फ्रॉम बेंगाल विथ लव्ह!

Submitted by एविता on 16 August, 2020 - 02:47

त्या दिवशी शुक्रवार एक मे आणि सुटीचा दिवस होता. मी आणि माई सकाळी दुसऱ्यांदा डायनिंग टेबलवर चहा पीत बसलो होतो. " अगं तेवढं ते कलिंगड चिरून ठेवशील का गं?," माई म्हणाल्या, " जेवल्यानंतर खावूया जरा गार गार फोडी."

"हो माई, चहा घेतला की लगेच चिरते." मी सांगितलं.

मी बेसिनचा नळ उघडला तेंव्हा ऋषि न् पण त्याचा चहा प्यालेला कप घेऊन आला.

" ठेव, मी विसळते." मी त्याला म्हणाले आणि कप विसळून तिथेच कट्ट्यावर पाणी निथळायला पालथे घातले आणि कलिंगड हातात घेत लं.

"ऋ, तो चाकू दे ना.."

त्यानं रॅक वरचा चाकू घेतला.

"धुवून दे."

त्यानं चाकू नळाखाली धरून झटकला.

" पुसून दे."

त्यानं पुसायला नॅपकिन घेतला. "आणि हा कलिंगड नळाखाली धरून मग जरा पुसून देतोस प्लीज..?"

मी त्याच्या हातात कलिंगड दिलं आणि त्याच वेळी टेबलावर ठेवलेला माझा फोन वाजला.

दितीमोनी. "ओ हॅलो दिती, की खोबोर.." दितीमोनीचा कॉल उचलून मी विचारलं.

" ओ मा इवी, केमोना आछेन? सॉबकीछु ठीकाछे..? की कोरबो?"

"अगं सगळं मस्त आहे. तू कुठे आहेस? दारात उभी आहेस आणि फोन करते आहेस काय..?"

"नाही. तू की कोरबो ते सांग."

"अगं पीएचडी करतीय मी.."

"हो.? बाप रे. कुठला विषय आणि काय आहे टा यटल..?

"आफ्टर इफेक्ट्स ऑफ कटिंग द वॉटरमेलॉन ऑन द डायनिंग टेबल अँड लेट द ज्यूस ड्रिप ऑन द टेबलटॉप अँड फ्लोअर, लिव्हिंग द स्टेन्स बीहायिंड टू बी क्लीनड बाय हबी... :-D:-D" ऋषीन् हसला. ' वाइफ..." असं तो काहीतरी पुटपुटला.

"हा हा हा," ती हसत म्हणाली, " काय आहे हायपो?"

"वाइफ डिमांडस् अँड हजबंड ऑफर्स टू क्लीन द डायनिंग टेबल अँड फ्लोअर..!":-P:-P:-P

"येते मी तरमूजा खायला तुझ्याकडे दुपारी.. हा हा."(•‿•)(•‿•)

" दिति, अगं मी नवीन कंपनी जॉईन केलीय. "जॉब सोडला एचएएल् मधला.."

"अगं काय सांगतेस इवि... एती अबाक कारा.. मग काय करणार आहेस आता..?"

" कन्सल्टन्सी. पे लोड सबसिस्टिम फॉर सॅटेलाईट. आणि ऋषीन् ने पण नवी कंपनी फ्लोट केलीय. त्याने पण जॉब सोडला.

"अरे... सो मेनी न्यू डेवलपमेंटस्... हे बघ, उद्या शनिवारी तुम्ही सगळे, यू ऑल फोर, माझ्याकडे डिनरला यायचंय. मला शक्य नाही हे वाक्य मला ऐकायचं नाही. तेंव्हा सगळी बातमी सांग. बाय." तिने फोन ठेवला.

"कोण ही दिति? इथे असते तुझी मैत्रीण म्हणाली होतीस ती हीच का...?" ऋषिन् ने विचारले.

