डावरे -बावरे

Submitted by ए_श्रद्धा on 12 August, 2020 - 10:35

हा लेखनाचा प्रयत्न, उद्या इंटरनॅशनल लेफ्ट हॅन्डर्स डे आहे त्या निमित्त.
१३ ऑगस्टलाच का याबद्दल मला तरी काही माहिती सापडली नाही. (https://www.lefthandersday.com) पण बऱ्याचदा १३ ऑगस्ट ला फेसबूक, Wats App वर कोणी तरी आठवण काढत आणि स्वतः च त्यात काहीही कर्तृत्व नसताना पण उगाच थोडंस स्पेशल वालं फीलिंग येत.

वामांगी लोकांच्या काही वेगळ्या मजा/अडचणी असतात.

शाळेत असताना -
 शाळेतल्या बाकांवर उजवीकडे बसले की लिहिताना शेजारच्याचे आणि आपले हात धक्काबुक्की करतात. Happy
 डावीकडे बसले की ओळींमधून फिरणाऱ्या बाईंना कोपरखळ्या बसतात.
 शाईपेन ने लिहिताना आधीचे लिहिलेले शब्द पुसले जातात.
 प्रसाद घेताना, देवाला फुलं वहातांना पटकन डावा हात पुढे आला की एखादे आजी -आजोबा डोळे वटारून बघतात.
 शाळेच्या स्कर्ट चे बक्कल उजव्या हाताने डावीकडे लावावे लागते आणि खिसा नेमका उजवीकडे असतो आणि जो एकच असतो. Sad

कॉलेजमध्ये गेल्यावर -
 डावखोऱ्या लोकांच्या मागे बसणाऱ्यांना त्यांचा सगळा पेपर दिसतो आणि कॉपी चालू आहे का म्हणून बोलणी पण खावी लागतात, जर तुम्ही थोडेफार हुशार असाल तर मात्र तुमचा भाव वाढतो Wink
 क्लासेस मधले सिंगल सीट बेंचेस आणि उजवीकडे असेलेले डेस्क तर खूप वैताग आणतात.
 माउस, कॅमेरा,Latch अशा वस्तू मजा बघतात.
 हॉटेल मध्ये प्लेट्स,ग्लास ,चमचे उलटीकडे ठेवले जाऊन सांडलवण होते.

संसाराला लागल्यावर -
 लहानपणी डोळे वटारून बघणाऱ्या आजी आजोबांची जागा चुलत,मावस सासवा, सत्यनारायण, मंगळागौर प्रकारांना येणारे गुरुजी घेतात.
 गॅस,मिक्सर,लाच यांची बटण घाबरवून सोडतात.
 साडीच्या निऱ्या उलट्या घेतल्या जातात.
 कितीही आतून वाटलं तरी त्यांची मुलं राईट हॅन्डर्स होतात. Lol
इत्यादी, इत्यादी

मंडळी तुमचे अनुभव, किस्से माहिती वाचायला नक्की आवडेल

ताजा अनुभव -
स्पायरल बाइंडिंग असलेल्या वहीमध्ये उजव्या पानावर लिहिताना त्रास होतो, जो उजव्या हाताने लिहिणार्यांना डाव्या पानावर होत असेल Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@BLACKCAT - मी ही ऐकलंय. मेधावि सतार वाजवतात बहुतेक.
मला तरी कोणतंही वाद्य वाजवता येत नाही Sad

मी सतार वाजवायला थोडी शिकलेय. फार नाही. पण सिमेट्रीचं ड्राॅइंग ऐका वेळी दोन्ही हातांनी काढू शकते मी. उजव्या हातानंही ब-यापैकी लिहू शकते. चित्रकला व इतर ललित कला अत्यंत आवडतात व थोड्याफार जमतात.

मजेशीर अनुभव आहेत जे डावऱ्यांसाठी त्रासदायक आहेत.
मी इतर सर्व कामे उजव्या हाताने करतो फक्त संगणकाचा उंदीर डाव्या हाताने चालवतो (कोणतेही बटन सेटिंग न बदलता) अगदी ऑटोकॅड ड्रॉईंग देखील डाव्या हातानेच बनवतो.

लिहायला उर्दू सारखी सुरवात करत होती, खूप सांगून ते बदलले>>>> माझी लेकसुद्धा असंच करत होती. मग तिने सुरुवात केली की, "उर्दू नको,मराठीत लिहा" असं हसतखेळत सांगायला सुरुवात केली. त्यामुळे थोडा फरक पडला. पण तरीही नकळतपणे तसं होतं अजूनही. पण तिच्या लक्षात आलं की सुधारते मग.
अक्षर तिरकं वर जातं मात्र लिहिताना. आणि ठिपक्यांची रेषा असलेली बाराखडी गिरवायचं पुस्तक आणलंय. पण गिरवताना ती नक्की कशावरून पेन्सिल फिरवतेय, हे तिचाच हात मध्ये आल्यामुळे तिला दिसत नाहीये, असं वाटतंय. त्यामुळे हे काम काही व्यवस्थित होत नाही आणि तिला कंटाळा येतो. हे डावरेपणामुळे असेल का?

