पवित्र रिश्ता...

Submitted by आस्वाद on 31 August, 2020 - 02:04

साल होतं २०१०.
मुंबईला मैत्रिणींसोबत रूमवर रहात होते. सगळ्याचजणी मिळून मिसळून रहात असू. त्यामुळे ऑफिसमधून 'घरी' जायची ओढ असायची. घरी गेल्यावर गप्पा टप्पा, स्वयंपाक आणि जेवण शक्य तेवढं सोबत करायचो. जो पहिले पोचेल तो स्वयंपाक चालू करेल, असा अलिखित नियमच होता.
हळू हळू सगळ्या जणी घरी पोचत. शेवटची रूममेट येईपर्यंत जेवायला थांबलो असायचो आम्ही. कधी फारच उशीर होणार असेल तर फोन करून 'तुम्ही जेऊन घ्या' असा निरोप आठवणीने देत असू. आमची पोळेवाली काकू पण अगदी निगुतीने आमचं काम करायची. कधीच खाडे नसायचे तिचे. एकूण काय, की घरापासून लांब राहून देखील आम्हाला 'घर' होतं. एकमेकींची साथ होती. त्यामुळे आमच्या आई-बाबांना पण आमची काळजी नसायची.
असंच एकदा एकीची तब्येत बिघडली. आम्ही डॉक्टरकडे घेऊन गेलो. टेस्ट्स केल्यावर कळलं की surgery करावी लागेल. आणि surgery नंतर पण महिनाभर तरी तिला रिकव्हरीला लागणार. अशा परिस्थितीत तिला तिच्या घरी जाणं शक्यच नव्हतं म्हणून काकूच आमच्याकडे आल्या. तिची surgery झाल्यावरही काकू १-१.५ महिना आमच्याकडेच होत्या. त्या दिवसांत आमची काकूंशी पण मस्त गट्टी जमली. दिवसभर काकू आणि ती दोघीच घरी असायच्या. मग संध्याकाळ झाली की हळूहळू सगळ्या घरी येत. काकू पण आमची वाटच बघत असायच्या. रोज काहीतरी बनवून ठेवत खायला. मलाच रोज उशीर होत असे. ९ पर्यंत मी पोचे. तोपर्यंत सहसा स्वयंपाक तयार असे. मग सगळ्या जणी जेवायला बसत असू. सहसा गप्पा मारत मारत जेवत असू. कधी TV लावलाच तर अगदी मुद्दाम शोधून काहीतरी टुक्कार मूवी लावायचो. जेवताना नुसतं हाहाहीही चालायचं. पण काकू आल्यावर यात बदल झाला. त्यांना 'पवित्र रिश्ता' बघायचं असायचं. आम्ही कोणीच ऐकता कपूर फॅन नव्हतो. कोणीच एकता कपूरचं एकही सिरीयल फॉलो केलं नव्हतं. त्यामुळे 'पवित्र रिश्ता' बघायला आम्हाला मुळीच इंटरेस्ट नव्हता. पण काकू मात्र ९ वाजले की 'ए, माझं पवित्र रिश्ता लावा न गं' म्हणायच्या. मग लावावंच लागायचं. पण काकूंना शांतपणे बघू देऊ तर आम्हाला जेवण कसं जाईल? यथेच्छ टर उडवायचो. काकूंची पण हसून हसून पुरेवाट व्हायची. पण तरी नेटाने त्या रोज लावायला सांगायच्या. आणि आम्ही रोज खिल्ली उडवायचो. "असा कसा हा मानव आहे, काकू? जी म्हणेल तिच्याशी हा लग्न करेल, त्याला स्वतःला काही चॉईसच नाहीये का? अर्चना तर अर्चना, श्रावणी तर श्रावणी." पण त्या १-१.५ महिन्यात आम्हाला पण पवित्र रिश्ता बघायची सवय लागली. मग काकू गेल्यावर पण कधी कधी मुद्दाम लावून बघायचो. आम्हाला सगळ्या जणींना मानव आवडायलाच लागला होता.
