डॉक्टर, पाळी पुढे घालवण्यासाठी गोळ्या हव्या आहेत.

Submitted by नादिशा on 21 August, 2020 - 03:40

श्रावण महिना म्हणजे चैतन्याचा महिना ! एकामागून एक येणारे सण, व्रतवैकल्ये यांची अगदी रेलचेल असते या महिन्यात.सगळे वातावरण उत्साहाने आणि धार्मिकतेने भारलेले असते.
नारळीपौर्णिमा झाली, श्रावणी सोमवार झाले, गोकुळाष्टमी झाली, आता सर्वांना वेध लागले आहेत, ते गौरीगणपतीचे ! घरोघरी सजावट,आरास वगैरे गोष्टींच्या चर्चा चालू असतील.
माझ्या नजरेसमोर मात्र अजून एक गोष्ट असते, अशा सण - उत्सवांच्या काळामध्ये. ती म्हणजे, पाळीची तारीख पुढे ढकलण्यासाठी गोळ्या मागायला येणाऱ्या पेशंटची दवाखान्यात वाढलेली गर्दी !
याविषयी इतर काही बोलण्यापूर्वी या गोळ्या नेमक्या कसल्या असतात आणि त्यांनी नेमके काय होते, हे आपण समजून घेऊया !
या सर्व गोळ्यांचा घटक असतो -नॉरएथिस्टरॉन .हे एक कृत्रिम प्रकारचे प्रोजेस्टेरॉन आहे.
स्त्री शरीरात 2 प्रकारची संप्रेरके (हार्मोन्स )असतात -इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन. नेहमीच्या ऋतुचक्रामध्ये जेव्हा पाळी येते, तेव्हा इस्ट्रोजेन पातळी वाढलेली असते. तर प्रोजेस्टेरॉन ची पातळी कमी होते, त्यामुळे गर्भधारणा झाली तर त्या गर्भाचे पोषण करण्यासाठी, गर्भाची गर्भाशयामध्ये व्यवस्थित वाढ व्हावी, या हेतूने गर्भाशयामध्ये तयार झालेले अस्तर बाहेर पडायला लागते. म्हणून पाळी येते.
जेव्हा आपण पाळीची तारीख पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घेतो, तेव्हा आपण शरीरातील प्रोजेस्टेरॉन ची पातळी वाढवतो, त्यामुळे गर्भाशयातील भिंतींना उलट अस्तर तयार होते किंवा अगोदरच तयार असणारे अस्तर अजून वाढते. त्यामुळे पाळी थांबवली जाते, अडवली जाते.
गोळ्यांचे दुष्परिणाम -
1)प्रोजेस्टेरॉन चे प्रमाण कृत्रिमरित्या वाढवले जात असल्याने, गर्भाशयातील अस्तर जास्त बनले जाते, त्यामुळे ते शरीरातून बाहेर टाकण्यासाठी साहजिकच जास्त रक्तस्त्राव होतो.
2)पाळीच्या रक्तस्रावामध्ये गाठी पडण्याची शक्यता वाढते.
3)जास्त दिवस रक्तस्त्राव होत राहणे .
4)स्तनांमध्ये जडपणा, दुखरेपणाची जाणीव, ठणका.
5)मळमळणे, उलटी होणे.
6)डोकेदुखी.
7)चक्कर येणे.
8)पोटात दुखणे.
9)काही स्त्रियांमध्ये केसगळती.
10)स्त्री शरीराची कार्यें सुरळीतपणे चालू राहण्यासाठी संप्रेरके, त्यांचे योग्य प्रमाण, त्यांचे संतुलित कार्य आवश्यक असते. पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्यांमुळे आपण त्या संप्रेरकांचा समतोल बिघडवतो. त्यामुळे चिडचिड , सतत बदलणारे मूड्स (मूड स्विंग्स ), हळवेपणा ह्या गोष्टी अनुभवास येतात.
जास्त वेळा या गोळ्या घेण्यात आल्या, तर पाळीतील अनियमितता-तारखेच्या आधी किंवा तारीख उलटून गेल्यावर खूप दिवसांनी पाळी येणे , पाळी येऊन गेल्यावर सुद्धा अचानक मध्येच थोडा रक्तस्त्राव(स्पॉटिंग ), अशक्तपणा, रक्तस्रावातील अनियमितता -कधी जास्त, कधी एकदम थोडा रक्तस्त्राव असा त्रास संभवतो.

