पाककृती स्पर्धा १ - मोदक बनवणे, डिकन्सट्रक्टेड मोदक, सई केसकर

Submitted by सई केसकर on 25 August, 2020 - 09:10

मला गेले अनेक दिवस अमेरिकेची आठवण येते आहे. तिथल्या अनेक गोष्टी आठवतात पण बऱ्याचदा कॅलिफोर्नियातले चेक्सचे शर्ट घालणारे, मोठ्या फ्रेमचे चष्मे घालणारे, अंतर्वस्त्रापासून ते डोक्याला लावायच्या तेलापर्यंत सगळं ऑरगॅनिक वापरणारे, हे जग म्हणजे एक भयानक षडयंत्र आहे असं मनापासून मानणारे असे हिपस्टर लोक आठवतात. त्यांची खाद्यसंस्कृती फार रोचक आहे. एकदा मी डिकन्सट्रक्टेड सुशी खाल्ली होती. एका ग्लासमध्ये मला शिजवलेला भात, अवोकाडो, चिकन आणि वसाबी असं आणून दिलं. छान लागलं. बिल बघून यात किती कंस्ट्रक्टेड सुश्या आल्या असत्या असंही वाटलं.

डिकन्सट्रक्टेड म्हणजे काय, तर एखाद्या पदार्थाचे सगळे घटक तसेच्या तसे ठेऊन तो पदार्थ एका वेगळ्या रूपात, पण कृती आधीपेक्षा सोपी करून घडवायचा. यात बऱ्याचदा मूळ पदार्थाच्या कृतीमधली एखादी अवघड पायरी वगळली जाते. कधी कधी मैदा वगैरे असलेले भाग वगळून काही कृती केल्या जातात. याचं एक उदाहरण म्हणजे ऍपल पाय. याच्या वरचे आवरण वगळून उंच ग्लास मध्ये बाकी सगळे जिन्नस टाकून त्यावर वॅनिला आईस्क्रीम घालून डिकन्सट्रक्टेड ऍपल पाय बनतो.

अर्थात मला उकडीचे मोदक जमले नाहीत हे सांगायचा हा फारच लांबचा रस्ता झाला पण असो. तर डिकन्सट्रक्टेड मोदक.

जिन्नस
1 वाटी तांदळाचा रवा
1.5 वाट्या पाणी
2 चमचे तूप
1/4 चमचा मीठ
1 वाटी ओल्या नारळाचा चव
1 वाटी किसलेला किंवा पावडर गूळ
4 चमचे खसखस
डिंक हवा असल्यास
1/4 चमचा जायफळ
तीळ सजावटीसाठी.

कृती:
1. पाणी जड बुडाच्या भांड्यात उकळायला ठेवा. त्यात तूप आणि. मीठ घाला. मीठ महत्वाचे आहे कारण त्याशिवाय पदार्थाला मोदकासारखी चव येत नाही.
PSX_20200825_180047.jpg
2. तांदळाचा रवा घालून आपण मोदकासाठी आणतो तशी त्याला वाफ आणायची. थोडावेळ झाकून शिजू द्या आणि मग झाऱ्याने हलवून शक्य तितकं घट्ट करून घ्या.
PSX_20200825_180021.jpg
3. वेगळ्या कढईत खसखस आणि खोबरं थोडं परतून घ्या. आणि मग गूळ, खसखस खोबरं आणि जायफळ उकडलेल्या रव्यात टाका. मिश्रण थोडं पातळ वाटत असेल तर आटवून घ्या.
PSX_20200825_175749.jpg
4. डिंकाला तूप लावून मायक्रोवेव्हमध्ये फुलवून घ्या. आपलं मिश्रण गार झालं की त्यात डिंकाचा चुरा घालून लाडू वळून घ्या.
PSX_20200825_175626.jpg

लाडू साधारण हळिवासारखे होतात पण अगदी मोदकासारखे लागतात.
PSX_20200825_175509.jpg

मी लाल तांदुळाचा रवा वापरलाय आणि माझा गूळही केमिकल विरहित आहे म्हणून रंग असा गडद चॉकलेटी आला आहे. तो तुमच्या तांदळाच्या आणि गुळाच्या रंगाप्रमाणे बदलू शकतो.

ही पाककृती जर अगदीच टोकाची वाटली तर संयोजकांनी ती बाद करावी.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगली पाकृ आणि सोपी आहे बरीच.
रंग छान आला आहे.
संयोजक ही पाकृ स्पर्धेत घेतील की नाही माहीत नाही पण मी नक्की करून बघणार.