पुढल्या एखाद-दोन वर्षात आम्हा सगळ्यांचीच लग्न झाली. मुंबईला कोणीच राहिलं नाही. सगळ्याच जणी इकडे तिकडे विखुरल्या. पण हे बंध इतके घट्ट होते की जगात कुठेही असलो तरी आम्ही सगळ्याजणी एकमेकींशी बोलायचोच. skype वर विडिओ चॅट नाहीतर conf कॉल नेहमीच चालू असायचं. ऑफिस, पुस्तकं, सिनेमा सारख्या अगणित विषयांमध्ये घर, नवरा, संसार अशा विषयांची एन्ट्री झाली. अगदी सगळं सगळं share करायचो एकमेकींशी. कधी कधी परदेशात असल्याने घरच्यांना ज्या गोष्टी, प्रॉब्लेम्स सांगू शकत नव्हतो ते पण share करायचो. नवऱ्याशी झालेलं भांडण, सासूनी मारलेला टोमणा अशा क्षुल्लक गोष्टी पण एकमेकींना सांगितल्या जात. करिअर बद्दल पण एकमेकींचे सल्ले घेत असू. यात नेहमीच पवित्र रिश्ता चा विषय निघाला कि आमची हसता हसता पुरेवाट व्हायची. आणि मग आला काय पो चे! आम्ही एकमेकिंना 'आपल्या' मानवचा सिनेमा बघायची आठवण दिली. आवडलाच होता मानव त्यात. तेव्हा त्याचं नाव सुशांत आहे हे कळलं.
अशातच मला दिवस गेले. मला आठवतं, ३ महिने कसेबसे मी कळ काढली. ३ महिने ज्या दिवशी झाले, मी सगळ्यांना कॉन्फ कॉल केला आणि हि गोड बातमी दिली. सगळ्याच जणी जाम खुश झाल्या. पहिल्यांदाच मावशी बनत होत्या न! माझी लेक झाली तेव्हा माझ्या इथल्या मैत्रिणीने हॅन्डमेड स्वेटर आणि पिटुकले मोजे असा सेट पाठवला होता कुरिअरनी. बरोब्बर मी हॉस्पिटल मधून घरी आल्यावर मला मिळाला. इतकं छान प्लॅन करून तिने पाठवलेलं पाहून डोळ्यात पाणी आलं. ही तर माझी अगदी 'go-to' मैत्रिण. आम्ही दोघीही US मध्ये होतो. एकमेकींपासून बरेच लांब होतो. कारने गेलो तर १२-१४ तास. तरीही आम्ही भेटायचो.
पुढे हळू हळू सगळ्याचजणी आपापल्या संसारात बिझी झाल्या. फोन कमी झाले. माझे आणि इथल्या मैत्रिणीचे फोन मात्र अगदी नियमित होत होते. दर ८-१५ दिवसांत एकदा तरी कॉल करायचोच. माझी लेक मोठी होत होती. तिला इतकं प्रेम करणाऱ्या मावशा मिळाल्या होत्या. ती पहिलीच बेबी होती आमच्या ग्रुप मध्ये. त्यामुळे तिचं कौतुक पण फार होतं. आणि हि तर खास मावशी होती. माझी मैत्रीण अगदी सुग्रण. नुसतं स्वयंपाकच नाही तर घर पण तिचं अगदी टापटीप. शिवाय आर्टिस्ट. तिचे पैंटिंग्स फार सुंदर असायचे. कायम आनंदी. अगदी तिची नोकरी सोडावी लागली तिला US ला येण्यासाठी. तरीही नवर्याबद्दल कधीच नाराजी, कटुता नव्हती. आहे त्या परिस्थितीत आनंदी कसं राहता येतं, हे तिच्याकडून शिकावं असं मी नेहमीच म्हणत असे.
