अपलोड-वेणा

Submitted by अनन्त्_यात्री on 13 August, 2020 - 13:24

सिंग्युलॅरिटीच्या
या गोठल्या वर्तमानकाळात
संगणकेश्वराज्ञेनुसार
माझा सायबोर्गावतार
आटोपता घेण्यासाठी
अपलोडतोय महास्मृृतिकोषात
माझ्या जाणिवा, नेणिवा,
अन्
होलोग्राफिक अस्तित्वखुणा.

ई-जैवकचरा होऊन वितळेन मग
पुनर्घटनाच्या अखंड धगधगत्या यज्ञात

हजर होईल
माझा डिजिटलावतार
कधीही, कुठेही
संगणकेश्वराच्या मर्जीनुसार

सायबरअमरत्वाच्या
या दुर्धर अपलोड-वेणा
माझ्या एकेका सर्किटनसेतून
ठिबकतायत...

Group content visibility: 
Use group defaults

छानच. वेगळे आणि टोकदार.
नव्या जगाच्या नव्या संवेदना, त्यानुसार चपखल नव्या उपमा आणि शब्द. दु:ख तेच, सलही तोच. जमाना नवा आणि आविष्कारही नवा, रिफ्रेशिंग.