे म्हणाला ,"आता बरी आहेस ना तू? Good... रात्री जेवायला साधंच कर काहीतरी...पोहे, उपमा वगैरे पण चालेल !! आज दिवसभर सगळं manage करून खूप दमायला झालंय.. लवकर झोपणार आहे आज मी."

एकीकडे रात्रीच्या जेवणाची तयारी करताना विभावरीच्या मनात मात्र वेगवेगळे विचार लपंडाव खेळत होते...कधी सात्विक संताप, तर कधी मनस्ताप...कधी अपराधी भाव तर कधी उदासीन हास्य...डोळे उगीचच पाणावत होते !!!पण आज तिला एका गोष्टीची जाणीव झाली होती.....बायकांना हक्काचं माहेरपण मिळत असेल पण हक्काचं आजारपण मात्र नसतं त्यांच्या नशिबात !!! ...

का कोणास ठाऊक - पण सगळ्या जगाला अगदी ओरडून सांगावंसं वाटत होतं...."आजारी पडणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे... आणि कधी ना कधी तो मी मिळवणारच !!"

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारीये !
म्हणूनच मी मुलाला आधीच सर्व दाखवून, बरंचस शिकवून ठेवलं आहे. Happy

मस्त लिखाण Happy
म्हणूनच मी मुलाला आधीच सर्व दाखवून, बरंचस शिकवून ठेवलं आहे -- आणि मी नवऱ्याला Happy
बाकी ते असंच का तसंच का चे वागबाण घरोघरी सुटत असावेत Proud

हे किचन म्हणजे बाईचे राज्य ही मानसिकता फार जुनी झालेली आहे. तो मुलगा बबड्या होत जाईल अशाने जिम ला जायचे तर स्वतः उठावे आई कशाला लागते उठ वायला. आर्मीत कसे बिगू ल वाजला की सगळे झक्कत उठतात. नाहीतर ऑफिसर्चा दट्ट्या लागेल . भूक लागली तर करून खावे. एक दिवस खिचडी ऐवजी अंडा ब्रेड चालतंय की. सगळी कामे सगळ्यांना यायला हवी नाहीतर स्विगी झोमॅटो आहेच की.

१९७० मध्ये मासिकात अश्या कथा येत. रोहिणी गृहशोभा,

तुला काही लागलं तर सांग..ह्याला!
साबुदाण्यालापण पटले पाहिजे ना
पानीपत, युद्ध भुमी... लै हसले
घर घर की कहानी असलं तरी खुसखुशीत लिहिलंय.

छान लिहिलय..
वरून जितका दाखवतो तितकाही हृदयशून्य नाहीये हा..

मला पण असं खूपदा वाटतं.

बाकी ते असंच का तसंच का चे वागबाण घरोघरी सुटत असावेत

खरय किल्ली

मस्त... सुदैवाने माझ्या नवऱ्याला पूर्ण स्वयंपाक येतो.. आणि न मागता किंवा आजारी न पडता मला हक्काची सुट्टी मिळते.... मुलांना पण हे शिकवलंच पाहिजे...

बाकी सगळं घर आपल्यावर अवलंबून आहे ही जाणीव पण सुखावह असते...

तुला काही लागलं तर सांग..ह्याला!
साबुदाण्यालापण पटले पाहिजे ना
पानीपत, युद्ध भुमी... लै हसले
घर घर की कहानी असलं तरी खुसखुशीत लिहिलंय.+111

घराबाहेर न पडलेले लोक असे बनतात. सध्या असे नवरे राहिले नाहीत. गपचूप किचन मध्ये राबत असतात बायकोबरोबर.