मध्ये गावाला...

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago
Time to
read
<1’

..

मध्ये गावाला जाऊन आलो. यावेळी काही कारणाने एप्रिलमध्ये गावच्या यात्रेला जाता आले नाही. त्यामुळे मे अखेरीस सुटी काढून काहीशा आडनिड्या वेळी गेलो. गेल्यावर पाणी-बिनी घेतघेतच माझी सगळी विचारपूस करायला सुरूवात होते. सगळ्यांची, एकूणच गावाची ख्यालखुशाली मिळाल्याशिवाय गावात आल्यासारखे वाटत नाही. घरात पोहोचण्यापूर्वीच वाटेत दोन आत्यांची गावं लागतात आणि तिथूनच ख्यालखुशाली सुरू होते. तर बोलता बोलता आत्या म्हणाली की, "अरे, परटाची वनुबाई दोन महिने इस्लामपुरात हॉस्पीटलात होती. आता घरी आणून दीड महिना झाला. सगळं अंथरुणावरच चाललंय. लकवा झालाय तिला. डावी बाजू पार लुळी पडलीय.. शश्या आता परत गेलाय. सतीश काम सोडून तीनचार महिने तिची औषधपाणी बघतोय.. दैवानं तरी किती अंत बघायचा असल्या गरीबांचा? मागच्या आठवड्यात आप्पा खुर्चीत बसता बसता कसे घसरले आणि त्यांचे माकड हाड मोडले.. त्यांना दुसर्‍याच्या मदतीशिवाय ना उठबस करता येत, ना चालता येत.. गुणाची पोरं तेवढी पोटाला आलीत.. "
फार वाईट वाटलं ऐकून. अर्थात मी जाऊन भेटून यावं हे या बोलण्यामागे ओघाने आलेच.

पिकणार्‍या जमिनीची दोन तीन तुकडी आणि वंशपरंपरागत चालत आलेला व्यवसाय यावर गुजराण करणारं हे कुटुंब. वनुबाई कुणाच्यात तरी रोजगारावर काम करायची आणि आप्पा लोकांचे कपडे इस्त्री करून द्यायचे. त्यासाठी शेजारच्या गावात पायपीट करायचे. एवढे करून पण एवढ्या लहान लहान खेड्यांतून असे कितीशे कपडे मिळणार? पैशाची चणचण कायमच.. यातूनच आलेले दारूचे व्यसन.. गावातल्या मिळतील त्या वाकळा, गोधड्या धुवून त्यातून बदल्यात काही धान्य त्यांना मिळायचे. दोन मोठ्या मुलींसह सहा मुले. त्यातल्या एका मुलीचं नाव पमो. त्यामुळं आम्ही लहान मुले वनुबाईला पमूची आई म्हणायचो. संसाराची ओढाताण विचारायला नको. अपार कष्ट पाचवीलाच पुजलेले. तरीही आहे त्यात समाधान मानून ते जगायचे. कुणाच्या अध्यात ना मध्यात. सुरूवातीपासूनच या कुटुंबाबद्दल सगळ्यांना आपुकली वाटत आलेली. मुलं शिकून काहीतरी करतील म्हणून सगळ्यांनाच शाळेत घातलेले. ती फारशी शिकली नाहीतच. पुढे दोन्ही मुलींची लग्नं झाली. आणि मुलं काम करण्याजोगी झाल्यावर एकेकाने धडपडत कुठेतरी काम शोधलेले. पुढे ती चारही मुलं इचलकरंजीला आली आणि तिथे एकत्र राहू लागली. पुढे आईबापांना पण तिकडेच घेऊन गेली आणि तेव्हापासून आतापर्यंत ते सगळे तिथेच राहत होते. मोठ्या दोन मुलांची लग्न झाली. त्यानंतर ते कधीतरीच गावाला यायचे, दोन तीन वर्षातून एकदा. माझी गाठ तर कितीतरी वर्षांतून कधीतरी पडायची. भेटल्यावर ती दोघंही भरभरून बोलायची. पमूच्या आईचा आणि आप्पांचाही आमच्यावर खूप जीव आणि कौतुक. आणि म्हणून मोठे झाल्यावर शक्य होईल तेव्हा आठवणीने भेटल्यावर त्यांना फार आनंद व्हायचा. आतेकडून आता हे ऐकल्यावर खूपच वाईट वाटलं. आमच्या घराच्या पुढच्या रस्त्यापलीकडे त्यांच घर. आमच्या घराकडे पाठ असलेले.

