।।मेलेलं कोंबडं।।। (भाग ५ - अंतिम)

Submitted by mi manasi on 22 August, 2020 - 12:40

।।मेलेलं कोंबडं।।
(भाग ५-अंतिम)

जुई बिल्डिंगजवळ आली तर कंपाऊंडमध्ये ओला टॅक्सी उभी होती.

सवयीप्रमाणे तिकडे जराही लक्ष न देता जुई जिन्याकडे वळली तर तिला अगदी समोरून सुमाआजी येतांना दिसल्या. सोबत त्यांची मुलगी-अनघा होती. जुई समजली. म्हणजे सुमाआजी चालल्या…जुईचा गळा भरून आला. जुई जशी जमिनीत रुतूनच बसली. तिला एक पाऊलही टाकवेना. सुमाआजी अगदी पुढ्यात येऊन उभ्या राहिल्या तरी जुई जागीच खिळून होती. सुमाआजी आल्या आणि त्या जुईला जवळ घेणार इतक्यात अनघा रागाने म्हणाली..

"अगं आई, काय करतेयस तू? जगात काय चाललंय? ती बाहेरून आलीय...थांब! तिच्या जवळ नको जाऊस... म्हणून मी तुला इथे ठेवत नाहीय..."

“हो! हो! विसरलेच बघ मी!”…सुमाआजी ओशाळून जागीच थांबल्या. मग पिशवीतून एक पाकीट काढून त्यांनी ते जुईकडे दिलं...

"हे आधी तूझे पैसे घे बघू! मी शिंदेकाकूंकडे देऊन जाणार होते बघ! आता मी कधी परत येईन काय माहित?"... त्यांचा आवाज कातर झाला…

"आणि तुलाही आता लागतीलच ना? आपली काळजी घे हं बाळा..आणखी काय सांगू?" सुमाआजी भरल्या गळ्याने बोलत होत्या.

जुई गप्प होती. तिला आपण नेमकं काय बोलावं तेच कळंत नव्हतं. पण तिला माहित होतं, बोललं नाही तरी, सुमाआजींना सगळं कळतं ... जुई नुसतीच त्यांच्यासोबत चालत टॅक्सीपर्यंत गेली... टँक्सीत बसण्याआधी सुमाआजी थोड्या घुटमळल्या. तिथेच थोडं थांबल्या...

“फोन कर ग मला"...जुई हो-नाही काही बोलली नाही...

मुलीने बसायचा इशारा करताच मग आजी टँक्सीत बसायला गेल्या. पण लगेच एकदम काहीतरी आठवल्यासारखं दाखवून मागे वळल्या...

"अरे हो! पण फोन कसा करशील?तुझ्याकडे फोन कुठे आहे? तुझा मोबाईल तर निलेशने काढून घेतला ना?”...बोलता बोलता त्यांनी पिशवीतून त्यांचा मोबाईल काढून तो जुईपुढे केला...

“असं कर, हा ठेव तुझ्याकडे...”

जुईने अनघाकडे पाहिलं. तिच्या कपाळावर आठ्या दिसल्या. जुईने हात पुढे केला नाही. ती आजींना म्हणाली...

"नको आजी...कशाला?..." आजीनी त्याकडे दुर्लक्ष करून मोबाईल जुईच्या हातात जरदस्तीने कोंबलाच......

"अगं! घर बंद ठेवून जातेय. काही असलं तर कळवशील तरी."

ते ऐकताच अनघा लगेच म्हणाली…

"हो ग हो! हे माझ्या लक्षातच आलं नव्हतं. घे ग जुई. आणि आईला माझ्या नंबरवर फोन कर हं!"

आजीनी डोळे मिचकावले. जुईने मोबाईल घेतला. मनातली वादळं फुटायला एकच तर किनारा होता. आता त्यातलंही अंतर वाढलं होतं. तिला आजींशी खुप बोलायचं होतं. पण जुईला समजलं होतं...

जवळ राहायला नुसतं प्रेम पुरेसं नसतं... दोघात काहीतरी नातं असावंच लागतं... आजी निघून गेल्या...

कधीची जुई ग्यालरीत बसून होती. दाराला कुलुप होतं. आता निलेश येईपर्यंत असंच बसून राहावं लागणार होतं. पुढे काय माहीत काय होणार... खोल मनांतले विचारांचे फुत्कार काहीकेल्या थांबत नव्हते...

नाना, भाऊकाका, काकू…आणि आता शैवटी सुमाआजीही! एकेक करत सगळे आधाराचे हात सुटले... सुहासचा मनाला थोडा कुठे काडीचा आधार होता. तोही भ्रम तुटला. आता जसं आहे तसं जगणं स्वीकारलंय असं वाटत होतं पण सुमाआजी गेल्यावर मन कसं अगदी रिकामं रिकामं झाल्यासारखं वाटतंय..जगायची भीती वाटतेय...

..म्हणजे अजून कोंबडं मेलेलं नाही? धुगधुगी आहे थोडी? असं कसं चालेल? अजून किती मोठमोठे आगीचे लोळ उठतील. ते कसे सोसायचे मग?...