वरील सर्व गोष्टींमुळेच दरवेळी एखादा सण दृष्टीक्षेपात आला, कि मला चिंता सतावू लागते. माझा दवाखान्यातील पेशंटची गर्दी वाढते त्या काळात, हे जरी खरे असले, तरी माझ्या मनाला मात्र ती वाढलेली गर्दी टोचत असते . पण मासिक पाळीचा अपवित्रतेशी जोडलेला संबंध अर्धशिक्षित स्त्रियांबरोबरच शिक्षित, उच्चशिक्षित स्त्रिया आणि त्यांचे परिवार सुद्धा पुसू इच्छित नाहीत, हेच चित्र बहुतांश वेळा पाहायला मिळते. त्यामुळे नाईलाजाने मी मागतील त्या पेशंटना, मागतील तेवढ्या गोळ्या देते, पण माझा वेळ घालवून, मनापासून, अगदी पोट तिडकीने गोळ्यांचे दुष्परिणाम सांगून गोळ्या शक्यतो न घेण्याबद्दल, निदान कमीत कमी घेण्याबद्दल विनविते.निदान जे सण काही दिवसांनी पार पाडले तर चालतात, (उदा. संक्रांतीचे हळदीकुंकू-संक्रांतीपासून रथसप्तमी पर्यंत चालते, रक्षाबंधन नारळीपौर्णिमेपासून अमावास्येपर्यंत चालते. ) त्यांसाठी तरी गोळ्या घेऊ नका, असे समजावून सांगते.
अगदी खुराक असल्यासारख्या सतत या ना त्या कारणाने अशा गोळ्या खात राहणारे पेशंट माझ्याकडे आहेत. माझ्या सांगण्याचा काहीही परिणाम होत नाही त्यांच्यावर. पण त्यांतील कुणाची ढासळलेली तब्येत, तर कुणाचे वाढलेले वजन पाहून चुकचुकण्याशिवाय माझ्या हातात काहीच नसते.
निदान ज्यांच्या घरात दुसरी कुणीतरी स्त्री आहे, मग ती तिची मुलगी असो, किंवा आई, सासूबाई.. त्यांनी तरी गोळ्या खाऊ नयेत. कारण तुम्हाला पाळी आली, तरी ती घरातली दुसरी स्त्री स्वयंपाक, पूजा करू शकतेच कि, असे मी सुचवते. पण बहुतांश वेळा त्याचा काहीही उपयोग होत नाही. "अहो, ती पोरगी आहे, तिला कसे जमणार एवढे सगळे?" ;"आमच्या सासूबाई खूप चिडचिड करतात अहो अशी सणासुदीला बाहेरची झाले की !ती चिडचिड, आदळआपट ऐकण्यापेक्षा आपणच गोळ्या खाल्लेले चांगले, होऊ देत काही व्हायचे ते माझ्या तब्येतीचे !";"आमचा देव /देवी खूप कडक आहे म्याडम, त्याला नाही चालत असलं काही !"अशी उत्तरे ऐकावी लागतात.
काहीवेळा तर घरातले पुरुष च गोळ्या न्यायला येतात. "अहो, तोंडावर सण आलाय आणि आमच्या बायकोचा नंबर आलाय.च्यायला, आता कोण करणार सगळं? एवढ्या एवढ्या दिवसांच्या गोळ्या द्या हो, "असे वैतागाने सांगतात. मी चुपचाप त्यांना गोळ्या देते .
अगदी अपवादात्मक म्हणता येतील, असे 2 सुखद अनुभव माझ्या गाठीशी आहेत. कारखान्यात कामगार असणारे माझे एक पेशंट बिल्कुल आपल्या पत्नीला गोळ्या घेऊ देत नाहीत.पत्नीला तर त्यांनी समजावून सांगितलेच आहे, पण अचानक सणांच्या वेळी जर तिला पाळी आली, तर ते स्वतः सगळा स्वयंपाक, पूजा पार पाडतात.
तर दुसरे माझे पेशंट वयस्कर मध्यमवयीन आहेत. फारसे शिकलेले नसूनही या गोळ्यांचे दुष्परिणाम त्यांच्या लक्षात आल्यापासून त्यांनी त्यांच्या घरातील कोणाही स्त्रीला या गोळ्या घेऊन दिल्या नाहीयेत.मग घरात कितीही महत्वाचा कार्यक्रम, कितीही मोठा सण असू देत. पाळी येणे, ही नैसर्गिक गोष्ट आहे.उलट खरेतर सर्वात पवित्र गोष्ट आहे. जर ती नसती, तर वंशसातत्य चालू राहिले असते का, असा त्यांचा रास्त प्रश्न असतो . त्यामुळे त्यांच्या घरातील सर्व स्त्रिया पूजाअर्चा, सणवार, रीतिरिवाज सर्व काही पाळी चालू असतानाही निःशंकपणे पार पाडतात , अगदी कोणत्याही संकोचाशिवाय !
कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा, कुणाच्याही श्रद्धेला धक्का पोचवण्याचा मुळीच हेतू नाही या लेखाचा. परिवर्तन हे हळूहळू आणि स्वतः च्या मताने -विचारांनी व्हावे लागते, त्यामुळे लगेच हा लेख वाचून उद्यापासून गोळ्या घ्यायचे बंद करा, असेही अजिबात म्हणणे नाही माझे. फक्त इथून पुढे पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या घेताना डोळसपणे, अगदी विचारपूर्वक घ्या, एवढाच प्रेमळ सल्ला !!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल सकाळीच हा विषय डोक्यात घोळत होता शेजारणीने गोळ्या घेतल्याने. पण विटाळ ही कल्पना मानणाऱ्या लोकांना समजावणे म्हणजे दगडावर डोकं आपटण्यासारखं असतं. आणि गंमत म्हणजे एकत्र कुटुंबात बऱ्याचवेळा, बायका कामाचा ताण नको म्हणून पाळी आली की बाहेर बसतात; अशा गोळ्या घेण्यापेक्षा.