" होय. अरे आयआयटी क्लासमेट. आली होती की लग्नाला. एरोस्पेसला पाचच सीट्स होत्या आणि माझ्या बरोबरच्या सगळया चारही आल्या होत्या लग्नाला. नंतर VGSOMच्या एमबीए क्लासमेट्स पण आल्या होत्या तीन दिवस अगोदर. दितीमोनी, ऐंद्रीला, मधुमिता, मौली, संध्या, पारोमा, स्नेहा, झंखना, मौशुमी आणि संचारी. सर्वांनी हजेरी लावली होती. त्या आल्यानंतर आम्ही सर्वांनी जो कल्लोळ केला तेवढा हॉस्टेल मध्ये पण केला नसेल."

" हो? मग कूर्ग मध्ये १४४ कलम लावलं असेल ना?"

"लावलं की! आमच्या घरात!... आम्ही सगळ्यांनी एक आठवडा आमच्याच हॉस्टेल म्हणजे मदर टेरेसा हॉलचं कॅन्टीन चालवायला घेतलं तेंव्हा घातलेला गोंधळ आणि बनवलेल्या बेचव भाज्या आणि कच्चा भात, आकार नसलेल्या चपात्या आणि मग आमची तक्रार करणाऱ्या मुली आणि त्यांची लीडर पारोमिता, तिच्या रूममध्ये दितीमोनीने सोडलेली पाल आणि पारोमिताचे किंचाळणे, आणि तिसऱ्याच दिवशी आमच्याकडून काढून घेतलेले कॅन्टीन हे आठवून आम्ही पोट दुखेपर्यंत हसलो."

"काय करते ग दितीमोनी?

"आयआयएससीत शिकवते."

"वाव..! आणि मिस्टर डे?"

"आयआयएम फॅकल्टी."

" टेरीफिक!:-):-) घरात इंजिनिअरिंग मॅनेजेमेंट आहे म्हण की! :-):-):-):-) बरं मग पारोमिता नी काय केलं?"

" दिवाळीत कॅम्पस मध्ये इल्लुमिनेशन नावाचा कार्यक्रम असायचा. त्यात आम्ही काढलेली रांगोळी पारोमिता आणि तिच्या सख्यानी पुसून टाकली होती आणि मग आम्ही तिला टॉयलेट मध्ये गाठून दहा बारा बुक्के मारून सरळ केलं होतं. ती आमच्या सायकलची हवा काढून टाकायची आणि आम्हाला लेक्चरला पोचायला वेळ व्हायचा. मग आम्ही तिची सायकलच उचलून कॅम्पस मध्ये असलेल्या जेल रोड वर ठेऊन आलो होतो."

"आता कळलं ना की तुला मी तुला का घाबरतो ते..?"

" :-D:-D:-D एकदा दिघा बीचला गेलो होतो आम्ही. एक दीड तासाचा रस्ता आहे खरगपूरहून. बीचवर तिची आणि दितीमोनीची झटापट, मारामारी आणि एकमेकींना ओरबाडणे वगैरे आठवून आम्हाला इतकं हसू आलं की ते दिवस परत यायला हवेत असं वाटलं. शेवटच्या सेमेस्टर मध्ये मात्र आम्ही पारोमिताशी जवळीक वाढवायचा प्रयत्न केला पण तिने प्रतिसाद दिला नाही. कॅम्पस सोडताना मात्र आम्ही सगळे रडवेले झालो आणि एकमेकींची गळाभेट घेताना येणारे हुंदके थांबता थांबत नव्हते. मी माझ्या लग्नाचे आमंत्रण पारोमिताला पाठवलं पण ती लग्नाला आली नाही."

"कूर्ग सारख्या ठिकाणी लग्नाला आली नाही म्हणजे बघ.." तो बोलला.

"बरं ते जाऊ दे," मी म्हणाले, "मघाशी तू हळूच वाइफ आणि काहीतरी पुटपुटलास ते काय होतं?"

" वाइफ म्हणजे डब्लू आय एफ इ, वरीज इन्वाईटेड फॉर एवर."

" अच्छा," मी कपाळावर आठ्या चढवून म्हणाले," वरिज कशाला, वर्कर इंडक्टेड फॉर एव्हर म्हण. नाहीतरी इंटरनॅशनल लेबर डे आहेच की आज. सोळा तास काम करायचं. सकाळी सहा ते रात्री दहा साडेदहा. हाऊस वाइफ. खरं म्हणजे तुलाच घरातली कामं करायला हवीत ऍज ए हजबंड. हजबंड मधला पहिला एचयूएस आहे तो house शी निगडित आहे. व्हिक्टोरियन काळातल्या इंग्लिशमध्ये हजबौंडी. त्यातल्या बौंडीचा अर्थ स्वामी, मालक. हजबंडचा मूळ अर्थ जो घरात राहतो तो. गृहस्थ, गृहस्वामी, गृहपति. घराच्या मालकांनी घर स्वच्छ ठेवायला पाहिजे. म्हणून सांगते की हजबंड या शब्दाशी तुला प्रामाणिक राहायला हवे. गृहिणी म्हणून मी कामं करायची तर गृहस्थ म्हणून तुला मला मदत करायला पाहिजे."

"ओके स्वीट डिश. तू सांग मी करतो."

"तूर्तास तो काचेचा बाउल घे मोठा आणि ह्या फोडी बाउल मध्ये टाक. बाउल समोर काचेच्या शोकेस मध्ये आहे बघ त्या वॉटर फिल्टरच्या बाजूला. धुवून आणि पुसून घे बाउल."

"येस सिकरने."

"ह्या फोडी भर बाउलमध्ये. हे हे हे हातांनी नाही. तो फॉर्क धुवून घे आणि त्यांनी उचल."

"जी अंटीन उंडी."

त्यानं फोडी भरायला सुरुवात केली. " आता बाउल फ्रीज मध्ये ठेव."

" हौदरी म्हैसूर पाक."

मला हसू फुटले. तो पण हसायला लागला.":-P:-P बर ह्या दितीमोनीचं आडनाव काय ग?"

"डे"

"मन्ना डे ची कोण?"

"खापरपणजी. :-D:-D". ऋ.. अरे तिने उद्या डिनर ला यायला सांगितलय आपल्या चौघांना. माई आणि अप्पा येतील ना रे दितीकडे..?"

"येतील की! सुनेच्या मैत्रिणींनी बोलावलंय तर जायचं नाही असं काही नाही बरं का..! आपण जाऊया."

" थॅन्क्स ऋ.." मी म्हणाले.

" ही मुलगी बंगाली आहे ना?"

" होय. का रे?"

" मला भोजनाबद्दल म्हणायचंय. तिच्याकडचं भोजन नॉनव्हेज नाही ना? माई करणार नाही तसलं भोजन. तिला शुद्ध शाकाहारी भोजन लागतं. फिश करी वगैरे भोजनात असेल तर ती भोजन करायची नाही."

"नाही, नॉनव्हेज नाही. तिला माहिती आहे. आणि हे सारखं भोजन भोजन काय लावलयस?. स्वैपाक, जेवण असे शब्द वापर की..!"

" बरं बाई.. नाही म्हणत भोजन. डिनर म्हणतो. ओके.? बर दुपारच्या भोजनाला काय आहे खास?" मी त्याला चापट मारणार तेवढ्यात, "मी जातो आता आंघोळीला." म्हणत तो गेला.

मग दुपारी आम्ही सगळे जेवायला बसलो तेंव्हा मी माई आणि अप्पाना माझ्या मैत्रिणीकडे दुसऱ्या दिवशी रात्री जेवायला बोलावल्याचं सांगितलं.