तिच्या लग्नाला ५ वर्षं झाले आणि तिला गोड बातमी मिळाली. हरखून जाऊन तिनी मला सांगितलं. अगदी तिच्या आईनंतर सर्वात पहिले मला सांगितलं. पण तेव्हापासून आमचे कॉल्स वाढले. काय करू, काय नको हे विचारायला मी 'experienced' होते ना! मी देखील 'been there, done that' या थाटात तिला सल्ले द्यायचे. कुठली कारसीट, कोणतं क्रिब, buy buy baby/babies r us वगैरे unknown territories मध्ये मी तिची पाथफाईंडर झाले. सगळं सुखरूप पार पडून तिला मुलगा झाला. तिची आई आली होती. २-३ महिन्याने मी तिच्याकडे बाळ पाहायला जाऊन आले. या वेळेला मात्र ती मला तेवढी खुश नाही वाटली. पण बाळाच्या दगदगीने थकली असणार अशी मी माझी समजूत घातली. ४-५ महिने राहून काकू वापस गेल्या आणि मग बाळाला एका हाती सांभाळताना तिची तारांबळ उडू लागली. आमचे आता फोन कमी कमी झाले. मी नवीन नोकरी धरली होती, त्यामुळे मी माझ्या ऑफिसच्या कामात जास्त व्यस्त झाले. कधीही तिला फोन केला की जेमतेम १५-२० मिनटं बोलू शकायचो. कधी माझी लेक रडायची तर कधी तिचं बाळ. मी तिला म्हटलं तू माझ्याकडे राहायलाच ये म्हणजे छान गप्पा होतील. ती देखील यायला तयार झाली. २५ डिसेंबर ते १ जानेवारी अशी आठवडाभर माझ्याकडे यायचं कबुल झाली. आणि २४ डिसेंबरला हिने 'मला जमणार नाही' असा मेसेज केला. फोन केला तर उचलला नाही. 'नवऱ्याला ऑफिसमुळे जमत नाहीये' असा १-२ दिवसांनी मेसेज केला. प्रचंड राग आला. शिवाय न्यू इयरचा प्लॅन फिस्कटल्याने नवऱ्याचे टोमणे ऐकावे लागले ते वेगळंच. नंतर जवळ जवळ २-३ महिने आम्ही बोललोच नाही. कधीतरी राग शांत झाला. पुन्हा बोलायला लागलो पण फोन खूप कमी झाले. मग ती २-३ महिन्यासाठी इंडियाला गेली.
आम्ही नवीन घर घेतलं. सामान लागतंच होतं आणि गणपती बसले. एव्हाना watsapp वर अगदी रोजच सगळ्यांशी 'बोलणं' व्हायचं. हिचे पण रोज नवीन फोटोस आणि स्टेटस दिसायचं. वीकएंड होता. आरामात जेऊन झोप काढावी, या विचारात होते. तेवढ्यात इंडियामधल्या दुसऱ्या मैत्रिणीचा फोन आला. इतक्या रात्री कशी काय फोन करतेय, असा विचार करतच फोन उचलला. आणि ती बातमी आली! तिने गळफास लावून आत्महत्या केली!! पुढले कित्येक मिनिटं आम्ही दोघी फक्त रडत होतो. कसं झालं हे असं, समजतच नव्हतं. २ दिवसांपूर्वी तिने याच मैत्रिणीला 'आपण सगळ्या जणी गोव्याला जाऊया' म्हणून फोन केला होता. चांगली तासभर बडबडत होती. आणि एकही क्षण असं वाटलं नाही की काही प्रॉब्लेम आहे!!
हळू हळू आम्ही सगळ्याच जणी या शॉकमधून बाहेर आलो. सर्वात मोठा शॉक मलाच लागला होता. कारण मीच सर्वात जास्त close होते तिला. कुठेतरी आपण मैत्रीण म्हणून कमी पडलो, याची सल बोचत राहिली. अजूनही बोचते.