गर्भ निरोधक गोळ्या च पाळी पुढे जाण्यासाठी वापरतात.
हे खरे आहे का.
पाळी पुढे जाण्यासाठी वेगळ्या गोळ्या नाहीत.

परिवर्तन हे हळूहळू आणि स्वतः च्या मताने -विचारांनी व्हावे लागते,>>> अगदी सहमत आहे. भारत एकाच वेळी तीन शतकात वावरतो. त्यामुळे परिवर्तनाचे सर्व टप्पे पाहायला मिळतात. तुम्ही दिलेल्या दोन उदाहरणात हळू ह्ळू झालेला सकारात्मक बदल दिसतो. पण वैज्ञानिक प्रगतीने काळ फार वेगाने पुढे चालल आहे व बदल त्यामानाने अतिशय मंदगतीने होतात. त्यामुळे अंतर कमी होत नाही. उलट ते वाढत जाते. त्यामुळे परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांची चिडचिड होते, त्रागा वाढतो व ते आक्रमक बनत जातात. समाजाला तुच्छ लेखायला लागतात व समाजापासून दुरावायला लागतात. समतोल राखणे अवघड बनते. पण चळवळीत आक्रमताही हवी असते. त्या रेट्याने तरी काही बदल वेगाने होतील. सतीची अनिष्ट प्रथा ही काही केवळ प्रबोधनाने हटली नसती. कायदाही व्हावा लागला.

जुन्या काळातील काही स्त्रीरोग तज्ञ , डॉक्टर स्त्रिया देखील पाळी ही धार्मिक कार्यात अपवित्र मानत. अजून ही मानतात.
सॅनिटरी पॅड वापरुन धार्मिक कार्य करायला आता काहीही अडचण नाही, पुर्वीच्या सामाजिक परिस्थितीत कदाचित त्याचा व्यावहारिक अडथळा होत असेल. म्हणून तशी प्रथा असावी. आता तो अडथळा दूर झाला आहे त्यामुळे आता विटाळ मानण्याचे कारण नाही. वर फिल्मी यांनी चक्रधराचे अवतरण दिले आहेच. ते ही सांगावे.

प्रकाश घाटपांडे, तुमच्या दोनही पोस्ट्स आवडल्या.

अशा गोळ्यांबद्दल माहीत आहे पण माझ्या माहितीत, ओळखीत या घेणारं कोणीच नाही. पण तरीही याचे दुष्परिणाम फार जवळून पाहिले आहेत. 2011 मध्ये आई हॉस्पिटलमध्ये असताना ICU मध्ये तिच्या बाजूच्या बेडवर एक 45-50 वयोगटातील काकू कोमामध्ये होत्या. त्यांचं पूर्ण कुटुंब ISCON followers होतं. ISCON मंदिरात जन्माष्टमी साजरी करण्यासाठी त्यांनी गोळ्या घेतल्या त्याचा ओव्हर डोज झाला किंवा मग अजून काही मेडिकल कंडिशन्स असतील, पण त्यांच्या मुलीने आणि नर्सने गोळ्यांचा दुष्परिणाम म्हणून सांगितलं, कारण पूर्वीही एकदा गोळ्या घेतल्यावर त्या चक्कर येऊन पडल्या होत्या.

