क्लोजर (Closure)

Submitted by भानुप्रिया on 3 August, 2020 - 07:49

प्रिय,

तुझ्या माझ्यातल्या संवादाचा खळाळता झरा गोठल्याला आज २ वर्ष पूर्ण झाली. दोन वर्ष.
बरंच काही घडून गेलंय ह्या दोन वर्षात. अर्थात, तुला माहिती आहेच ते सगळं. पण मी होऊन सांगितलं मात्र नाहीये तुला, गेल्या दोन वर्षांबद्दल, एक अक्षराने सुद्धा! कदाचित म्हणूनच आज लिहावंसं वाटलं असावं.

पत्र!

जगाची आणि माझी पत्रं लेखनाच्या गरजेची व्याख्या वेगवेगळी आहे बहुतेक. माझ्या मते पत्र दोन, अगदी टोकाच्या केसेस मध्येच लिहितो आपण.
१. नाती खुलत असताना, जेव्हा ती जोपासावीत असं आपल्याला आपल्या असण्याच्या सगळ्यात आतल्या पातळीवर वाटत असतं तेव्हा,
आणि
२. जेव्हा नाती संपतात, जेव्हा त्यांच्यात पूर्वीचा मोकळेपणा औषधालाही सापडेनासा होतो तेव्हा. कारण मोकळेपणा संपला तरी अनेकदा संवादाची आस काही सुटत नाही.

गेल्या दोन वर्षात मी हजारो पत्रं लिहिली तुला, मनातल्या मनात. जवळपास रोज संध्याकाळी तुझ्याबरोबर बोलतही होते, चहा घेता घेता, अर्थात, ते हि माझ्या मनातच. आपल्या प्रत्यक्षातल्या भेटी औपचारिक ते रुक्ष असा प्रवास करत असताना माझ्या मनात खोलवर कुठेतरी एक ओऍसिस आकाराला येत होतं. आणि नुसतं कल्पनाविश्वात रमण्यापेक्षा हे काहीतरी वेगळं होतं. तुझ्या माझ्या नात्याची डिव्हिनिटी माझ्याच मनात कुठेतरी उदयाला आली होती. ती तुझ्यावर लादण्याचा माझा फोल प्रयत्न संपल्यावर मात्र त्या डिव्हिनिटीला झटकून द्यावंसं मला तरी वाटलं नाही. मग काय, जोपासत गेले मी, त्या कल्पनेला, माझ्या असण्याच्या सगळ्यात आतल्या त्या कप्प्यात. आणि खरं सांगू? माझ्या आतल्या त्या ओऍसिसनं वाचवलं मला. आपल्यातल्या रुक्षपणात हरवले होतेच मी, आणि माझ्या मनातली डिव्हिनिटी हळूहळू मला मृगजळ वाटायला लागली होती. Almost तुझ्याच नजरेनं बघायला लागले होते मी, आपल्याकडे. अर्ध्या रस्त्यात मला माझं ओऍसिस गवसलं अन् माझी मलाच नव्यानं सापडले मी.
अर्थात, ह्या सगळ्याशी तुला काडीमात्र हि घेणं देणं नाहीये ह्याची पूर्ण जाणीव असताना आज मी पत्र लिहिण्यावर वेळ घालवण्याचं ठरवलं त्यालाही एक विशेष कारण आहे.
तुला माहित्येय, १६ वर्षांपूर्वी अप्पा गेले. त्यानंतरचे काही दिवस त्यांचा फोटो ठेवलेला होता घरात, हार घातलेला, समोर दिवा लावलेला. खरं तर अप्पांचा एकदम दिलखुलास हसतानाचा फोटो होता तो. One of my favourites. पण पुढच्या काही दिवसांमध्ये घरी भेटायला येणाऱ्यांच्या दुःखात तो फोटो सुद्धा न्हाऊन निघाला होता. त्या फोटोला स्वतःची अशी एक दुःखाची किनार तयार झाली होती. आणि the worst part, ती दुःखाची किनार ना, संसर्गजन्य होती. तिला स्वतःचा परीघ वाढवण्याची भयंकर भूक होती. पण माझं ठरलं होतं. दुःखाच्या आहारी जाणं हा ऑप्शन कमकुवत मनाचा असतो. तो माझा असूच शकला नसता. ज्या माझ्या वडलांच्या हसऱ्या चेहऱ्याने माझा दिवस सुरु व्हायचा, त्या माझ्या अप्पांना मला दुःखाशी relate करायचंच नव्हतं, म्हणून मी तो फोटो माझ्यापुरता डिलीट करून टाकला होता. सोप्पं होतं हे सोल्युशन, माझ्यामते. त्या वेळेपुरता.
पण काही काळ गेला, भेटायला येणाऱ्यांची संख्या रोडावत गेली, आणि आमचं आयुष्य परत शक्य तितकं routine ला यायला लागलं, तस तसं मला काहीतरी चुकत असल्याची जाणीव व्हायला लागली. वर वर सगळं उत्तम होतं. आम्ही पुन्हा सुरक्षित होतो, खायला-प्यायला मिळत होतं, अप्पा गेल्यानंतर अम्माच्या शिस्तीत वाढ झाली असली तरी तिचं प्रेमही कणभर वाढलं होतं. सगळं आलबेल दिसत असताना मला काय सलत होतं हे एक मोठं कोडंच होऊन बसलं होतं.
मला अजूनही लख्ख आठवतंय. रविवारची दुपार होती, माझी धाकटी मावशी आली होती घरी. आणि आम्ही जेवणानंतर हॉलमध्ये जुने अल्बम काढून बसलो होतो. जुन्या फोटोज् वर तासन् तास कुटाळक्या हा तिचा आणि माझा जुना उद्योग. त्या दिवशी अम्मा-अप्पांच्या लग्नाचे फोटो बघताना एक क्षणात सगळं क्लीअर झालं, माझं मलाच.
दुःखाची किनार त्या स्पेसिफिक फोटोला किंवा इतर कुठल्या फोटोला नव्हतीच मुळात. ती होती माझ्या असण्याला. त्या दुःखानं मला व्यापलं होतं. अप्पा गेले हि फॅक्ट बुद्धीनं स्वीकारली असली तरी मनानी ती प्रोसेसच केली नव्हती. इतका काळ उलटून सुद्धा. सुख आपण readily स्वीकारतो. पण दुःख समजून घ्यावं लागतं, स्वतःला समजावून सांगावं लागतं. त्या रविवारच्या दुपारी मी पहिल्यांदा अप्पांचं नसणं प्रोसेस केलं, इमोशनली. त्या दिवशी पहिल्यांदाच, अप्पांच्या फोटोकडे बघून आतपर्यंत प्रसन्न वाटलं मला. ऑल्मोस्ट अप्पांनी ‘फायनली’ म्हणून सुस्कारा सोडल्यासारखं.
कसलंतरी जडशीळ वजन छातीवर बांधून फिरत होते मी, त्या दिवशी त्यातून मोकळी झाले. माझं मन आणि माझ्या भोवतालचं संबंध जग मोकळं स्वच्छ झालं होतं.
मला पहिल्यांदा कळलं त्या दिवशी, मृत्य स्वीकारणं का आणि किती महत्त्वाचं असतं ते.
पण त्या मोकळेपणा नंतर जे काही माझ्या वाट्याला आलं त्यासाठी मी नक्कीच तयार नव्हते.
अप्पांना जाऊन साधारण ७-८ महिने झाले असतील तेव्हा. संध्याकाळची वेळ होती, मी कॉलेजचा अभ्यास करत बसले होते. Sociology चा पेपर होता. कुठलातरी शब्द अडला म्हणून डिक्शनरी उघडली. अर्थ वाचता वाचता माझ्याही नकळत डोळ्यात पाणी.
अप्पा असेपर्यंत, त्यांनी सांगितल्याशिवाय, छे, खरं तर डोळे वटारल्याशिवाय, मी डिक्शनरी हातातही घ्यायचे नाही. मग अप्पा त्यांच्या स्टाईलनी शब्दार्थ समजावून सांगायचे.
हे सगळं आठवून, डोळ्यात पाणी येणं ह्यामध्ये जेमतेम एक-दोन मिलिसेकंद गेले असतील. पण अप्पांचे किस्से आठवले, कितीही मजेशीर गोष्टी आठवल्या, रागावणं आठवलं तरी अप्पांचा चेहराच येईना रे डोळ्यासमोर. फोटो बघून बघून डोक्यात फिट्ट बसलेली इमेज वेगळी आणि जिवंत असतानाच्या त्या माणसाच्या, त्याच्या हालचालींच्या, लकबींच्या, हसताना किंवा रागावताना त्यांच्या चेहऱ्यावर जाळं विणणाऱ्या रेषांनी तयार होणारी इमेज वेगळी. फारसं बोलले नाही हे कधी कोणाला मी, पण त्या दिवशीनंतर अप्पा मला फक्त कै. श्री. भास्करराव जोशी म्हणूनच दिसत राहिले. माझ्या आठवणीतले अप्पा हळूहळू लुप्त होत गेले. आयुष्याचे व्याप वाढत गेले तसतसं मी ते सहज स्वीकारातही गेले.
तुला सांगू? अगदी आत्ता आत्तापर्यंत मी चेहरे विसरण्याचा हा phenomenon फक्त मृत्यूशीच जोडला होता. जिवंत माणसांचे चेहरेही विसरले जातात हे गेल्या काही दिवसातच कळलं मला, अन् खरं तर पायाखालची जमीन सरकली माझ्या.
झालं असं, की कसल्यातरी संदर्भात तुझा उल्लेख झाला. अन् भराभर आपली ओळख ते अनोळख हा सगळा प्रवास घडत गेला डोळ्यांसमोर. कित्ती काय काय आठवत गेलं.
हिशोब केला तर पायाशी किमान चार फुटाचा ढीग तयार होईल, फक्त सिग्रेटिंच्या थोटकांचा. चहाचे सतराशे साठ कप ही असतील, कोपऱ्यात कुठेतरी. झिंग आणायला दारू लागली नाही कधी, पण ती ही आहेच की, ह्या हिशोबात! तासनतास आठवले. तेव्हा अर्थपूर्ण वाटलेल्या कित्येक गप्पांचे. कडाक्याची भांडणं अन त्यानंतर काही तास ते काही दिवस चाललेले अबोले सुद्धा तितक्याच आवेगानं आठवणींच्या पडद्यावर उतरले.
खरं तर एखाद्या माणसाची आठवण म्हणून हे इतकं पुरायला हवं. पुरून उरायला हि हरकत नाही माझी. पण हे सगळं दिसलं डोळ्यासमोर अन् तरीही तुझा चेहरा काही येईना. कित्ती प्रयत्न केला तरी हि मला माहिती असलेला, ज्याच्याशी माझा काहीतरी एक खोल आणि जुना ऋणानुबंध आहे असा माझा पक्का समाज होता, असा तो ‘तुझा’ चेहरा काही केल्या माझ्या डोळ्यांसमोर येईना. आतल्या आत काहीतरी तुटत गेलं त्या दिवशी.
म्हणजे तुटलं होतंच आपल्यातलं सगळं, पण माझ्या मनात जपलेला तू सुद्धा त्या दवशी हरवलास.
माणूस गेला कि आपण दिवस करतो त्याचे. त्या माणसाच्या नसण्याला प्राक्टिकॅलिटी देण्यासाठी. त्याचं नसणं सगळ्यांना सवयीचं व्हावं ह्यासाठी. त्याला दिवसांची मर्यादा घालून दिलेली असते. प्रोजेक्ट डेडलाईन असते तसंच! आणि गम्मत म्हणजे येतं सगळं पूर्वपदावर. रोजच्या जगण्याची काळजी भेडसावायला लागली कि आपोआपच एखाद्याचं नसणं, त्याच्या आठवणीने डोळ्यातलं पाणी न खळणं, अन्नावरची वासना उडणं, जगणं निरर्थक वाटणं ह्या सगळ्याची तीव्रता कमी कमी होत जाते. आठवण येतच नाही असं नाही. पण जगणं थांबू नये म्हणून केलेली हि एक अरेंजमेंट.

पण नात्यांचं काय रे?
नाती तुटतात तेव्हा कुठे होतात शोक सभा? दिवस तरी कुठे करतो आपण? एक दिवस आलबेल असलेलं सारं दुसऱ्या दिवशी असेनासं होतं तेव्हा कोण येतं सांत्वन करायला? कुठे असतो ह्या सगळ्याशी अड्जस्ट होण्याचा वेळ? कुठे मिळते शांतता? घट्ट विणलेल्या नात्यांच्या मृत्यूचा दुखवटा कोण आणि कसा पाळतं?
नाती संपतात तेव्हा फक्त चर्चा घडतात, शत्रुपक्ष आणि मित्रपक्षांमध्ये. कोण चुकलं, कसं चुकलं. हे नातंच मुळात कसं चुकीचं होतं, ह्यात समोरच्याने तुमचा गैरफायदा कसा घेतला, आणि तुम्ही कसे मूर्ख होतात आणि आणखीन मूर्ख बनत गेलात ह्याचे नेटके हिशोब मांडले जातात. आणि कोणाचाही आपल्याला दुखवायचा हेतू नसतो. इन फॅक्ट exactly विरुद्ध हेतू असतो. तो म्हणजे आपण योग्य होतो आणि नात्याच्या मृत्यूची खरी जबाबदारी समोरच्यावर आहे असं सांगण्याचा सगळ्यांचा प्रयत्न असतो. कारण त्यांचं आणि आपलं नातं त्या पॉइंटला घट्ट असतं रे! ते फक्त त्या घट्ट असणाऱ्या नात्यासाठी किंवा असं म्हणूयात कि त्या नात्याच्या बांधिलकीतून बोलत असतात. मजेशीर आहे ना हे हि खरं तर? एका मृत्यूच्या प्रसंगी इतर नात्यांचा जन्म सोहळा घडत असतो! ह्या सगळ्यात मनोरंजन होतं, सांत्वन होतं, धीर दिला जातो, आधार दिला जातो, पण नेमकं हवं असलेलं closure तेवढं मिळत नाही.

हे पत्र त्या माझ्या राहिलेल्या closure साठी. ‘आपल्याला’ लागलेला हा गंज कधीतरी उतरेल ह्या गैरसमजातून मी आता स्वतःला मोकळं करतेय.
--
माझीच, मी!

Group content visibility: 
Use group defaults

"हे पत्र त्या माझ्या राहिलेल्या closure साठी. ‘आपल्याला’ लागलेला हा गंज कधीतरी उतरेल ह्या गैरसमजातून मी आता स्वतःला मोकळं करतेय"
.. अतिशय समर्पक आणि नेमकं... मी आज अशाच एका विषयावर मैत्रीणीशी बोलत होते आणि आता हे वाचलं. माझ्या मनातलेच विचार वाचते आहे असं वाटलं.

हे पत्र त्या माझ्या राहिलेल्या closure साठी. ‘आपल्याला’ लागलेला हा गंज कधीतरी उतरेल ह्या गैरसमजातून मी आता स्वतःला मोकळं करतेय.
--
माझीच, मी

++100

लिखाणाची शैली खूप छान आहे
'As you write more and more personal becomes more and more universal.'... ~ व पु

wow ! what a write up ! आप्पांबद्दल लिहिलेले एकदमच जबरदस्त आहे.

छान लिहिलंय.. आप्पांबद्दल जास्त लिहिल्या गेलंय अन "प्रिय" बद्दल कमी.. घाई घाईत आवरतं घेतल्यासारखं (कि फक्त मलाच असं वाटतंय?)

सगळ्यांना खूप खूप धन्यवाद!

मायबोलीवर असलेल्या जवळपास दहा वर्षांमध्ये मी मोजक्या कविता, काही ब्लॉग पोस्टस आणि थोड्या रेसिपीज इतपतच लिहिलंय. कथा किंवा कथा सदृश काहीही हा माझ्या प्रांत नाही असा माझ्या ठाम समज होता (आहे!). पण मध्यंतरी लिहायला सुरुवात केली आणि ही कथा घडली. पूर्ण केलेली ही दुसरी कथा. पहिली इंग्लिश आहे, भाषांतर करून ती ही पोस्टेनच! पण आज इथल्या प्रतिक्रिया आणि प्रतिसाद वाचून लिहिण्याचा हुरूप आलाय हे नक्की!

पुन्हा एकदा आभार!

छान लिहिलंय.. आप्पांबद्दल जास्त लिहिल्या गेलंय अन "प्रिय" बद्दल कमी.. घाई घाईत आवरतं घेतल्यासारखं (कि फक्त मलाच असं वाटतंय?)

Submitted by अजिंक्यराव पाटील on 3 August, 2020 - 22:58

>>>>>

प्रिय बद्दल वेगळं लिहावं असं नाही वाटलं, त्या अनुषंगाने किंवा त्या नात्याच्या अनुषंगाने जितकं ह्या कथेला गरजेचं होतं तेव्हढंच लिहिलंय. अप्पांचा उल्लेख overall सूचक आहे!

खूप छान .. आतपर्यंत पोहोचलं .
लॉकडाऊन च्या निमित्ताने बरेच जुने ID लिहायला लागले आहेत. हे खरंच सुखावह आहे. Happy
पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

किती दिवसांनी!
आवडले ग

>>>

अनिश्का, परवाच तुझी आठवण आली होती गं! २०११-१३ ह्या काळात आपण काही जणी केवढ्या active होतो!

खूप छान .. आतपर्यंत पोहोचलं .
लॉकडाऊन च्या निमित्ताने बरेच जुने ID लिहायला लागले आहेत. हे खरंच सुखावह आहे. Happy
पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

Submitted by सामी on 4 August, 2020 - 08:25

>>>

मोठ्ठी मिठी तुला! जुन्या IDs ची गंमतच वेगळी होती बघ! सॉलिड मिस करते मी जुन्या स्टार्सच लिखाण!

धन्यवाद, सगळ्यांना! Happy

कथा म्हणूनच लिहिलंय हे सगळं, खरोखरचं पत्र नाहीये! (उगाच आपलं एक clarification!)