दोन फुले

Submitted by तो मी नव्हेच on 7 August, 2020 - 23:22

दारातल्या जुई चा बहर फुलला होता
ते पाहून भिंतीवरला मोगरा खुलला होता
तेवढ्यात येणाऱ्या वार्याचा वापर करीत खुबीने
मोगर्याने होती ती दोनच फुले हलकीच मोकळी केली
आणि वार्यानेही इमानी मित्राप्रमाणे
ती फुले जुईच्या वेलाच्या पायाशी नेऊन टाकली
खट्याळ वाराही आणि थोडा वेगवान झाला
अन् तीच हवा भरून मोगरा ही डोलू लागला
जणू न्याहाळत होता जुईला आपादमस्तक
त्याने तिच्या पायी वाहिलेल्या फुलांसहीत
भिनणारा वारा जुईला ही होता जाणवत
डोलू पाहत होती ती व्दिधा मनस्थितीत जणू
जमिनीत घट्ट मुळे अन् वर शेंडा गजाला बांधल्याने
पण समोर मोगर्याला अंदाज येतच नव्हता
अन् वारा काही वाहायचा थांबत नव्हता
जुईचीही उजवीकडील दोन फुले तिच्याही नकळत
वार्यासोबत सुटली हिरव्याकंच ओढणीतून
अन् मोगरा खुलला उजवा कौल मिळाला म्हणून
पण काही केल्या भेट नव्हती होत उराउरी
गुंतत नव्हते वेल वरच्यावर अन् मुळेही खाली
काळ लोटला पण भेट झालीच नाही तशी
पण तरीही भेटतात त्यांची फुले कधीतरी
कधी देव्हार्यात तर कधी वेणीमध्ये गुंफलेली
अन् ते दोघेही मानतात समाधान सहवासाचे
थोडेसे अंतर राखूनच का असेना
त्यांना येतो त्या पहिल्या फुलांचा वास स्वतःमधूनच
एकमेकांच्या पायाशी जी वाहिली होती
रुजली असतील, भिनली असतील कदाचित
मातीमध्ये अन् पर्यायाने एकमेकांच्या मुळांमध्ये सुद्धा

- रोहन

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users