मला एक गोष्ट आवडली.
यावेळी कोणीतरी गुरुजींनी आधीच पेपर मध्ये सांगितलं होतं की यावेळी सध्याची परिस्थिती पाहता मंडळांनी इश्यूज असल्यास गणपती बसवला नाही तरी चालेल.त्याने दोष येणार नाही.(गणपती मध्ये खंड पाडताना बरे वाटत नाही.)
आमचे गुरुजी दरवर्षी श्राद्धात ते घास शेवटी गाईला द्यायला आणि नदीपात्रात सोडायला सांगतात.गोठ्यात गवळ्याना गाईंना काही दिलेले आवडत नाही.नदीपात्रावर मोठी रेलिंग लावलेली असतात.निर्माल्य कलशही त्यावेळी नसतात.मग आम्ही ते सर्व त्यांना न सांगता कंपोस्ट मध्ये टाकतो.यावेळी गुरुजी स्वतःच म्हणाले कंपोस्ट मध्ये टाका.गाईना खाणं देता येत नाही.
मुद्दा: पॅड वापरून देवाचं केलं तरी दोष नाही असं ऑफिशियल पुजारी कम्युनिटी च्या किमान 4-5 प्रस्थापित नावांकडून पेपरमध्ये आल्यास समाजावर जास्त लवकर इम्पॅक्ट पडेल.

पाळी ला अपवित्र समजण्याचे प्रमाण आता खूप कमी झाले आहे.
पाहिले 5 दिवस स्त्री ला बाहेर बसवले जायचं.
शिवायच सुद्धा नाही .
घरामधील काहीच काम करायचे नाही.
पण आता हा प्रकार शहरात तर जवळ जवळ नष्ट च झाला आहे.
खेडेगावात पण कमी झाला आहे.
पण पुरुष नी सांगून सुद्धा स्त्रिया पाळी मध्ये देव पूजा,करत नाहीत.
हे पण सत्य आहे.

माझी शेजारीण (वय ४०) प्रचंड धार्मिक होती. तिने दोन वर्षांपूर्वी श्रावण सुरू झाल्यापासून दिवाळी होईपर्यंत सलग गोळ्या घेतल्या. तिला त्यानंतर लगेच पॅरालिसिसचा ॲटॅक आला. नंतर पुर्णपणे परावलंबी. मागच्या महिन्यात ती वारली. हे सगळं गोळ्यांमुळे घडलं असं डॉक्टरांनी सांगितले. Sad

श्रावण सुरू झाल्यापासून दिवाळी होईपर्यंत सलग गोळ्या घेतल्या. >> pcod च्या त्रासात 21 गोळ्यांचा कोर्स असतो सहा महिने असे ऐकलंय, मैत्रीण घ्यायची, तिला काही त्रास झाला नाही, रादर मदतच झाली होती.

म्हणजे यांनी सहा महिने ब्रेक न घेता घेतल्या की काय Uhoh

अगदी गोळ्या पण डॉक्टर सल्ला आणि त्यावरच्या सूचना नीट वाचून घेतल्यास इतके कॉम्प्लिकेशन येण्याचे कारण नसावे
पण जीव जाण्याइतके नसले तरी थोडे साईड इफेक्ट असतातच.
शिवाय सायकल चा पूर्ण हिशोब, ट्रॅक जात असेल.नंतर pcod, काही पुढेमागे झाल्यास लक्षणं पटकन कळणार नाहीत.
पिरियड शिवाय अगदी अवेळी ब्लिडिंग हे सर्व्हायकल कँसर चेही एक लक्षण आहे(म्हणजे ब्लिडिंग असेल तर कॅन्सरच असेल असे नाही.पण अनेक शक्यतांपैकी तेही एक)
पुढे ढकलायला गोळ्या घेतल्यास सायकल चा क्रम विसरला जाऊन ही लक्षणे मास्क होऊ शकतात.

सासवांनी सांगितलं तर नक्की करतील>>>>> आमच्याकडे सुनेने मला पाळायला लावलं. महालक्ष्म्यांना तिच्या माहेरी जायचं होतं तर तिने मला येऊ नका सांगितलं ( मला त्यांच्याकडचे सोवळं ओवळं माहिती होतं तर मी जाणारच नव्हते ... माझी मत/सुधारणा माझ्यापुरत्या) मुलीच्या सासरीही पाळतात.... सध्या वेगळे राहात असल्याने काही प्राॅब्लेम नाही पण तिला सांगितलंय गोळ्या घेणार नाही ह्यावर ठाम राहयचं.. बराच काळ जावा लागतो सुधारणा व्हायला...

त्यांनी ब्रेक न घेता श्रावणापासून सलग चार महिने गोळ्या घेतल्या होत्या. दिवाळी नंतर त्यांना पहिला अटॅक आला. वर्षभरानंतर दुसरा. मागच्या महिन्यात तिसरा आला आणि त्या गेल्या.

ओह
या नक्कीच स्वतःच्या बुद्धीने घेतल्या असणार.
भयंकर आहे हे.

<<<या नक्कीच स्वतःच्या बुद्धीने घेतल्या असणार
>>> +१११ मलाही असेच वाटतेय, कुठल्याच डॉक्टर असे नाही सांगणार, कारण मुळात तो २१ दिवसांचा कोर्स असतो, अन पॅकेट पण २१ गोळ्यांचे असते.

नमस्कार !
माझा हा मायबोली वरचा पहिलाच लेख होता. आपण सर्वांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार !
मी कालपासून माझा एक नवीन लेख प्रकाशित करण्याचा प्रयत्न करते आहे. पण सर्व झाल्यावर जेव्हा save वर click करते, तेव्हा error असे दिसते. You have an unexpected error, असे लिहून येते. कालपासून 7-8वेळा असेच झाले. आताही 2वेळा असेच झाले.
का होते आहे असे, कुणी सांगू शकाल का प्लीज?

नादिशा, लेखात मोबाईलवरचे इमोजी टाकले असले तर असे होऊ शकते.
इमोजी मायबोलीवरचे किंवा आपण स्वतः टाईप करून : ) ने वगैरे टाकून बघा.
माझ्या एरर याप्रमाणे गेल्या आहेत.

त्यात काही स्मायली , चित्रे कॉपी पेस्ट असतील तर ती डिलीट करा

अक्षरे , अंक , विरामचिन्हे आणि मायबोलीच्या स्वतःच्या स्मायली

याशिवाय काही असेल तर तशी एरर येते

धन्यवाद. आपण सांगितल्याप्रमाणे सुधारणा केल्या आणि माझ्या एरर गेल्या. नुकताच नवीन लेख 'शब्दांशी मैत्री 'प्रकाशित करू शकले आहे. आपल्या मदतीबद्दल मनःपूर्वक आभार.

या लेखावर आलेल्या प्रतिसादांना, विशेषतः त्यातील शंकांना उत्तर द्याल का?

भरत, काय झाले, बऱ्यापैकी सर्व शंकांना प्रतिसादामध्येच इतरांनी उत्तरे दिलेली आहेत. त्यामुळे मी वेगळी उत्तरे देण्याची आवश्यकता भासली नाही.
सतरा वर्षांच्या माझ्या वैद्यकीय व्यवसायात मला आलेल्या अनुभवांवर मी हा लेख लिहिला, त्याचा उद्देश लोकांमध्ये दुष्परिणामांबद्दल जागरूकता निर्माण करणे, हा होता.मी जनरल प्रॅक्टिशनर आहे. यात विचारलेल्या काही शंकांना स्त्री रोगतज्ज्ञच उत्तरे देऊ शकतात. तेवढे माझे ज्ञान नाही.
प्रकाश घाटपांडे सर, धन्यवाद. तुमचे म्हणणे खरे आहे. आपण पोट तिडकीने एखादी गोष्ट समोरच्याला सांगत असतो आणि समोरचा त्याकडे दुर्लक्ष करतो, तेव्हा चिडचिड होतेच, निराशा पण येते. पण अनुभवाने आता मी शांत राहायला शिकले आहे.कारण हेच, की परिवर्तन स्वानुभवाने होते, स्वतः चा आतला आवाज जेव्हा जागा होतो, तेव्हाच होते आणि मगच ते कायमस्वरूपी टिकते. माझे काही पेशंट तर असे आहेत, की अगदी क्षुल्लक कारणांसाठी अशा गोळ्या खातात. पण मी माझा वेळ घालवून त्यांना गोळीचे तोटे सांगते आणि निर्णय त्यांच्यावर सोपवते. कारण दुर्दैवाने गोळ्या घेणाऱ्यात अशिक्षित, अर्धशिक्षित, उच्चशिक्षित सर्व स्त्रिया असतात. सांगायला वाईट वाटते, पण माझ्या काही डॉक्टर मैत्रिणी सुद्धा पाळी अपवित्र मानून गोळ्या घेतात.

