पाककृती स्पर्धा १ - मोदक बनवणे, डिकन्सट्रक्टेड मोदक, सई केसकर

Submitted by सई केसकर on 25 August, 2020 - 09:10

मला गेले अनेक दिवस अमेरिकेची आठवण येते आहे. तिथल्या अनेक गोष्टी आठवतात पण बऱ्याचदा कॅलिफोर्नियातले चेक्सचे शर्ट घालणारे, मोठ्या फ्रेमचे चष्मे घालणारे, अंतर्वस्त्रापासून ते डोक्याला लावायच्या तेलापर्यंत सगळं ऑरगॅनिक वापरणारे, हे जग म्हणजे एक भयानक षडयंत्र आहे असं मनापासून मानणारे असे हिपस्टर लोक आठवतात. त्यांची खाद्यसंस्कृती फार रोचक आहे. एकदा मी डिकन्सट्रक्टेड सुशी खाल्ली होती. एका ग्लासमध्ये मला शिजवलेला भात, अवोकाडो, चिकन आणि वसाबी असं आणून दिलं. छान लागलं. बिल बघून यात किती कंस्ट्रक्टेड सुश्या आल्या असत्या असंही वाटलं.

डिकन्सट्रक्टेड म्हणजे काय, तर एखाद्या पदार्थाचे सगळे घटक तसेच्या तसे ठेऊन तो पदार्थ एका वेगळ्या रूपात, पण कृती आधीपेक्षा सोपी करून घडवायचा. यात बऱ्याचदा मूळ पदार्थाच्या कृतीमधली एखादी अवघड पायरी वगळली जाते. कधी कधी मैदा वगैरे असलेले भाग वगळून काही कृती केल्या जातात. याचं एक उदाहरण म्हणजे ऍपल पाय. याच्या वरचे आवरण वगळून उंच ग्लास मध्ये बाकी सगळे जिन्नस टाकून त्यावर वॅनिला आईस्क्रीम घालून डिकन्सट्रक्टेड ऍपल पाय बनतो.

अर्थात मला उकडीचे मोदक जमले नाहीत हे सांगायचा हा फारच लांबचा रस्ता झाला पण असो. तर डिकन्सट्रक्टेड मोदक.

जिन्नस
1 वाटी तांदळाचा रवा
1.5 वाट्या पाणी
2 चमचे तूप
1/4 चमचा मीठ
1 वाटी ओल्या नारळाचा चव
1 वाटी किसलेला किंवा पावडर गूळ
4 चमचे खसखस
डिंक हवा असल्यास
1/4 चमचा जायफळ
तीळ सजावटीसाठी.

कृती:
1. पाणी जड बुडाच्या भांड्यात उकळायला ठेवा. त्यात तूप आणि. मीठ घाला. मीठ महत्वाचे आहे कारण त्याशिवाय पदार्थाला मोदकासारखी चव येत नाही.
PSX_20200825_180047.jpg
2. तांदळाचा रवा घालून आपण मोदकासाठी आणतो तशी त्याला वाफ आणायची. थोडावेळ झाकून शिजू द्या आणि मग झाऱ्याने हलवून शक्य तितकं घट्ट करून घ्या.
PSX_20200825_180021.jpg
3. वेगळ्या कढईत खसखस आणि खोबरं थोडं परतून घ्या. आणि मग गूळ, खसखस खोबरं आणि जायफळ उकडलेल्या रव्यात टाका. मिश्रण थोडं पातळ वाटत असेल तर आटवून घ्या.
PSX_20200825_175749.jpg
4. डिंकाला तूप लावून मायक्रोवेव्हमध्ये फुलवून घ्या. आपलं मिश्रण गार झालं की त्यात डिंकाचा चुरा घालून लाडू वळून घ्या.
PSX_20200825_175626.jpg

लाडू साधारण हळिवासारखे होतात पण अगदी मोदकासारखे लागतात.
PSX_20200825_175509.jpg

मी लाल तांदुळाचा रवा वापरलाय आणि माझा गूळही केमिकल विरहित आहे म्हणून रंग असा गडद चॉकलेटी आला आहे. तो तुमच्या तांदळाच्या आणि गुळाच्या रंगाप्रमाणे बदलू शकतो.

ही पाककृती जर अगदीच टोकाची वाटली तर संयोजकांनी ती बाद करावी.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त प्रकार सई. डिकंस्ट्रक्टेड ही टर्म आवडली आहे.

मलाही खांडवी ची आठवण झाली. मला स्वतःला मोदकाच्या प्रिपरेशन मध्ये सगळ्यात आवडणारी स्टेप म्हणजे मोदक वळणे. स्वर्ग सुख मिळतं सुरेख वळले गेले मोदक कि.

deconstructed पदार्थ - हे प्रथमच ऐकलं. >>>>> +१११ होय मी पण

मोदक खावे तर फक्त तळणीचेच .>>>> का बरें?

>>>मलाही खांडवी ची आठवण झाली. मला स्वतःला मोदकाच्या प्रिपरेशन मध्ये सगळ्यात आवडणारी स्टेप म्हणजे मोदक वळणे. स्वर्ग सुख मिळतं सुरेख वळले गेले मोदक कि.

वा! मलाही असा अनुभव येउदे लवकरच! Happy

सगळ्यांचे आभार!

>>>>Vegali पा. कृती म्हणून ठीक आहे.पण मोदकाच्या साहित्याचा असा काला करण्यापेक्षा पारित नुसते सारण गुंडाळले असते तरी चालले असते. बिन कळ्यांचे मोदक म्हणून ओळखले गेले असते<<<
+११११
सरळ चपटा लाडु म्हणायचे ना, उगाच ओढून ताणून केलेला प्रकार वाटतोय. उगाच तारीफ काही जमत नाही. Light 1

नावीन्य पूर्ण रेसिपी

मोदकांना कळ्या करण्याचे wa व्हिडीओ आले नाहीत का?
हाताने वळून साधारण मोदकाचा आकार द्यायचा आणि एक टूथपिक घेऊन खालच्या भागात कळ्यांचे डिझाइन करायचे,
किस्सी को पता नही चलेगा. Happy

Pages