घसा सुकला म्हणून जुईने पर्समधून आपली पाण्याची बाटली काढली. थोडंसच पाणी उरलं होतं. मनात आलं... काय माहीत हे असं जगणं अजून किती उरलंय ...संपवावं का? कि थोडं थांबावं अजून? ...निलेशला यायला उशीर झाला तर? सगळेच उत्तर नसलेले प्रश्न!...तिने पाणी पिऊन टाकलं. इतक्यात ग्यालरीत लाईट लागले...

मनातल्या अंधाराला बाहेरचा उजेड सोसत नव्हता. पण ईलाज नव्हता. येणारा जाणारा आजीच्या बंद खोलीकडे बघून तिच्याकडे नजर टाकत होता. नजरेत न विचारता येणारे प्रश्न होते...जुई उगाच खाली रस्त्यावर बघत बसली...

जुईला खाली निलेश रिक्षातून उतरतांना दिसला. त्याच्या हातात सामानाच्या पिशव्या आणि सोबत आरोही होती. तो वर आला तशी जुई अवघडून खाली बघण्याचं नाटक करीत बसली. पण मन त्याच्या सगळ्या हालचालींचा वेध घेत होतं. छोटी आरोही निलेशमागे थांबलीय. निलेश आता दार उघडतोय...

निलेश घरात गेला तरी लगेच आंत जाता येणार नव्हतं …ती निलेश घरात जाण्याच्या आवाजाची वाट बघत होती. अचानक तिच्या कानावर शब्द आले...

"जुई! आत ये..."

जुईला वाटलं उगाच आपल्या मनातूनच हा आवाज येतोय. पण पुन्हा आवाज आला...

“जुई!…आंत ये म्हणतोय ना?"...

जुईने वळून पाहिलं. निलेश दार उघडून उभा होता…क्षणात विचार धडकला...बापरे! याला सुहासबरोबर गेलेलं कळलं का?...पण आज आवाजात ती जरब नव्हती. आणि आता आरोही आहे घरात तिच्यासमोर… तिची तिलाच चीड आली... एवढ्याशा आरोहीचा कसला आधार शोधतोय आपण?...आता जे होईल ते होईल… ती आत जायला उठली...

जुई उठली पाहिल्यावर निलेश आंत वळला. त्याच्या पाठोपाठ जुई आत गेली... घरात आरोही उगाच गोलगोल फिरत होती. तिला हाताने पकडत निलेश म्हणाला...

“जुई जा! गिझर चालू कर आणि हिला आंघोळ घाल. आणि तुही करून घे. नंतर काहीतरी खायला कर आपल्यासाठी. आता हिला आपल्या दोघांनाच सांभाळावं लागेल. तुझी वाहिनी आता आठ दिवसांनी येईल घरी. तिला आता हॉस्पिटलमध्येच राहावं लागेल ना?"

निलेश सगळं इतक्या सहज सांगत होता की त्यांच्यात कधी काही झालंच नव्हतं...

क्षणभर जुईच्या मनात वादळ घोंघावलं… आधी सुहास आता निलेश...ह्यांच्यासाठी मी फक्त तात्पुरती सोय...त्यांना हवं ते हवं तेव्हा पुरवणारी… ह्याच निलेशने मला रात्रपाळी असते म्हणून नर्सिंगला जाऊ दिलं नाही. आता किती कौतुकाने सांगतोय...

जुईचं आरोहीकडे लक्ष गेलं. ती पुन्हा तशीच गोलगोल फिरत होती. जणू जुईला सांगत होती.…जीवनचक्रात फिरायचं तर काहीतरी करावंच लागेल...जुई समजली. आता दुसरा पर्याय नाहीय. निलेशलाही हे चांगलंच माहित आहे. म्हणून तर...

निलेश आरोहीला सांगत होता...
”आरू… जा! आतू तुला आंघोळ घालतेय. आणि आता तुझी मम्मी कामाला गेलीय ना? आता आतूचं सगळं ऐकायचं."…

निलेशने ठरवलं होतं म्हणून आता जुईचा दैवलेख बदलत होता...

स्वयंपाक आटोपून जुई बाहेर आली तेव्हा निलेश आंघोळीला गेला होता. आरोही तिथे भातुकली खेळत होती. जुई तिच्या जवळ बसली.. तिचा खेळ बघता बघता जुई पुन्हा स्वतःच्या कोषात गेली...

…आरोहीला माहित आहे; आता बाबा येईल आणि सगळा खेळ गुंडाळून भरून ठेवेल. हे रोज होतं. आणि होतंच राहणार. पण उद्या पुन्हा खेळता येईल यावर तिचा विश्वास आहे. म्हणून आत्ता ती आनंदाने खेळतेय. खोट्या खेळात सुद्धा खरं सुख मिळतं! फक्त असं उद्यावर विश्वास ठेवून आत्तापुरतं खेळायला हवं....हेच जमायला हवं मला...

इतक्यात आरोही तिथे आली. आपल्या हातातलं भातुकलीचं भांडं तिला देत म्हणाली...

