Gone With The Wind जेव्हा गारूड करतं...

Submitted by ललिता-प्रीति on 16 August, 2020 - 03:17

आठवतंय तेव्हापासून या पुस्तकाचं वर्णन ’स्कार्लेट ओ’हेरा आणि र्‍हेट बटलरची प्रेमकथा’ असंच वाचण्यात आलं होतं. प्रेमकथा म्हटलं की आपल्या डोक्यात काही basic ठोकताळे तयार असतात. पुस्तकाची पहिली १००-१२५ पानं वाचून झाली तरी त्यातलं फारसं काही कथानकात येत नव्हतं. त्याचंही इतकं काही नाही, पण (narration ला एक छान लय असूनही) त्या शंभर-एक पानांमध्ये हळूहळू कंटाळाही यायला लागला. ५००+ पानांचं पुस्तक कसं काय पूर्ण करणार, असा प्रश्न पडायला लागला. (Kindle वर ५००+ पानांची आवृत्ती मिळाली होती.)

पुस्तक विकत घ्यावं की नाही, वाचलं जाईल की नाही, अशा शंकेनं आधी काही वाचक मित्रमंडळींना पिडलं होतं. त्यातल्या बर्‍याच जणांनी वाचायला सुरुवात करून कंटाळा आल्याने मध्येच सोडून दिलं होतं, ते आठवलं. मग काही काळ पुढे रेटू म्हणून वाचत राहिले, आणि... कधी पुस्तकाने माझा ताबा घेतला हे कळलंच नाही!

सुरुवातीला कंटाळा आला, पण आता जरा बरं सुरू आहे... आता फारच इंटरेस्टिंग होत चाललं आहे... व्यक्तिचित्रणं करण्याची पद्धत कमाल आहे... वाचणार्‍याला आपल्यासोबत ओढून नेणारं आहे... दिवसेंदिवस unputdownable होत चाललं आहे... झपाटून, हेलपाटून टाकणारं आहे... अशा एक एक पायर्‍या चढत मी वाचत गेले.
आणि शेवटी मेलनीच्या आजारपणानं सुरू झालेला प्रदीर्घ प्रसंग वाचत वाचत पुस्तकाच्या शेवटाला आले तेव्हा तर मला स्पष्टपणे जाणवलं, की मनावर एक गारूड तयार झालेलं होतं, एक अंमल चढला होता...
त्याचं मर्म पुस्तकाच्या पानापानावरच्या detailing मध्ये होतं; तरीही घेतलेल्या अनपेक्षित jumps मध्ये होतं... त्या jumps मुळे वाचकांचा अजिबात विरस न होण्यात होतं; historic fiction मध्ये इतिहास किती आणावा याच्या घालून दिलेल्या परिपाठात होतं; प्रेमकथेला किती तर्‍हेचे कोन असू शकतात याच्या दाखवून दिलेल्या शक्यतांमध्ये होतं; प्रेमाची कबुली देण्याचा प्रसंग किती जगावेगळा असू शकतो या जाणीवेत होतं... ’माणसं अशी वागतातच का?’ या प्रश्नांच्या अनेको उत्तरांमध्ये होतं.

हो, ही ’स्कार्लेट ओ’हेरा आणि र्‍हेट बटलरची प्रेमकथा’च आहे, पण तेवढ्या ६(च) शब्दांत पुस्तकाचं वर्णन करणे हा अन्याय आहे.
ही जगण्याच्या वावटळीत टिकून राहण्यासाठी केलेल्या अथक धडपडीची, धीरोदात्तपणाची कथा आहे; आता सगळं संपलं, अशी परिस्थिती समोर ठाकते तेव्हाही शरण न जाता जमेल तसे हातपाय मारण्याची आहे; प्रेमामुळे या धडपडीसाठी मोठी ताकद मिळू शकते याकडे झालेल्या दुर्लक्षाची आहे.

काही पुस्तकं चाळीशीच्या अनुभवांचं गाठोडं हाताशी आल्यावरच वाचावीत असं मला ’The God Of Small Things’ वाचल्यावर जाणवलं होतं. Gone With The Wind नं त्यावर शिक्कामोर्तब केलं.

Timeless Classics म्हणजे नेमकं काय हे या पुस्तकामुळे लख्खपणे समजलं.

----------

पुस्तकात गुलामगिरीची पाठराखण केली गेली आहे असा या पुस्तकावर आरोप होतो. (जॉर्ज फ्लॉइड प्रकरणानंतर नेटफ्लिक्सवरून हा सिनेमा हटवण्यात आला, असंही वाचलं.) पण लेखिका एक southerner होती, कथानकही southerners च्या दृष्टीकोनातून लिहिलं गेलं आहे, हे एकदा लक्षात घेतलं, तर मग ती बाब खूप खटकत नाही.
उलट त्या संदर्भात आणखी एक गोष्ट नोंदवावीशी वाटते. पुस्तकातल्या गुलाम पात्रांचे संवाद ते ज्या उच्चारांची इंग्रजी बोलतात तशा पद्धतीनंच लिहिलेले आहेत. (I - Ah, going - gwine) ते वाचायला सुरुवातीला जरा अडचणीचं वाटतं. पण नंतर मजा यायला लागते. ती पात्रं खरंच आपल्यासमोर उभी राहून बोलत असल्याचा भास होतो.

----------

Gone With The Wind हा सिनेमा मी पाहिलेला नाही. YouTube वर त्यातल्या बर्‍याच महत्वाच्या प्रसंगांच्या clips आहेत. पुस्तकातला तो-तो प्रसंग वाचून झाला की मी त्या-त्या clips पाहत होते. आणि (संपूर्ण सिनेमा पाहिल्याशिवाय कोणतीही टिप्पणी करणे चुकीचं आहे हे मान्य करून म्हणेन, की) पुस्तकात फार सुंदर/भेदक/परिणामकारक रीतीने समोर येणारे प्रसंग त्या clips मध्ये ५० टक्केही वठलेले वाटले नाहीत... अर्थात माध्यमांतर हा वेगळा विषय झाला.

पण मुद्दा आहे गारूड! पुस्तक पूर्ण करायला दोन महिने लागले, पण ते झालं. पुस्तक पूर्ण करून एक आठवडा होऊन गेला, तरी ते अजून तसंच आहे!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिज्ञासा,साधना, फारेंड व इतर .. तुम्ही जे म्हणता की या पुस्तकात/ चित्रपटात जो इतिहास आहे तो इतिहास बदलु नये किंवा या चित्रपटावर बंदी घालुन इतिहास थोडी बदलता येणार आहे? मग चित्रपटावर बंदी कशाला? इट्स अ नी जर्क रिअ‍ॅक्शन...

पण मला असे वाटते की जी लोक या पुस्तकावर किंवा या पुस्तकावरुन काढलेल्या चित्रपटावर आक्षेप घेत आहेत त्यांचे म्हणणे आहे की या पुस्तकात/ चित्रपटात प्लांटेशन लाइफवरच्या गुलामांच्या आयुष्याचे जे वर्णन/ चित्रीकरण आहे... ते वास्तव नाही... ते सगळे शुगरकोटेड / वॉटर्ड डाउन व्हर्जन आहे...

खर्‍या प्लांटेशन इस्टेटींवर गुलाम माणसांना चाबकाने फोडुन काढत असत व गुलाम बायकांवर दररोज बळजबरी व अत्याचार होत असत. गुलामांच्या कुटुंबातील आई, वडिल मुले यांच्यात निर्दयीपणे फारकत केली जात असे. मीमीसारखे आयुष्य असणार्‍या बायका विरळाच होत्या. तुम्ही जर अंकल टॉम्स केबीन पुस्तक वाचले तर तुम्हाला या पुस्तकावर व चित्रपटावर आक्षेप घेणार्‍यांचा द्रुष्टिकोन समजेल.

ब्लॅक लाइफ मॅटर्स च्या चळवळीच्या पार्श्वभुमीवर.. बर्‍याच लोकांना... हा वास्तवाशी फारकत असलेला.. शुगरकोटेड इतिहास मान्य नाही... एकीकडे गुढग्याने गळा दाबुन खुन करायचे व एकीकडे असे वास्तवाशी फारकत असलेले चित्रपट दाखवायचे.... या विरोधाभासाचा निषेध..म्हणुन चित्रपटावर आक्षेप.

झालच तर “रुट्स” नावाची टीव्ही सिरिज जर बघता आली तर खरच बघा.. खर्‍या प्लांटेशन वरचे गुलामांचे आयुष्य बघुन अंगावर शहारे येतात व मेंदु सुन्न होतो!

अर्थात.. हा गुलामांबद्दलचा मुद्दा जर वगळला तर ही कादंबरी एक फिक्शन म्हणुन श्रेष्ठ व खुप परिणामकारक आहे यात संदेह नाही! ऑन सिंपली लिटररी मेरिट.. धिस नॉव्हेल इज नो डाउट... अमेझिंग!

मुकुंद, खूप सुंदर पोस्ट व माहिती. अमेरिकन इतिहास तितकासा माहीत नाही, यादवी युद्धबद्दलही फारशी माहिती नाही. मी पुस्तक व चित्रपट फिक्शन म्हणून वाचले.

या पुस्तकात शुगर कोटेड माहिती आहे म्हणून हे पुस्तक जगभरातून गोळा करून जाळून तर टाकले जाणार नाही ना? आजही हे पुस्तक जगभरात छापले जातेय. मग चित्रपटाने काय घोडे मारले आहे? चित्रपट म्हणून बघावा. तो का दडपून टाकावा?

आणि इतिहासच म्हटला तर जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हरसुद्धा गुलाम म्हणूनच जन्माला आला. त्याच्या जन्मानंतर काही वर्षात गुलामगिरी कायद्याने संपवली नसती तर तो कदाचित जन्मभर गुलाम राहिला असता. त्याला सहृदय मालक भेटला, ज्याने त्याचा स्वतःच्या मुलासारखा सांभाळ केला.

मानवी स्वभावाच्या अनेक बाजू असतात. शक्य आहे की काही गुलामांना थोडीफार चांगली वागणूक मिळत होती.

आजच्या मुक्त अमेरिकेत गुढग्याने गळा दाबून काळ्याना मारणारे गोरे जसे आहेत तसे तेव्हाच्या अमेरिकेत काळ्याना सहृदयतेने वागवणारेही कुणी असतील.

एखादी गोष्ट वाईट म्हणून दडपून टाकण्याचे समर्थन होते तेव्हा त्याचा फायदा घेऊन कुठेतरी काही चांगलेही दडपून टाकले जाण्याची शक्यता निर्माण होते. म्हणून सर्व प्रकारच्या दडपशाहीचा मुळातून निषेध करायला हवा हेमावैम.

मुकुंद, सुंदर पोस्ट्स! द रूट्स फार पूर्वी वाचली आहे. आता पुन्हा वाचली पाहिजे.
साधना, +१
कादंबरी आणि सिनेमा हे दोन्ही काल्पनिक आहे (work of fiction) याची जाणीव राहिली तर दोन्ही खटकणार नाहीत. मात्र सिनेमाचा उपयोग whitewashing करण्यासाठी होऊ नये.

>> मग चित्रपटावर बंदी कशाला? इट्स अ नी जर्क रिअ‍ॅक्शन...<<
माझ्या माहिती नुसार नेफिने चित्रपट बॅन केलेला नाहि, रोटेशन (किंवा कॉटॅक्ट संपल्या) मुळे तो तिथुन गेलेला आहे. तीच परिस्थिती एचबीओची. त्यांनी टेपररीली तो या वर्षाच्या सुरुवातीला ऑफलाइन केला होता, पण आता उपलब्ध आहे.

एरव्हि तुझी पोस्ट मस्त, मात्र एक अ‍ॅडिशन करेन. सिविल वॉर केवळ गुलामगिरी या मुद्द्यावरुन घडलं न्हवतं, ओवरॉल आर्थिक गळचेपी, फेडरल गवर्नमेंटचा नको तेव्हढा हस्तक्षेप हि काहि सदनर्सची ठुसठुसती कारणं, आणि नॉदनर्सना खटकणारी सदनर्सची खुशालवृत्ती, त्यात भर ड्रेड स्कॉटच्या बाबतीत दिलेल्या सुप्रिम कोर्टाच्या निकालाची. असा सगळा प्रकार होता तो...

मला तरी पुस्तक किंवा चित्रपट या दोन्हित रेसिझम ठळक/बटबटित, इवन ग्लोरिफाय केलेला आहे असं जाणवलं नाहि. उलट चित्रपटात आफ्रिकन अमेरिकन्सचं बॅलंस्ड पोर्ट्रेयल आहे. त्या तुलनेत हल्लीच्या चित्रपटातलं (जँगो अन्चेन्ड, हेल्प इ.) डिपिक्शन जास्त धाडसी आहे माझ्या मते. पण काय आहे, एकदा रेसिस्टचा टॅग लागला कि तो जात नाहि, तसं काहिसं या पुस्तक आणि चित्रपटाचं झालेलं आहे. मार्गरेट मिचलला त्याची झळ ती जिवंत असताना पोचलीच पण तीच्या पश्च्यात, तीच्या मिडटाउन मधल्या घराला (जिथे तीने हि कादंबरी लिहिली) तीनदा आगीचा सामना करावा लागला...

सिविल वॉर केवळ गुलामगिरी या मुद्द्यावरुन घडलं न्हवतं, >>> राज - हा वाद तर वर्षानुवर्षे सुरू आहे. आणि आता तो निकाली निघणे अशक्य आहे. पण या युद्धाबद्दल जितकी माहिती मिळते तितके Fundamental allegiance मधे काही फरक नसलेल्या, देशाचा/वंशाचा विस्तार सारखे कोणतेही कारण नसलेल्या व एकाच भूमीत साधारण एकसारख्या कारणांनी येउन वसलेल्या दोन गटांमधे इतके रक्तरंजित युद्ध झाले याचे आश्चर्य वाटते.

पण गुलाम आफ्रिकन अमेरिकन लोक हे व्हाईट्स च्या बरोबरीचे नाहीत या गुहितकावर कॉन्फेडरेट आस्तित्वात आली होती. त्यामुळे त्यांच्या सामाजिक व्यवस्थेतून व त्याहीपेक्षा आर्थिक इक्वेशन्स मधून गुलामगिरी अचानक बंद करणे हेच प्रमुख कारण वाट्ते. बाकी कारणे दुय्यम असावीत. एकूण अर्थव्यवस्थेचा विचार करता कापूस, प्लॅण्टेशन्स वगैरे एक भाग झाला. पण उत्तरेकडच्या राज्यांमधे तेथील अर्थव्यवस्था कसल्या उत्पादनांवर अवलंबून होती - ज्यात गुलामगिरीशिवाय ती चालू राहू शकली - याबद्दल फारशी माहिती नाही. एकूण जगाचा तेव्हाचा इतिहास पाहिला तर बहुतांश देशांनी या युद्धाआधी सुमारे ३०-४० वर्षांमधे गुलामगिरी प्रथा बंद केल्या. मग उत्तरेकडे कधीच नव्हती, की त्यांनीही मधे कधीतरी अ‍ॅबोलिश केली कल्पना नाही.

मुकुंद - या चित्रपटाबद्दलचे सर्व आक्षेप मान्य आहेत. तरीही चित्रण चुकीचे आहे म्हणून चित्रपटावर बंदी आणावी हा स्लिपरी स्लोप आहे. उलट हा चित्रपट कसा तेव्हा तेथेच सुरू असलेल्या वाईट गोष्टी जराही दाखवत नाही, तेथील आयुष्य शुगरकोटेड दाखवतो याबद्दल माहिती या चित्रपटाबरोबरच दिली आहे. मी जी व्हर्जन पाहिली त्यात पहिली ५ मिनीटे एक क्लिप आहे हे सगळे संदर्भ सांगणारी. इन जनरल तोच चांगला उपाय वाटतो.

राज.. तु म्हणतोस सिव्हिल वॉर वॉज नॉट अबाउट स्लेव्हरी .. तुझ्यासाठी १९९८ च्या बिल क्लिंटन इंपिचमेंट ट्रायल मधे सेनेटर डेल बंपर काय म्हणतो ते जरुर बघ या क्लिप मधे... Happy
I
https://youtu.be/xBUORg6r2Eg

जाउ दे.. सिव्हिल वॉरची कारणे इथे आपण देत बसलो तर ललिता प्रितीने उघडलेला हा छान धागा हायजॅक होइल... Happy

साधना, फारेंड... मला वाटते मी चित्रपटाच्या आक्षेपाचे नीट स्पष्टीकरण दिले नाही.... परत एकदा प्रयत्न करतो...

मी स्वतः सेंसरशीपच्या स्लिपरी स्लोपच्या विरुद्ध आहे. पण साधना... मुद्दा इथे चांगला किंवा वाईट इतिहास दडपायचा की नाही हा नसुन .. तो इतिहास बरोबर आहे की चुकीचा आहे हा आहे!

तुम्हाला एकच उदाहरण देतो... जर समजा एखाद्या चित्रपटात नाझी लोकांनी ज्यु लोकांचे जे होलोकॉस्ट केले... त्याचे शुगर कोटेड व्हर्जन दाखवले की डकाव किंवा ऑश्विच कॉनसन्ट्रेशन कँप मधे एखाद्या दुसर्‍या ज्युला चांगले वागवले तेच दाखवले पण त्याच नाझींनी लाखो ज्युंची कत्तल केली.. ते सोयिस्कर इग्नोअर केले तर ते चालेल का?