" जावूया की. सांगून टाक आम्ही येतो म्हणून." अप्पा म्हणाले.

" काय आहे नाव एवि आपण जाणार आहेत त्यांचं?" माईनीं विचारलं.

" दितीमोनी डे. बंगाली आहे. कोरमांगलाला राहते."

"ओहो. बंगाली आहे होय.. मला वाटलं कानडी आहे. होसमनी, हळेमनी, दोड्डामनी असतं तसं वाटलं दितीमनी."

":-):-):-) नाही माई, मनी नव्हे, मोनी. बंगालमधल्या सिलिगुडीची आहे."

" बर बर. जावूया की. तू असल्यावर काही चिंताच नाही गं.!"

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मग आम्ही सगळे दितीमोनीकडे जायच्या तयारीला लागलो. आम्ही निघालोय आणि तासाभरात पोहोचतो असं मी दितीमोनीला कळवलं. साडेसहाला आम्ही घराला कुलूप लावलं आणि गाडीत बसलो. मी आणि ऋषीन् पुढे आणि माई,अप्पा मागच्या सीटवर.

"चलायचं माई भोजन करायला?" ऋषिन् ने गाडी सुरु केली आणि माझ्याकडे आणि मागे बघत भोजन शब्दावर जोर देत विचारलं.

" अरे थांब जरा.. मी टाळ घ्यायला विसरले बघ. एवी, जरा कुलूप उघडून देवघरात ती टाळ ठेवलीय बघ ती घेऊन येतेस?"

" हो माई, आणते." असं म्हणून मी उतरले आणि कुलूप उघडून देवघरातून ती टाळ घेतली. मला काहीच उलगडा होईना त्यांना टाळ कशाला हवीय.. दुरुस्त वगैरे करायची असेल वाटेत म्हणून मी त्याची दोरी तुटलीय का किंवा एखादी वाटी खराब झालीय का तेही बघितलं पण ती अगदीच सुस्थितीत होती. वाजवून बघितली तर झण्ण्ण्ण sss! असा मस्त आवाज ही आला. टाळ त्यांना कशासाठी हवीय ते मी विचारलं असतं तर आगाऊपणा झाला असता म्हणून मी गप्प बसले.

मग माईंच्या हातात ती टाळ सोपवून आम्ही निघालो. गाडीत अशा तशा गप्पा चालल्या होत्या. बंगळूरच्या ट्रॅफिकला कशी शिस्त नाही, अवाढव्य वाढलेलं शहर इत्यादी. मी वाट बघत होते की माई ऋषीन् ला टाळ दुरुस्त करायला कुठल्यातरी दुकानासमोर थांबव म्हणतात की काय पण नाही म्हणाल्या. आम्ही दितीमोनीच्या अपार्टमेंट मध्ये शिरलो आणि विजिटर्स पार्किंगला गाडी लावली.

पाचव्या मजल्यावर असणाऱ्या तिच्या फ्लॅटची बेल दाबली तेंव्हा दितीमोनीने दार उघडले आणि हजार वोल्टचा दिवा लागावा तशी ती प्रसन्न हसली. आगत स्वागत झाल्यावर मग गप्पा सुरू झाल्या. शुभांकर, ऋषीन् आणि अप्पा यांचं राजकारण, अर्थकारण, आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची स्थिती यावर चर्चा सुरू झाली आणि आम्ही किचन मध्ये दितीमोनी आणि तिचे आई वडील, आमचे शिक्षण, खरगपूर च्या गोल बाझार मध्ये मिळणाऱ्या स्वस्त कलकत्ता साड्या, कूर्गमध्ये फिरलेली ठिकाणं, भाजी किती महागली आहे, दूध, किराणा जवळपास कसे मिळते, कामाला येणाऱ्या बायका कश्या कामचुकारपणा करतात यावर बोलत बसलो. आमच्या गप्पा संपल्या आणि मग तिने ताट वाट्या घेतल्या. जेवणात झाल मुरी, कोबीशाक, लुची, कांचा आमेर चटणी आणि गोड म्हणून चोमचोम आणि पांतूवा केलेले होते.

जेवण झाल्यावर आम्ही सगळे परत बाहेर हॉल मध्ये बसलो. थोड्याशा गप्पा झाल्या आणि मग निघताना माईनीं त्यांना डबल बेडशीटची गिफ्ट बॅग दिली. त्यानंतर आम्ही त्यांचा निरोप घेतला. ती दोघं पार्किंग पर्यंत सोडायला आली.

कार रस्त्याला लागल्यावर ऋषीनने माईना विचारलं," माई, कसं वाटलं भोजन?"

माई मोठ्यांदा हसल्या. "हे खरं भोजन. छान बनवलं होतं या मुलीनी. गोड मुलगी आहे अगदी!"

" बरं आता एविला प्रश्न पडलाय की तू इथे येताना टाळ का घेतला होतास," ऋषीन् पुढे बोलला, "तिला आता सांग कथा."

माई परत हसल्या, " अगं आम्ही मुंबईत कुलाब्याला होतो रंगाचारींची बदली झाली तेंव्हा. रिझर्व्ह बॅंकेच्या ऑफिसर्स क्वार्टर मध्ये जागा मिळाली होती. शेजारी बंगाली कुटुंब होतं. बट्टाचारी त्यांचं नाव."

" माई बट्टाचारी नव्हे, भट्टाचार्य असेल," मी म्हणाले.

" अगं तीच तर गम्मत आहे, " अप्पा म्हणाले, " आम्ही शिफ्ट झाल्यावर तिसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता त्यांच्या घरातून मिसेस भट्टाचार्य आल्या. तिने स्वतःची ओळख करून दिली. श्री भट्टाचार्य बाहेरगावी गेले आहेत आणि तुम्ही आमच्याकडे बारा वाजता भोजन करायला या असं तिनी राधाला सांगितलं. फक्त राधालाच बोलावलं होतं. ती भट्टाचार्य म्हणाली आणि हिला वाटलं बट्टाचारी."

"अगं मी कानडी बोलले तर ती हिंदी बोलायला लागली आणि तेही मोडकं तोडकं!" माई म्हणाल्या, "मला फक्त बारा बजे आणि भोजन एवढंच कळलं."

":-):-):-) मग?" मी विचारलं.

"मी मग स्वैपाक केलाच नाही. रंगाचारी कचेरीला गेल्यावर बारा वाजता मी तिच्याकडे गेले. हॉल मध्ये पंधरा वीस बायका बसल्या होत्या. टीपॉयवर दुर्गादेवीचा हार घातलेला फोटो ठेवला होता. समई लावली होती. मी गेल्यावर तिने हसून स्वागत केलं, बसायला छोटी चटई दिली आणि माझ्या हातात टाळ दिला. मग त्यांनी दुर्गेचे स्तोत्र असं काहीतरी म्हंटलं आणि मग भक्ती गीते म्हणत टाळ वाजवायला सुरुवात केली. मी फक्त टाळ वाजवत राहिले कारण त्यांची गाणी कळतच नव्हती. शेवटी एक वाजला तेंव्हा टाळ वाजवणं बंद झालं. मग प्रसाद म्हणून चमचाभर शिरा दिला. हळू हळू सगळ्या बायकांनी जायला सुरुवात केली. मला वाटलं की सगळ्या गेल्या की खास माझ्यासाठी जेवायला केलं असेल शेजारधर्म म्हणून. शेवटी मी एकटीच राहिले. तेंव्हा पाच एक मिनिटं वाट पाहून ती "भोजन हो गया" असं म्हणाली. मला आश्चर्यच वाटलं. म्हंटलं कधी झालं भोजन? हे टाळ वाजवणं म्हणजेच भोजन असं म्हणाली. मी चुपचाप घरी आले आणि उप्पीट करून खाल्लं."

