लेखन स्पर्धा २ - माझा अनुभव - कोविड-१९ लॉकडाऊन

Submitted by Aaradhya on 30 August, 2020 - 13:41

आपण देवाकडे सतत काहीना काही मागत असतो. बऱ्याचदा जे हवं ते मिळतंही आणि मिळत नाहीही, कधी कधी उशिरा मिळतं. कदाचित म्हणूनच भगवानके घर देर है अंधेर नही म्हण आली असेल. बरेच दिवस झाले सुट्टी नाही कुठे फिरणं नाही फक्त काम काम काम! एका पॉईंटला कंटाळा आला होता पण पर्याय नसल्याने करत होतो. असं वाटत होतं की काहीतरी व्हावं आणि जगच बंद पडावं, म्हणजे सुट्टी मिळेल. देव सगळ्या मागण्यांची एन्ट्री करून घेत असेल बहुदा आणि मग सगळ्यांच्या मागण्या कॅण्डीक्रश च्या गेम प्रमाणे सेट करत असेल. 3,3 जोड्या वाल्या छोट्या छोट्या मागण्या मान्य करताना हा मोठा बंपर धमाका भेटला की बोर्ड बऱ्यापैकी खाली होतो तसं बऱ्याच लोकांच्या मागण्या एकत्र मान्य झाल्या असाव्यात.झालं मार्च महिन्यात उडती उडती बातमी आली की कोणतातरी रोग आलाय आणि हा रोग जरा डेंजर आहे. पण ते चीन मध्ये आपण काय तिकडे जात नाही मग का टेन्शन घ्या ? म्हणून विषय तिथेच सोडून दिला. साधारण २ ३ दिवसांनी इटली वरून केरळला आलेल्या पर्यटकांना कोरोना झाला आहे अशी बातमी वाचली. केरळ फार लांब आहे हे आपल्याकडे काय येत नाही.
माणसाकडे आत्मविश्वास असावा पण अती तेथे माती. इकडे कोविड १९ साठी २ दिवस आस्थापने (दुकाने) बंद ठेवण्यात येतील असे जाहीर झाले. वाटलं २ दिवसांनी सुरू होईल सगळं. स्वाईन फ्लू आलाच होता की, तो पण आला तेव्हा हेच म्हणत होते लोक. मी तर मास्क पण लावला नव्हता तेव्हा, कुठे काय झालं? आहेच की अजून जिवंत.
माणूस हा निष्काळजी प्राणी आहे असं म्हणण्यापेक्षा अतिआत्मविश्वासी आहे म्हणलं पाहिजे. जोपर्यंत मरण येऊन मिठी नाही मारत तोपर्यंत त्याचं मला काय होतंय हेच चालू असतं. टीव्ही, मोबाईल, रेडिओ सगळीकडे हेच सांगत होते की, बाहेर पडू नका, कोरोनाचा धोका आहे. आणि नेमकं आपण सर्वजण ह्याविरुद्ध करत होतो. बातम्या, व्हाट्सएपच्या फॉरवर्ड सगळीकडे गर्दी आहे असंच दाखवत होते. एरव्ही जे आहे ते खाणारा वर्ग ताज्या भाज्यासाठी मार्केट मध्ये गर्दी करत होता. मास्क सॅनिटायजर हे तर किती वेळ त्यांचं काम करणार.
लॉकडाऊन च्या काळात डोक्याला फार काही काम नसल्याने त्याचं खाली दिमाग शैतान का घर झालं होतं. सतत काहींना काही विचार डोक्यात येत असायचे. आपण जिथे नेहमी जात होतो तो भेळवाला, दाबेलीवाला वगैरे त्यांचीही दुकाने बंद असतील. असे कितीसे कमवत असणारेत ते पुरतील का त्यांना पैसे?
भर उन्हात आपल्यासाठी काम करणारे पोलीस कर्मचारी, सफाई कामगार, दिवसदिवस भर पीपीई किट घालून काम करणारे डॉक्टर्स, नर्सेस, ब्रदर्स ह्यांना वेळेवर जेवायला मिळत असेल का ? त्यांच्याशी सगळे चांगले वागत असतील का? आज हे लोक नसते तर काय झालं असतं? खरंतर कोरोना बरोबर आपण लढलोच नाही. ह्या लोकांनी ती जबाबदारी स्वतः वर घेऊन आपल्या आणि कोरोनाच्या मध्ये ढाल बनून उभे राहिले. एक आई मुलाला चांगले संस्कार मिळावेत म्हणून जसं बाळाला समजावून, वेळ पडली ओरडून, कधी मारून शिकवत असते. अगदी तसंच पोलिसांनी काम केलं. काहींना समजावून सांगितले तर काहींना उठाबश्या काढायला लावल्या तर प्रसंगी फटके ही दिले. पण जे काही केलं ते आपल्यासाठीच केलं. हे लोक तिथे आपल्यासाठी होते म्हणून आपण घरात सेफ आहोत/होतो.
व्यवसाय शेती रिलेटेड असल्याने सतत शेतकरी भेटत असतात. असेच एक काका काहीतरी घ्यायला आले होते तेव्हा बोलता बोलता सहज बोलून गेले की, कोरोना आल्यापासून सतत हात धुवायची सवय लागलीय आणि त्यामुळे गेल्या काही महिन्यात घरातील कोणीच आजारी नाही पडलं. आधी सारखं काही न काही चालू असायचं. विचार केला तर त्याचं म्हणणं बरोबरच होतं, गेल्या काही महिन्यात अति स्वछते मुळे आपल्या आणि आपल्या घरच्या सर्वांचीच तब्येत ठणठणीत आहे.
२२ मार्च पासून लॉकडाऊन सुरू झाला. खरं सांगायचं तर मला लॉकडाऊन म्हणजे नक्की काय ते माहीत नव्हतं. मागे २,३ वेळा दंगल झालेली तेव्हा करफू की कर्फ्यु काहीतरी लागलेलं पण तेव्हा आम्ही बाहेर फिरतच होतो. सोशल डिस्टन्सींग हा प्रकार ही नव्यानेच माहीत पडला. मला कोरोना म्हणजे हडळ वाटते. गोष्टीतल्या पुस्तकात असते तशी. तिचं मनुष्य प्राण्यावर फार प्रेम आहे म्हणून ती मनुष्याच्या शरीरात प्रवेश करते. प्रबळ इच्छाशक्ती असलेला त्या हडळी च्या तावडीतून सुटतो आणि कमकुवत मनाचा जीवाला मुकतो. ह्या हडळी बरोबर लढायचं असेल तर शरीराबरोबर मनही स्ट्रॉंग पाहिजे कारण शरीराने कितीही बळकट असलो तरी मनाची भीती घात करतेच.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंय
पटलं
(शेवट थोडा अकस्मात झालाय का?अजून काही लिहिणार होतात का?)

