नमो भालचंद्रा नमो एकदंता

Submitted by पुरंदरे शशांक on 21 August, 2020 - 23:18

नमो भालचंद्रा नमो एकदंता
गणेशा सुमुखा जनी विघ्नहर्ता
कृपा हो जयाची समाधान चित्ता
गिरीजात्मजा रे नमो बुद्धीदाता

अती साजिरी मूर्ती विघ्नाहराची
रुळे शुंडही, कोर माथा शशीची
प्रभा फाकली नेत्री ती दिव्यतेची
मुसावूनि लाभे गुणानिर्गुणाची

सुवर्णासवे रत्नभारे किरीटी
टिळा शोभलासे विशाळा ललाटी
फडत्कारी कर्णे वरी एकदंती
रुळे शुंड वेधी अती दिव्य कांती

मना निर्मळा हो जरी त्वत्कृपेने
प्रतिष्ठापना भालचंद्रा स्वयेने
अकारे उकारे मकारे मिळोनी
जसा निर्गुणी तू स्वभक्ता सगुणी

रुळे वक्रशुंडा वरी एकदंते
शिरी शोभिली पाचू दुर्वांकुराते
करी मोदके दिव्य पाशांकुशाते
नमस्कार भावे सदा विघ्नहर्ते

जरी कार्यसिद्धी त्वरे योग्य व्हावी
तरी श्रीगणेशा वंदनाने करावी
जनीसज्जनी मान लंबोदरासी
स्मरोनी मिळे येश किर्ती धनासी

करी मंगला सर्वदा सौख्यराशी
स्मरावे प्रभाती प्रभू श्रीगणेशी
प्रसिद्धे सदाची जनी बुद्धीदाता
नुरो मागणे हेचि दे दान आता

समस्ता जना वेध की लाविलेसे
अति साजिरे ध्यान लंबोदराचे
बहु आवडी ज्यास दुर्वांकुराची
फुले रक्तवर्णी वरी मोदकाची

रुपे साजिरे बाळ या पार्वतीचे
अती कौतुके देवही थक्क देखे
स्वये शंभू घे उचलोनी तयाते
जया पाहता भान भक्ता नुरे ते

जरी कार्य आरंभ कोणी करावा
जनी बोलती श्रीगणेशा स्वभावा
अति आदरे मान त्वां पूजनाला
स्मरु भक्तीभावे गणेशा दयाळा

.........................................................

त्वां पूजनाला .... तुझ्या पूजेला

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर....