श्रावण महिना म्हणजे चैतन्याचा महिना ! एकामागून एक येणारे सण, व्रतवैकल्ये यांची अगदी रेलचेल असते या महिन्यात.सगळे वातावरण उत्साहाने आणि धार्मिकतेने भारलेले असते.
नारळीपौर्णिमा झाली, श्रावणी सोमवार झाले, गोकुळाष्टमी झाली, आता सर्वांना वेध लागले आहेत, ते गौरीगणपतीचे ! घरोघरी सजावट,आरास वगैरे गोष्टींच्या चर्चा चालू असतील.
माझ्या नजरेसमोर मात्र अजून एक गोष्ट असते, अशा सण - उत्सवांच्या काळामध्ये. ती म्हणजे, पाळीची तारीख पुढे ढकलण्यासाठी गोळ्या मागायला येणाऱ्या पेशंटची दवाखान्यात वाढलेली गर्दी !
याविषयी इतर काही बोलण्यापूर्वी या गोळ्या नेमक्या कसल्या असतात आणि त्यांनी नेमके काय होते, हे आपण समजून घेऊया !
या सर्व गोळ्यांचा घटक असतो -नॉरएथिस्टरॉन .हे एक कृत्रिम प्रकारचे प्रोजेस्टेरॉन आहे.
स्त्री शरीरात 2 प्रकारची संप्रेरके (हार्मोन्स )असतात -इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन. नेहमीच्या ऋतुचक्रामध्ये जेव्हा पाळी येते, तेव्हा इस्ट्रोजेन पातळी वाढलेली असते. तर प्रोजेस्टेरॉन ची पातळी कमी होते, त्यामुळे गर्भधारणा झाली तर त्या गर्भाचे पोषण करण्यासाठी, गर्भाची गर्भाशयामध्ये व्यवस्थित वाढ व्हावी, या हेतूने गर्भाशयामध्ये तयार झालेले अस्तर बाहेर पडायला लागते. म्हणून पाळी येते.
जेव्हा आपण पाळीची तारीख पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घेतो, तेव्हा आपण शरीरातील प्रोजेस्टेरॉन ची पातळी वाढवतो, त्यामुळे गर्भाशयातील भिंतींना उलट अस्तर तयार होते किंवा अगोदरच तयार असणारे अस्तर अजून वाढते. त्यामुळे पाळी थांबवली जाते, अडवली जाते.
गोळ्यांचे दुष्परिणाम -
1)प्रोजेस्टेरॉन चे प्रमाण कृत्रिमरित्या वाढवले जात असल्याने, गर्भाशयातील अस्तर जास्त बनले जाते, त्यामुळे ते शरीरातून बाहेर टाकण्यासाठी साहजिकच जास्त रक्तस्त्राव होतो.
2)पाळीच्या रक्तस्रावामध्ये गाठी पडण्याची शक्यता वाढते.
3)जास्त दिवस रक्तस्त्राव होत राहणे .
4)स्तनांमध्ये जडपणा, दुखरेपणाची जाणीव, ठणका.
5)मळमळणे, उलटी होणे.
6)डोकेदुखी.
7)चक्कर येणे.
8)पोटात दुखणे.
9)काही स्त्रियांमध्ये केसगळती.
10)स्त्री शरीराची कार्यें सुरळीतपणे चालू राहण्यासाठी संप्रेरके, त्यांचे योग्य प्रमाण, त्यांचे संतुलित कार्य आवश्यक असते. पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्यांमुळे आपण त्या संप्रेरकांचा समतोल बिघडवतो. त्यामुळे चिडचिड , सतत बदलणारे मूड्स (मूड स्विंग्स ), हळवेपणा ह्या गोष्टी अनुभवास येतात.
जास्त वेळा या गोळ्या घेण्यात आल्या, तर पाळीतील अनियमितता-तारखेच्या आधी किंवा तारीख उलटून गेल्यावर खूप दिवसांनी पाळी येणे , पाळी येऊन गेल्यावर सुद्धा अचानक मध्येच थोडा रक्तस्त्राव(स्पॉटिंग ), अशक्तपणा, रक्तस्रावातील अनियमितता -कधी जास्त, कधी एकदम थोडा रक्तस्त्राव असा त्रास संभवतो.
वरील सर्व गोष्टींमुळेच दरवेळी एखादा सण दृष्टीक्षेपात आला, कि मला चिंता सतावू लागते. माझा दवाखान्यातील पेशंटची गर्दी वाढते त्या काळात, हे जरी खरे असले, तरी माझ्या मनाला मात्र ती वाढलेली गर्दी टोचत असते . पण मासिक पाळीचा अपवित्रतेशी जोडलेला संबंध अर्धशिक्षित स्त्रियांबरोबरच शिक्षित, उच्चशिक्षित स्त्रिया आणि त्यांचे परिवार सुद्धा पुसू इच्छित नाहीत, हेच चित्र बहुतांश वेळा पाहायला मिळते. त्यामुळे नाईलाजाने मी मागतील त्या पेशंटना, मागतील तेवढ्या गोळ्या देते, पण माझा वेळ घालवून, मनापासून, अगदी पोट तिडकीने गोळ्यांचे दुष्परिणाम सांगून गोळ्या शक्यतो न घेण्याबद्दल, निदान कमीत कमी घेण्याबद्दल विनविते.निदान जे सण काही दिवसांनी पार पाडले तर चालतात, (उदा. संक्रांतीचे हळदीकुंकू-संक्रांतीपासून रथसप्तमी पर्यंत चालते, रक्षाबंधन नारळीपौर्णिमेपासून अमावास्येपर्यंत चालते. ) त्यांसाठी तरी गोळ्या घेऊ नका, असे समजावून सांगते.
अगदी खुराक असल्यासारख्या सतत या ना त्या कारणाने अशा गोळ्या खात राहणारे पेशंट माझ्याकडे आहेत. माझ्या सांगण्याचा काहीही परिणाम होत नाही त्यांच्यावर. पण त्यांतील कुणाची ढासळलेली तब्येत, तर कुणाचे वाढलेले वजन पाहून चुकचुकण्याशिवाय माझ्या हातात काहीच नसते.
निदान ज्यांच्या घरात दुसरी कुणीतरी स्त्री आहे, मग ती तिची मुलगी असो, किंवा आई, सासूबाई.. त्यांनी तरी गोळ्या खाऊ नयेत. कारण तुम्हाला पाळी आली, तरी ती घरातली दुसरी स्त्री स्वयंपाक, पूजा करू शकतेच कि, असे मी सुचवते. पण बहुतांश वेळा त्याचा काहीही उपयोग होत नाही. "अहो, ती पोरगी आहे, तिला कसे जमणार एवढे सगळे?" ;"आमच्या सासूबाई खूप चिडचिड करतात अहो अशी सणासुदीला बाहेरची झाले की !ती चिडचिड, आदळआपट ऐकण्यापेक्षा आपणच गोळ्या खाल्लेले चांगले, होऊ देत काही व्हायचे ते माझ्या तब्येतीचे !";"आमचा देव /देवी खूप कडक आहे म्याडम, त्याला नाही चालत असलं काही !"अशी उत्तरे ऐकावी लागतात.
काहीवेळा तर घरातले पुरुष च गोळ्या न्यायला येतात. "अहो, तोंडावर सण आलाय आणि आमच्या बायकोचा नंबर आलाय.च्यायला, आता कोण करणार सगळं? एवढ्या एवढ्या दिवसांच्या गोळ्या द्या हो, "असे वैतागाने सांगतात. मी चुपचाप त्यांना गोळ्या देते .
अगदी अपवादात्मक म्हणता येतील, असे 2 सुखद अनुभव माझ्या गाठीशी आहेत. कारखान्यात कामगार असणारे माझे एक पेशंट बिल्कुल आपल्या पत्नीला गोळ्या घेऊ देत नाहीत.पत्नीला तर त्यांनी समजावून सांगितलेच आहे, पण अचानक सणांच्या वेळी जर तिला पाळी आली, तर ते स्वतः सगळा स्वयंपाक, पूजा पार पाडतात.
तर दुसरे माझे पेशंट वयस्कर मध्यमवयीन आहेत. फारसे शिकलेले नसूनही या गोळ्यांचे दुष्परिणाम त्यांच्या लक्षात आल्यापासून त्यांनी त्यांच्या घरातील कोणाही स्त्रीला या गोळ्या घेऊन दिल्या नाहीयेत.मग घरात कितीही महत्वाचा कार्यक्रम, कितीही मोठा सण असू देत. पाळी येणे, ही नैसर्गिक गोष्ट आहे.उलट खरेतर सर्वात पवित्र गोष्ट आहे. जर ती नसती, तर वंशसातत्य चालू राहिले असते का, असा त्यांचा रास्त प्रश्न असतो . त्यामुळे त्यांच्या घरातील सर्व स्त्रिया पूजाअर्चा, सणवार, रीतिरिवाज सर्व काही पाळी चालू असतानाही निःशंकपणे पार पाडतात , अगदी कोणत्याही संकोचाशिवाय !
कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा, कुणाच्याही श्रद्धेला धक्का पोचवण्याचा मुळीच हेतू नाही या लेखाचा. परिवर्तन हे हळूहळू आणि स्वतः च्या मताने -विचारांनी व्हावे लागते, त्यामुळे लगेच हा लेख वाचून उद्यापासून गोळ्या घ्यायचे बंद करा, असेही अजिबात म्हणणे नाही माझे. फक्त इथून पुढे पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या घेताना डोळसपणे, अगदी विचारपूर्वक घ्या, एवढाच प्रेमळ सल्ला !!
मुळात ही गोष्ट नैसर्गिक आहे
मुळात ही गोष्ट नैसर्गिक आहे हे स्वतः मान्य केलं पाहिजे,माझ्या माहितीतील एक स्त्री पेहराव,वागणुकी बाबत अतिशय माडर्न आहे,पण पाळी आली की देव्हाऱ्याला बाजूने पडदा लावून घेते,4 दिवसात हिची सावली पण नको पडायला देवावर म्हणून
हा नक्की किती सुशिक्षित अडाणीपणा
लेख आवडला.. 100%पटला..
लेख आवडला.. 100%पटला..
वर प्रतिसादात कोणीतरी म्हटल्याप्रमाणे सासूऐवजी आधी आईने किंवा आजीने पाळीसंदर्भातल्या गोष्टी समजावून सांगितल्या पाहिजे.. असं मनापासून वाटतं.. तेव्हा बदल रुजायला मदत होईल...
Pages