सुशांतच्या आत्महत्येची बातमी आली आणि सगळ्या आठवणी परत जाग्या झाल्या. ती आत्महत्या की हत्या, या वादात मला पडायचंच नाही.
कुठंतरी सुशांत आमच्या सगळ्यांच्या आनंदी क्षणांचा भागीदार होता. आयुष्याच्या सुखी, स्वच्छंदी वळणावर असतांना पवित्र रिश्ताने आम्हाला खूप हसवलं.

कोणाला माहित होतं की आयुष्य इतकं क्षणभंगुर आहे. आज आपल्यासोबत खिदळणारी आपली मैत्रीण अशी मधूनच उठून जाईल, हे तेव्हा स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. आपल्याला हसवणारा इतका टॅलेंटेड ऍक्टर इतका अचानक आपल्यातून निघून जाईल, हे तरी कसं कळणार! हसणाऱ्या चेहऱ्यामागे किती खोल वेदना दडलेल्या असतात, हे कोणाला कधीच कळणार नाही का?

देव या दोघांच्याही आत्म्याला शांती देवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओघवतं ,साधं पण परिणामकारक लिहिलंय
पाणीच आलं डोळ्यात,मग वाहू दिलं..

तुमच्या मैत्रिणीला आणि आयुष्याचा डाव अर्धा सोडून गेलेल्या प्रत्येकाच्या आत्म्याला शांती मिळो

सुखकर प्रवास सुरु असताना अचानक अपघात होतो तसे जाणवले. छान लेख वाचत असताना शेवटी असे काही घडेल असे वाटलंच नाही. छान लेखनशैली.

ओघवत, साधं पण परिणामकारक लिहिलंय. पाणीच आलं डोळ्यात, मग वाहू दिलं.. तुमच्या मैत्रिणीला आणि आयुष्याचा डाव अर्धा सोडून गेलेल्या प्रत्येकाच्या आत्म्याला शांती मिळो-----+११११११.

अरेरे. शेवट वाचून धक्का बसला. वाईट वाटले खूप. 'eक 'रिशता' असा मध्ये च संपून जावा, लोंबकळून तुटावा ...
चांगलं लिहिलंय.

> असंच एकदा एकीची तब्येत बिघडली. आम्ही डॉक्टरकडे घेऊन गेलो. टेस्ट्स केल्यावर कळलं की surgery करावी लागेल. आणि surgery नंतर पण महिनाभर तरी तिला रिकव्हरीला लागणार. >

काय झालं होतं?

बापरे... कारण कळलं का आत्महत्येचं शेवटी ?
आयुष्यातल्या बारीक सारीक गोष्टी शेयर करणारे लोक इतकं असह्य वाटणारं काही आपल्या प्रियजनांशी का बोलत नाहीत?

तुमचं लेखन वाचलं, तुम्ही खूप छान मांडलंय
त्यामुळे मलापण माझ्यासोबत घडलेली घटना share करावीशी वाटली. पण मला नेमक्या शब्दात मांडता येत नाहीये त्यामुळे सांभाळून घ्या,
माझ्या लहान बहिणीची कॉलेज ची एक मैत्रीण आहे ती आत्ता माझ्यासोबत जॉब कर होती. आमचा विभाग वेगवेगळा असल्यामुळे जास्त संबंध येत नसे,
४ ऑगस्ट ला सकाळी ऑफिस ला आली एक दोन काम पण केले आणि अचानक काय झालं ती कुणालाच ओळखत नव्हती तिची बॉस जी माझी चांगली मैत्रीण आहे तिने मला बोलावलं तर मला ओळखायला पण २-३ मिनिट लागले. तिचे Mr. आले तर त्यांना पण नाही ओळखलं.मग तिला त्यांच्या फॅमिली Dr कडे नेल तर त्यांनी तिला वय विचारलं तर तिने २१ सांगितलं (आत्ता तीच वय ३३ आहे ) नवरा, मूलं. , सासु -सासरे जॉब ऑफिस काहीच आठवत नाहीये.
तिला सासू सासरे आणि घराचा खूप स्ट्रेस होता आणि लोकडोऊन मुळे सगळं जरा जास्त झालं.
खूप वाईट वाटत राहत तिच्याबद्दल. खूप कमी बोलायची ती आणि स्वतःसाठी कधी स्टॅन्ड पण नाही घ्यायची.