"हे घे तुला सूप!"…जुईने नुसतंच भांडं हातात घेतलं. तशी म्हणाली..

"अरे! पिऊन टाक! नाहीतर थंड होईल!"…

जुईने प्यायचं नाटक केलं. आरोही उत्सुकतेने प्रतिक्रियेसाठी जुईकडे डोळे लावून होती. जुई काहीच बोलली नाही पाहिलं तसं लगेच तिने विचारलं...

"कसं झालयं?"

"छान!" जुई अवघडलेली होती.

“छान नाही म्हणायचं” …आरोहीने नकारार्थी मान हलवली. आणि एक मोठ्ठा श्वास घेऊन दाखवत म्हणाली...
"मSSSस्त!"...असं म्हणायचं.

जुईही तिच्यासारखाच मोठा श्वास घेऊन म्हणाली…

"मSSSस्त!"
आणि दोघीही हसल्या...

जुईच्या डोळ्यात आभाळ उतरलं… सुमाआजींची आठवण आली...

…..सुमाआजींना फोन करायला हवा! सांगायला हवं...

आता हे मेलेलं कोंबडंही आगीला घाबरलं नाही...
दोन ओळखी नव्याने झाल्यात...
सुहास आणि निलेश!...

आणि एक नवी झुळूक मेलेल्या कोंबड्यात श्वास भरू पाहतेय...
आरोही!...

...समाप्त
मी मानसी...

मेलेलं कोंबडं भाग -१
https://www.maayboli.com/node/76062
मेलेलं कोंबडं भाग-२
https://www.maayboli.com/node/76069
मेलेलं कोंबडं भाग-३
https://www.maayboli.com/node/76080
मेलेलं कोंबडं भाग-४
https://www.maayboli.com/node/76092

# कशी वाटली कथा? शेवट पटला की नाही पटला? नसेल पटला तर का नाही पटला? तुम्हाला कसा शेवट योग्य वाटला असता? सांगाल?
धन्यवाद!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जाई
अनंतनी
कविन
मोहिनी १२३
एस
Mrunal samad
कथा आवडली बरं वाटलं. तुम्ही मनापासून दिलेल्या प्रतिसादासाठी आभारी आहे.
अनंतनी..तुमच्या प्रतिसादाने माझे लेखनाचे कष्ट सार्थकी लागले.
एस...तुम्ही कथा पुन्हा वाचलीत हे माझ्यासाठी बक्षीस आहे.

मस्त झाली आहे कथा! खूप नाट्यपूर्ण वगैरे न करता चांगली परिणामकारक झाली आहे. लिहीत रहा.

मस्त झालिय कथा... उगीच लांबड न लावता, शब्दबंबाळ न करता कथा थोडक्यात परिणाम करून जाते. शीर्षक बरोबर आहे पण त्यामुळे जुईच्या नशिबी काय लिहिले आहे त्याचा सुरवातीपासून अंदाज येतो.

खूप छान
Realistic
शेवट विशेष आवडला

वावे धन्यवाद!
कथा लिहीतांना ती वास्तववादी वाटावी हा विचार मनांत होताच..तसा प्रयत्न केला.

साधना धन्यवाद!
खरं आहे! माझ्याही मनांत हा विचार आला होता. कथाबीज ठरवल्यावर आठ दिवस मी कथेचं नावं बदलून विचार करत होते. पण... "मेलेलं कोंबडं आगीला घाबरत नाही"..हे वाक्य लिहील्यावर कथा त्या वळणाने जाऊ लागली. तेव्हा मला वाटलं तो विचार प्रतिध्वनीत होत राहिला तर जास्त परिणामकारक ठरतो..चर्चा आवडली.
आभार!

किल्ली धन्यवाद!
शेवट कथेचा सगळा ताण घालवणारा असावा असं वाटलं...कथा realistic वाटली...बरं वाटलं.

सनव
मामी
कमला
धन्यवाद!
कथा आवडली, शेवट पटला बरं वाटलं

Cuty धन्यवाद!
खरं आहे! बुडणाऱ्याला तात्पुरती हाती आलेली काडीसुध्दा आधाराची वाटते!

वास्तवदर्शी कथा..
कथा वाचताना कथेतले सारे प्रसंग डोळ्यांसमोर उभे राहत होते.

खूप छान झाली कथा. आणि वेळेत पूर्ण केलीत त्याबद्दल विशेष कौतुक. वाचकांचा वेळ सत्कारणी लागला.

मी चिन्मयी धन्यवाद!
वाचकांचा अमुल्य वेळ कारणी लागला याचा आनंद आहे. कौतुक केलंत... आभारी आहे.

अप्रतिम लिखाण, सादरीकरण, आणि प्रत्येक भाग तितकाच वाखाण्यायोग्य असा आहे..... शब्दावरची तुमची पकड आणि वाचकांच्या मनाला खिळवून ठेवण्याचं सामर्थ्य तुमच्या लेखनातून जाणवलं.... अशाच लिहीत राहा.... पुढील लिखाणासाठी हार्दिक शुभेच्छा

Pages