Filmy, तुमचे खूप खूप आभार. चक्रधर स्वामींच्या पुरोगामी विचारांबद्दल मला माहिती होती. पण हे अवतरण मला माहिती नव्हते.
वैद्यकीय व्यावसायिक असूनही साहित्यावरील प्रेमापोटी मी शिवाजी विद्यापीठातून distinction मिळवून M. A. झाले, M. Phil. चे पेपर्स दिले, त्यात extra ordinary class मिळवला. आणि Ph. D. पण मिळवली. त्यासाठी अभ्यास करताना चक्रधर स्वामींच्या पुरोगामी विचारांबद्दल वाचले होते. पण हे अवतरण दुर्दैवाने नव्हते आले वाचनात. ते तुम्ही सांगितलेत, त्याबद्दल खरेच मनापासून आभार तुमचे !

चांगला लेख.

<<<आम्ही सुदैवीच म्हणायच्या. कधीही गोळ्या घेतल्या नाहीत, न कुणाला घेताना पाहिले.. असे घेतात ऐकलय फक्त..>>> +१००

पाळी पुढे ढकलण्याची औषध फक्त हिंदू, धर्मीय स्त्रिया च वापरतात की बाकी धर्माच्या
स्त्रिया पण वापरात.
फक्त हिंदू धर्मीय च वापरात असतील तर बाकी कोणत्याच देशात त्या उपलब्ध होत नसतील.

साध्या बर्थ कंट्रोल गोळ्या आहेत हो
जगभर मिळतात. इतर ठिकाणी धार्मिक कारणासाठी वापरत नसल्या बाया तरी काही वेगळं कारण, भरपूर पैसे खर्च करून व्हेकेशन प्लॅन केलीय वगैरे कारणासाठी कधीकधी पुढे ढकलायला वापरत असतीलच.

माझे वयक्तिक आणि माझ्या डॉक्टरांशी झालेल्या चर्चेच्या बेसिस वर मत : समाजात रूढ असलेले समज आणि त्यामुळे या गोळ्यांचा होणारा वापर या व्यतिरिक्त फक्त वैद्यकीय दृष्ट्या याचा स्वतंत्र विचार ही कारायला हवा असे वाटते. सगळीकडे या गोळ्या मिळतात आणि या गोळ्यांचा वापर होतो आणि त्या डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने घेतल्या तर खरच इतक्या सरसकट असुरक्षित आहेत का? NHS च्या ऑफिशीअल site वरती वगैरेही या गोळ्यांबद्दल आणि त्यांच्या यासाठीच्या योग्य पद्धतीने वापराबद्दल रीतसर माहिती आहे. सौम्य साईड इफेक्ट्स हे सर्वच औषधांचे असतात. त्याचे actual प्रमाण काय, किती परसेन्ट लोकांना असे टोकाचे त्रास होतात याही गोष्टी विचारात घ्यायला हव्यात. त्यामुळे अर्थातच प्रत्येक वेळेस एक सोय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याविना ज्याप्रमाणे कोणतीच औषधे घेऊ नयेत तेच यालाही लागू होते आणि त्याचप्रमाणे खरच गरज असेल तेव्हा तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने बाकी औषधांप्रमाणेच याकडे पाहणेही.

खरं आहे
डॉ चा सल्ला वगळून परस्पर ठरवून घेतले तर सौम्य आयुर्वेदिक औषधांनी पण भयंकर परिणाम होऊ शकतात
(एक वर्षांपूर्वी त्या एक बाई नेचरोपॅथी वेट लॉस शिबिरात गेल्या होत्या तेथे उपासमार आणि काही कॉम्प्लिकेशन होऊन मृत्युमुखी पडल्या)

डॉ च्या सल्ल्याने, अगदीच क्वचित, आणि नीट डोसनुसार (नंतर डॉ कडे जायला मिळाले नाही म्हणून बेधडक तोच डोस स्वतःच्या बुद्धीने चालू न ठेवताच) घेतल्या तर परिणाम इतके गंभीर नसावेत.
आय पिल्स पण अश्याच सर्रास जेम्स च्या गोळ्या खाल्ल्या सारख्या घेतल्या जातात.
मुळात आयुर्वेदिक असो वा अलोपॅथी वा साध्या प्रोटीन पावडर, आपण पोटात काय ढकलतो, आपली आधीची तब्येत हिस्टरी काय आहे याचे भान हवे.

Pages