धन्यवाद
शेवटी आणखी एक किस्सा लिहला होता पण नंतर तो एडिट केला त्यामुळे झालं असेल कदाचित.

शरीराबरोबर मनही स्ट्रॉंग पाहिजे कारण शरीराने कितीही बळकट असलो तरी मनाची भीती घात करतेच.>>परफेक्ट

आटोपशीर आणि अगदी नेमकेपणाने लिहिलेला लेख.

खालील वाक्ये फार भिडली/भावली...

>> स्वाईन फ्लू आलाच होता की, तो पण आला तेव्हा हेच म्हणत होते लोक. मी तर मास्क पण लावला नव्हता तेव्हा, कुठे काय झालं? आहेच की अजून जिवंत.

>> खरंतर कोरोना बरोबर आपण लढलोच नाही. ह्या लोकांनी ती जबाबदारी स्वतः वर घेऊन आपल्या आणि कोरोनाच्या मध्ये ढाल बनून उभे राहिले.

>> लढायचं असेल तर शरीराबरोबर मनही स्ट्रॉंग पाहिजे कारण शरीराने कितीही बळकट असलो तरी मनाची भीती घात करतेच.

छान वर्णन केले आहे अनुभवलेल्या परिस्थितीचे. खोडलेला किस्सा कम अनुभव शक्य झाल्यास दुरुस्त करून लिहा पुन्हा.

Atulpatil, कमला, किशोर मुंढे धन्यवाद.
किस्सा काही खास न्हवता. झालेलं काय आमच्या इकडे खूप दिवस झाले एक अफवा (की खरंच?) आहे की साधी सर्दी खोकला असेल तरी कोरोना म्हणून नेतात. त्यांना पैसे मिळतात वगैरे. एकजण व्यायामाला गेला त्याला तिथूनच उचलून नेलं नंतर व्यक्तीचा अहवाल पॉसिटीव्ह आला. आणि बघता बघता तो गेला ही. तर असंच एक दिवस मलाही अशक्तपणा जाणवायला लागला सोबतीला सर्दी खोकला सुरू झाला. झालं आता काय आपण राहत नाही. रात्री स्वप्नात यम रेड्यावरून घ्यायला येतोय वगैरे दिसायला लागला. गडबडून जागं झालो तर घशाला कोरड पडलेली. सर्दी मुळे घसा पण खवूखवू लागला. अलमोस्ट कोरोना चे सगळे simtoms दिसत होते. म्हणलं मला झाला तर ठीक आहे पण आजी आजोबा त्यांचं कसं होईल. ठरवलं सकाळी उठलो की वेगळं राहायचं. पण उठल्यावर ताप ही न्हवता आणि सर्दी खोकला ही नाही सगळा मनाचा खेळ Lol