In short.. it’s not the question of good or bad.. it’s the question of right or wrong!

( अर्थात गॉन विथ द विंड या पुस्तकाचा मुळ विषय गुलामगीरी व सिव्हिल वॉर हा नाहीच .. पण मी आधी म्हटल्याप्रमाणे .. या पुस्तकात तो इतिहास कॉन्स्टंटली लुम्स लार्ज इन द बॅकग्राउंड.. आणी पुष्कळसे वाचक त्यावरच जास्त भर द्यायची चुक करतात.. व मग राज म्हणाला तसे लेखिकेचे अ‍ॅटलांटामधले घर दुर्दैवाने ३ दा जाळले जाते.... Sad )

आणी साधना.. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हरला एक चांगला मालक मिळाला व तसे काही चांगले व्हाइट ओनर असु शकतील हे मान्य.. पण मी म्हणतोय की अश्या एखाद्या दुसर्‍या चांगल्या उदाहरणाने संपुर्ण गुलामगीरी या हॉरिबल विचारसरणीचे समर्थन कधीच होउ शकत नाही... चूक ती चूकच!

पण परत एकदा... या कादंबरीतला तो मुद्दा जर बाजुला ठेवुन फक्त या लेखिकेने ज्या ताकतीने या कादंबरीतल्या व्यक्तिरेखा उभ्या केल्या आहेत व त्यांच्यातले खुप गुंतागुंतीचे .. खुप घड्या असलेले सबंध...ज्या सहजतेने वाचकांसमोर उलगडले आहेत त्याला नक्कीच सलाम केला पाहीजे! म्हणुनच मग जिज्ञासाने म्हटल्याप्रमाणे .. स्कार्लेट ओहारासारखे कॅरेक्टर.. जे बर्‍याच वेळेला मॉरली राँग असुनही वाचक तिचासाठी रुट करतात! धिस बुक इज लाइक अ ब्युटिफुली वुव्हन इंट्रिकेट टॅपेस्ट्री..

तळटीपः या चित्रपटाची मजा तुकड्या तुकड्यात यु ट्युबवर बघुन मुळीच समजणार नाही.. मी तर यापुढेही जाउन म्हणेन... हा चित्रपट जर अ‍ॅप्रिशिएट करायचा असेल तर.. थिएटरमधे... ७० मिलिमिटर पडद्यावर किंवा घरी बिग स्क्रिन टिव्ही असेल तर त्यावर बघायला हवा.. चांगल्या साउंड इफेक्ट सकट.. तरच या चित्रपटाची भव्यता व सुंदरता समजेल.... इट्स ट्रुली अ‍ॅन एपिक मुव्ही!

वा! छान चर्चा. Happy आणि अवांतर मुळीच नाही.

या पुस्तकाबद्दल आणि लेखिकेबद्दल नेटवर इतर माहिती शोधली तेव्हा 'अंकल टॉम्स केबिन' सतत समोर येत होतंच. आधीही त्या पुस्तकाबद्दल वाचण्यात आलं आहे.

मार्गारेट मिशेलबद्दलच्या विकी पेजवर म्हटलंय, की ती सिव्हिल वॉरच्या चर्चा ऐकतच लहानाची मोठी झाली; तिनं आपल्या आजीकडून सिव्हिल वॉरबद्दलच्या बारीकसारीक गोष्टी ऐकल्या. हे वाचल्यावर मला वाटलं, की त्या चर्चा किती इन्टेन्स असतील, आजीनं किती बारकावे सांगितले असतील तिला आणि तिनं ते सगळं कसं टिपून घेतलं असेल, जे पुढे या कादंबरीत इतक्या प्रभावीपणे उतरलं.
आणि मग आजीनंच तिला शुगरकोटेड गोष्टी सांगितल्या असतील का?
अर्थात, एक प्रतिभावान लेखिका म्हणून ती तेवढ्यावरच आधारित काही लिहायला गेली नसती हे देखील खरं.

उत्तरेकडे कधीच नव्हती, की त्यांनीही मधे कधीतरी अ‍ॅबोलिश केली कल्पना नाही. >>>
मला वाटतं, एकेक राज्यं ही प्रथा अबॉलिश करत गेली. पण दक्षिणेकडची काही राज्यं त्यासाठी अजिबात तयार नव्हती. त्यासाठी देशातून फुटून निघण्याचीही त्यांची तयारी होती. आणि लिंकनचं म्हणणं होतं की वेळ आली तर युद्ध करू, काही माणसं मेली तरी चालतील, पण देश एकसंध राहायला हवा.

नेटवर अशीही एक चर्चा वाचली, की कादंबरीतल्या कालखंडादरम्यान अब्राहम लिंकनची हत्या झाली. पण कथानकात त्याचा कुठेही ओझरता उल्लेखही येत नाही.

मला असं वाटतं, की सिव्हिल वॉरच्या इतिहासाकडे आपण (नॉन-अमेरिकन्स, त्या मातीत मुळं नसलेले, अशा अर्थाने) तिर्‍हाइताच्या दृष्टीकोनातून पाहू शकतो. ('शुगर-कोटेड, येस, मेबी, पण आम्हाला वर्क ऑफ फिक्शन वाचायचंय' - असं म्हणणे आपल्याला शक्य आहे.)

मुकुंद तू दिलेले स्पष्टीकरण व आक्षेप दोन्ही समजले व त्याबाबतीत या चित्रपटातले चित्रीकरण चुकीचे आहे हे ही मान्य. माझा विरोध फक्त चित्रपटावर बंदी घालणे व स्ट्रीमिंग सर्विसेस मधून काढून टाकणे वगैरेला आहे. अगदी धादांत चुकीचा इतिहास चित्रपटातून दाखवला असेल तरी बंदीला विरोध आहे.

दोन स्वतंत्र प्रश्न आहेत
- हे चालेल का, योग्य आहे का? - याला उत्तर "नाही"
- म्हणून तशा कलाकृतीवर बंदी असावी का? - यालाही उत्तर "नाही"

मग काय उत्तर आहे? तर लोक त्यांच्या समजानुसार, त्यांना जो प्रपोगंडा पसरवायचा आहे त्यानुसार इतिहासाची मांडणी करणार. तो त्यांच्या विचारस्वातंत्र्याचा भाग आहे. असंख्य चित्रपट्, पुस्तके अशी आहेत की ज्यात इतिहासाचे वर्णन चुकीचे, एकांगी किंवा काल्पनिकही असेल. ज्यांना ते खटकते, त्यांनी त्यावर लिहावे, इतरांना समजवावे, रेफ्युट करावे. यापेक्षा सर्व बाबतीत लागू पडेल असा लीगल उपाय मला तरी माहीत नाही.

हे वरचे झाले जनरलाइज्ड मत.

स्पेसिफिकली या चितपटाबद्दल - आता पूर्ण पाहून झाला. अनेक वर्षे आधी जेव्हा पाहिला होता तेव्हा एकूणच सिव्हिल वॉर, ओल्ड साउथ वगैरेंबद्दल फारशी माहिती नव्हती. इथे नवीन आलो तेव्हा सुरूवातीला अमेरिकन्स जेव्हा "साउथ" म्हणतात तेव्हा त्यात आख्ख्या अमेरिका देशाचा दक्षिण भाग न येता टेक्सास व तेथून पूर्व किनार्‍यापर्यंत असलेल्या भूभागात दक्षिणेला- असलेली व एका स्पेसिफिक विचारसरणीचा प्रभाव असलेली राज्येच येतात ही माहिती होण्यापासून सुरूवात होती. मग मधल्या काळात कुतूहल जागे झाल्याने बरीच माहिती वाचली, पाहिली. त्यात आता इतक्या वर्षांनी पुन्हा पाहताना आणि त्याच "साउथ" मधून पाहताना वेगळाच अनुभव वाटला. प्लॅण्टेशन्स चे उल्लेख, गावांची नावे वगैरे आता आजूबाजूचे वाटते. पूर्वी कॅलिफोर्नियात असताना हा चित्रपट पाहताना it wasn't quite the same feeling!

हा चित्रपट अ‍ॅक्टिव्हली रेसिस्ट नाही. गुलामांबद्दलच्या वागणुकीचे, अन्यायाचे एखाददुसरा संवाद वगळता यात समर्थन नाही. त्याचा फारसा उल्लेखच नाही. पण ओल्ड साउथ, तेथील वातावरण वगैरे ग्लोरिफाय करताना त्याच वेळेस तेथे सुरू असलेल्या गुलामगिरीच्या प्रथेकडे तो पूर्ण डोळेझाक करतो. वरच्या पोस्ट मधे लिहीले होते तसे एका सीन मधे तेथील वातावरण किती भारी होते हे दाखवून नंतर पाचच मिनीटांत गुलामांची - ती ही लहान मुलांची- कामे दाखवताना त्यात काही विरोधाभास दाखवत आहेत असे अजिबात वाटत नाही.

यासारखे आपल्याकडचे उदाहरण द्यायचे म्हणजे लोकांना पूर्वी आपल्या घरी एकाच वेळेस जेवणास वीस पंचवीस लोक सहज असत वगैरें ची कौतुके/उमाळे येत असतात. पण त्यावेळच्या सिस्टीम मधे घरातील बायका व नोकरचाकर किती भरडले जात असतील याकडे पूर्ण डोळेझाक असते त्यात (किंबहुना अजूनही "आमच्याकडे आलेला माणूस जेवल्याशिवाय जात नाही" छाप छातीठोक बढाया व पाहुणचाराची वर्णने ही घरातील स्त्रिया प्रामुख्याने याला लागणारी कामे उचलणार या गृहीतकावर आधारित असतात) . रूढ अर्थाने गुलामगिरी नसली तरी समाजाच्या एका अंगाचे गौरवशाली वर्णन करताना त्याच समाजव्यवस्थेत चालू असलेल्या अन्यायकारक प्रथांकडे पूर्ण डोळेझाक असते. तसलाच प्रकार.

>>>>>पण त्यावेळच्या सिस्टीम मधे घरातील बायका व नोकरचाकर किती भरडले जात असतील याकडे पूर्ण डोळेझाक असते त्यात>>>> Happy Happy Happy Happy Happy Happy

अगदी धादांत चुकीचा इतिहास चित्रपटातून दाखवला असेल तरी बंदीला विरोध आहे.///

हे समजलं नाही. म्हणजे एखाद्या फिल्म मेकरला धादांत खोटा इतिहास दाखवण्याचं स्वातंत्र्य असावं पण streaming service वाल्याना तो चित्रपट आपल्या प्लॅटफॉर्मवर न घेण्याचं स्वातंत्र्य नसावं? तो चित्रपट त्यांनी दाखवलाच पाहिजे अशी सक्ती?
आणि समजा एखाद्या प्लॅटफॉर्मवर असा चित्रपट आला तर जनरल पब्लिकला तो प्लॅटफॉर्म नाकरण्याचंही स्वातंत्र्य नसावं?
उदाहरण द्यायचं झालं तर हिटलर वाईट नव्हताच, ज्यूच वाईट होते, हिटलरने एकाही ज्यूला मारलं नाही- असा इतिहास दाखवणारा चित्रपट कोणीतरी बनवला. तर मग नेटफ्लिक्स किंवा प्राईम वाल्याना तो दाखवायचं नाकारण्याचा हक्क नसावा?
आणि समजा नेटफ्लिक्सने तो चित्रपट दाखवायचं ठरवलं तर मला निषेध म्हणून माझं subscription रद्द करण्याचा हक्क नसावा? लोकांना 'cancel netflix' अशी मोहीम सोशल मीडियावर चालवण्याचा हक्क नसावा?

सनव - मी असा चित्रपट एखाद्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म ने आपल्या लिस्ट मधून काढणे हे मला का पटत नाही त्याचे स्पष्टीकरण दिले आहे. वरच्या कोणाचेही कसलेही स्वातंत्र्य नाकारलेले नाही.

आणि एकूणच माझा मुद्दा "बंदी" शी जास्त संबंधित आहे. एखाद दुसर्‍या कंपनीने किंवा व्यक्तीने केलेल्या चॉईस बद्दल नाही.

सध्याच्या काळात तशी बंदी नाहीच.

पण स्ट्रीमिंग सर्व्हिस किंवा सोशल मीडिया साईट्स तारतम्य वापरून काही कंटेंट वगळणार. किंवा कस्टमर्स आपली पॉवर वापरणार.

अमोल.. बिंगो! आपल्याकडचे उदाहरण एकदम चपखल!

