उजवा हात - (कुट्टीची गोष्टं - १)

Submitted by SharmilaR on 30 August, 2021 - 03:04

सकाळी कसल्यातरी खुडबुडीनं कुट्टीला जाग आली. डोळे उघडून बघते तर दोन माणसं मोठी लाकडी खाट उचलून बाहेर नेत होते. पडल्या - पडल्याच तिनं घरभर नजर फिरवली, सगळं घर रिकामं - रिकामं झालं होतं. ती तटकन उठून बसली.

"उठलीस का? सगळे गेलेत पुढे. आपणच राहिलोत फक्त." अन्य बाहेरून धावत येत म्हणाला.

कुट्टी पण मग धावतच अंगणात आली. रस्त्यावर दोन्ही हात खिशात घालून बाबा समोरच्या काकांशीबोळात उभे होते. दोन माणसं ट्रक मध्ये सामान भरत होती. अन्या आपला उगाचच इकडून तिकडे धावत होता. मग तिला आठवलं, आता आपण दुसऱ्या गावी राहायला जाणार. गेले काही दिवस घरात मोठी माणसं सतत त्याबद्दल काहीतरी बोलत होती. उगाचच आपलं येता - जाता कुट्टीच्याही कानावर चार वाक्य पडायची. अर्थातच तिला वेगळं काही सांगायचे कुणी कष्ट घेतले नव्हते. दोन्ही हात कमरेवर ठेऊन ती बघत राहिली. आई, मावशी, ताई, दादा सकाळीच गेलेले दिसत होते. निदान त्यांनी जातांना आपल्याला उठवायला तरी हवं होतं . तिला नेहमीप्रमाणेच परत वाईट वाटलं. आपल्याशी सगळे असेच वागतात. ताईला मात्र आई बरोबर घेऊन गेली. अन मला सांगितलं पण नाही. ती हिरमुसली.

"चला, उठलात का? बसा समोर ट्रकमध्ये ". बाबांचं आत्ता कुट्टीकडे लक्ष गेलं.

कुट्टी एकदम भानावर आली अन काहीतरी आठवून तिला एकदम धसकल्यासारखं झालं. ती धावत परत घरात आली. बाहेरची खोली, माजघर ओलांडून ती स्वयंपाकघरात आली. तिथं काहीच नव्हतं. भरभरल्या सारखी तिनं सगळीकडे नजर फिरवली. मग मागल्या दाराकडे तोंड करून उभी राहिली.

"हं , इथंच दाराजवळ असायचंते निळं कपाट ? भिंतीला लागून. ओट्याकडे उघडणारं दार, अन कपाटाला लागून ओट्याकडे तोंड करून आपण जेवायला बसायचो?"

कुट्टी खाली बसली. नेहमी जेवायला बसतांना बसायची तशी. मंडी घालून. ओट्याकडे तोंड करून. मग कपाटाच्या बाजूचा हात उचलला.

"नक्की हाच तो उजवा हात." ती स्वतःशीच बोलली. दुसऱ्या हाताने पहिल्या होताच मनगट धरलं. आता दिवसभर, अगदी नवीन घरात जाईपर्यंत हात सोडायचा नाही, तिनं मनाशीच ठरवलं.

आजपर्यँत कुट्टीनं उजवा हात लक्षात ठेवण्याचे खूप मनापासून प्रयत्न केले होते. पण जेवायला बसल्यावर काय व्हायच ते कळायचंच नाही. पाठीत जोरात धाबेक बसल्यावरच कळायच, जेवतांना परत चुकीचा हात वापरलाय. मग सगळे तिला हसायचे.

"एवढी कशी हि ढधसध एक उजवा हात नाही लक्षात ठेवता येत?" दादा - अन्या कुत्सितपणे म्हणायचे.

"हीचा नं डावा हात बांधूनच ठेवायला हवा." मावशी म्हणायची.

कुट्टीला खूप - खूप रडू यायचं मग. शेवटी गेले काही दिवस हात लक्षात ठेवण्याची तिनं तिची - तिची युक्ती शोधून काढली होती. रोज न चुकता निळ्या कपाटाजवळच जेवायला बसायचं अन कपाटाच्या बाजूच्या हातानं जेवायचं. चला! गेले काही दिवस तरी चांगले गेले होते. पण कपाटाजवळची जागा मात्र तिनं सोडली नव्हती.

"कुट्टी .... कुट्टी.... " बाहेरून हाक यायला लागल्या तशी कुट्टी हातात हात धरूनच उठली अन घराबाहेर पडली. ड्राइव्हर जवळ अन्या आधीच बसला होता. त्याच्याजवळ तिलाही बाबांनी उचलून ठेवलं . शेजारी बाबा बसले अन ट्रक सुरु झाला.

रस्ताभर ड्राइव्हर अन त्याच्या शेजारचा माणूस काहीबाही बोलत होते. बाबाही मधेच काही सांगत होते. कुट्टीचं कशातच लक्ष नव्हतं. मधेच अन्यानी हळूच डोक्यामागची छोटीशी खिडकी उघडून तिला खुणावलं. कुट्टीनं हात हातात गच्चं धरूनच अवघडलेपणानं मागे मान वळवली. मागे ठेवलेलं सामान दिसत होतं . त्यातच तिच ते निळं कपाटही होतं . दोन माणसं कपाटाला टेकून बसली होती. तिला हायसं वाटलं.

छोट्याशा गल्लीतल्या नव्या घराजवळ ट्रक पोचला तेव्हा जेवायची वेळ होत आली होती.

"हे आपलं नवं घरं " बाबांनी कुट्टीला उचलून खाली ठेवलं. पाठोपाठ अन्यानही खाली उडी मारली. कुट्टीनं घराकडे बघितलं , तेव्हा डोळ्यात भरलं ते काळभोर दारं , अन दारावरचं मोठ्ठ पितळी कुलूप.

"तुम्ही थांबा इथेच." बाबा त्या दोघांना तिथेच उभे करून वरच्या घरमालकांकडे किल्ली घ्यायला गेले.

बाबांनी घर उघडून दिलं तशी ट्रक मधली माणसं सामान काढायला लागली. बाबांनी त्यातली सायकल घेतली.

"चला , आता आपण शुभाआत्याकडे जायचं आहे."

"कोण शुभआत्या?" कुट्टी शुभआत्याच नाव पहिल्यांदाच ऐकत होती.

"अगं , माझी चुलत बहीण आहे. इथे जवळच घर आहे तिचं . तुम्ही दिवसभर तिथेच राहायचं. शहाण्यासारखं वागायचं. त्रास नाही द्यायचा कुळाला."

बाबांनी नेहमीप्रमाणे कुट्टीला पुढच्या दांडीवरच्या छोट्या सीट वर बसवलं. अन्य मागच्या कॅरियरवर बसला. बाबा सायकल चालवायला लागले. आता कुट्टीला हात हातात धरून ठेवणं खूपच कठीण जात होत.तरी तिनं उजव्या हातानं सायकलच हँडल गच्च पकडलं पण डाव्या हातानं उजव्या हाताचं मनगट सोडलं नाही. नवीन रस्ता असल्यामुळे बाबाही सायकल हळू चालवत होते. आज तिच्याकडे कुणाचाच लक्ष नव्हतं.

तिघं शुभआत्याकडे पोचले तेव्हा आई - मावशी, दादा - ताई आधीच तिथे आलेले होते. आत्याच्या तिन्ही मुलींनी तिच्या भोवती गराडाच केला. मोठ्या अल्काताईंनी पटकन कुट्टीला उचलून घेतलं. सगळीजणं एकाचवेळी बोलत होती.

एकीकडे मोठ्यांची पटापट जेवणं सुरु झाली. आई दिसल्यावर खरं तर कुट्टीला खुप - खूप रडू आलं होतं .

