काय मग यंदाच्या स्पर्धेत सहभागी होताय ना??

Submitted by संयोजक on 18 August, 2020 - 10:59

आज सकाळपासूनच कैलास पर्वतावर "ही" लगबग चालू होती. सगळेच काही ना काही कामात व्यग्र होते आणि इतके व्यग्र होते की, नारदमुनी अवतरून दोन निमिषे होऊनसुद्धा त्यांच्या अस्तित्वाची कुणीच दखल घेतली नव्हती. घसा खाकरून नारदमुनीने दोनदा 'नारायण नारायण' केलं तेव्हा कुठे पार्वतीच लक्ष त्यांच्याकडे गेलं..

"अय्या!! नारदभावोजी..कधी आलात? या ना.." परातीत वळलेले लाडू व्यवस्थित ठेवत पार्वती म्हणाली.

"हे काय आताच.. इतकी कसली गडबड म्हणायची ही?" हातातली वीणा बाजूला ठेवत 'नारायण नारायण' म्हणत हळूच नारदमुनी पार्वतीजवळच्याच शिळेवर आसनस्थ झाले.

"काय भावोजी.. हा प्रश्न तुम्ही विचारावा हे अपेक्षित नव्हतं.. जाऊ द्या.. हा घ्या लाडू.. खाऊन सांगा.. तूप साखर बरोबर आहे का ते."
एका हाताने लाडू देत पार्वती म्हणाली.

मुनींनी पटकन लाडू तोंडात टाकला आणि भरल्या तोंडानेच वाह वाह केलं. तोंडातला ऐवज गिळल्यानंतर त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि सांगायला सुरूवात केली,

" तुम्हाला सांगतो वहिनी.. लाडू खावे तर तुमच्या हातचेच! नाहीतर लक्ष्मीवहिनी वैभवसंपन्न दिसावं म्हणून सोन्याचा वर्ख लावतात. बेसनाच्या लाडूला कशाला पाहीजे हो वर्ख?" नारदमुनींने पितांबरला हात पुसत खडा टाकण्याचा प्रयत्न केला.

"असू द्या हो भावोजी.. त्यांची बातच वेगळी. मी आपली बैराग्याची धर्मपत्नी.. आमच्या ह्यांना सोन्याचा वर्ख काय किंवा भस्माचा वर्ख काय.. दोन्ही सारखंच! ते जाऊ द्या.. मी काय सांगत होते? यंदाचं मायबोलीवरच्या स्पर्धेच एकवीसावं वर्ष! तर सगळं कसं साग्रसंगीत आणि दणक्यात व्हावं म्हणून ही लगबग बघा. ह्या लाडूची पाककृतीपण पाठवणार आहे मी. तुम्ही आहातच ना तिथे. तर मला पाठींबा द्या. मला आवर्जून मत द्या. खाल्ल्या लाडूची शपथ आहे तुम्हाला.." पार्वतीने अत्यंत हुषारीने तिन्ही लोकांत वावर करणार्या नारदमुनींचं मत आपल्याकडे अलगद वळवलं होतं.

"अवश्य!! नारायण नारायण.." डाळ काय शिजत नाही म्हटल्यावर नारदमुनींनी आपला मोर्चा कार्तिकेय कडे वळवला.

कार्तिक पर्वणीला (कार्तिकच्या वाहनाचं नाव) काहीतरी वाचून दाखवत होता आणि पर्वणी दाद म्हणून पिसारा फुलवत होता...

"कार्तिकबाळा काय चाललयं तुझं?"

"काही नाही हो मुनी.. स्पर्धेसाठी कथा लिहतोय आणि तिच मी पाठवण्याआधी पर्वणीला ऐकवत होतो.. बरं झालं तुम्ही आलात. मी वाचून दाखवतो. तुमचा अभिप्राय सांगा.." इतकं बोलून कार्तिकने कथा सांगायला सुरूवात केलीसुद्धा आणि इच्छा नसूनही नारदमुनींना पूर्ण कथा ऐकावीच लागली.

इकडे डिंका (गणपतीच्या मूषकाच नाव) हे सगळ चोरून ऐकत होता. सगळी कथा ऐकल्यानंतर तो धावतच आपल्या स्वामीकडे आला. स्वामीसमोर नतमस्तक होत डिंकाने सगळं सांगितलं आणि रागवूनच तुम्ही का नाही लिहत असं काही असं विचारलं.