“रूढ अर्थाने गुलामगिरी नसली तरी समाजाच्या एका अंगाचे गौरवशाली वर्णन करताना त्याच समाजव्यवस्थेत चालू असलेल्या अन्यायकारक प्रथांकडे पूर्ण डोळेझाक असते. तसलाच प्रकार.”... +१

मान्य की तु म्हणतो तस... “ हा चित्रपट/ हे पुस्तक अ‍ॅक्टिव्हली रेसिस्ट नाही. गुलामांबद्दलच्या वागणुकीचे, अन्यायाचे एखाददुसरा संवाद वगळता यात समर्थन नाही. त्याचा फारसा उल्लेखच नाही”...

पण मी परत एकदा सांगतो.. या सबंध पुस्तकात/ चित्रपटात ... तत्कालीन इतिहास, समाज, त्यांचे भपकेबाज प्लांटेशन लाइफ, तिथले गुलाम व त्यांचे सबसर्व्हिएंट लाइफ, ते करत असलेली गोर्‍यांची खिदमत... हे सगळे लुम्स व्हेरी लार्ज इन द बॅग्राउंड...आपण ते इग्नोअर करु शकतो किंवा आपल्या खिजगणतीतही ते येत नाही किंवा आपल्याला त्यात काहीच वावगे वाटत नाही किंवा ते खटकतही नाही.... कारण?

कारण...आपण आफ्रिकन अमेरिकन नसल्यामुळे आपल्याला आठवड्यातुन १० वेळा गाडी चालवताना पोलिसाने थांबवल्याचा अनुभव अमेरिकेत येत नाही पण नेहमीच असे अनुभव येणार्‍या लोकांना .....

अश्या चित्रपट/ पुस्तकातला सदर्न प्लांटेशनचा राजेशाही भपका बघताना किंवा यातली पात्रे फॉर स्लेव्हरी कॉज करता लढताना बघताना.. ... हे सगळे काळ्या गुलामांचे रक्त व घाम गाळुन मिळालेले आयते वैभव आहे व ते वैभव.. ती राजेशाही जिवनशैली ..इटर्नली काळ्यांनी गुलामगीरीतच खितपत पडुन राहुन.. गोर्‍यांची खिदमत करतच रहावी ..ही विचारसरणी पर्पेच्युएट करायला यातली पात्रे युद्ध करतायत..
.. हे बघुन तिटकारा येणारच! ती लोक हे पुस्तक/ चित्रपट एक चांगले फिक्शन म्हणुन बघण्याच्या मनस्थितीत कसे बरे असतील? .. आणी म्हणुनच पुस्तकास/चित्रपटास त्यांचा आक्षेप!

त्यांचा आक्षेप अस म्हणण्यापेक्षा.. सध्य परिस्थितीत .. स्टुडिओज व स्ट्रिमिंग सर्व्हिसेस तसे चित्रपट व टीव्ही शोज... स्ट्रिम व ब्रॉडकास्ट करायचे की नाही या संभ्रमात आहेत. कोणालाच सध्याचे तंग वातावरण अजुन प्रक्षोभक करायचा आरोप नको आहे.. म्हणुन टेकिंग डाउन सच मुव्हिज/ शोज ऑर पुटींग डिस्क्लेमर्स सच अ‍ॅज यु सॉ इट बिफोर धिस मुव्ही.. अमोल.

जोपर्यंत वाचक/ प्रेक्षक हे पुस्तक/ चित्रपट आफ्रिकन अमेरिकन माणसांच्या द्रुष्टिकोनातुन वाचु/ पाहु शकणार नाहीत तोपर्यंत या पुस्तकावर/ चित्रपटावर आक्षेप का व कशाला याचे उत्तर त्यांना हुलकावणीच देइल.

तळटीपः ज्यांना खरच अमेरिकन सिव्हिल वॉर बद्दल अजुन माहीती हवी असेल तर दिग्दर्शक केन बर्न्स याची अ‍ॅवॉर्ड विनिंग ... “ सिव्हिल वॉर“ ही अतिशय सुंदर ... साडे अकरा तासाची .. ९ भागाची...डॉक्युमेंटरी जरुर पहा... यु विल नॉट बी डिसअपॉइंटेड... आय प्रॉमिस!... अमेरिकेत असाल तर कुठल्याही पब्लिक लायब्ररीतुन तुम्हाला ती डॉक्युमेंटरी चेक आउट करता येइल.

ललीता-प्रीती व अमा आपले प्रतिसाद खूप आवडले.
>>>>हो, ही ’स्कार्लेट ओ’हेरा आणि र्‍हेट बटलरची प्रेमकथा’च आहे, पण ................... ताकद मिळू शकते याकडे झालेल्या दुर्लक्षाची आहे.

क्या बात है!

Pages