"आलीस का ?" असं विचारत आईनं कुट्टीला जरा जवळ घेतलं पण परत ती आत्याशी काहीतरी बोलायला लागली. रडण्याकरता उघडलेलं कुट्टीचं तोंड परत गच्च बंद झालं.

फक्त ताई आणि कुट्टी सोडून बाकी सगळे जेऊन नवीन घरात सामान लावायला निघाले.

"मी बघते मुलींचं जेवणं - खाणं . तू ये संध्याकाळी सावकाश." आत्यानं बाबांना सांगितलं.

दिवसभर कुट्टीचे सगळ्यांनी लाडच लाड केले. आता ताई पण बरोबर होती. कुट्टीपण मग रमत गेली. आपला हात सुटणार नाही याची काळजी मात्र ती घेताच राहिली. आत्याने तिला जरा मोकळं करून जवळ घ्यायचा प्रयत्न केला पण दरवेळी तोंड गच्च बंद करून ती हात आणखीच घट्ट धरते म्हंटल्यावर तिने तिचा नाद सोडला.

जेवतांना आज कुट्टीच्या पानात गूळ - तूप पोळी पडली. तिला खूपच मजा वाटली. घरी कधीकधी तूपसाखर पोळीचा लाडू मिळायचा पण गूळ- तूप पोळी आज पहिल्यांदाच खायला मिळाली होती. दिवसभर मग छानछान गोष्टी ऐकण्यात वेळ गेला.

आता डावा हात दुखायला लागला होता. कुट्टीने मग उजव्या हाताने फ्रॉक गच्च धरून ठेवला. जरा बरं वाटलं. मग ती आणि ताई आत्याच्या मुलींच्या मागे - पुढे फिरत राहिल्या .

संध्याकाळी सायकल घेऊन बाबा परत आले तेव्हा कुट्टी नुकतीच अलकाताई बरोबर दूध आणायला बाहेर जाऊन परत आली होती. पुन्हा उजव्या हाताचं मनगट धरलेलंच होतं . आता मागच्या कॅरिअर वर ताई बसली. कुट्टी आपली नेहमीसारखीच पुढच्या छोट्या सीटवर बसली.

सकाळचं घराचं काळभोर दार दिसताच कुट्टी घराकडे पळत सुटली. पुढच्या दोन खोल्या पार करून ती स्वयंपाक घरात पोचली तेव्हा आधी काही दिसलंच नाही. सगळीकडे अंधार होता. ती तशीच दरवाज्यात उभी राहिली. हळूहळू दिसायला लागलं. कोपऱ्यात मोरी होती अन मोरीला लागून होतं तिचं निळं कपाट . कुट्टी हळूहळू कपाटाजवळ गेली. मोरीकडे पाठ केली. ओट्याकडे तोंड केलं अन तशीच ती जमिनीवर खाली बसली.

कुट्टीने उजवा हात मोकळा केला अन दिवसभरात पहिल्यांदाच तिचा चेहरा हसरा झाला.

कपाट डाव्या हाताला होतं .

------------------

Group content visibility: 
Use group defaults

छान प्रसन्न वाटले वाचताना....कुट्टी ची घालमेल कथाभर जाणवत होती... नीळ कपाट जाग्यावर गेल्यावर माझा पण जीव भांड्यात पडला

छान प्रसन्न वाटले वाचताना....कुट्टी ची घालमेल कथाभर जाणवत होती... नीळ कपाट जाग्यावर गेल्यावर माझा पण जीव भांड्यात पडला

छान कथा, खूप आवडली..

ती नैसर्गिकरीत्या डावखुरी होती. म्हणूनच तिचा डावा हात सारखा वापरला जायचा. पण हे समजून न घेता तिला धपाटा पडायचा.
आता शेवटचे तिला हायसे वाटणे नेमके हात मोकळा झाल्याने.... का ते कपाटच तिच्या डाव्या हाताला आल्याने आता आपण आपला नैसर्गिक डावा हात वापरू शकतो या कल्पनेने..

छान कथा!
कुट्टीची घालमेल छान व्यक्त झालीयं