छान लेख छान विषय

मला फार वाटायचे की माझे एखादे मूल तरी डावखुरे व्हावे. कारण एकूणच मी डावखुर्‍यांचा फार मोठा फॅन आहे. मला ते स्टायलिश वाटत आलेत नेहमीच.

तसेच डावखुरे लोक क्रिएटीव्ह असतात कारण ते उजव्या मेंदूचा वापर करतात असा काहीतरी फंडा आहे ना
जाणकारांनी प्रकाश पाडा प्लीज

अरे हो, मी स्वतः सौरव गांगुलीसारखे दिसावे आणि भासावे म्हणून जवळपास वर्षभर डाव्या हाताने फलंदाजी करायचो. बरेपैकी यशही मिळाले होते Happy

वरचे बरेच मुद्दे स्वत: लेफ्टी असल्यामुळे रिलेट झाले. शिवाय धाकटी बहीण, मोठी काकी, मेव्हणा असे घरातच लेफ्टी आहेत.

डाव्या-उजव्याचा बराच त्रास झाला आहे लहानपणी. प्राथमिक शाळेत दुपारचा डबा खातांना मला डावा हात मांडीखाली ठेवण्याची सक्ती होती - उजव्यानी खाल्ले नाही तर मित्र हसायचे. घरी पण जेवण उजव्या हातानेच करावे असा आग्रह होता, त्यासाठी बऱ्याच युक्त्या वापरल्या जात, मला मात्र त्याचा राग राग होत असे. पुढे दोन्ही हातांनी (सारखेच गचाळ अक्षर) लिहिणे, चित्रे काढणे अगदी १४-१५ वर्षाचा होईंपर्यंत. मग मात्र लिहिणे डाव्या आणि खाणे उजव्या हाताने अशी विभागणी झाली.

शर्टाची बटणे, खिसे, बेल्ट यांच्या रचनेनी आधी खूप त्रास दिला, आता सवय झाली आहे.

आता मजेत आहे - भारतीय जेवण उजव्यानी सुरु करतो, पण दोन्ही हातानी जेवतो Happy फारिनला आणि जिथे काट्याचमच्यांनी खायचा प्रोटोकॉल असतो तिथे थोडी तारांबळ उडते - डावा हात टेक्स फुल्ल कंट्रोल - मग ते डाव्या-उजव्याचे सर्व नियम कायदे पाय(हात)दळी तुडवून मजा करतो Happy

आता उजव्या हाताने सुवाच्य लिहिता येत नाही.
सही आजही दोन्ही हातानी सेम टू सेम येते.

आम्सटरडॅमला डावखुऱ्या लोकांसाठी असलेल्या वस्तूंनी खच्चून भरलेले एक दुकान बघून आपण थोडे आधीच जन्माला आलो असल्याचे फीलींग आले होते !

धन्यवाद सर्वांना !! Happy

@ऋन्मेष - सौरव गांगुली, का आवडतो माहित नाही पण आवडतो Happy

@अनिंद्य - आम्सटरडॅमला डावखुऱ्या लोकांसाठी असलेल्या वस्तूंनी खच्चून भरलेले एक दुकान बघून आपण थोडे आधीच जन्माला आलो असल्याचे फीलींग आले होते ! >> विशलिस्ट मध्ये add करतेय.

शीर्षक मस्त आहे. विषय फारच जिव्हाळ्याचा. ह्या उजव्यांच्या जगात डावरे बिचारे अगदीच बावरे होऊन जातात. हे सगळ जग उजव्यांसाठीच बनलेल आहे की काय अशी शंका येते बरेच वेळा.

आपली आई ही कधी आपली बाजू समजून घ्यायची नाही. आणि. पूर्वी तर नाहीच नाही. पण त्यामुळे मी अनेक गोष्टी दोन्ही हाताने करू शकते. डाव्या हाताने ही माझं अक्षर छान येत आणि फास्ट ही येत लिहिता. लहानपणी जेवावं तर उजव्या हातानेच लागे , ते हळू हळू जमू लागलं होतं पण कोणाकडे गेलं आणि खायला दिलं काही की चमचा मात्र डाव्या हातात धरला जाई. आई नुसत्या नजरेनेच तो उजव्या हातात धरायला लावायची पण उजव्या हाताने काही ग्रिप येत नसे. मग घास तोंडात न जाता खाली सांडणे, कधी चमचाच हातातून निसटून जाणे ह्या गोष्टी घडत की मग पुन्हा आईचा ओरडा ...एवढं कसं खाता येत नाही म्हणून. Happy

पत्ते खेळताना ही डावरे लोक साफ उलटे धरतात पत्ते. झांजा, टाळ्या वाजवणे, कपडे पिळणे, शिवणकाम करणे ह्या गोष्टी तर उलट्या केल्या जातातच पण ईव्हन लहान मुलाला कडेवर ही उलट्या बाजूला घेतल जात.

बस मध्ये उभ असाल तर पकडायचा रॉड हा उजव्या हाताने पकडता येईल अशीच त्याची रचना आहे . उजव्या हाताने आम्ही धरू शकत नाही, डाव्या हाताने धरला तर आम्ही लाईन मधून बाहेर येतो आणि उतरणाऱ्या लोकांचे धक्के खावे लागतात.

आम्हाला शाळेत इंग्लिशला Left is Right धडा >> +१

डावखुऱ्या लोकांच्या इतक्या समस्या असून देखील ते सर्व क्षेत्रांत सरस आहेत.

मी स्वतः Left-handed नसलो तरी कोणी (वा मुलांनी) डावखरे नसावे ह्याचे बंधन नाही घालणार.

गली क्रिकेट मध्ये जास्त वेळ बॅटिंग मिळावी म्हणून 2-3 वर्षे Left handed खेळलो आहे...आऊट होईपर्यंत नंबर ने बॅटिंग असायची, धावा नाहीत. उजव्या हाताने फलंदाजी करणारे फार काळ टीकायचे नाहीत, ऑफ स्पिन बॉलर्सच्या सापळ्यात लगेच सापडायचे. त्रिफळा किंवा कॅच आऊट. डावखुरा खेळताना बाहेरचा चेंडू पायामागुन थटवता यायचा Lol

मी डावरी नाहीये म्हणजे जेवताना, कामं करताना, लिहिताना उजवा हातच पुढे असतो. डाव्याने जमत नाही या गोष्टी पण गोट्या खेळताना डाव्या हाताने खेळायचे, लंगडी घालताना डाव्या पायावर उभी राहून, उजवा पाय दुमडायचे, पाणी भरताना कळशी डाव्या कमरेवर घेते. चालताना डावा पाय पुढे येतो.

मी स्वतः डावखुरा आहे आणी त्याचा मला जाणवलेला तोटा. ( लेखातही आलेला आहे )

कागदावर लिहिणे उजव्या हाताने लिहिणार्‍यांसाठी सोयीचे (optimized) आहे, डावखुर्‍यांना नाही. नॉर्मल लोक जो मजकूर लिहितात त्यावरून हात फिरत नाही, त्यामुळे तो पुसला जात नाही. शिवाय तो झाकलाही जात नाही. आम्ही जसजसे लिहित जातो तसतते त्या लिखाणावरून हात फिरतो. शाई ओली असेल तर जास्तच त्रास. अर्थात उर्दू सारख्या भाषांना उजव्या लोकांना सेम प्रॉब्लेम येइल.

आमची आई होती डावखोरी, पण ती दोन्ही हात वापरू शकायची. शाळेत शिकवताना ती दोन्ही हातांनी फळ्यावर लिहायची. त्याचा फायदा घेऊन आम्ही म्हणायचो की दोन्ही हातांनी आम्हाला मारते Happy

म्हणजे तुम्ही डावरेच आहात... >>> थोडी म्हणता येईल पण जास्त नाही कारण काही परतताना, लाडू वळताना, कणिक भिजवताना, एकंदरीत स्वयंपाक करताना डाव्याने अजिबात जमत नाही, केर काढणे, भांडी घासणेही डाव्याने जमत नाही, सर्व उजव्या हाताने . लिहिणे आणि जेवणही डाव्याने अजिबात जमत नाही. वर उल्लेख केलेल्या काही गोष्टीत डावी बाजू पुढे येते. त्यामुळे काही टक्के असेन, म्हणजे दहा टक्के डावरी असेन.

माझं बाळ डावरा आहे. त्याला day care मध्ये जबरस्तीने उजव्या हाताने खायला लावत असत. मग तेच ग्रिप न येणे, सांडासांड व्हायची. मग मी त्यांना सांगून आले की त्याला डाव्या हाताने खाऊ देत आम्हाला काही प्रोब्लेम नाही. तुम्ही जबरदस्ती करू नका त्याच्यावर. फक्त प्रसाद उजव्या हाताने घ्यायला सांगतो बाकी नो बंधन.

माहित नाही पण तो कुठल्याही मंदिरात गेला आणि प्रसादासाठी हात पुढे केला तर गुरुजी लगेच उजवा हात पुढे कर म्हणतात, आता कोणा कोणाला सांगत बसायचं म्हणून आम्हीच त्याला शिकवलं.

हो, तुम्ही करता ते योग्य आहे. या वादात पडणे निरर्थक आहे.

मला कुतूहल आहे ते या साठी की मला घरून सांगितलेले की उजवा हात जेवायचा आणि डावा हात धुवायचा. तर प्रसादाला तो कसा वापरणार.. जर डावखुरे इथे उलटे सुलटे हात वापरत असतील तर त्या लोजिकने त्यांनी त्यांच्या जेवायच्या डाव्या हातात प्रसाद घ्यायला हवे ना..

Pages