"मग कळलं की तिला भजनाला या म्हणायचं होतं पण ती बंगाली असल्याने भजनचा उच्चार भोजन असं केला होता." अप्पानी स्पष्ट केलं.

"आणि म्हणून आज बंगाली मुलीनी भोजनाला बोलावलंय म्हणून मी भजन असेल असे समजून टाळ घ्यायला सांगितलं तुला पण मी काल म्हंटलंच होतं की तू असलीस की चिंता नाही." माई पहाडी हसत म्हणाल्या, "फ्रॉम बेंगाल विथ लव्ह!"

आम्हीही त्यांच्या पहाडी हास्यात सामील झालो.

....

VGSOM= विनोद गुप्ता स्कूल ऑफ मॅनेजमेंट, आयआयटी, खरगपूर.

बंगाली:

की खोबोर = काय विशेष ( बातमी)
ओ मा इवी, केमोना आछेन? सॉबकीछु ठीका आछे..? की कोरबो.? = ओ हाय एवी, कशी आहेस? सगळं ठीक आहे? काय करतेस?
एती अबाक कारा = This is surprising! या अर्थी.

कानडी:

सिकरने = शिकरण
अंटीन उंडी = डिंकाचे लाडू
हौदरी = होय हो (आदरार्थी)

Group content visibility: 
Use group defaults

छान.
बंगालमध्ये गातात, महाराष्ट्रात खातात: भोजन
आणि
महाराष्ट्रातून पाठवतात बंगालमध्ये खातात: संदेश

हे हेहेहेहे भोजन भजन डोक्यातच नाही आलं. मी पण विचार करत होते कि टाळ कशासाठी घेतलेत? Happy मस्त, मला तुझी गोष्ट सांगायची स्टाईल खुप आवडते एवि.

@ निलुदा, :-D:-D हो ना अरे. बट्टाचारी ने भोज.. न करवले आणि दितीमोनी ने भोजन करवले!

@ धनुडी, हाहाहा, माझ्या जागी असतीस तर तुला असंच वाटलं असतं! अगं नुसतंच टाळ घ्यायला सांगितलं. मृदंग घ्यायला सांगितलं असतं तर...?! Anyways thank you so much.

@नंबर १ वाचक, अगं कानडी लिहिता वाचता येत नाही. बंगाली फक्त बोलता येते आणि समजते. अगं तू तर एवढी नावाजलेली अनुवादक. तुझ्यापुढे मी म्हणजे किस झाड की पत्ती! Thank you anyways. Loads of Love!

खरंच खूप छान आणि गोड लिहिता तुम्ही... आणि तुमच्या कथांमधील संवाद खरेच असतील तर मस्त बोलता तुम्ही सगळे.. विशेष म्हणजे तुम्ही आणि तुमचे मिस्टर..

वाह मस्तच. खुब भालो. असं सुंदर हल्केफुल्के लिखाण सकाळी सकाळी वाचलं की अख्खा दिवस खुप छान जातो.

@ अमा, बरोबर! खरगपूर सुटलं तसं भेळ बंदच झाली. तिथे दर रविवारी गोल बाझार मध्ये जायचं आणि भेळ खाऊन यायचं हा दिती आणि माझा छंद! कॅम्पसमध्ये आमच्या हॉस्टेल जवळ टिक्का सर्कल आहे तिथे मिळायची पण ती गोल बाझार इतकी टेस्टी नसायची. स्ट्रीटफूडची मजाच वेगळी! इथे बेंगलोर मध्ये झाल मुरी? अशक्य! दितीने ते खास माझ्यासाठी बनवले आणि जेवणात वाढले. शेवटी माझी खास मैत्रीण ना! आणि वांगी? आमचा नावडता पदार्थ...!
Thank you for reading!

Pages