भेटायला गेलो तेव्हा सतीश आण्णा आणि त्याची बायको घरात होते. माझा आवाज ऐकल्याबरोबर आत जमिनीवर अंथरूणात पडून असलेल्या पमूच्या आईंनी "अगं हा कधी आला?" असं जवळजवळ ओरडूनच विचारलं. उठायची धडपड करू लागल्या. पण लगेचच त्यांच्या लक्षात आले, ही नुसतीच धडपड.. मी झपाट्याने आत गेलो आणि त्यांच्या उशाशी बसलो. त्यांनी पुन्हा उठायची धडपड केली आणि शेवटी असहायतेनं ढसाढसा रडू लागल्या. मला काय करावे तेच सुचेना. बोलायचे पण. डोळे बोट बोट खोल गेलेले. आपला दुसर्‍याला कमीत कमी ताप व्हावा म्हणून अन्न जवळ जवळ वर्ज्यच केलेलं. त्यातून आलेला अशक्तपणा आणि क्षीण झालेली प्रतिकारशक्ती याने अधूनमधून अंगात ताप यायचा. खूप रडल्या. मी गप्प बसून राहिलो. काय बोलायचे? मला आतून भडभडून आलं होतं. जरा मोकळ्या झाल्यावर बोलायला लागल्या. मी उगीच इकडची तिकडची विचारपूस करायला सुरूवात केली. तुझं कसं चाललंय? शिक्षण झालं का? चांगली नोकरी मिळाली का? आई-बाबा आणि घरातले सगळे कसे आहेत? अजूनही भांडता का रे आप-आपसात? असं खूप बोलल्या त्या. आणि अचानक पुन्हा गाडी त्याच रुळावर आली. "माझ्या मुलांनी खूप केलं बघ माझ्यासाठी... अजिबात हयगय केली नाही, औषधपाण्याची, दवाखान्याची, की शुश्रुषा करण्याची. त्यांनी किती करायचं? आता मी काही यातून उठणार नाही... मग देवानं आणखी कसला विचार करायचा ठेवला आहे?..." म्हणून पुन्हा हुंदके देऊन रडू लागल्या. शेवटच्या वाक्यानं एवढा वेळ दुसर्‍या कोपर्‍यात शांत बसलेले आप्पा पण रडायला लागले. ही गेली तर माझं कसं व्हायचं?....

"हा सतीश चार महिने झाले काम सोडून माझ्यासाठी इथे बसला आहे. आज इकडचे औषध आण, उद्या तो काढा कढवून पाज, परवा कुठले आयुर्वेदीक औषध आण. काय उपयोग या सार्‍या धडपडीचा? आणखी किती दिवस तो असा राहणार? किती ताप ह्यांना? त्यातच आप्पांचं असं झालं.... किती करायचं पोरांनी?..." ...या एकाही प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नव्हते. "पमूच्या आई असं काय बोलता? सारखं अजिबात रडायचं नाही. आईवडिलांची सेवा करण्यात कसला आलाय ताप? ती न करून असं काय मिळवणार आहेत ते? तुम्हाला वाटतंय ना, ह्यांना ताप कमी व्हावा, तर त्यासाठी तुम्ही व्यवस्थित जेवण, औषध वगैरे घ्यायला नको का? येईल त्याच्याजवळ असे रडून त्रास कशाला करून घ्यायचा?" असं काहीतरी बोलत राहिलो. खूपवेळ बसलो. शेवटी "निघू मग आता मी?" असं विचारलं. त्या गप्प झाल्या. आलेलं रडू आवरत त्या कशाबशा म्हणाल्या "आता परत कधी भेटणार? माहित नाही.. पुन्हा गाठ पडेल की नाही.." चुळबूळ करत हळूच म्हणाल्या "मला जरा उठवून बसव." मी आणि आण्णाने त्यांना उठवून बसवले.
मला जवळ बोलावून उजव्या हाताने माझा चेहरा कुरवाळला आणि म्हणाल्या "खूप मोठा हो" ...माझ्या गालावर - त्या जन्मभर कष्ट आणि कष्टच करून खरबुडीत झालेल्या - त्यांच्या हाताचा स्पर्श झाला तेव्हा मला गलबलून आलं. डोळे केव्हा वाहायला लागले ते कळलं नाही.

एवढं निर्व्याज प्रेम करणार्‍या माणसांना, कसलीच अपेक्षा न ठेवता आतून आलेल्या या सदिच्छांच्या बदल्यात द्यायला माझ्याकडे काय आहे?

-
विषय: 
प्रकार: