पाककृती स्पर्धा १ - मोदक बनवणे - भरत.

Submitted by भरत. on 28 August, 2020 - 10:45

गणेशोत्सवात दरवर्षी मी काजू मोदक करतो. यंदा मायबोली गणेशोत्सवात मोदकांचीच स्पर्धा असल्याने काहीतरी वेगळे करणे भाग होते.
बिस्किटांपासून करायचा हा सोप्पा केक अनेकदा केला आहे. कुठल्याशा कुकरी शोमध्ये मारी बिस्किटापासून करंजी केलेली पाहिली होती. तेव्हा बिस्किटांचा मोदक नक्कीच करता येईल असं वाटलं. नेटवर शोधलं तेव्हा अनेक रेसिपीज दिसल्या. त्यांच्यावर नजर फिरवली आणि बिस्किट मोदकांचा बेत पक्का केला.

साहित्य
१. पार्ले जी १०० ग्रामचा पुडा
२ हाइड & सीक १०० ग्रामचा पुडा
३ दूध
४ पिठीसाखर

मोदकाचा साचा

क्रमवार कृती
१. दोन्ही पुड्यांतली अर्धी अर्धी बिस्किटं घेतली. त्यांचे लहान तुकडे करून मिक्सरमध्ये फिरवून बारीक पूड करून घेतली.
२ पिठीसाखरेचा दगड झाला होता. तोही मिक्सरमध्ये फिरवून बारीक पूड केली.
३. थोडं दूध कोमट करून घेतलं. आणि बिस्किटांच्या चुर्‍यात थोडं थोडं घालत मिश्रण ढवळत राहिलो. इतकं करूनही अचानक मिश्रण पातळ झालं.
४. काजू मोदकांचा अनुभव गाठीशी असल्याने त्यात मिश्रणात पिठीसाखर घालून ते घट्ट होतंय का हे पाहिलं.
५. हाइड & सीक मधलं चॉकलेट आणि बाकी पदार्थांचा संयोग होऊन मिश्रण घट्ट होत होतं. काट्याला जड लागत होतं. पण तरीही मळता येईल, गोळा करता येईल इतकं कोरडं नव्हतं.
६ मग दोन्ही पुड्यांतली उरलेली बिस्किटं मिक्सरमध्ये फिरवून आधीच्या काल्यात ती पूड घातली. आता मिश्रण जास्तच कोरडं झालं.

चित्रपट मालिकांत पहिल्यांदाच कणीक मळणारी व्यक्ती कधी पाणी, कधी पीठ घालत राहते आणि मोठ्ठा राडा करते तसे होण्याची चिन्हे दिसू लागली. (इथे पिठाचा डबा डोक्यावर उपडी होण्याची भीती नव्हती, एवढंच) थोडंसं दूध आणखी घातलं , पिठीसाखर घातली आणि काटा बाजूला ठेवून मिश्रणात हात घातला. तेव्हा ते जरा हाताळण्याजोगं झालं.
तेवढ्यात आठवलं की नुसत्या फायनल प्रॉडक्टचे फोटो पुरेसे नाहीत. म्हणून बोटे आणि हात चाटून स्वच्छ केले आणि त्या होऊ घातलेल्या गोळ्याचा फोटो काढला.
IMG_20200827_212737.jpg
फोन हातात घेतल्यावर मायबोलीवर बागडणे अनिवार्य असते त्यामुळे त्यात काही मिनिटे गेली. तोवर गुमान पडून असलेला गोळा आवाक्यात आला.

मोदकाच्या साच्याला तूप लावून त्यात मिश्रण भरून मोदक तयार केले. ते बर्‍यापैकी मॉइस्ट होते आणि बाहेर पाऊसही पडत होता म्हणून डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवले.

या मोदकांना व्हाइट चॉकलेटमध्ये बुडवून जरा ग्लॅमरस करायचा बेत होता. पण तेवढ्यात मायबोलीवर बिस्किट मोदकांची कृती आलेली दिसली. तेव्हा आधी ही कृती लिहून काढली.
IMG_20200828_183254.jpg
क्लोज अप
IMG_20200828_183604.jpg

मोदक उरले आणि व्हाइट चॉकलेट डेकोरेशन यशस्वी झालं तर ती स्टेप आणि फोटो वाढवण्यात येतील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा जी वा. बडी कुकिंग शुकिंग हो रही है. मी प्रवाहाच्या विरुद्ध म्हणून गाजर हलवा बनवला आणि खोबर्‍याच्या वड्या व तांदळाच्या पिठीची धिरडी बनवली. क्रेप्स बनवून खाईन. छानच दिस त आहेत.

पा कृ भारी आणि उपद्व्यापाचे वर्णन त्याहून भारी. अगोड वाटलेच तर पिठीसाखर शिवरता येईल आणि सजावटही होईल.

Pages