छान आहे की, अन संयोजकांनी तुम्हाला सांगितले आहे ना की कळ्या नसल्या तरी चालेल मग ते का बाद करतील?

छान पाककृती.
लाडू वळायच्या ऐवजी त्याला मोदकाचा आकार दिला असता तर चालले असते.

छान दिसतंय एकदम.. लाल तांदळाचा रवा.. म्हणजे हेल्थी सुद्धा..मी बनवून बघेन

>>>लाडू वळायच्या ऐवजी त्याला मोदकाचा आकार दिला असता तर चालले असते.
मी प्रयत्न केला तसा पण माझ्याकडे साचा नाही आणि हाताने तसा आकार देऊन सुंदर नव्हते दिसत.

>>छान दिसतंय एकदम.. लाल तांदळाचा रवा.. म्हणजे हेल्थी सुद्धा..मी बनवून बघेन
मी काही दिवसांत पांढऱ्या तांदळाचे असे करून बघणार आहे. तेव्हा फोटो टाकेन इथे. रवा घरी बनवावा लागेल.

मस्त आहे रेसिपी. Deconstructed हा प्रकार पहिल्यांदा ऐकला. आणि आवडला. मला मोदक कळ्या हे प्रकरण जमत नाही त्यामुळे मी मोदकांवर उगीच हाईपड केलेला प्रकार असा शिक्का मारलाय... deconstructed ही माझ्यासारख्यांसाठी चांगली सोय आहे Happy

छान!
किंचित मीठ असलेली पारी आणि मग गोड सारण अशी अदलुन बदलुन चव आवडते.
असा सगळा एकत्र लगदा करायच्या ऐवजी निवग्र्यांना करतो तशी (मायनस एनी मसाला)नुसती पारी वाफवुन तिचे तुकडे ग्लासात टाकून मल्टी लेअर्ड सारण - पारी केलं तर छान दिसेल आणि वेगळं टेक्श्चर असल्याने लागेलही असं वाटलं.

फारच छान पाककृती.
माझ्यासारख्या कळ्या/उकड/मोदक challenged लोकांसाठी उत्तम. हे ग्लेझड डोनट ball / Tim Horton's चे टिमबिट्स सारखे दिसतेय मुलांना आवडेल नक्कीच !

>>पारी केलं तर छान दिसेल आणि वेगळं टेक्श्चर असल्याने लागेलही असं वाटलं.
मी आधी हाच विचार करून मोदक लाझानिया करणार होते. पण ते तितकंसं व्हिजुअली अपीलिंग वाटलं असतं का असा प्रश्न पडला होता. आणि लाडू पटकन तोंडात टाकता येतो म्हणूनही अशी केली.

@साधना
सुंदर कळीचे मोदक ज्यांना जमतात त्यांच्याबद्दल मला फार आदर आहे. हे आपलं असंच. आता ममोच्या टिप्स वापरून पुन्हा उकड काढणार आहे.

>>Tim Horton's चे टिमबिट्स
हो की! खरंच तसं दिसतंय. माझ्या मुलाला मोदकापेक्षा हा लाडू आवडला कारण त्याला तसा टेक्श्चरचा इशू आहे. तळलेले खातो तो पण उकडीचे नाही खात.

आता माझ्या हाताने बरेच deconstructed पदार्थ तयार होतील..ठणकावून सांगेन घरातल्याना deconstructed croissant असेच असतात म्हणून..

Vegali पा. कृती म्हणून ठीक आहे.पण मोदकाच्या साहित्याचा असा काला करण्यापेक्षा पारित नुसते सारण गुंडाळले असते तरी चालले असते. बिन कळ्यांचे मोदक म्हणून ओळखले गेले असते. Light 1

@देवकी
रेसिपी नक्कीच controversial आहे. म्हणूनच संयोजकांना आधीच सांगितले आहे.

सुरेख रंग आलाय फायनल प्रॉडक्टचा.
Deconstructed american recipes पाहिल्या आहेत पण मोदकाच्या रेसिपीत हा ट्विस्ट आणणे आवडलं.

आईकडे सणाला शास्त्र म्हणून पुरण घालतात. थोडं पुरण, शेवयांची खीर, वरण भात असा नैवेद्य असतो. मग आम्ही साधी पोळी, ते पुरण , त्यावर तूप असं जेवताना खातो. त्याला deconstructed पुरणपोळी म्हणता येईल का?
(मी हर हायनेस सासूबाईंना मात्र डिकन्स्ट्रकटेड पुपो आणि उमो ऑफर करण्याची हिंमत करणार नाही Wink )

फोटो मस्त आहेत. रेसिपीही छान.
शिवाय मोदक या शब्दाचा खरा अर्थ गोड पदार्थ. लाडू हाही एक लोकप्रिय गोड पदार्थ म्हणून त्यांना मोदक असं म्हटलं जाऊ लागलं. गणपतीला खरे आवडतात ते लाडूच.

>>त्याला deconstructed पुरणपोळी म्हणता येईल का?
अर्थात!! त्यातही पोळीचा पुरण घालून रोल करून त्यावर तूप घालून एकदम क्लोजप पोर्ट्रेट शॉट्स घ्यायचे. हा.का. ना. का.
लोकडाऊनमध्ये मी पुरण भरून पाव केला होता (अनपान बनसारखा). आणि त्याला पुरणपाव म्हंटलं होतं. त्यावर बऱ्याच लोकांनी फक्त मैत्री आहे म्हणून मला शिव्या घातल्या नाहीत.

छानच कल्पना आहे! चवीला मोदकांसारखे लागले म्हणजे deconstructed पदार्थ म्हणून पास झाले लाडू. Deconstructed पदार्थाच्या कल्पनेला फुलवायला भारतीय पदार्थांमध्ये भरपूर वाव आहे.
पण मला lasagna ची कल्पना फार भारी वाटते आहे. किंवा ravioli सारखं काहीतरी पण करता येईल मोदकाचं. Lasagna किंवा ravioli हे deconstructed असणार नाहीत पण मोदकाचे अपारंपरिक variation म्हणून छान लागतील असं वाटतंय!

>>पण मला lasagna ची कल्पना फार भारी वाटते आहे. किंवा ravioli सारखं काहीतरी पण करता येईल मोदकाचं.
तांदळाचा प्रॉबलेम असा आहे ही गव्हाइतकी "रूम टू प्ले" नाही कारण ग्लूटेन नाही. म्हणून उकडसुध्दा इतकी अवघड जाते कधी कधी. म्हणून मी त्या वाटेला गेले नाही. ज्या व्यक्तीला उत्तम उकडीचे मोदक जमतात तीच तिचा लाझानिया करू शकेल. आणि जिला तसे जमतात ती लाझानिया का करेल?

खरं आहे. तांदूळाची उकड इतकी forgiving नसते. पण structurally lasagna किंवा ravioli मोदकाच्या आकारापेक्षा जास्त forgiving वाटताएत. अर्थात करुन बघितल्यावरच कळेल.

deconstructed पदार्थ - हे प्रथमच ऐकलं.

मी सुद्धा एकूणच 'पदार्थांची कलाकुसर चॅलेन्ज्ड' आहे,
त्यात वेळ का घालवा, चव महत्वाची असं माझं स्पष्ट मत Proud

त्यामुळे आयडिया आवडलेली आहे.

अर्रे बॉस इतकी मस्त पाककृती ... थोडा यूट्यूब सर्च मारला असतास तर.... एक संज्योत खीर (का कीर) नावाचा शेफ चमच्याने मोदक करतो. बरे दिसतात. आता संयोजकाना नम्र विनंती करणे आले.
(मी डिकन्स्ट्रेकटेड फणसाची खीर खाल्ली होती. इतकी डिकन्स्ट्रक्टेड की सांगितलं म्हणून कळलं नाहीतर फणसाचे आईसक्रिम समजले होते. शेवयाच्या घरट्यावर फणसाचा आईसक्रिमी गोळा होता आणि वर कुठलासा नारळ सॉस. अवांतर तरी लिहीलं कारण ही पाककृती तशी वाटली नाही. चव मोदकाचीच लागेल असे वाटले.)

.deconstructed पदार्थ - हे प्रथमच ऐकलं. >>>>> +१
फोटो टेम्प्टींग ! कल्पना आवडली.
पितळी पातेली पाहून छान वाटलं..... कल्हई ड्यू आहे.

छान आहे प्रयत्न!
नेटफ्लिक्सच्या एका शो मधे स्पर्धकाने तिरामिसु deconstruct केला होता , मुख्य लेअरिन्गच केले नसल्याने जजेस बघुनच नाखुश झाले पण चव घेतल्यावर मात्र त्यानी वहवा केली तस काहिच झाल पहिल्या काही स्टेप्स बघुन प्रश्न पडले पण एन्ड प्रॉडक्ट चान्गल दिसतय.
तसही . मोदक खावे तर फक्त तळणीचेच .

Pages