गणपती फक्त हसला आणि डिंकाच्या डोक्यावर थोपटत गणपती बोलला -

"डिंका मीच उत्सवमूर्ती आहे. मी कसा सहभाग घेणार? मी तर सहभाग घेऊ शकत नाही पण माझे वाचक-लेखकमित्र, भक्त घेऊ शकतात.. तर भक्तांनो कसली वाट पाहताय? चला तर उचला लेखणी आणि साहित्य, करा लिहायला सुरूवात आणि व्हा सामील. यंदाचं वर्ष दणक्यात साजरा करूया.

काय मग घेताय ना भाग?? मी वाट पाहतोय!"

-साभार

-----------------------------------------------------------------------
अधिक माहितीसाठी इथे टिचकी मारा.

Groups audience: 
- Private group -
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"अय्या!! नारदभावोजी..कधी आलात? या ना.." परातीत वळलेले लाडू व्यवस्थित ठेवत पार्वती म्हणाली.>>>>
नारदभावोजी संबोधन चुकीचं आहे. नारद म्हणजे ब्रह्माचे सुपुत्र.. ब्रह्मा, विष्णु, महेश भाऊ भाऊ त्यामुळे नारद पार्वतीचा पुतण्या वगैरे..
'वत्सा' असं संबोधायला हवं. Proud

वैराग्याची धर्मपत्नी>>>
शब्द चुकीचा वाटतो ! बैराग्याची धर्मपत्नी हवाय का ?

कार्तिक पर्वणीला (कार्तिकच्या वाहनाचं नाव) काहीतरी वाचून दाखवत होता आणि पर्वणी दाद म्हणून पिसारा फुलवत होती...>>>>
कार्तिकेयाचं वाहन मोर(नर) आहे. मोर मादीला(लांडोर) पिसारा नसतो.

छान!
सगळ्या स्पर्धांच्या लिंक्स या दवंडीखाली दिल्यात तर बरं होईल.

नारदभावोजी संबोधन चुकीचं आहे >> +१

सगळ्या स्पर्धांच्या लिंक्स या दवंडीखाली दिल्यात तर बरं होईल. +१

बाकी काही म्हणा पण दवंडी छान आहे.

पण हिमवान म्हणजे पार्वतीचे वडील हा ब्रह्माचा पुत्र आहे, त्यामुळे नारद तिचा सख्खा काका‌ लागतो. Proud

छान!
तुम्हाला शुभेच्छा!
काही सोप्या आम्हाला , झेपण्यासारझ्या असतील तर करेन नक्कीच.

स्पर्धां च्या बाफावर ही माहिती उपलब्ध आहे. अधिक शंका असल्यास कृपया त्या त्या स्पर्धेच्या बाफावर प्रश्न विचारावेत.

मला हस्ताक्षर स्पर्धेत भाग घ्यायचा आहे. पण योग्य  ग्रुप निवडून नवीन लेख कसा लिहावा ते समजत नाही. कुणीतरी कृपया मदत करा.  

सर्वप्रथम गणेशोत्सव ग्रूपाचे सभासदत्व घ्या (ग्रूप इथे आहे https://www.maayboli.com/node/76112)
त्यानंतर नवीन लेखन करण्यासाठी पुढिल ठिकाणची माहिती वापरा.

हस्ताक्षर स्पर्धेत लाखोंनी एंट्र्या आल्या आहेत.
करोडो अजून येतील.
माझ्यासारखे चिकन लेग फॉन्ट वगळता सारेच भाग घेत आहेत असे वाटते.
मला प्रश्न पडलाय की अश्यातून आपले मत कोणाला द्यायचे हे कसे ठरवायचे??

एकापेक्षा जास्त लोकांना मत द्यायची सोय ठेवता येईल का?

यंदा सगळे उपक्रम आवडले. गुड जॉब संयोजक. नवीन मंडळ असून देखील छान प्रकारे पार पाडता आहात जबाबदारी.

कौतुकाची मोठी पोस्ट लिहिलेली ती गेली. आता शेवटच्या दिवशी लिहीन पोस्ट.

यंदा सगळे उपक्रम आवडले. गुड जॉब संयोजक. नवीन मंडळ असून देखील छान प्रकारे पार पाडता आहात जबाबदारी...+१००

Pages