हम तो है देस मे परदेश मे निकला होगा चांद

Submitted by रेव्यु on 7 August, 2020 - 05:19

हम तो है परदेस मे ... देस मे निकला होगा चांद
जसजीतच्या या ओळी मला अनेक दशकांपूर्वी महाराष्ट्राबाहेर-- दूरवर हिमाचल अन उत्तरांचल तसेच विदेशी----म्हणजे अमेरिकेत कामावर असतांना अस्वस्थ करून जायच्या.. खूप गतकालविव्हल म्हणजे नॉस्टॅल्जिक होत असे.
विशेषतः कोजागिरी निमित्त एकत्र बसलो ( परदेशी ) की हमखास ही गझल व्हायची अन एकदम अस्वस्थ शांतता...... आम्हा सर्व विजनवासीयांना एका खिन्न मनः स्थितीत न्यायची. अशा बैठकीत जुनी मराठी-हिंदी गाणी व्हायची..... मसाल्याचे दूध व्हायचे.... माहौल असा खिन्न... पण सुखद अन दु:खद खिन्नता आणणारा व्हायचा... या हमदर्द भावनातून जिवलग मित्र झाले. गंमत म्हणजे या मेळाव्यात अनेक अ-महाराष्ट्रीय सुध्दा असायचे अन त्यांच्या सणात आम्ही देखील तितकेच समरस होवून सामील व्हायचे.
पण भावना मात्र तिच ... हम तो है परदेस में ... अशीच असायची ... अगदी प्रत्येकाची!
ती सुख-दु:ख संमिश्रित भावना आम्हाला एकमेकांना समभावी बनवायची.
वर्षे लोटत गेली. मुले मोठी झाल्याने म्हणा वा व्यावसायिक प्रगतीच्या हावेने म्हणा... आम्ही पांगलो. व्यवसायात यशस्वी झालो आणि बहुतेक जण मायदेशी परतलो... आपापल्या राज्यात. गुहा आणि बंदोपाध्याय कोलकात्त्याला स्थायि झाला... मणि कोयंबत्तूरला गेला.... पाटणकर इंदूरला अन सिन्ग आणि चावला... लुधियानाला.... तय्यब बोहरी अमदावादला... अशी ही पांगापांग!
मुलामुलींच्या लग्न समारंभाला आवर्जून भेटायचो... जुन्या आठवणी काढून हळहळायचो....
ती सुखद दु:खद भावनांच्या अनुभवाची वीण अजूनही घट्ट होती.... आहे.

पण...
मायदेशी परतल्यावर ते बंध रेशमाचे पुन्हा विणू शकलो नाही. अप्रूप वाटणारे पु.लंचे सी डी संच, वा मणीकडील एम एस सुब्बलक्षमींचे गायन , वा चावला आंटींच्या गिद्द्याला आपापल्या राज्यात फारसे भावनिक स्थान नव्हते अन त्यांच्या पुनरावृत्तीत ती भावनिक कौतुकाची ओढ नव्हती. एकत्र साजरा केलेला लोहडीचा, पोंगलचा, गुढी पाड्व्याचा सण आमच्या पैकी कोणा एकाच्या ......त्या राज्याच्या मूळ निवाशाच्या मनात....... ती “ हम तो है, परदेस में, देस में निकला होगा चाँद”ही ओळ व्यथित करून जायची आणि ती त्याच्या चेहर्‍यावर झळकता क्षणीच आमच्या ही मनात हुरहुर लागायची आणि मग आम्ही हमदर्द व्हायचो.
हे आता होत नाही. सण सर्व आपलेच असतात ... पण ते आर्जव नसते .... का कुणास ठावूक !!
म्हणूनच आता इथे नाशकात सण साजरे होतात तेव्हा याच ओळी मला अशा रूपात व्यथित करतात
’ हम तो है देस में... परदेस में निकला होगा चाँद !!”

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वय हा मोठा घटक आहे.वाढत्या.वाढत्या वयानुसार bhavana hi निबर होत जातात.

परदेशात जवळच्या माणसांच्या सोबतीची (विशेषतः सणासुदिनाला) जितकी गरज वाटते, तितकी देशात , आपल्या माणसांत वाटणार नाही.

देस में निकला होगा चाँद ही ओळ ऐकल्यावर मला जगजीतची गझल न आठवता अरुणा इराणीची एक मालिका आठवते. यु के तल्या पंजाब्यांची गोष्ट. पोलिस सोडून तिथे सगळे इंडियनच राहत होते.

>>देस में निकला होगा चाँद ही ओळ ऐकल्यावर मला जगजीतची गझल न आठवता अरुणा इराणीची एक मालिका आठवते.

मलाही ह्या नावाची एक मालिका होती हेच आठवलं. Happy

>>परदेशात जवळच्या माणसांच्या सोबतीची (विशेषतः सणासुदिनाला) जितकी गरज वाटते, तितकी देशात , आपल्या माणसांत वाटणार नाही.

हे मात्र अगदी बरोबर

असे होत असेल अशी कल्पना नव्हती. एक वेगळाच भावनिक पैलू लक्षात आणुन दिल्याबद्दल धन्यवाद.

सुंदर लिहिले आहे.
परक्या मुलुखात परक्या लोकांमधे जेव्हा आपुलकी मिळते तेव्हा जुळलेले बंध, व्यतीत केलेले क्षण, खास आठवणी बनून राहतात.

रुचा जी...... परदेशात असतांना ती भावना असते पण आपल्या देशात परतल्यानंतर काय झाले ती व्यथा इथे मांडली आहे!!!